शुक्रवार, २२ जून, २०१८

बंगदेशी २


कोलकात्याच्या मेट्रो प्रवासाचा एक धडा `जतीन पार्क’ स्थानकावर परतल्यावर मिळाला. आपण मेट्रो प्रवासाचे टोकन घेतो आणि फलाटावर जातो त्यावेळी ते टोकन आत जाण्याच्या मार्गावर असलेल्या खोक्यावर टेकवावे लागते. त्याशिवाय त्या स्वयंचलित व्यवस्थेतून आत जाताच येत नाही. तुम्ही टोकन खोक्यावर टेकवले की मधला अडथळा दूर होतो आणि आत जाण्याचा मार्ग मोकळा होतो. प्रवास संपवून स्थानकाच्या बाहेर पडताना त्या प्रवासाचे टोकन बाहेर पडण्याच्या मार्गावरील खोक्यात टाकायचे म्हणजे अडथळा दूर होतो आणि मार्ग मोकळा होऊन बाहेर येता येते. जाताना तर व्यवस्थित गेलो, पण जतीन पार्कला परतल्यावर मी टोकन खोक्यात टाकले तरीही मार्ग काही खुला होत नव्हता. तीन चारदा असे झाल्यावर एक माणूस लगेच जवळ आला. त्याचा पहिलाच प्रश्न होता - `कहां घूम रहे थे इतनी देर?’ गडबड अशी झाली होती की, जाताना घेतलेले टोकन श्यामबाजार स्थानकावर मी खोक्यात टाकलेच नाही. कारण ती पद्धतच परिचयाची नव्हती. तरीही बाहेर कसा पडलो कोणास ठाऊक. कदाचित गर्दीत समोरच्या व्यक्तीच्या पाठोपाठ बाहेर निघून गेलो असेन किंवा काही तांत्रिक कारण किंवा आणखीन काही. नेमके नाही सांगता येणार. मात्र बाहेर पडलो एवढे खरे. त्यामुळेच परत येताना जवळ दोन टोकन होते. एक जातानाच्या प्रवासाचे अन एक येतानाच्या प्रवासाचे. मी जे टोकन खोक्यात टाकत होतो ते जातानाच्या प्रवासाचे होते त्यामुळे स्वयंचलित यंत्रणा ते स्वीकारित नव्हती, फेटाळून लावत होती. तो माणूस जवळ येऊन जेव्हा विचारू लागला - `आतापर्यंत कुठे फिरत होता?’ तेव्हा त्याचे लक्ष माझ्या हातातील दुसऱ्या टोकनकडे गेले. मला नाही पण त्याला गडबड लक्षात आली. तो म्हणाला - `ते टोकन टाका.’ मी दुसरे टोकन टाकले आणि मार्ग खुला झाला. तेव्हा कुठे सगळी रचना स्पष्ट झाली. मी फुकट प्रवास केलेला नाही याची त्या माणसाला खात्री झाली आणि मला समाधान !! मग दोन मिनिटे त्या व्यक्तीशीही बोललो. लोकांनी मेट्रोचा गैरवापर करू नये, छान वातानुकुलीत वातावरणात फिरून येणे, टाईमपास करणे वा अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी ही व्यवस्था. विशिष्ट वेळेपर्यंतच ते परत स्वीकारले जाते. अन्यथा ती स्वयंचलित व्यवस्था ते नाकारते आणि तुम्ही पकडले जाता. त्यामुळे कोणीही अवैधपणे प्रवास करू शकत नाही.
कोलकाता ज्या देवीसाठी प्रसिद्ध आहे किंवा ज्या देवीमुळे कोलकाता ओळखले जाते, ती काली कलकत्तेवाली म्हणजे कालीघाटावरील मां काली. येथे मात्र दक्षिणेश्वरच्या एकदम विरुद्ध. देवाचा बाजार, भक्तीचा बाजार, पंडे आणि पंच मकराची तंत्रसाधना. अर्थात हे तांत्रिक प्रकार मंगळवार, शनिवार, अमावास्या या दिवशीच. परंतु पंडे वगैरे दररोज. मी देवळानजीक गेलो तर एक खेटलाच. तो खेटला तर मीही खेकसलो. तो कालीचा पंडा असेल तर मीही कालीचा भक्त होतोच ना? त्याला कशाची भीती आणि क्षिती नव्हती तर मला तर कशाचीच भीती अन क्षिती नव्हती. त्याला टिपेच्या स्वरातच सांगितले- मला कोणतीही पूजाबिजा करायची नाही. फक्त दर्शन करायचे. हात जोडायचे अन निघायचे आहे. मग तो बाजूला झाला अन अजीजीने म्हणाला- `फुल तो लीजिये चढाने के लिए.’ त्याला हरकत असण्याचे कारण नव्हतेच. कोणत्या तरी फुलवाल्याकडून टोपली घ्यायची तर त्याचे कमिशन असलेल्या फुलवाल्याकडून घेऊ. त्याने काही बिघडत नाही. टोपली घेतली. त्यानेच ती धरली. आवारात गेलो. त्याच्याकडे टोपली मागितली तेव्हा म्हणाला- `बहुत देर लगेगी. लाईन देख रहे है ना? दो घंटे तो लगना ही है.’ मनातल्या मनात हसलो. म्हटले - `माई, मीही थोडंबहुत जग पाहिलं आहे हे तुझ्या या पंड्याला सांगितलं नाहीस का?’ अन प्रकटपणे त्याला सांगितलं- `मुझे पैसे देकर कोई भी स्पेशल दर्शन वगैरे नही करना. जितना समय लगेगा लगने दो. बहुत ही ज्यादा देर होगी तो बाहर से ही प्रणाम करके निकल जाउंगा. मां मेरे मन मे बसती है.’ पण तो सामान्य माणूस नव्हता, पंडा होता. आपल्याला पटो न पटो, आवडो न आवडो; त्याच्या बिचाऱ्याचा पोटाचा प्रश्न होता. माझ्या उत्तरावर तो घोटाळला पण दोन पावले चालल्यावर पुन्हा तेच - `समय बहुत लगेगा. देर होगी.’ ४-५ वेळा असा दोन दोन पावलांचा प्रवास झाला. अखेर त्याला म्हटले - `आप ही चढा देना फुल. मै चला. हो गया मेरा दर्शन.’ अखेरीस त्याने टोपली माझ्या हाती दिली आणि माघार घेऊन परतला. रांगेत लागलो. त्याने म्हटल्याप्रमाणे दोन तास लागले नाहीत. पंधरा मिनिटात दर्शन, प्रणाम करून बाहेर. सारदा मां भक्तांना नेहमी सांगत असत- `ती जगन्माता सत आणि असत, विद्या आणि अविद्या, चांगले आणि वाईट; अशा साऱ्याचीच आई आहे.’ प्रणाम करताना हेच मनात घोळत होते.
कोलकाता... अवाढव्य पसरलेले महानगर. कधीकाळी भारताची राजधानी असलेले. साधारण दोन कोटीपर्यंत लोकसंख्या पोहोचलेली. कसे आहे हे ऐतिहासिक शहर? बंगाली लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या `मुडी’सारखे. मुडी म्हणजे मुरमुरे. बंगाली माणसाने दिवसातून एकदातरी मुडी खाल्लीच पाहिजे. अन मुरमुरे कशासोबत खायचे? कशाहीसोबत. मिठाईपासून पाण्यापर्यंत काहीही चालतं मुडीसोबत. अन त्याचा `कच्चा चिवडा’ केला की ती होते `झालमुडी.’ कोलकाता या झालमुडीसारखं आहे. खूप साऱ्या गोष्टी मिसळलेलं. या शहरातले रस्ते मोठे आहेत. बहुतेक सगळीकडे पदपथ आहेत. अन क्वचित अपवाद वगळले तर कोलकात्याचा माणूस पदपथाचाच वापर करतो. याचा अर्थ पदपथ खूप छान, देखणे, स्वच्छ, नीटनेटके असतातच असे नाही. एखादं तरी बिऱ्हाड थाटलेलं नाही किंवा एखादं तरी दुकान नाही असा पदपथ सापडणे कठीण. परंतु कोलकात्याचा माणूस या दुकानातून किंवा बिऱ्हाडातून मार्ग काढतो पण वापरतो पदपथच. एखादी खानावळ आहे. लोक जेवत आहेत आणि जाणारे त्यांच्या मधून जात आहेत हे सहज पाहायला मिळेल. आपल्याला कचऱ्यातूनच चालावे लागेल असे नाही, पण मधेमधे त्यातूनही मार्ग काढावा लागेलच. पदपथावर पाण्याचा नळ धोधो वाहतो आहे, त्यात कोणी गाडी धुतो आहे, कोणी आंघोळ करतो आहे, कोणी कपडे धुतो आहे; यात कोणीही आश्चर्य वाटून घेत नाहीत. अन नळाची धार आपल्या घरच्या नळाच्या धारेपेक्षा दहापट तरी मोठी. अगदी मॉड मुलीदेखील नाकातोंडाला रुमाल वगैरे न लावता सहजपणे या पदपथांवरून जात असतात.
नवीन नवीन भागांमध्ये मात्र हे चित्र बदलते आहे. परंतु कोलकाता अजूनही जुन्या काळातच असल्यासारखे आहे. मुंबईसारखे राजकीय, आर्थिक, विदेश व्यवहार, मनोरंजन, उद्योग, गुन्हेगारी असे बहुविध पैलू कोलकात्याला नाहीत. हे फक्त वाढते आहे पण त्यामुळे त्याला फार बदलावे लागते असे नाही. दोन कोटीपर्यंत लोकसंख्या पोहोचली तरी हजार- पाच हजार लोकसंख्येच्या गावातल्यासारखी दुकाने तेथे पाहायला मिळतील. अन लोक अशा दुकानातून खरेदीही करीत असतात. अंतरामुळे जाण्यायेण्याला वेळ लागतो हे खरे असले तरी, येथील माणूस घाईत नसतो. माणसे उगाच धावताहेत असे दिसत नाही. एवढी लोकसंख्या असूनही गर्दी अशी नसते. धक्काबुक्की नसते. तुम्ही गर्दीने लोटले जात नाही. चालणे किंवा उभे राहणे तुम्ही तुमच्या मर्जीने करू शकता. शेअरिंग ऑटोरिक्षा, चार-पाच बससेवा, taxis, मेट्रो, स्वत:चे वाहन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मेट्रो विशिष्ट मार्गावरच उपयोगाची. शेअरिंग ऑटोरिक्षा ठराविक मार्गांवर, विशिष्ट भागापुरतेच चालतात. बस आणि taxi मात्र सहज आणि कुठूनही कुठेही जातात. अजूनही ९० टक्के taxis काळ्यापिवळ्या ambassador गाड्याच. आता आता पांढऱ्या-निळ्या वेगळ्या मॉडेलच्या गाड्या आल्या आहेत. पण त्या फार थोड्या. संख्येने थोड्या असल्या तरीही नवीनपणामुळे आपला दर्जा वरचा आहे असा गंड त्यांच्यात आहे. वागणे, पैसे, लुटारूवृत्ती यातून हा गंड अनुभवास येतो. ट्रामचे रूळ अजूनही बघायला मिळतात. ट्राम मात्र बहुतेक बंद झाल्या आहेत. यापूर्वी ट्राम प्रवासाचा अनुभव घेतल्याने त्याची रुखरुख वाटली नाही.
अन्य महानगरांप्रमाणे दमट हवामान आणि त्यामुळे भरपूर घाम हे कोलकात्याचेही वैशिष्ट्य. फरक हा की कितीही वेळा आंघोळ करण्यासाठी पाणी मात्र उपलब्ध. पाण्याची कमतरता नाही. बंगाल सुजलाम आहेच. अन सुफलाम सुद्धा. फळे आणि फुले भरपूर. शिवाय विविध प्रकारची. ताजी अन रसरशीत. झाडे वगैरे बऱ्यापैकी. अगदीच रखरखीत नाही. जा-ये करणे अन्य महानगरांच्या तुलनेत स्वस्त आहे तसेच खाणेही अन्यत्रच्या तुलनेत स्वस्त. गोड तर बंगाल्यांच्या आवडीचे. अगदी पाच-दहा रुपयाची मिठाई घेऊन, खाऊन पुन्हा कामाला लागणे हे सहज पाहायला मिळणारे. छोटी वा मोठी दुकाने. अन मारुती van वा तत्सम छोट्या गाड्या मिठाई विकताना पाहायला मिळतात. तिथेच खाण्यासाठी स्थानिक माणसाने मिठाई घेतली तर त्याला पारंपरिक पानाच्या द्रोणात मिठाई मिळणार अन गिऱ्हाईक स्थानिक नसेल तर थर्माकोल अथवा अन्य पदार्थाच्या आधुनिक द्रोणात मिठाई मिळेल. पोहे वगैरे नाही मिळणार. दक्षिणी पदार्थही कमीच. समोसे मात्र भरपूर खातात. त्यांना समोसे मात्र म्हणायचे नाही. त्यांना म्हणायचे शिंगाडे. पुरीभाजी म्हणजे लुची. पत्ता, रस्ता वगैरे सांगायला सगळे बहुतेक तयारच असतात. कोणी कुरकुर करत नाहीत. जागोजागी पोलीस भरपूर असतात. तेही मदत करतात. अन फसवणूक हा माणसाचा गुण असला तरीही त्याचे प्रमाण कमी. रात्री बेरात्री भीती फारशी नाही. हां राजकीय गुन्हेगारी हा मात्र स्वतंत्र विषय.
मोठाल्या हवेल्या अजूनही सगळीकडे पाहायला मिळतात. सदनिका आहेतच पण महानगराच्या मानाने कमी. कोलकाता अजूनही मोठ्या प्रमाणात स्वतंत्र घरांमध्ये राहते. पारंपरिक बंगाली पेहेरावातील स्त्री पुरुष मात्र आता शोधावेच लागतात. पूजा वगैरेच्या निमित्तानेच ते पाहायला मिळतात. छोट्या मोठ्या कामांच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने बिहारी लोक कोलकात्यात आलेले मोठ्या प्रमाणात सापडतात. बंगाली हीच मूळ आणि प्रधान भाषा. परंतु हिंदीला विरोध वा आकस नाही. समजलीही मोठ्या प्रमाणावर जाते.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ४ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा