सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

कांद्याचे भाव

कांदा आयात करून कांद्याचे भाव खाली आणण्याची चर्चा आहे. चांगलाच निर्णय आहे पण त्यासाठी एवढा वेळ का लागावा?

दुसरे म्हणजे कांद्याचे (अन्यही पुष्कळ जिन्नस) भाव निश्चित का करू नयेत? एक भाव निश्चित करून जाहीर करावा. त्यापेक्षा अधिक भावाने विक्री करण्यास बंदी घालावी. याने साठेबाजी कमी होऊ शकेल. भाव जर जास्त मिळणारच नसेल तर कोणी साठवून का ठेवेल? कांदा कमीच असेल तर आहे तोवर ठरलेल्या भावात विकला जाईल. संपला तर मिळणार नाही. कांदा मिळाला नाही तर जीवन काही थांबत नाही. माल साठवून ठेवायचा, सोयीने टंचाई निर्माण करायची, सोयीने भाव वाढवायचे वा पाडायचे; हे बंद होणार की नाही? विक्रीत हस्तक्षेप, धाडी वगैरे घालणे, त्यातून निर्माण होणारी साटेलोटे साखळी, हे हवेच कशाला? Fixed rate ठरवून द्यायचा. त्याचा दरवर्षी आढावा घ्यायचा. जसे शेतमालाचे हमीभाव जाहीर करतात तसेच ग्राहकांसाठी विविध वस्तूंचे भाव ठरवून द्यायचे. व्यापारी, अडते, दलाल आदी मोडून काढण्याची हिंमत दाखवावी लागेल. सध्याच्या प्रयत्नांनी हे साध्य होणे कठीण. समाजाच्या organic checks and balances चा उपयोग करून घेणेही महत्वाचे.

- श्रीपाद कोठे

१ नोव्हेंबर २०२०

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

जेपींचा वारसा

नरेंद्र मोदी यांनी पाटण्याच्या सभेत `जे जेपींना सोडू शकतात ते बीजेपीही सोडू शकतात' अशी बोचरी टीका नितीश कुमार यांच्यावर केली. त्याला नितीश कुमारांनी आज उत्तर दिले. आणखीनही बरेच राजकारणी जेपींचे नाव जपत असतात. प्रश्न असा की जेपी म्हणून प्रसिद्ध असलेले जयप्रकाश नारायण यांचे खरे उत्तराधिकारी कोण? जेपी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनही एक ऐतिहासिक सत्य दुर्लक्षित करता येत नाही की, जयप्रकाशजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच यश लाभले. मुळात जयप्रकाशजींचे आंदोलन आकाराला आले ते गुजरातमधून आणि त्याचे शिल्पकार होते नानाजी देशमुख. बिहारमध्ये त्यांनी मोठी सभा वगैरे घेतली होती, पण ती तेवढ्यापुरतीच होती. नानाजींनी सूत्रे हाती घेतली आणि त्याचे विशाल आंदोलन झाले. आणिबाणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात जेपींनी जे उद्गार काढले ते पाहिले तर सगळ्या शंका दूर होतात.

जयप्रकाशजीचा, सरदार पटेलांचा, एवढेच नव्हे तर महात्मा गांधींचाही खरा वारसदार जर कोणी असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे.

- श्रीपाद कोठे

२९ ऑक्टोबर ‌‌‌२०१३

कारण मुळात आणि प्रामाणिकपणे संघ त्याच्या जन्मापासूनच कोणालाही विरोधक वा शत्रू मानत नाही. `सर्वेषां अविरोधेन' हीच संघाची सततची भूमिका आहे. आणि हे केवळ बोलणे नाही व्यवहारही तसाच आहे. म्हणूनच पहिल्या बंदीनंतर गोळवलकर गुरुजींनी देशभर एकच भूमिका मांडली- `वयं पंचाधिकम शतम' आणि बाळासाहेब देवरसांनी दुसर्या बंदीनंतर देशभर भूमिका मांडली- `forget & forgive'. पंजाबमधील दहशतवादाच्या वेळी हिंदू-शीख असा भेद करून वातावरण तापत असताना, संघ शाखांवर हल्ले होत असताना बाळासाहेब देवरस यांनी स्पष्ट भूमिका घेतली `no retaliation'. सगळेच पक्ष आपलेच आहेत. कोणताही पक्ष शत्रू नाही वा परका नाही. संघाची ही भूमिका मोरोपंत पिंगळे यांनी जाहीरपणे नागपुरात विमानतळाजवळच्या डो. हेडगेवार चौकाच्या उदघाटनाच्या वेळी मांडली होती. १९६८ साली संविद सरकारे स्थापन करताना दीनदयाल उपाध्याय यांनीही हीच भूमिका घेतली होती. मुद्दा हा आहे की, अन्य पक्ष संघाला आपला शत्रू मानतात. तसेच वागतात. मग स्वाभाविकच स्वयंसेवकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. आणि संघासोबत राहणे त्या पक्षांना अनेक कारणांनी परवडत नाही. समस्या ते पक्ष आणि संघाचा विरोध करणार्यांची आहे. संघाची नाही.


मी नरहर कुरुंदकर वाचेन, पण त्यांचे मत काय आहे त्यावरून मी मत बनवणार नाही. दुसरे असे की, जयप्रकाशजींचे स्वत:चे मतच महत्वाचे. आणि जेपींचे मत किती प्रखर होते? जेली म्हणाले होते- `संघ जर facist असेल तर मीही facist आहे.' अन्य मतांची काय गरज?


देशातलं प्रत्येक सरकार हे देशाचं सरकार असतं, मग त्यांना फक्त ४०-४५ टक्के लोकांचाच पाठींबा का असतो? किंवा ४०-४५ टक्के पाठींबा असणार्या सरकारला देशाचं सरकार म्हणायचं का? मुद्दा सत्तेचा- संघावर आक्षेप घेणारेच ठरवतात की संघाला सत्ता प्राप्त करायची आहे वगैरे किंवा संघाला या राष्ट्रासाठी काही करायचं असेल तर त्याने सत्ता मिळवली पाहिजे वगैरे. आणि प्रश्न विचारतात. संघाने सत्ता का मिळवायची? टीकाकारांना वाटते म्हणून? संघाचा विचारच वेगळा आहे. त्या विचारात सत्तेला स्थान नाही असे नाही, पण तो विचार सत्तासापेक्ष नाही. संघाने जे स्वप्न पाहिले आहे, त्यात सत्ता ही खूप छोटी गोष्ट आहे. बाकीच्यांना वाटते तेवढे महत्व संघाला सत्तेचे वाटत नाही. सत्ता हे संघाचे उद्दीष्टच नाही. कोणाला त्यावर विश्वास आहे की नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे. संघाने नेहमीच `पथ का अंतिम लक्ष्य नही है, सिंहासन चढते जाना... सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना...' असाच संस्कार दिला आहे. तसे नसते तर ईशान्य भारतात शेकडो कार्यकर्ते घरदार सोडून कशाला सेवाकार्यात लागले असते?


अन्य समाज लोकसंख्या हे हत्यार म्हणून वापरणार असतील वा तशी तयारी करीत असतील तर हिंदूंनाही त्याचा तसाच विचार करावा लागेल. आम्ही कोणावर आदळणार नाही, पण आमच्यावर कोणी आदळत असेल तर त्याची काळजीही आम्ही घेतली पाहिजे; हा तर सामान्य जीवशास्त्रीय नियम आहे ना?


पोपने तर संपूर्ण आशिया ख्रिश्चन करण्याचा संकल्प आपल्या नवी दिल्लीतील विज्ञान भवनात जाहीर केला होता.

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

विरोधी पक्ष की सहयोगी पक्ष

 - चुकीचा विचार चुकीच्या शब्दांना जन्म देतो, ते शब्द चुकीचे भाव आणि चुकीच्या धारणा घेऊन पुढे जातात, अन ही मालिका सुरूच राहते. 'विरोधी पक्ष' हे असेच चुकीचे शब्द. त्याऐवजी सत्ताधारी पक्ष आणि सहयोगी पक्ष अशी शब्दावली रूढ व्हायला हवी. देशातले सगळे पक्ष देशाचे पक्ष आहेत आणि सहयोगी पक्ष आहेत. कोणीही विरोधी नाही. हास्यास्पद वाटणारा हा प्रयोग नेटाने रेटला तर भविष्यात फरक दिसेल. सगळ्याच गोष्टींचं असंच असतं नं?

- श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०१८

चलनी करण नको

सध्या दिवाळीची हवा आहे. दिवाळी हा लक्ष्मीचा सण. या सणाच्या शुभेच्छांमध्ये 'ज्ञानाची दिवाळी' वगैरे येत असले तरीही, कोणी ते फार गंभीरपणे घेत नाही. मात्र दिवाळीला अवकाश असल्यामुळे लक्ष्मी आणि ज्ञान यांना एकत्र करणारा एक विचार - 'सगळ्या गोष्टींचे चलनीकरण ही चुकीची गोष्ट आहे.' त्यामुळे जीवनाचं मूल्यवर्धन होत नाही. सगळ्या गोष्टींची किंमत पैशात करू नये हे आपल्याला बऱ्यापैकी कळतं. (वळतं का माहिती नाही.) पण सगळ्या गोष्टीचं चलनीकरण नको हेही तेवढंच महत्वाचं आहे. जसे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचा विचार करताना ती किती बिलियन किंवा ट्रीलीयन डॉलर्सची आहे हे बोललं जातं. हे अयोग्य आहे. केंद्र सरकारनेही असं काही उद्दिष्ट ठेवलं आहे. हे बरोबर नाही. त्या ऐवजी अमुक काळानंतर देशात कोणीही उपाशी झोपणार नाही, कोणीही अशिक्षित राहणार नाही, कोणीही उपचारवंचित राहणार नाही; अशी उद्दिष्ट हवीत. अशीच भाषाही हवी. कारण डॉलर्समध्ये उद्दिष्ट ठरवलं की फोकस डॉलर्सवर होतो. भूक, आरोग्य, शिक्षण असं उद्दिष्ट ठेवलं की फोकस त्या गोष्टींवर होतो. अन फोकस कशावर आहे त्यानुसार गोष्टी आकार घेतात. केंद्रात भाजप सरकार असल्याने ही भाषा बदलण्याची थोडी अपेक्षा करता येते. पण जागतिक शक्ती, नाणेनिधी, जागतिक बँक, अर्थतज्ज्ञ; यासारखी कारणे देऊन जर तीच डॉलर्सवाली भाषा सुरू राहिली तर जीवनाचं चलनीकरण आणखीन वाढत जाईल. हा बदल करण्यासाठी हिंमत, धैर्य, बांधिलकी हवे आणि त्यासाठीची बौद्धिक, सैद्धांतिक तयारी भरपूर हवी. ती तयारी आहे का मला ठाऊक नाही, पण एवढं ठाऊक आहे की, भारताने जगाच्या पावलावर पाऊल न टाकता वेगळी वाट चोखाळली तरी भारताला काही म्हणण्याची वा खोडा घालण्याची शक्ती आज कोणाकडे नाही. प्रश्न फक्त आपल्या संकल्पाचा आहे.

- श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०२१

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

बावळट भाटांचा विजय असो

माणूस किती निर्बुद्ध वा बावळट असू शकतो? आयबीएन-लोकमत पाहताना आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते उत्तर आहे, कुमार केतकर यांच्याएवढा. का? याला आधार त्यांचं एक विश्लेषण. भारतीय जनता पार्टीने `कॉंग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा दिली आहे. त्यावरील त्यांचा अभिप्राय- `देशाला कॉंग्रेसमुक्त करायचे म्हणजे, हेडगेवारमुक्त आणि वल्लभभाईमुक्तही करावे लागेल. कारण हेडगेवार आणि वल्लभभाई पटेल हे पण कॉंग्रेसचेच होते.'

माझे आक्षेप-

संघ कॉंग्रेसविरोधी आहे म्हणताना हेडगेवार कॉंग्रेसचे होते हे का आठवत नाही?

यांच्याच तर्काने जायचे तर, हेडगेवार हिंदुत्वसमर्थक होते म्हणजे कॉंग्रेस पण हिंदुत्वाची समर्थक आहे का?

कॉंग्रेस विसर्जित करावी असे स्वत: महात्मा गांधी यांनी म्हटले होते. म्हणजे नेहरू, पटेल यांच्यासह सगळे नेते; एवढेच नव्हे तर कॉंग्रेसने दिलेला स्वातंत्र्याचा लढा आणि मिळवलेले स्वातंत्र्य यांचेही विसर्जन करायला हवे असेच गांधीजींना म्हणायचे होते का?

अनेक जागतिक संस्था अनेक अहवाल सादर करीत असतात. त्यांचे निष्कर्ष असतात- कधी भारत अप्रामाणिक आहे, कधी भारत मागासलेला आहे; वगैरे. म्हणजे केतकर अप्रामाणिक आहेत, मागासलेले आहेत असाच त्याचा अर्थ होईल का?

आपण सगळे म्हणतो, अमुक एकाचे ऑपरेशन झाले. म्हणजे त्या व्यक्तीचे डोळ्याचे, डोक्याचे, हाताचे, पायाचे, हृदयाचे, नाकाचे, कानाचे, पोटाचे, हाडाचे; असे सगळ्याच गोष्टींचे ऑपरेशन झाले असे म्हणायचे का?

तुम्ही-आम्ही असे म्हणत नाही, कारण आपण केतकर यांच्याएवढे निर्बुद्ध आणि बावळट नसतो. बावळट भाटांचा विजय असो.

- श्रीपाद कोठे

२५ ऑक्टोबर २०१३

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

हिंदुत्व

- हिंदुत्व हे राजकारण वा समूह अस्मिता एवढंच राहीलं तर काय होतं याचं, नेपाळ हे चांगलं उदाहरण आहे. हिंदुत्वाचं तत्व तिथे फार कधी नव्हतंच. किंवा असेल तर ते टिकवून ठेवता आलं नाही. त्याचाच हा परिणाम.

- मुस्लिम, ख्रिश्चन वा साम्यवाद यांना उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात यश मिळालं नाही; हे आपण मान्य करतो पण; असं का झालं याची चिकित्सा करत नाही.

- ज्याला हिंदूंची दुर्बलता म्हटले जाते वा सांगितले जाते, ती खरंच दुर्बलता किती आणि शक्ती किती; याचाही विचार करायला हवा.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०२०

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

महत्त्वाचा मुद्दा कोणता?

सरसंघचालकांच्या कालच्या भाषणातील कोणता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा वाटला? असा प्रश्न एकाने विचारला.

त्यावर माझं उत्तर होतं - 'आपण या जगाचे स्वामी नाही आहोत. ईशावास्यम इदं सर्वम.' हा मुद्दा.

त्यावर तो म्हणाला, पण हे फार तात्त्विक आहे.

मी म्हटलं 'हो.'

त्यावर तो पुन्हा म्हणाला - 'बाकीच्या व्यावहारिक गोष्टींचं काय?'

मी - 'बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे त्याच्या कारणांच्या मुळाशी आणि सोडवणुकीच्या प्रारंभाशी नेणारा हा विचार आहे. ज्याला तू तात्त्विक म्हणतो आहेस तो. तालिबान, लोकसंख्या, मंदिर व्यवस्थापन, कुटुंब प्रबोधन, राजकीय संस्कृती, फेडरल व्यवस्था; सगळ्या सगळ्या प्रश्नांचं मूळ आणि उत्तर त्यात आहे. त्याचा विचार फार कोणी करणार नाही. पण त्याकडे लक्ष दिल्याशिवाय समस्यांची उकल आणि सोडवणूक पण होणार नाही.'

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०२१