मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

`सत्ताप्रधान' की `धर्मप्रधान'


इतर अनेक गोष्टींप्रमाणे इंग्रजांनी आम्हाला सांगितलं- सत्ताप्रधान समाज म्हणजेच खरा समाज. समाज काय, देश काय, मूल्यं काय; चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, अधिकृत आणि अनधिकृत यांचे मापदंड; सगळ्या सगळ्याचा विचार `सत्तेच्या संदर्भात' करायचा. आम्ही ते गुपचूप स्वीकारलं. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. अखंड, विशाल राजकीय सत्ता नसतानाही आम्ही देश आणि समाज म्हणून एक होतो. सगळा देश मुस्लिम सत्तेने व्यापला असतानाही हा `हिंदोस्ता' होता. आम्ही `भारतवासी नाही' असे औरंगजेबसुद्धा म्हणत नव्हता. आता एकछत्री सत्ता असतानाही- `आम्ही भारतवासी नाही' हे म्हणणारी झुडुपं उगवत आहेत. जे असं म्हणत नाहीत आणि `आम्ही भारतवासी आहोत' असं म्हणतात; त्यांच्याही मनात- दुसऱ्या भाषेचा, दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या संप्रदायाचा, दुसऱ्या प्रांताचा, दुसऱ्या (शेजारच्या) घरातला म्हणजे `आम्ही नाही' हे स्पष्ट असतं. का झालं असं? `धर्मप्रधान' समाजाला `सत्ताप्रधान' समाजात बदलण्याच्या इंग्रजांच्या धूर्तपणामुळे. आम्ही त्याचे बळी ठरलो आहोत का, अशी शंका घ्यावी अशीच आज स्थिती आहे. तूर्त पाकिस्तानचे एक बाजूला ठेवू. परंतु नेपाळ, श्रीलंका यासारख्या संस्कृती आणि मानस वेगळे नसलेल्या प्रदेशांबाबत `आम्ही' हा भाव आहे का आपल्या मनात? लगेच प्रश्न येईल- तो वेगळा देश आहे. कारण? कारण तेथे सत्ता वेगळी आहे. सत्ता हाच देशाचे एकत्व ठरवण्याचा एकमेव मापदंड. `सत्ताप्रधानता' हाच एकमेव संदर्भ.
समाज, देश, भाषा, अस्मिता, मूल्यं; जे जे म्हणून काही असेल त्याचा `आम्ही' म्हणजे सत्ता. त्यामुळे `भाषा' ही मानवी जीवनाचे एक अंग म्हणून कमी पाहिली जाते आणि तिला मिळणारा सत्ताश्रय आणि त्यातून निर्माण होणारी तिची सत्ता हेच महत्वाचे ठरते. ही `सत्ताप्रधानता' इतकी हाडीमासी खिळते की, आधी जेवणारे सत्ताधारी आणि वाढणारे गुलाम !!! कोणाला तरी वाढावे लागणारच. बरे, बफे ठेवला तरी, ती व्यवस्था करणारे नंतरच जेवणार; म्हणजे गुलामच; म्हणजे शोषित, अन्यायग्रस्त; वगैरे वगैरे वगैरे. व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टींपासून, मोठमोठ्या गोष्टींपर्यंत हेच. राजकीय पक्षांच्या आधारावर आज समाजात असलेले मतभेद, वादंग, संघर्ष हे या `सत्ताप्रधान' विचारांचेच परिणाम आहेत. याच विचारांनी आणि भावनांनी भारताची आणि भारतीय समाजाची एकता अनेक अर्थांनी मोडीत काढली आहे. स्वामी विवेकानंद, गांधीजी, योगी अरविंद, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय, दत्तोपंत ठेंगडी; या सगळ्यांनी हेच सांगण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न केला.
`सत्ताप्रधानता' या समाजाच्या गळी उतरवणे आणि या समाजाला `धर्मप्रधान' बनवणे याचा हा संघर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धापासूनच सुरु झाला. तरीही त्याला आजचे स्वरूप यायला मोठा काळ जावा लागला. अगदी पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्ययात्रा समोरच्या मार्गाने जात असताना, दिल्लीतील काँग्रेस भवनावरचा पक्षाचा ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. आज असं चित्र दिसू शकेल का? मुळात `सत्ताप्रधानता' आणि `धर्मप्रधानता' म्हणजे काय? स्वतंत्र चर्चेचा विषय असला तरी; एवढे निश्चित की, जीवनातील सत्तेची गरज आणि भूमिका कमीत कमी असणे; किंबहुना सत्तेची गरजच राहणार नाही असं जीवन असणे; म्हणजे `धर्मप्रधानता'. अन, जीवनातील सत्तेची गरज आणि भूमिका अधिकाधिक असणे म्हणजे `सत्ताप्रधानता'. कम्युनिस्टांनी `सत्ताशून्य' समाजाची कल्पना मांडली आणि भारताने `सत्तानिरपेक्ष' समाजाची कल्पना मांडली. `सत्ताशून्य' समाज अशक्य आहे. त्यातून अराजक निर्माण होते. ते टाळण्यासाठी सत्तेचं अधिकाधिक केंद्रीकरण होत जातं. भांडवलशाही तर उघडउघड `सत्ताप्रधान' आहे. तीच भांडवलशाहीची आकांक्षाही आहे. भारताने मात्र `सत्तानिरपेक्ष' `धर्मप्रधान' समाज प्रत्यक्ष साकारून दाखवला आहे. भारताचा मोठा इतिहास, किंबहुना संपूर्ण इतिहास `सत्तानिरपेक्ष' `धर्मप्रधान' असाच आहे.
२०१४ साली भाजपा सत्तेवर आल्यानंतर जागतिक प्रसारमाध्यमांनी ज्या ऐतिहासिक परिवर्तनाचा उल्लेख केला त्याचा आशयच मुळात भारत आता `सत्तासापेक्षतेकडून' `सत्तानिरपेक्षतेकडे' जाऊ शकेल, असा होता. भारताला `धर्मप्रधान' रूप देण्याच्या १८५७ पासूनच्या प्रयत्नांचा आणि चिंतनाचा संदर्भ त्याला होता. भाजपा हा त्या प्रयत्नांचे आणि चिंतनाचे एक प्रतिक आहे या धारणेतून त्या माध्यमांनी काढलेला तो निष्कर्ष होता. भाजपचा विजय आणि सत्तारूढ होणे हा त्या प्रयत्नांमधील आपद्धर्म असणारा, अपरिहार्य असा टप्पा आहे. `सत्ताप्रधानतेच्या' वर्तमान वास्तवातून `सत्तानिरपेक्षतेच्या' भविष्याकडे वाटचाल करण्यासाठीची ही संधी आहे. या संधीचं नेमकं आकलन आणि पुढील वाटचाल हे एक मोठे आव्हान आहे. भारताला `सत्तानिरपेक्ष धर्मप्रधानतेकडे' घेऊन जाण्यात यश मिळेल की, `सत्तासापेक्ष सत्ताप्रधान' प्रयत्न, व्यवस्था आणि मानसिकता यांच्या लाटेत ही संधी वाहून जाईल हे तर काळच सांगेल. तुमच्या आमच्या मनातील `सत्ताप्रेम' अधिक असेल तर संधी वाहून जाईल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १९ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा