सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

महात्मा गांधींचे अर्थचिंतन


`अर्थ' या विषयाचा विचार करताना स्वाभाविकच महात्मा गांधी यांचा विचार केला जातो. परंतु गांधीजींनी `अर्थ' या विषयाबाबत काय विचार वा मते मांडलीत याकडे वळण्यापूर्वी, एका गोष्टीची खूणगाठ बांधणे आवश्यक आहे की, गांधीजींचा आर्थिक विचार हे त्यांचे अर्थशास्त्र नाही. शास्त्र म्हणून त्यांच्या विचारांकडे पाहता येणार नाही. `शास्त्र' या संज्ञेसाठी ज्या पद्धतीचा अभ्यास आणि मांडणी हवी, तशी ती नाही. त्यामुळे प्रचलित अर्थाने ते शास्त्र नाही. गांधीजींचा अर्थविचार हे अर्थचिंतन आहे आणि अर्थशास्त्राला आधार देण्याचीही त्यात क्षमता आहे. असे असले तरीही त्यांच्या अर्थचिंतनात माहितीचा वा घडामोडींचा अभाव आहे, असे मात्र नाही. त्यांचे जीवन हे अतिशय कर्ममय जीवन होते. बालपण असो, इंग्लंडमधील शिक्षणासाठीचे वास्तव्य असो, व्यवसायानिमित्तचा दक्षिण आफ्रिकेतील दीर्घ निवास असो, की भारतात परतल्यानंतरचा स्वातंत्र्यलढ्यातील दीर्घ सहभाग असो; अनुभवांचे समृद्ध भांडार त्यांच्याकडे होते. घडामोडी, लोकस्थिती, गरजा, व्यवस्था, समस्या यांची अतिशय चांगली जाण त्यांना होती. या साऱ्याबाबत त्यांना जे वाटले ते त्यांनी वेळोवेळी बोलून वा लिहून प्रकट केले. एखाद्या समस्येवरील वा विषयावरील प्रबंध असे त्याचे स्वरूप नाही. वेळोवेळी त्यांनी दिलेले responses आणि स्वतंत्र भारताचे चित्र रेखाटताना त्यांनी केलेले रेखाटन म्हणजे गांधीजींचे विचार. त्यांच्या दुर्दैवी हत्येनंतर त्यांच्या या विस्तृत लिखाणातून आणि भाषणातून विषयवार संकलन करून अनेकांनी ते समाजापुढे ठेवले. त्यानंतर विविध विषयांच्या अनुषंगाने गांधीजींच्या चिंतनाचा मागोवा घेतला जाऊ लागला.
समाजातील शेवटचा माणूस हा त्यांच्या सगळ्या विचारांचा केंद्रबिंदू होता. कोणतीही योजना, कोणताही कार्यक्रम, कोणताही उपक्रम त्या शेवटच्या व्यक्तीला सक्षम बनवतो का? त्याला वर उचलतो का? ही त्यांची कसोटी होती. त्यासाठी त्यांनी `अंत्योदय' असा शब्द वापरला. रस्किनच्या `unto this last' याचा तो भावानुवाद. अर्थविचाराला सुद्धा हीच कसोटी ते लावीत असत. या अखेरच्या व्यक्तीचे चांगले जीवन हा त्यांचा ध्यास होता. तो त्यांच्या आर्थिक विचारांचा हेतू होता. हा हेतू साध्य करण्यासाठीचे प्रयत्न, पद्धती, व्यवस्था यांचा त्यांनी उहापोह केला. अन हे साकार करण्यासाठी आधारभूत विचार आणि तत्वज्ञान यांचीही त्यांनी चर्चा केली. हेतू, प्रक्रिया आणि आधारभूत विचार असे त्यांच्या अर्थचिंतनाचे तीन पैलू म्हणता येतील.
स्वयंपूर्ण गावे हा गांधीजींच्या सामाजिक आणि आर्थिक विचारांचा एक महत्वाचा घटक. बहुसंख्य भारतीय जनता आजही छोट्या गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये राहते. गांधीजींच्या काळी तर हे प्रमाण फार मोठे होते. या लाखो गावात विखुरलेल्या कोट्यवधी लोकांचा विचार प्राधान्याने करायला हवा असे त्यांचे मत होते. या कोट्यवधी लोकांचे दारिद्र्य, त्यांची भूक, त्यांचे आरोग्य, त्यांच्या वेळेचा सदुपयोग; हे सारे गांधीजींच्या चिंतनाचे विषय होते. आदर्श खेड्याची त्यांची कल्पना मांडताना ९ जानेवारी १९३७ च्या `हरिजन'मध्ये गांधीजी म्हणतात- `हिंदुस्थानातील आदर्श खेड्याची रचना अशी असेल की जेथे संपूर्ण स्वच्छता ठेवणे सुकर होईल. या खेड्यातील घरांची रचना भरपूर उजेड आणि हवा खेळत राहण्यासारखी असेल आणि घरांचे सामान असे वापरलेले असेल की जे त्या गावच्या आसपासच्या पंचक्रोशीत मिळण्याजोगे असेल. घरांच्या पुढे मोकळी जागा असेल आणि त्यात घरमालकाला त्याच्या घरच्या वापरासाठी भाजीपाला लावता येईल. गुराढोरांकरिता निवारा करता येईल. खेड्यातले रस्ते आणि गल्ल्या या काढून टाकता येण्यासारख्या धुळीपासून मुक्त असतील. गावच्या गरजेप्रमाणे गावात विहिरी असतील आणि त्या सर्वांना वापरता येण्यासारख्या असतील. गावात सर्वांच्याकरिता उपासनागृहे असतील. एक सार्वजनिक सभागृह असेल. गावची गुरे चारण्याकरिता एक सामयिक कुरण असेल. सहकारी दूधपुरवठा केंद्र असेल. प्राथमिक व दुय्यम शाळा असतील. तेथे औद्योगिक शिक्षणाला मध्यवर्ती स्थान असेल. गावची पंचायत असेल व त्यात तंटे मिटवले जातील. गाव आपले धान्य, भाजीपाला आणि फळे स्वत:च पिकविल. तसेच आपल्याला लागणारी खादी काढील. ही माझी नमुनेदार गावाविषयीची सामान्य कल्पना आहे.'
गावे संपन्न आणि स्वयंपूर्ण राहावीत हा त्यांचा आग्रह होता. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा आणि त्यासोबत आरोग्य व शिक्षण हे त्यांचे प्राधान्यक्रम होते. प्रत्येक व्यक्तीला हे सारे त्याच्या गरजेप्रमाणे, सहजपणे आणि माफक दरात मिळायला हवे असे त्यांचे प्रतिपादन होते. हे कसे करता येईल यासाठीचे प्रयोगही त्यांनी केले. आहार सकस, पोषक आणि परवडेल असा असला पाहिजे असा विचार मांडताना त्यासाठी त्यांनी प्रयोग केले. असाच एक प्रयोग २२ ऑक्टोबर १९३५ रोजी त्यांनी मगनवाडी येथे केला. वर्ध्याच्या आसपासच्या गावातील कार्यकर्त्यांना त्यांनी जेवायला बोलावले आणि सर्वसामान्य माणसाला झेपेल असा आहार कसा असू शकेल त्याचे प्रात्यक्षिक सगळ्यांना दाखवले. एकूण ९८ लोक जेवायला होते. त्या जेवणात कणिक, टमाटे, गूळ, लाल भोपळा, जवसाचे तेल, दूध, सोयाबीन, नारळ, कवठ, चिंच, मीठ यांचे पदार्थ होते. हा खर्च प्रती व्यक्ती सुमारे सहा पैसे होता. जेवणानंतर गांधीजींनी त्यावर विवेचन देखील केले होते. असे वेगवेगळे प्रयोग आणि प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षण यावर बेतलेले आपले मत व्यक्त करताना १९ ऑक्टोबर १९४७ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `पहिला धडा आपल्याला शिकायचा आहे तो स्वावलंबनाचा आणि स्वत:च्या बळावर विसंबून राहण्याचा. हा धडा जर आपल्या गळी उतरला तर परक्या देशांवर अवलंबून राहण्याच्या आणि अंती दिवाळखोर बनण्याच्या घातकी अवस्थेतून आपण मुक्त होऊ शकू. अन्नपदार्थांचे केंद्रीकरण करणे घातक आहे असे मला वाटते. विकेंद्रीकरणाने काळ्या बाजाराला सहजच आळा बसतो. इकडून तिकडे वाहतुकीत होणाऱ्या वेळेच्या आणि पैशांच्या खर्चात बचत होते. शिवाय, धान्ये, कडधान्ये पिकवणाऱ्या खेडेगावच्या माणसाला आपली पिके उंदरा घुशींपासून कशी वाचवावीत याचे ज्ञान असते. एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात नेताना उंदीर घुशी धान्य खाऊन टाकतात. त्यायोगे देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. खंडोगणती धान्याला आपण आचवतो. वास्तविक चिमूट न चिमूट धान्य आपल्याला हवे आहे. जेथे कोठे धान्य काढता येत असेल तेथे ते काढले पाहिजे.' स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनीदेखील गांधीजींनी मांडलेला हा विचार महत्वाचा ठरतो. खेडोपाडी उपलब्ध असलेले मनुष्यबळ व साधनसंपत्तीच नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यातून त्यांच्या गाठी असलेला अनुभव व कौशल्य हे देखील महत्वाचे आहे यावर त्यांचा भर होता.
गावातील कुटुंबांनी शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर शेती करण्यापेक्षा सामूहिक शेती करावी असे त्यांचे मत होते. ते अधिक फायदेशीर व हिताचे ठरेल असे त्यांना वाटत असे. मात्र ही सामूहिक शेती याचा अर्थ आज मांडण्यात येत असलेला corporate शेतीचा प्रकार नव्हे. तसेच वरून लादलेला, सरकारी योजनेचा भाग असेही नव्हे. तर गावातील लोकांनी परस्पर सहकार्य, विश्वास यांच्या आधारावर सामूहिक हित जपण्यासाठी आणि सगळ्या गावच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी एकत्र येऊन करावयाची शेती, असे त्याचे स्वरूप गांधीजींना अपेक्षित होते. निर्णयप्रक्रिया, विनिमय प्रक्रिया, व्यवसाय इत्यादी पूर्णत: गावातील जनतेच्या हाती असावे आणि सामूहिक शहाणपणाच्या आधारे त्यांनी काम करावे असा त्यांचा विचार होता. जमिनीचा कसदारपणा टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खते वापरावी. ही सेंद्रिय खते गावातीलच काडीकचरा, टाकून देण्यात येणारे अन्न, झाडपाला, शेण व मानवी विष्ठा यांचा वापर करूनच तयार करावी. खतांसाठी गावाबाहेरील कशावर वा कोणावर अवलंबून राहावे लागू नये अशी त्यांची भूमिका होती. गावांच्या स्वयंपूर्णतेच्या त्यांच्या विचाराला सुसंगत असाच हा विचार होता.
ग्रामीण अर्थकारण आणि जीवन यांचा विचार करताना त्यांनी गायीगुरांचाही विचार समोर ठेवला आहे. या बाबतीत त्यांचा दृष्टीकोन व्यावहारिक आणि भावनिक असा दोन्ही आहे. यासंबंधात १५ फेब्रुवारी १९४२ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `आज गाय नष्ट होण्याच्या पंथाला लागली आहे. आमचे तिला वाचविण्याचे प्रयत्न यशस्वी होतीलच याची मला खात्री नाही. पण जर ती नष्ट झाली तर तिच्याबरोबर आपणही नष्ट होऊ. आपण म्हणजे आपली संस्कृती. आपली मूळची अहिंसक व ग्रामीण संस्कृती.' गायीगुरांवर प्रेम करणारे आणि त्यांना निर्दयीपणाने वागवणारे असे दोन्ही प्रकारचे लोक असतात याचा उल्लेख करून, निर्दयीपणाने वागणाऱ्या लोकांबद्दल ते लिहितात- `जर आपण आपली रीत सुधारली तर आपण दोघेही वाचू. नाहीपेक्षा दोघेही बरोबर तरू किंवा बुडू.' उपासमार आणि दारिद्र्य यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी गायीगुरांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक आहे असे प्रतिपादन करून, आपल्या ऋषींनी आपल्याला हा उपाय दाखवून दिला आहे, असेही ते नमूद करतात. गायींचे पालनपोषण कसे करावे याबाबत त्यांचा विचार व्यवहार्य आहे. शेतीप्रमाणेच हे सुद्धा सामूहिक सहकार्याच्या पद्धतीने करावे असे त्यांचे मत होते. एकट्या कुटुंबाला आपल्या गुरांची योग्य निगा राखणे, पालनपोषण करणे व्यवहार्य नाही, असे त्यांचे मत होते. `गोरक्षण' हा शब्द बरोबर नसून, `गोसेवा' हे आपले ध्येय असले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.
जमीनधारणा हा एक मोठा बिकट प्रश्न होता आणि आहे. भूमिहीन आणि जमीनदार असे दोन वर्ग कल्पिले जातात आणि त्यांच्यातील संघर्ष गृहीत धरला जातो. त्यावर गांधीजी म्हणतात- `पहिले पाऊल म्हणून जमीनदार आणि भूमिहीन यांच्यात परस्परांविषयी आदर आणि विश्वास यांचे वातावरण प्रस्थापित झाले पाहिजे. म्हणजे मग वरच्या वर्गात आणि सामान्य समाजात हिंसक संघर्ष होण्याची शक्यता राहणार नाही. वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे असे मला वाटत नाही.' यावर अधिक प्रकाश टाकताना, अमेरिकेचे एक पत्रकार लुई फिशर यांच्याशी सेवाग्राम आश्रमात १९४२ सालच्या जून महिन्यात चर्चा करताना गांधीजी म्हणाले- `जो कसतो त्याची जमीन आहे हे मला मान्य आहे. परंतु त्याचा अर्थ जमीनदाराचा नाश केला पाहिजे असा करण्याचे कारण नाही. जो मनुष्य बुद्धीचा आणि नाण्यांचा पुरवठा करतो, तो हातांनी श्रम करतात त्यांच्याइतकाच कसणारा आहे. या दोघांमध्ये आज जी भयंकर विषमता आहे ती काढून टाकणे, हे आम्हाला साधायचे आहे.' यावर फिशर यांनी मुद्दा मांडला की, ही सुधारणेची क्रिया फार दीर्घ आहे. त्याला उत्तर देताना गांधीजी म्हणतात- `अत्यंत दीर्घ वाटणारी क्रिया पुष्कळ वेळा अत्यंत जवळची असते.' साम्यवाद आणि भांडवलशाही हे दोन्हीही गांधीजींनी या ठिकाणी सपशेल फेटाळले आहेत. अर्थकारणातील भांडवल आणि श्रम या दोहोंचे महत्व आणि जीवनाचे प्रवाहीपण यांचा एकत्रित विचार करून, एक समन्वयात्मक विचार व्हावा अशीच त्यांची भूमिका होती. अन आपल्या भूमिकेवर ते अतिशय ठाम होते. २ जानेवारी १९३७ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `खरा समाजवाद आमच्या पूर्वजांकडूनच वारसाने आमच्याकडे आला आहे. त्यांची शिकवण अशी की,
`सभी भोम गोपाल की या मे अटक कहां
जाके मन मे खटक रही सोही अटक रहा'
ईशावास्य उपनिषदाच्या प्रथम मंत्रातील भावार्थच यात प्रकट झाला आहे. अन्यत्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलेही आहे की, ईशावास्य उपनिषदाचा प्रथम मंत्र हाच त्यांच्या अर्थविचारांचा आधार आणि गाभा आहे.
हाच विषय त्यांनी १५ नोव्हेंबर १९२८ च्या `यंग इंडिया'मध्ये अधिक स्पष्ट केला आहे. ते लिहितात- `हिंदुस्थानची आणि म्हटले तर जगाचीसुद्धा आर्थिक घडण अशी असली पाहिजे की, त्याखाली असणाऱ्या कोणालाही अन्नवस्त्राची ददात सोसावी लागू नये. प्रत्येकाला स्वत:चा निर्वाह करणे शक्य व्हावे इतके काम त्याला मिळावे. जीवनाच्या प्राथमिक गरजांची उत्पादन साधने सर्वसामान्य जनतेच्या हाती राहतील तरच, हे उद्दिष्ट सर्वत्र अमलात आणणे शक्य होईल. ही उत्पादन साधने देवाच्या हवापाण्याप्रमाणे सर्वांना सर्रास उपलब्ध होण्याजोगी असली पाहिजेत. दुसऱ्यांच्या लुबाडणूकीकरिता क्रयविक्रयाचे वाहन त्यांना बनवता कामा नये. कोणाही देशाने, राष्ट्राने किंवा व्यक्तीसमूहाने त्यांची मक्तेदारी करणे अन्यायाचे होईल. या तत्वाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज आपण या अभागी देशातच नव्हे तर जगाच्या इतर भागात सुद्धा अठराविश्वे दारिद्र्य पाहत आहोत.'
अर्थशास्त्राच्या मर्यादांची चर्चा करताना १ मार्च १९३५ च्या `हरिजन'मध्ये गांधीजी लिहितात- `अर्थशास्त्राचे सिद्धांत, गणितशास्त्राच्या सिद्धांतासारखे, कधीही न बदलणारे आणि सार्वकालिक व सार्वदेशिक आहेत असे नाही. इंग्लंड फ्रान्सचे अर्थशास्त्र मानणार नाही. फ्रान्स जर्मनीचे मानणार नाही. जर्मनी अमेरिकेचे घेणार नाही. अन त्यांनी ते घेतले तर ती चूक होईल. हिंदुस्थानलाही फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका किंवा जर्मनी यांच्या अर्थशास्त्राप्रमाणे चालणे परवडणार नाही.' प्रत्येक देशाचे अर्थशास्त्र हे त्याच्याजवळ उपलब्ध साधनसंपत्ती, मनुष्यबळ, शिक्षण, संस्कृती, गरजा आदींवर बेतलेले असते आणि ते तसेच असायला हवे. एकमेकांची नक्कल करणे, अनुकरण करणे हिताचे नसते. त्यांचा यंत्रविचारही याच अंगाने जाणारा आहे. त्याविषयी ११ मे १९३५ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `ज्या देशात जमिनीवर लोकसंख्येचे दडपण सर्वात जास्त प्रमाणात आहे त्या देशाचे अर्थशास्त्र आणि संस्कृती, ज्या देशात हे दडपण सर्वात कमी आहे अशा देशाच्या अर्थशास्त्राहून आणि संस्कृतीहून वेगळेच आहे, असणे भाग आहे. विरळ वस्तीच्या अमेरिकेला यंत्रांची गरज असू शकेल. हिंदुस्थानला त्याची गरज मुळीच असू शकणार नाही. जेथे कोटी कोटीच्या संख्येने श्रम करणारे घटक निष्क्रिय पडले आहेत, तेथे श्रम वाचवण्याचा विचार करण्यात अर्थ नाही. जर एखाद्याने, खाण्याकरिता होणारे हातांचे श्रम वाचवण्याचे यंत्र शोधून काढले, तर खाणे ही आनंददायक क्रिया न राहता तो त्रासच होऊन बसेल. आमच्या दारिद्र्याचे कारण आमचे उद्योगधंदे नष्ट झाले आणि त्याबरोबर बेकारी आली हे आहे. आपण उद्योगी बनले पाहिजे आणि जेथे आज गवताचे एक पाते येते तेथे दोन उगवतील असे केले पाहिजे.'
२२ जून १९३५ च्या `हरिजन'मध्ये वीज व यंत्र यासंबंधीच्या प्रश्नाला गांधीजींनी दिलेले उत्तर त्यांची याबाबतची भूमिका स्पष्ट करणारे आहे. ते म्हणतात- `एखादा समाजवादी सुद्धा यंत्राचा अविवेकी वापर करावा अशा मताचा असणार नाही. छापण्याची यंत्रे घ्या, ती बनणारच; ऑपरेशन करण्याची हत्यारे घ्या, ती हातांनी कशी बरे बनवता येतील? मोठी यंत्रेच त्यासाठी लागणार. परंतु आळसाच्या रोगाला बरे करणारे यंत्र या चरख्यावाचून दुसरे नाही. ते कोणी नष्टही करू शकत नाही.' आजही देशात सर्वत्र पुरेशी वीज उपलब्ध नाही. गांधीजींच्या काळात तर परिस्थिती एकदमच निराळी होती. वीज ही चैनीचीच बाब होती. त्या अनुषंगाने ते म्हणतात- `जेथे वीज नाही तेथे काय करायचे? त्या हातांना काही काम देणार की नाही? की काम नाही म्हणून ते हात तोडून टाकायचे?' त्यांची भूमिका किती व्यवहारी होती हे यावरून लक्षात यावे. यंत्रतंत्र उपयोगा विषयीच्या गांधीजींच्या विचारांची तीन सूत्रे सांगता येतील. १) यंत्रतंत्राचा अंदाधुंद वापर नको. २) गरजा आणि उपलब्धता यांचा सारासार विचार करून त्याचा वापर हवा. ३) मानवी कलाकौशल्य संपुष्टात आणणारा, हातापायांचा- शरीराचा वापर करण्याची शक्ती हिरावून घेणारा आणि मनुष्यबळाला बेकार बनवणारा यंत्रतंत्राचा वापर नसावा. यंत्रतंत्राचा वापर विवेकी असला पाहिजे हाच त्याचा आशय. लोकांची तातडीची कापडाची गरज भागवण्यासाठी त्याकाळी चरख्या शिवाय दुसरा उत्तम उपाय नव्हता हे आजही नीट विचार केल्यास लक्षात येईल. चरखा सहजपणे उपलब्ध होता. कापूस सहज उपलब्ध होता. त्याला मानवी श्रमाची जोड देऊन सगळ्यांना कापड उपलब्ध होऊ शकेल ही त्यांची व्यवहारी भूमिका होती. वीज, कारखाने, वाहतूक, सूत व कापड गिरण्या, देशव्यापी बाजारपेठ; या सगळ्याच्या अभावी कोट्यवधी लोकांची साधी कापडाची गरज भागू नये हे लाजिरवाणे होते. गांधीजींचा चरख्याचा विचार हा त्या प्रश्नाला उत्तर देण्यातून पुढे आला होता.
देशाच्या विविध राज्यात सत्तारूढ असलेल्या कॉंग्रेस मंत्रिमंडळातील उद्योग मंत्र्यांची एक परिषद पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये ३१ जुलै १९४६ रोजी भरली होती. जनतेला स्वातंत्र्याचा आशय पटावा यादृष्टीने आपले आर्थिक धोरण काय असावे इत्यादी प्रश्नांवर त्या परिषदेत चर्चा झाली. गांधीजींचेही त्या परिषदेपुढे भाषण झाले. खेडेगावाला पूर्ण घटक समजून त्याची प्रतिष्ठा आणि दर्जा कसा वाढेल यावर त्यांनी त्या भाषणात उहापोह केला होता. ते म्हणाले- `हिंदुस्थानला आणि त्याच्या द्वारे जगाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर लोकांना शहरात न राहता खेड्यात राहावे लागेल. ही गोष्ट आज ना उद्या मान्य करावीच लागेल. शहरात आणि महालात करोडो लोक एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहणे कधीही शक्य होणार नाही. तशा स्थितीत त्यांना हिंसा आणि असत्य यांचा आसरा घेण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. सत्य आणि अहिंसा नसेल तर मानव समाजाला विनाशा खेरीज भवितव्य नाही, असे मी मानतो. सत्य अहिंसा ग्रामजीवनाच्या साधेपणातच अमलात आणणे शक्य आहे. हा साधेपणा चरख्यात व त्याने व्यक्त होणाऱ्या सर्व गोष्टीतच उत्तम रीतीने आढळण्यासारखा आहे. आज जग चुकीच्या मार्गाने जात असेल तर मी बावरून जाण्याचे कारण नाही. कदाचित हिंदुस्थान सुद्धा त्या मार्गाने जाईल आणि गोष्टीतल्या त्या पतंगाप्रमाणे, ज्या ज्योतीच्या भोवती तो अधिकाधिक भयानक रीतीने नाचत आहे तिच्यात जळून खाक होईल असा संभव आहे. परंतु माझ्या जीवात जीव आहे तोवर त्याला आणि त्याच्या मार्फत साऱ्या जगाला अशा मृत्यूपासून वाचविण्याचा प्रयत्न करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, मनुष्याने आपल्या ज्या खऱ्याखुऱ्या गरजा असतील तेवढ्या भागवून संतोष मानावा व स्वयंपूर्ण व्हावे.'
कारखानदारीच्या संस्कृतीवर अहिंसा उभी करता येणार नाही आणि हिटलरच्या मनात आले तरी ७ लाख स्वयंपूर्ण खेडी तो नष्ट करू शकणार नाही, असाही विचार त्यांनी मांडला होता. लुबाडणूक ही देखील हिंसाच होय असे त्यांचे मत होते. मानवी जीवनासाठी उद्योग आवश्यकच आहेत. पण याची सुरुवात खालून व्हायला हवी. ग्रामोद्योग, कुटीरोद्योग, हस्तोद्योग यापासून सुरुवात व्हावी. ज्या गोष्टी त्या उद्योगांनी तयार करता येण्यासारख्या आहेत त्या तेथेच तयार व्हाव्यात. ज्या तेथे तयार होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी टप्प्याटप्प्याने मोठे उद्योग असावेत अशा मताचे ते होते. सरकारला पैशाच्या स्वरुपात जसा कर देण्यात येतो, तशीच श्रमाच्या स्वरुपात कर देण्याची व्यवस्था असावी अशीही त्यांची सूचना होती. त्याने पैशाचा व्यवहार देखील नियंत्रित होऊ शकेल अशी त्यांची भूमिका होती.
१९४० च्या जुलै महिन्यात त्यांची काही अमेरिकन अभ्यासकांशी चर्चा झाली. खादी आणि इतर अनेक हस्तोद्योग हे मुळातच अर्थशास्त्रात न बसणारे उद्योग आहेत असे मत त्या अभ्यासकांनी व्यक्त केले. यावर गांधीजी त्यांना म्हणाले- `आजच्या ह्स्तोद्योगाच्या मालाशी तुलना करता कारखान्यातील माल अर्थशास्त्रात बसण्याजोगा आहे हे त्याचे स्वरूप त्याचा मुलभूत गुणधर्म नव्हे, तर तो आरोपित गुण आहे. समाजाने जे मूल्यपरिमाण मान्य केले किंवा मान्य करणे इष्ट मानले त्यावर तो गुण अवलंबून आहे. एखादा व्यवसाय किंवा उत्पादनपद्धती अर्थशास्त्राला धरून आहे की नाही याची ठाम कसोटी एकच; ती ही की, जीवनाच्या अत्यंत आवश्यक गरजा ती पद्धती कितपत भागविते आणि उत्पादकाला त्या उत्पादनातून किती लाभ होतो.' याच चर्चेत शहरीकरण हाही विषय होता. शहरीकरणाला गांधीजींचा ठाम विरोध होता. परंतु त्यासाठी आजच्या शहरी लोकांना खेड्यात पाठवावे असे त्यांचे मत नव्हते, तर शहरांवर आधारित खेडी, याऐवजी खेड्यांवर आधारित शहरे; अशी रचना आणि योजना असावी अशी त्यांची भूमिका होती. यातून हळूहळू आकार घेत एक समन्यायी चित्र आकारास येईल असा त्यांचा होरा होता.
स्वतंत्र भारताच्या आर्थिक सशक्तीकरणाविषयी बोलताना १९४७ च्या मे महिन्यात ते म्हणाले होते- `कॉंग्रेस अनुयायांनी केंद्रीय नियोजन आणि राक्षसी प्रमाणावर औद्योगीकरण न करता खेड्यामध्ये विकेंद्रीकरणाच्या पायावर विधायक कार्य करण्याची गरज आहे. केंद्रीय नियोजन आणि औद्योगीकरण ही अंती फार मोठी चूक असल्याचे आढळून येईल असे माझे भाकीत आहे. मी तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्ही आपखुशीने जर न कराल तर परिस्थितीचा दाब ते करण्याला तुम्हाला भाग पाडील.' भारताचे पुनरुथ्थान वरून लादून होणार नाही तर तळागाळातील माणसांना सोबत घेऊन, त्यांच्या मनाला व मेंदूला आवाहन करून, त्यांचा सामूहिक पुरुषार्थ जागवूनच करावे लागेल, ही गांधीजींची भूमिका होती. खूप आधीपासूनच त्यांचे हे विचार होते. २० सप्टेंबर १९४० च्या `हरिजन'मध्ये नियोजनाविषयी गांधीजी लिहितात- `राष्ट्रीय नियोजनासंबंधीचे माझे विचार चालू विचारांहून भिन्न आहेत. मला ते औद्योगिक पद्धतीचे नको आहे. औद्योगीकरणाचा विषारी संसर्ग आमच्या खेड्यांना लागू नये म्हणून मी त्याला प्रतिबंध करू इच्छित आहे. पंडित नेहरूंना औद्योगीकरण पाहिजे आहे. कारण त्यांना वाटते की, जर त्याच्यावर समाजाचा ताबा असला तर भांडवलशाहीच्या अनिष्ट गोष्टींपासून ते मुक्त राहील. माझे स्वत:चे मत असे आहे की, त्या अनिष्ट गोष्टी औद्योगीकरणातच मुळात आहेत आणि कितीही समाजवाद आणला तरीही त्या मुळासकट काढून टाकता येणार नाहीत.' पंडित नेहरूंच्या मिश्र अर्थकारणाला गांधींचा किती ठाम आणि कडवा विरोध होता हे यातून स्पष्ट होते. या संदर्भात कॉंग्रेस वर्किंग कमिटीत चर्चा झाली होती. तसेच गांधीजी व पंडित नेहरू यांच्यात पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष चर्चाही झाली होती. ते सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. एक मात्र निश्चित की, भारताच्या आर्थिक धोरणांविषयी, आर्थिक रचनेविषयी, नियोजनाविषयी या दोन्ही नेत्यात एकवाक्यता तर नव्हतीच उलट मतभेद होते. अन हे मतभेद त्यांनी लपवून ठेवले नाहीत हेही खरे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू पंतप्रधान झालेत आणि गांधीजींची दुर्दैवी हत्या झाली. त्यामुळे स्वाभाविकच स्वतंत्र भारताची आर्थिक घडी पंडित नेहरूंच्या विचाराने घातली गेली. त्यात गांधीजींच्या अर्थविचारांना स्थान नव्हते. प्रयोग या स्वरुपात गांधीजींचे अनुयायी काही कामे करीत राहिले, पण गांधीजींचा अर्थविचार देशाच्या मुख्य प्रवाहाचा विचार झाला नाही. सैद्धांतिक स्वरुपात सुद्धा तो मुख्य प्रवाहात आला नाही वा आणला गेला नाही. सत्ता सांभाळणाऱ्या लोकांना तो नकोच होता आणि गांधींचे अनुयायी आणि त्यांच्या वा त्यांच्या नावाच्या संस्था व्यवहारात सत्तेच्या आणि वैचारिकदृष्ट्या कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेल्या राहिल्या. हे बंधन तोडून स्वतंत्र भरारी घेणारा एकही अनुयायी गांधींना लाभला नाही.
व्यक्तिगत संपत्तीविषयी गांधीजींचे मत होते की, प्रत्येकाने आपली संपत्ती मर्यादित ठेवावी. प्रत्येक मनुष्य आपली बुद्धी, कौशल्य, क्षमता यानुसार काम करून प्रामाणिकपणे पैसा मिळवू शकतो. काही जण भरपूर पैसा मिळवू शकतील. काही जण कमी मिळवू शकतील. परंतु जे लोक अधिक पैसा मिळवू शकतात त्यांनी तो पैसा फक्त आपला आहे असे समजू नये. आपण मिळवलेली संपत्ती सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे समाजातील अभाव दूर करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात श्रीमंत लोकांनी पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. हिंदू समाजात एके काळी प्रचलित असलेल्या आश्रम व्यवस्थेचा उल्लेख करून, एका वयोमर्यादेनंतर आपली सगळी संपत्ती दान करून नि:संग होण्याचा विचारही त्यांनी मांडला आहे. सगळ्यांना चांगले जीवन प्राप्त होण्याचा हाच मार्ग असल्याचे त्यांना वाटत असे. `धरणीमातेकडे सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर आहे, पण कोणा एकाची हाव मात्र ती पूर्ण करू शकत नाही,' हे त्यांचे वाक्य तर प्रसिद्ध आहे. हे सगळे कसे घडून येईल? केवळ कोणी म्हणतो म्हणून समाज असा वागेल का? गांधीजींनी याचीही चर्चा केली आहे. २३ फेब्रुवारी १९२१ च्या `young india'त ते लिहितात- Our civilization, our culture, our Swaraj depend not upon multiplying our wants--self-indulgence, but upon restricting our wants--self-denial. अन्यत्र ते लिहितात- Jesus, Mahomed, Buddha, Nanak, Kabir, Chaitanya, Shankara, Dayanand, Ramakrishna were men who exercised an immense influence over and molded the character of thousands of men. The world is the richer for their having lived in it. And they were all men who deliberately embraced poverty as their log....In so far as we have made the modern materialistic craze our goal, so far are we going downhill in the path of progress. गांधीजींना काय हवे होते आणि त्यांच्या आर्थिक चिंतनाची दिशा काय होती, हे यावरून स्पष्ट होते.
१) साधेपणा, २) स्वदेशी, ३) स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन, ४) यंत्रांचा विवेकी वापर, ५) परस्पर सहकार्य, ६) छोट्या उद्योगांना प्राधान्य, ७) श्रमप्रतिष्ठा, ८) अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण सगळ्यांना सहज उपलब्ध असणे, ९) अंत्योदय, १०) प्रत्येक हाताला काम, ११) कामाचा योग्य मोबदला, १२) संपत्तीची स्वनियंत्रित मर्यादा, १३) परस्परावलंबन १४) विश्वस्त कल्पना; हे त्यांच्या आर्थिक विचारांचे ठळक पैलू म्हणता येतील. या सगळ्या बाबी घट्ट पोलादी चौकटीसारख्या नसून त्यांचा वेळोवेळी आढावा घेणेही त्यांच्या विचारात अंतर्भूत आहे. मात्र हा आढावा घेताना आणि निरनिराळ्या योजना, रचना तयार करताना आणि राबवताना, अर्थकारण कशासाठी याचा विसर पडता कामा नये. किंबहुना सर्वप्रथम अर्थकारणाच्या हेतूचा विचार करूनच अन्य बाबी करायला हव्यात. अर्थकारणाचा हा हेतू आहे सामान्य माणसाला देवमानवाकडे वाटचाल करण्यासाठी साहाय्य करणे. खूप सारी संपत्ती, साधने इत्यादी जमवून त्याआधारे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अथवा ऐहिक उपभोगात आकंठ बुडून जाण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी साहाय्य करणे; गांधीजींच्या अर्थविचारात बसत नाही. ऐहिकतेचे जडवादी ध्येय समोर ठेवून शांततापूर्ण सुखदायी सहअस्तित्व प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. उलट तो भस्मासुर ठरेल, असा गांधीजींच्या विचारांचा आशय आहे. आज जगापुढे उभ्या राहिलेल्या आर्थिकच नव्हे तर; सामाजिक, राजकीय, सामरिक, भौगोलिक, आरोग्यविषयक, पर्यावरण विषयक, मानसिक, शारीरिक आदी समस्यांचे विकराळ सर्वभक्षी रूप पाहिले की, रस्ता चुकल्याची जाणीव होते. अशा वेळी पुढील मार्ग कोणता याचा विचार करताना गांधीजींच्या चिंतनाचा विचारही करणे क्रमप्राप्त ठरते. ते टाळता येऊ शकत नाही.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या आणि गांधीजींचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेसने त्यांच्या विचारांची उपेक्षाच केली. तीन वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने, त्याची छबी गांधीविरोधी असूनही त्यांच्या विचाराकडे लक्ष वळवलेले दिसून येते. त्यांच्या अनेक कल्पनांना अनुसरून योजना आखण्याचा प्रयत्नही होताना दिसतो. मात्र, अर्थकारणासाठी अर्थकारण अथवा पैसा निर्मितीसाठी अर्थकारण अशी भूमिका न ठेवता; जीवनासाठी अर्थकारण आणि जीवन म्हणजे आध्यात्मिक परिपूर्णता; हा आशय कायम नजरेपुढे असायला हवा. जडवादी, ऐहिक, उपभोगप्रधान जीवनादर्श समोर ठेवून गांधीजींच्या कल्पना राबवणे हे गांधी विचारांशी सुसंगत ठरणार नाही. ते भारताच्या व संपूर्ण मानवतेच्या हिताचे ठरेल का? याचाही शांतपणे विचार व्हायला हवा. हे आध्यात्मिक जीवनादर्श समाजात रुजवणे, प्रतिष्ठीत करणे, जोपासणे; ही निर्मळ अर्थकारणाची प्राथमिक आवश्यकता आहे. हेच गांधीजींचे अर्थचिंतन आहे.
- श्रीपाद कोठे

1 टिप्पणी: