बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

चलनी करण नको

सध्या दिवाळीची हवा आहे. दिवाळी हा लक्ष्मीचा सण. या सणाच्या शुभेच्छांमध्ये 'ज्ञानाची दिवाळी' वगैरे येत असले तरीही, कोणी ते फार गंभीरपणे घेत नाही. मात्र दिवाळीला अवकाश असल्यामुळे लक्ष्मी आणि ज्ञान यांना एकत्र करणारा एक विचार - 'सगळ्या गोष्टींचे चलनीकरण ही चुकीची गोष्ट आहे.' त्यामुळे जीवनाचं मूल्यवर्धन होत नाही. सगळ्या गोष्टींची किंमत पैशात करू नये हे आपल्याला बऱ्यापैकी कळतं. (वळतं का माहिती नाही.) पण सगळ्या गोष्टीचं चलनीकरण नको हेही तेवढंच महत्वाचं आहे. जसे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचा विचार करताना ती किती बिलियन किंवा ट्रीलीयन डॉलर्सची आहे हे बोललं जातं. हे अयोग्य आहे. केंद्र सरकारनेही असं काही उद्दिष्ट ठेवलं आहे. हे बरोबर नाही. त्या ऐवजी अमुक काळानंतर देशात कोणीही उपाशी झोपणार नाही, कोणीही अशिक्षित राहणार नाही, कोणीही उपचारवंचित राहणार नाही; अशी उद्दिष्ट हवीत. अशीच भाषाही हवी. कारण डॉलर्समध्ये उद्दिष्ट ठरवलं की फोकस डॉलर्सवर होतो. भूक, आरोग्य, शिक्षण असं उद्दिष्ट ठेवलं की फोकस त्या गोष्टींवर होतो. अन फोकस कशावर आहे त्यानुसार गोष्टी आकार घेतात. केंद्रात भाजप सरकार असल्याने ही भाषा बदलण्याची थोडी अपेक्षा करता येते. पण जागतिक शक्ती, नाणेनिधी, जागतिक बँक, अर्थतज्ज्ञ; यासारखी कारणे देऊन जर तीच डॉलर्सवाली भाषा सुरू राहिली तर जीवनाचं चलनीकरण आणखीन वाढत जाईल. हा बदल करण्यासाठी हिंमत, धैर्य, बांधिलकी हवे आणि त्यासाठीची बौद्धिक, सैद्धांतिक तयारी भरपूर हवी. ती तयारी आहे का मला ठाऊक नाही, पण एवढं ठाऊक आहे की, भारताने जगाच्या पावलावर पाऊल न टाकता वेगळी वाट चोखाळली तरी भारताला काही म्हणण्याची वा खोडा घालण्याची शक्ती आज कोणाकडे नाही. प्रश्न फक्त आपल्या संकल्पाचा आहे.

- श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा