शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

क्रोधाग्ने नम:

श्री विष्णू सहस्रनामात `क्रोधाग्ने नम:' असंही नमन आहे. वरवर पाहता गंमत वाटते, पण भारतीय चिंतन परंपरेची हीच अद्वितीयता आहे. ती वरवर आणि भोंगळ विचार करत नाही. या जगाचीच नव्हे, तर त्याच्या आदिकारणापासून साऱ्याचीच व्यामिश्रता, त्यातील अंतर्विरोध, त्यातील असंगती यांचाही त्यांनी धाडसाने, सत्यान्वेषी बुद्धीने, निर्ममतेने वेध घेतला. त्यातूनच त्या चिंतन परंपरेने कैवल्य सत्याची मांडणी केली; ज्याला जगात कोणतीही तोड नाही. `क्रोधाग्ने नम:' हेही त्याचंच उदाहरण. केवळ जगात क्रोध आहे, अन म्हणून त्याला नमन एवढाच त्याचा आशय नाही. नाईलाजाने त्याचा स्वीकार आणि त्याला नमन नाही. तर क्रोध ही या विश्वाची गरजही आहे. हे मान्य करायला, स्वीकारायला जे धाडस लागतं ते त्यांच्याकडे होतं. कोणाचा तरी क्रोध कोणत्या तरी गोष्टीला अटकाव करत असतो; कोणाचा तरी क्रोध कोणाचा तरी विवेक जागा करीत असतो. त्याचे प्रमाण, प्रसंग, प्रेरणा हे महत्वाचे असतात. परंतु क्रोधविहिनता ही चुकीची गोष्ट आहे. क्रोध असायलाच हवा. प्रश्न येतो- प्रमाण, प्रसंग, प्रेरणा कसे निश्चित करायचे? प्रमाण, प्रसंग, प्रेरणा निश्चित करण्यासाठीच प्रार्थना हवी. नकारात्मक, हीन समजल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टींबाबत हे सत्य आहे. म्हणूनच `लोकाभिराम' जसा प्रणम्य, तसाच `रणकर्कशराम' देखील प्रणम्य. या जगातील कोणतीही गोष्ट टाकावू नाही. त्याज्य नाही. अगदी विषसुद्धा. मुळातच पाश्चात्य चिंतन परंपरा सत्याऐवजी, स्वसुख यालाच प्रमाण मानणारी असल्याने; अर्धवट, एकांगी आहे. ती अस्तित्वाच्या व्यामिश्रतेचा स्वीकार करण्याऐवजी एकांगी स्वप्नाळूपणावर आधारित आहे. त्यातूनच निर्माण झालेल्या वर्तमान सामाजिक व अन्य तत्वज्ञानाने `चांगल्याची' एक भंपक चौकट तयार करून ठेवली आहे. त्यामुळेच आज बोधशून्य कंठशोषी चर्चांचा महागोंधळ घरापासून विश्वापर्यंत प्रत्येक बाबतीत पाहायला मिळतो. दुर्दैवाने विष्णू सहस्रनामाविषयी आस्था आणि श्रद्धा असणारेही प्रत्यक्षात स्वप्नाळू एकांगीपणात गुरफटलेले अनेकदा पाहायला मिळतात. विष्णू सहस्रनामातच म्हटल्याप्रमाणे `अर्थाय नम:' सोबतच `अनर्थाय नम:' हे समजून घेणाऱ्या वैचारिक धाडसाची आज नितांत गरज आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ९ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा