मंगळवार, २६ जून, २०१८

बंगदेशी ५


उत्तर कोलकात्याच्या जोडासांको भागातील ठाकूरबारी हे एक बंगाली तीर्थस्थान आहे. `कविगुरू’ म्हणून ख्यात असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांचे हे घर. घर कसले खूप मोठ्ठी हवेलीच. किती मोठी? फक्त ३५ हजार वर्ग मीटर एवढ्या आवारात !! आज तेथे `रवींद्र भारती विद्यापीठ’ आहे. १९६२ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले होते. रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर यांनी १७८५ साली ही हवेली बांधली. रवींद्रनाथांनी पहिला आणि शेवटचा श्वास घेतला तो याच हवेलीत. त्यांचा विवाह देखील येथेच झाला. पण ८०-८१ वर्षांच्या आयुष्यातील सुरुवातीची १७ वर्षे आणि अखेरची नऊ वर्षे, अशी २६ वर्षेच ते या हवेलीत राहिले. त्यांच्या काव्यलेखनाची सुरुवात याच ठिकाणी झाली. साहित्य, संगीत, चित्रकला, नाटक अशा विविध कला प्रकारांवर आपला ठसा उमटवणारे आणि त्यात मोठे योगदान देणारे रवींद्रनाथ टागोर यांनीच नोबेल पुरस्कारांच्या नामावळीत भारताचे नाव प्रथम नोंदवले. टागोरांनी कला साहित्यात फक्त योगदान दिले असे नाही तर बंगाली मानसाला वळण देण्याचा मोठा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे युगांतराच्या काळातील त्यांच्या साहित्याने आणि कलेने मूळ भारतीयत्वाचा धागा टाकून दिला नाही, सुटू दिला नाही. भारतीयत्वाचा प्रवाहच नवीन रुपडे घेऊन त्यांच्या साहित्यातून, कलेतून वाहत राहिला. रवींद्रनाथांच्या वयाच्या ४० व्या वळणावर पत्नी मृणालिनी देवी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतरची ४० वर्षे ते `एकला चालो’ असेच जगले. त्याशिवाय प्रचंड प्रतिभावान, प्रज्ञावान लोकांना जे वेगळ्या प्रकारचे एकाकीपण जाणवते, त्यांच्या विचार आणि भावनांना सशक्त प्रतिसाद न मिळण्याची जी कमतरता त्यांना आयुष्यभर त्रास देते; ते एकाकीपण तर होतेच. त्यानेही त्यांची आध्यात्मिक वृत्ती आणखीन पुष्ट केली. वाडवडिलांकडून त्यांना सांपत्तिक वारसा लाभला पण त्यात ते बुडाले नाहीत. संपत्ती त्यांची होती पण ते संपत्तीचे झाले नाहीत. ती आणखीन वाढवण्याच्या फंदात ते पडले नाहीत. त्याऐवजी जीवनातल्या सत्य-शिव-सुंदराची आराधना करण्यात ते रत राहिलेत. असे रवींद्रनाथ जन्मले, राहिले आणि परत गेलेत ती ही ठाकूरबारी.
गिरीश पार्क मेट्रो स्थानकावर उतरून थोडा वेळ चालत गेलो की आपण या हवेलीत पोहोचतो. दोन मार्गांनी येथे पोहोचता येते. एक रवींद्र भारती विद्यापीठाच्या बाजूने आणि दुसरे पैतृक घराच्या बाजूने रवींद्र सारिणीवरून. कोणत्याही प्रवेशद्वाराने गेलो तरीही दारातला चाफा आपले हसून सुगंधी स्वागत करतो. ठाकूरबारीचे दोन स्पष्ट भाग आहेत. एक `रवींद्र भारती विद्यापीठ’ आणि दुसरे टागोरांचे पैतृक घर. हवेलीसमोरील मोठ्ठ्या मैदानातील बाग पार करून घरात प्रवेश करताना उजव्या हाताला रवींद्रनाथांचा सुरेख अर्धपुतळा आहे. हवेलीतील संग्रहालयात तीन दालने आहेत. त्यात रवींद्रनाथ, कुटुंबीय आणि बंगाली नवोत्थान प्रयत्नांचे चित्रमय दर्शन होते. वेगवेगळी लहानमोठी चित्रे, काही वस्तू पाहणाऱ्याला जुन्या काळात घेऊन जातात. गाण्यांच्या जुन्या तबकड्या, त्यांना विविध ठिकाणी मिळालेल्या भेटवस्तू, त्यांच्या मोजक्या चित्रफिती, त्यांनी काढलेली चित्रे; हेही या दालनांमधून पाहायला मिळते. रवीन्द्रनाथांनी अखेरचा श्वास ज्या खोलीत घेतला ती खोलीही जतन केली आहे. त्यांनी विश्वात्मकाला गीतांची अंजुली `गीतांजली’ वाहिली होती. मी त्यांना काय वाहणार? मी त्यांना मौन भावांजली वाहून तेथून बाहेर पडलो.
बंगाली मनाला वेड लावणाऱ्या आणि जगालाही भुरळ घालणाऱ्या या तत्वज्ञ कवीच्या या निवासाला भेट देणे हा एक आनंदाचा आणि समाधानाचा विषय. परंतु तिथे होणाऱ्या उत्सवांच्या वेळी तिथे जाऊ नये असे माझे व्यक्तिगत मत. हां, उत्सवांचा अनुभव हा स्वतंत्र विषय, पण कवीगुरूंशी, त्यांच्या व्यक्तित्वाशी, त्यांच्या भावविश्वाशी, त्यांच्या चिंतनाशी, त्यांच्या अनुभवांशी एकरूप व्हायचे असेल, ते सारे feel करायचे असेल तर जो निवांतपणा हवा तो उत्सवांच्या वेळी मिळत नाही. मी गेलो तो रवींद्रनाथांचा जन्मोत्सव होता. खरं तर त्या दिवशी जाऊन त्या विश्वात रमावे हाच हेतू. पण त्या दिवशी ठाकूरबारीत अक्षरश: जत्रा असते. एरवी सकाळी १० ते दुपारी साडेचार उघडे असणारे हे घर त्या दिवशी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत उघडे असते. अन रवींद्रनाथांवर अपार माया करणारे सर्व वयोगटातील, सर्व आर्थिक- सामाजिक स्तरातील लाखो बंगाली स्त्री-पुरुष यांची तिथे रीघ लागलेली असते. अंगणात टाकलेल्या भव्य मंडपात सतत कविता, नृत्य, नाट्य असे काही ना काही सुरूच असते. प्रत्येक कलाकार आपापल्या कलेद्वारे आपल्या ;लाडक्या `रोबी’ला भावांजली वाहत असतो. बंगाली माणसाचे हे रवींद्रप्रेम अनुभवल्याविना कळणे नाही. ते मी अनुभवले पण `रोबी’शी जे तदाकार व्हायचे होते ते मात्र होता आले नाही.
तिथे घालवलेल्या काही तासात; रवींद्रनाथांची आजी दिगंबरी देवी, काकू जोगमाया देवी, मोठी वहिनी ज्ञाननंदिनी, दुसरी वहिनी कादंबरी देवी आणि पत्नी मृणालिनी देवी; या स्त्रियाही मनात पिंगा घालत होत्या. रवींद्रनाथांच्या जडणघडणीत या महिलांचाही मोठा वाटा होता. किंबहुना अन्य कोणापेक्षा अधिक वाटा होता. रवींद्रनाथांना अचानक आणि ध्यानीमनी नसताना लग्न करावे लागले होते, पत्नी अवघ्या १४ व्या वर्षी आई झाली होती, वहिनी कादंबरी देवी यांनी वयाच्या ऐन विशीत आत्महत्या केली होती, अन वहिनी ज्ञाननंदिनी एकटीने इंग्लंड वगैरे फिरणारी. अशा या विविध छटांच्या, वृत्तींच्या स्त्रियांनी त्यांच्या भावभावनांना आकार दिला होता. कादंबरी देवी या तर त्यांच्या कवितेच्या प्रथम वाचक आणि समीक्षक होत्या. त्यांच्या कथा कादंबरीतून भेटणारी स्त्री पात्रे याच महिलांनी प्रभावित केलेली असावीत असाही एक विचार मनात येऊन गेला. शब्दसुरांचा, रंगरेखांचा, निराकार ब्रम्हाचा हा उपासक; बंगभूमीचा अन भरतभूमीचा पुत्र, समाजोत्थानाचा ध्यास घेतलेला कर्मवीर; अशा विविध रूपातील रवींद्रनाथांचा पिंड जेथे आकारला त्या ठाकूरबारीचा अनुभव भावश्रीमंत करणारा होता. अर्थात तदाकार होण्यासाठी पुन्हा भेट द्यावी लागणार हे नक्की. हवेलीच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताना थोडी चाफ्याची फुले आणि चिमूटभर माती बांधून घेतली आणि निघालो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार २६ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा