बंगदेशी खुणावणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच साद आली बंगदेशाची अन जाऊन आलो गळाभेट घेण्यासाठी. हावडा स्थानकावर उतरलो आणि prepaid taxi ने मुक्कामी पोहोचलो ते मनात थोडे आश्चर्य घेऊनच. आश्चर्य याचे की, रस्ते इतके मोकळे का? कोलकात्याला काही मी पहिल्यांदाच गेलो नव्हतो. परंतु रस्त्यांवर इतका शुकशुकाट प्रथमच जाणवला. याच कोलकाता नगरात, एकाच जागी तासभर अडकून पडण्याचा अनुभवही घेतला होता. मग लक्षात आले, अरे आज तर रविवार. म्हणूनच taxi १५-२० मिनिटात मुक्कामी पोहोचली. मुक्कामाजवळ पोहोचलो तर खरं, पण वळणावर गाडी थांबवून चालक म्हणाला- गाडी आत जाणार नाही. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून म्हणाला- no right turn. आता आली पंचाईत. मग विश्वास देत म्हणाला- थोडंच चालत जावं लागेल. म्हटलं- ते ठीकाय बाबा. पण तू नेमकं पोहोचवलं आहेस की नाही खात्री तर करून घेऊ दे. आता आणखीन पंचाईत. सामान घेऊन पत्ता शोधणे त्रासाचे. अन सामान गाडीत ठेवून जायचे तर मनाची चलबिचल. बरे गाडीचे पैसे द्यायचे आहेत असेही नव्हते. ते आधीच देऊन झाले होते. शेवटी त्याला म्हटले- सामान राहू दे गाडीतच. मी आत पाहून येतो. तो हो म्हणाला. आतल्या रस्त्याला (मोठा दुपदरी रस्ता असूनही आलो त्या बाजूने right turn नव्हता.) थोडं चालत जाऊन मुक्कामाची खात्री करून आलो. गाडी दृष्टीआड होईल एवढे आत जावे लागले होते. परतलो तेव्हा गाडीत बसून चालक गाणी ऐकत होता. त्याला धन्यवाद देऊन सामान घेऊन मुक्कामी आलो. अशा रीतीने बंगदेशीच्या प्रवासाची सुरुवात तर छान झाली. मोकळे रस्ते आणि प्रामाणिक वाहनचालकाने कोलकात्यात स्वागत केले.
आंघोळ वगैरे उरकून बाहेर पडलो. पहिली भेट कुणाची घ्यावी? स्वाभाविक उत्तर आले- चलो दक्षिणेश्वर. मां भगवतीच्या भेटीला. पहिल्यांदा कुणाला भेटणार आईशिवाय? कोलकात्याच्या भुयारी मेट्रोने जाऊ म्हटले. कोलकात्याच्या भुयारी मेट्रोचा माझा हा पहिलाच अनुभव. नंतरच्या मुक्कामात मेट्रोलाच प्राधान्य दिले एवढा हा अनुभव छान होता. `श्याम बझार’ स्थानकाचे टोकन घेतले. टोकन देणारा स्वाभाविक बंगालीत बोलला. मला काहीही कळले नाही. पण मागेच असलेल्या एका तरुणीने माझी अडचण लक्षात घेऊन स्वत:हून दुभाष्याचे काम केले अन प्रश्न सुटला. त्याच वेळी कुठून ट्यूबलाईट पेटला कुणास ठाऊक. मनात म्हटले- परत येताना इथेच यायचे आहे. पण इथे म्हणजे कुठे? या स्थानकाचे नाव काय? अन्य कष्ट घेण्याऐवजी त्या तरुणीलाच विचारले. तिनेही सहज सांगितले. `कोण हा बावळट, कुठून आला’ असे कोणतेही भाव चेहऱ्यावर न दाखवता म्हणाली- `जतीन पार्क.’ मनाला बजावले- पुढील काही दिवस `जतीन पार्क’ हे शब्द मुळीच विसरायचे नाहीत. कोलकाता मेट्रो खरंच व्यवस्थित आहे. फलाटावर उतरले की, डावीकडे आणि उजवीकडे लहान पाट्या लटकलेल्या दिसतात. फलाटावर येणारी गाडी कोणत्या स्थानकांवर पुढे जाणार हे त्यावर लिहिले असते. ते वाचून आपला फलाट निवडता येतो. वेगाने येणारी गाडी पूर्ण थांबल्याशिवाय स्वयंचलित दरवाजे उघडत नाहीत. त्यामुळे धावत धावत चढणे-उतरणे याचा प्रश्नच नाही. शिवाय फलाटावरून डब्यात शिरणे म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासारखे अन दारे तर मोठी असतातच. गाडीने स्थानक सोडले की पुढील स्थानक कोणते आणि त्याचा फलाट कोणत्या दिशेला येणार याची उद्घोषणा होते. हीच उद्घोषणा स्थानक येण्याच्या काही क्षण अगोदर होते. तुम्ही नवीन असलात तरीही त्यामुळे कोणाला विचारण्याची गरज पडत नाही. शिवाय उद्घोषणा अतिशय स्पष्ट आणि बंगाली, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत होतात. त्यामुळे अडचण येण्याचा संभव कमीच. मुंबईच्या लोकलपेक्षा मेट्रो केव्हाही उजवी. अपघातांचे प्रमाणही कमी, सुख आणि सुरक्षा दोन्हीची हमी.
दक्षिणेश्वरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. विश्वातील सगळ्याच कातर, हळव्या, रम्य, दु:खार्त आनंदाच्या क्षणांचं दान नियतीनेच जिच्या पदरी टाकलं आहे अशी संध्याकाळ. सारं काही स्वीकारण्यासाठी सतत पुढे असलेली कालपुरुषाची ओंजळ म्हणजे संध्याकाळ. अशा संध्याकाळी पुण्यसलीला भागीरथीच्या तीरी भगवतीच्या, आईच्या दारी पोहोचलो होतो. याआधीच्या खेपेस मंदिराबाहेरचा परिसर साधा होता. आता खूप बदलला आहे. मंदिराच्या महाद्वारातून आत प्रवेश करताच लक्षात आलं, इथे मात्र काहीही बदललेलं नाही. चहूभोवताल त्याच सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या मोठाल्या पडव्या. त्यात निवांत बसलेली माणसे. विविध दालनात संस्थांची कार्यालये आदी. राणी रासमणी या कोळी जातीच्या राणीने, स्वप्नातील दृष्टांतानुसार बांधलेल्या या भव्य मंदिराचा इतिहास सांगणारी चित्रे लावलेली, पावनी गंगेच्या वेगवान प्रबल प्रवाहाला समांतर १२ ज्योतिर्लीन्गांची १२ स्वतंत्र पण सारखी मंदिरे. अन विस्तीर्ण प्रांगणाच्या मध्यभागी भगवती मां कालीचं उंच मंदिर. मंदिराच्या डाव्या, उजव्या अन पुढील बाजूने वर जाणाऱ्या पायऱ्यांवर लागलेल्या मोठ्या रांगा. कुठेही गडबड गोंधळ नाही. मंदिरातील शांततेत उलुध्वनी भरून राहिला होता. शांतपणे एका रांगेत जाऊन उभा राहिलो. पाचेक मिनिटात पायऱ्या चढून भगवतीपुढे पोहोचलो. शांत आणि पवित्र तामसिक अशी ही कालिका. कालीरूप असूनही उग्र नसलेली अशी ही दक्षिणेश्वरची मूर्ती आहे. कालीरुपाला इष्ट मानून पाच मकारांची जी तंत्रसाधना करतात ती येथे नाही. `कलकत्ते का काला जादू’ इथे नाही. बळी वगैरे प्रकार नाहीत. काली उपासना असूनही सात्विक जगदंब भाव. मनात असंख्य तरंग उठले. पण क्षणभरच. लगेच मन न-मन झालं. मनोभावे प्रणाम करून बाहेर आलो. मंदिरासमोरच्या एका कट्ट्यावर बसलो. भगवतीसमोर न-मन झालेलं मन आता उन्मन होऊ लागलं. भागीरथीच्या नादमधुर तालात मन कुठे निघून गेलं कळलंच नाही. थोडा वेळ असाच आनंदमय अवस्थेत गेला.
मग आवारात एक चक्कर टाकली. संस्थानने लावलेल्या नळाचे थंडगार पाणी पोट भरून प्यायलो आणि पावले विलक्षण आवेगाने, विलक्षण धुंदीत आणि अपार नम्रतेने ठाकुरांच्या- श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या खोलीकडे वळली. एक अद्भुत शांती, अद्भुत धुंदी, गंभीर आनंद, अलौकिक पूर्णता या खोलीत सदैव असते. मुख्य म्हणजे यातील काहीही कोणावरही सत्ता गाजवीत नाही. हे सारे फक्त असते... तुम्हाला सोबत करत... हळूहळू तुमचा तू काढून घेत तुम्हाला आपल्यात सामावून घेत. समग्र विश्वाच्या आध्यात्मिकतेला एक दिशा आणि वेग देणाऱ्या ठाकुरांची ही खोली. इथेच त्यांची अद्भुत लीला आकारास आली. इथेच त्यांची लोकविलक्षण साधना मूर्त झाली. इथेच या अस्तित्वाच्या गाभ्याला हात घालणारी, कोटी कोटी मानवांना आधार आणि आनंद देणारी संभाषणे झाली, इथेच स्वामी विवेकानंदांना त्यांनी निर्विकल्प समाधी केवळ स्पर्शाने मिळवून दिली, जात-पात-धर्म-भाषा-लिंग-देश-वेश-वंश- हे सारे भेद कोणताही उच्चार न करता एकाच मूळ आत्मरसात विरवून टाकले. आनंदाचे सप्तसमुद्र याच १० बाय १५ फुटांच्या खोलीत उसळले. पलंगडीवर ठेवलेल्या ठाकूर प्रतिमेला प्रणाम करून खोलीच्या खिडकीजवळ जाऊन बसलो. गंगेच्या विशाल प्रवाहावरून येणारा पश्चिमेचा शीतल वारा जीवाला सुख चारत होता. मन तर निसटून कुठे कुठे भटकत आणि भरकटत होतं. बसल्या बसल्याच तास दीड तास या जगाच्या बाहेर फिरून आलो. ठाकुरांच्या पाठुंगळी बसून.
बाहेर आलो. पुन्हा एकदा पडवीत टेकलो. मग मंदिराच्या आवाराबाहेर पडलो. श्री रामकृष्णांच्या लीलासहधर्मिणी, मां सारदा ज्या नगारखान्यात राहत असत तिथे गेलो. तिथे आता त्यांची बंगाली लाल काठाची साडी परिधान केलेली प्रतिमा आहे. काही बंगाली मंडळी तिथे भजन करीत होती. थोडा वेळ त्यात सामील झालो. इकडे तिकडे भटकलो आणि `श्यामबाजार’ मेट्रो स्थानकावर परतण्यासाठी पाय वळवले. मंदिरात जाण्यापूर्वी बाहेर काढून ठेवलेली पादत्राणे आणि भ्रमणध्वनी परत घेतले आणि निघालो. तेव्हा जाणीव झाली- अरे, गेले तीनेक तास भ्रमणध्वनी आपल्याजवळ नव्हता !! म्हणजे तो कधीच नसला तरी चालू शकेल का? मनात उगाच चुकार प्रश्न येऊन गेला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांजवळ जाऊन वाटेची खात्री करून घेतली आणि पावले चालू लागली. मनात भगवती, श्रीरामकृष्ण आणि मां सारदा भरून घेऊन. पुण्यदायीनी भागीरथीचा निरोप घेऊन.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ जून २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा