शुक्रवार, २२ जून, २०१८

बंगदेशी ३


कोलकाता म्हटले की, अनेक नावांची यादी क्षणार्धात नजरेपुढे तरळून जाते. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, योगी अरविंद, डॉ. जगदीशचंद्र बोस, बंकिमचंद्र चटर्जी, बिपिनचंद्र पाल; अशी एक जगाला ललामभूत ठरलेली मांदियाळी. भागिरथीच्या तीरावर बेलूर येथील रामकृष्ण आश्रम, माणिकतला भागातील स्वामी विवेकानंद यांचे जन्मस्थान, एल्गिन रस्त्यावरील सुभाषचंद्र बोस यांचे निवासस्थान, जोडासांकोची ठाकूरबारी, शेक्सपिअर सारिणीवरील श्री अरविंद भवन; हे सगळेच `ये रे’ म्हणून बोलावणारे. अन बोलावू धाडले नाही तरीही हक्काने जावे असे. वाटले तर गुज करावे, न वाटले तर राहिले. नुसतेच जाऊन, डोळाभर पाहून यावे. अनुभवून यावे. साऱ्यांनाच भेटून आलो. माझ्याकडे सांगण्यासारखे काय होते त्यांना? त्यांनी आपल्याला पाहावे यापरता दुजा हेतू नव्हताच. बेलूर तर ३६५ दिवस मनात उगवलेले असतेच. कधीतरी केलेला आठ दिवसांचा मुक्काम जन्मभर पुरेल असाच. जणू त्यासाठीच जन्म. ती भेट पुरणारी असली तरीही, ओढही सरणारी नाही. यावेळी मात्र थोडक्यावर समाधान मानावे लागले. कोलकाता `वाढता वाढता वाढे’ असे असल्याने कधी तरी जाणाऱ्याची अंतर, वेळ चुकणार म्हणजे चुकणार. त्यामुळे पोहोचलो उशिरा. उशिरा म्हणजे सांजारती सुरु होता होता. भास्कर अस्ताचलास टेकण्याच्या वेळी यमनाचे सूर उमटतात- `खंडन भवबंधन जगवंदन वंदी तोमाय... निरंजन नररूपधर निर्गुण गुणमय...’ बेलूर रस्त्यावरील प्रवेशद्वारातच दुरून येणारे स्वर कानी पडतात. झपझप पावले उचलत ठाकूर मंदिरात पोहोचतो. एक एक पायरी चढताना निरंजन यमन कवेत घेतो सारं काही. हे खेव देणंही असं, की सारं काही आहे जिथल्या तिथेच. काहीही लोपत नाही. फक्त जे सारं काही आहे ते निरालंब आहे. कोणत्याही आलंबनाशिवाय. निरालंब सुख, निरालंब दु:ख, निरालंब आनंद, निरालंब वेदना, निरालंब प्रेम, निरालंब संयोग, निरालंब वियोग, निरालंब विश्व, निरालंब ईश, निरालंब शून्यत्व, निरालंब अस्तित्व, निरालंब आसू, निरालंब हसू... जे काही आहे ते शुद्ध आहे, पूर्ण आहे... पूर्णात् पूर्णमिदम... आरती आटोपली. त्या विशाल सभामंडपातील लोक हळूहळू पांगले. सागरात लय पावून उन्मुक्त होण्यासाठी वेगाने निघालेल्या भागिरथीच्या विशाल प्रवाहावरून उजव्या बाजूने आलेली वाऱ्याची झुळूक हळूच कानाशी आली अन म्हणाली- `उठ आता.’ उठलो. पुढे जाऊन त्या निरंजनाच्या अगदी पुढ्यात उभा राहिलो. बोलणे, सांगणे काही नव्हतेच. दोघांनीही एकमेकांना पाहिले. डोळा भरून. माथा टेकवला अन उजवीकडील पायऱ्या उतरलो. मन एकदम भूतकाळात गेले. एकदा कधीतरी सहज उत्सुकता म्हणून येथे आलो होतो. याच पायऱ्यांजवळ उभा होतो. अचानक एक जण जवळ आला. मला न येणाऱ्या बंगालीत काही तरी बोलला. मी फक्त त्याच्या तोंडाकडे पाहिले. मग त्यानेच विचारले होते- `कहां से आए हो?’ तेव्हा उत्तर दिले होते- `नागपूर से.’ त्यावर काहीही न बोलता त्याने आत जाण्यास सांगितले होते. काय होते आत? दुपारच्या भोजनप्रसादाची पंगत. या पलीकडे दिसणाऱ्या भागिरथीच्या प्रवाहात पाय सोडून बसलेली आईच तिथे वाढत होती. तिनेच बोलावून घेतले होते, त्या भर दुपारच्या भुकेल्या वेळी. उत्सुकता म्हणून आलो होतो, तिने काहीही न विचारता पोटाशी धरून प्रेमाने जेऊ घातले होते. अन मग तिचाच होऊन गेलो. नंतरच्या खेपेस, त्या पलीकडच्या आंब्याखाली उभा असताना तिनेच हाती मधुर आंबा घातला होता. असंच काहीबाही घोळवत आवारात फिरू लागलो. अलीकडे सूर्यास्तानंतर नदीकाठावर जाण्यास बंदी केलेली आहे. काही अनुचित घटना घडल्या होत्या त्यामुळे. त्यामुळे नदी काठावरील स्वामी विवेकानंद यांचे समाधी मंदिर, सारदा मांचे मंदिर, अन मिशनचे पहिले अध्यक्ष स्वामी ब्रम्हानंद यांचे मंदिर बंद होते. तेथील गार्ड हे सांगत होता तेवढ्यात एक संन्यासी कोणाशी तरी मराठीत बोलताना कानी पडले. म्हणून त्यांच्याजवळ गेलो. ओळख दिली. थोडावेळ बोललो. मग त्यांना विचारले- मराठी बोलताय तेव्हा कोण कुठले? पण त्यांनी सांगितले नाही. म्हणाले- ते खूप मागे पडलेय. आता आठवतही नाही. पुन्हा ठाकूर मंदिरात आलो. थोडा वेळ निवांत बसलो. परतण्यासाठी पायऱ्या उतरू लागलो. चार पायऱ्या उतरलो असेन आणि आठवलं- आपल्या थंगड्याने ठाकुरांना नमस्कार सांगितला आहे. उतरलेल्या पायऱ्या पुन्हा चढलो. माथा टेकवला. म्हटलं- हा प्रणाम थंगड्याचा. अन बेलूरचा निरोप घेतला.
कोलकाताच्या माणिकतला भागातील स्वामी विवेकानंद यांचे जन्मस्थान, निवासस्थान आता उत्तम रीतीने बांधले आहे. जसे त्यावेळी होते तसेच. सोबतच शेजारची घरे विकत घेऊन थोडा व्याप वाढवला आहे. शिवाय तिथे संग्रहालय आणि विवेकानंद कल्चरल सेंटर सुरु करण्यात आले आहे. बेलूरला उशिरा पोहोचलो होतो. येथे लवकर पोहोचलो. भेट देणाऱ्यांसाठी दुपारी १२ वाजता स्वामीजींचे घर बंद होते. दुपारी दोन वाजता पुन्हा उघडते. पोहोचलो तेव्हा नेमके सव्वाबारा झालेले. आता काय करायचे? तेथील विवेकानंद कल्चरल सेंटरमध्ये गेलो. तिथे भाषा, कला व अन्य काही वर्ग; संशोधन इत्यादी चालते. मी गेलो तेव्हा स्वागत कक्षात एक दोघे बसलेले होते. मीच जाऊन औपचारिक चौकशी केली. शेजारी एका कक्षात रामकृष्ण मिशनचे एक संन्यासी काही काम करत बसले होते. तिथे गेलो. त्यांना म्हटले- नागपूरहून आलो आहे. मी आलो तर स्वामीजींचे घर, संग्रहालय बंद झाले आहे. आपल्या या स्वागत कक्षात बसू का घर उघडेपर्यंत? इथलेच एखादे पुस्तक वाचत बसेन. त्यांनी काहीही आढेवेढे न घेता अनुमती दिली. तिथे ठेवलेल्या पुस्तकातील एक पुस्तक घेतले. स्वामीजींची मातृभक्ती या विषयावरील एका भाषणाची ती पुस्तिका होती. तिथल्या सोफ्यावर मी वाचत बसलो. १०-१५ मिनिटांनी ते संन्यासी भोजनावकाशासाठी बाहेर पडले. त्यांनी पाहिले मी पंखा न लावताच बसलो आहे. त्यांनी स्वागतिकेतील एका व्यक्तीला बोलावले. त्याला सांगितले त्यांना पंखा लावून दे, पाणी दे आणि घर उघडले की सांग. त्याने पंखा लावून दिला. पाणी दिले. अन दोन वाजता सूचनाही दिली. उरलेली दोन पाने संपवून मी घर आणि संग्रहालय पाहायला गेलो. अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा हे घर एक पडके घर होते. कोणी राहत नव्हते. मेंटेनन्स नव्हता. होता फक्त एक रखवालदार. त्यानेच कुलूप उघडून घर फिरवून आणले होते. त्यानंतर आलो होतो तेव्हा मिशनने नुकताच ताबा घेऊन कामाला अगदी सुरुवात केली होती. याखेपेस घर पूर्ण झालेले होते. एकएक दालन पाहत होतो. तिथे ठेवलेले सामान पाहात होतो. स्वामीजींची चरित्रकथा डोळ्यांपुढून सरकत होती. एकएक प्रसंग आठवत होता. मनात उजळणी होत होती. हां इथून स्वामीजींनी भिकाऱ्याला आपले सगळे कपडे देऊन टाकले होते, या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून खालच्या रस्त्यावर घोडागाडीखाली येणाऱ्या एका बालकाचा जीव त्यांनी वाचवला होता, इथेच त्यांच्या डोक्यावर नाग पाहून त्यांच्या मित्रांनी पळ काढला होता, हेच स्वामीजी फिरवीत ते मुद्गल, याच अशिलांच्या खोलीत त्यांनी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे हुक्के ओढून पाहिले होते काय फरक असतो म्हणून, हा स्वामीजींचा तंबोरा... असे करत करत जीवाचा आनंद सुरु होता. ज्या वीरेश्वर महादेवाच्या भक्तीने नरेंद्र जन्माला आला अशी त्याच्या जन्मदात्रीची श्रद्धा होती, त्या वीरेश्वर महादेवाची पिंड एका दालनात प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. वीरेश्वराच्या त्या मंदिरात तास दीड तास बसलो. मनात विचार आला- या वीरेश्वराच्या कृपेनेच नरेंद्र खऱ्या अर्थाने वीर झाला होता. सगळ्यांवर अशीच कृपा होवो आणि समस्त मानवप्राणी वीर होवो. या ठिकाणी एक छोटासा प्रार्थना हॉल आहे. आजूबाजूला स्वामीजींचे कुटुंबीय, काका, भाऊ यांच्या खोल्या आहेत. स्वामीजींचे एक भाऊ भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक होते. एवढेच नव्हे तर कम्युनिस्ट विचारधारेचेही त्यांना आकर्षण होते. त्यांनी कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून कामही केले होते. अन रशियाला जाऊन ते लेनिनला भेटूनही आले होते. शेतकरी, शेतमजुरांसाठी तुम्ही काम करा असे लेनिनने त्यांना सांगितले होते. त्यांच्या कक्षात त्यांच्या तसबिरीसह ही माहिती तर आहेच, पण लेनिनचा फोटोदेखील आहे. मला हे लक्षणीय आणि महत्वाचे वाटते. हाच भारताचा भाव आणि स्वभाव आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा