रविवार, २७ जुलै, २०१४

अर्थ प्रभावाची गुन्हेगारी

पैशाच्या अभावातून गुन्हेगारी जन्माला येते तशीच पैशाच्या प्रभावातून देखील गुन्हेगारी जन्माला येते. अशी अर्थ प्रभावाची गुन्हेगारी बहुतेक दुर्लक्षित राहते. किंबहुना अशी गुन्हेगारी असू शकते किंवा गुन्हेगारीच्या मुळाशी अर्थाचा प्रभावसुद्धा राहू शकतो हेच मुळात लक्षात घेणे व मान्य करणे कठीण जाते. परंतु त्यामुळे वास्तविकता बदलत नाही हेही खरे. अर्थप्रभावातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचे स्वरूप बहुआयामी आहे. अर्थ अभावाच्या गुन्हेगारीला मानवीय दृष्टीकोनातून समजून घेता येऊ शकते आणि अर्थाचा अभाव दूर करून ती गुन्हेगारी दूरही करता येऊ शकते. अर्थ प्रभावाची गुन्हेगारी मात्र अशी समजूनही घेता येत नाही आणि दूर करणेही अवघड आहे. अर्थ प्रभावाची ही गुन्हेगारी आपल्या आजूबाजूला सहज आणि विपुल प्रमाणात पाहायला मिळू शकते. ही वृत्ती, अशा घटना, असे विचार हे अनेकदा गुन्हेगारी म्हणून पाहिलेही जात नाहीत. कधी कधी मात्र त्याला स्पष्टपणे गुन्हा संबोधले जाते.

आज समाजात कर्करोगासारखा पसरलेला भ्रष्टाचार हे अर्थ प्रभावाच्या गुन्हेगारीचे वृत्ती व कृती या दोन्ही प्रकारचे उत्तम उदाहरण आहे. मोठमोठे अधिकारी, व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी यांच्यावर अनेकदा धाडी पडतात आणि अनेक दिवस संपत्तीची मोजदाद सुरु असते. ही गुन्हेगारी नव्हे तर काय? अशा तऱ्हेने गैरमार्गाने पैसा मिळवणे, तो बेकायदेशीरपणे दडवून किंवा लपवून ठेवणे दोन्ही गुन्हेच. पुष्कळदा हे सारे दडपण्याचा जो प्रयत्न होतो तीही गुन्हेगारीच. वृत्ती म्हणूनही हा प्रकार गुन्हेगारी म्हणूनच गणला जायला हवा. या लोकांना जगण्याचे प्रश्न असतात किंवा असा गैरमार्गाने पैसा जमवण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो असे नाही. तरीही अशी कृती केली जाते आणि नंतर तर तिला काहीच मर्यादा राहत नाही.

जगभर नजर फिरवली तरी हे लक्षात येईल. आज महासत्ता समजली जाणारी अमेरिका जगातील ४२ टक्के शस्त्रे पुरवते. त्यातून अफाट पैसा कमावते. वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्रे विकली जावीत याचा प्रयत्न होतो, लॉबिंग होते, प्रश्न सोडवले जातात किंवा निर्माण केले जातात. ही सारी अर्थ प्रभावाखालील गुन्हेगारी म्हटली पाहिजे. विविध प्रकारचे मानकीकरण, कायदे- नियम अर्थ प्रभावाची गुन्हेगारी याच सदरात येतात. स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करू शकलात की तुम्ही बँकाच्या बँका बुडवू शकता. किंवा व्यवसाय आणि व्यक्तिगत आयुष्य चलाखपणाने वेगळं करू शकलात की विजय मल्यासारखं छान आयुष्य जगू शकता. ही गुन्हेगारी आहे.

कालचीच एक बातमी आहे- ज्यात एका साठी ओलांडलेल्या महिलेवरील आपबिती दाखवण्यात आली. घटना मुंबईतील आहे. साठी ओलांडलेली एक महिला लोकलचे दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढून चुकून पहिल्या वर्गात बसली. एका महिला तिकीट तपासनीसानेच तिची दोन वेळा अंगझडती घेतली, तासभर तिला कोंडून ठेवले. समोरची महिला पैसेवाली असती आणि तिने त्या तिकीट तपासनिसाचे हात ओले केले असते तर पुढील प्रकार घडला नसता. एक तर पैसे खाणे हा तिचा उद्देश असेल किंवा नियमानुसार वागण्याचा तिचा प्रयत्न असेल. खरेच नियमानुसार वागण्याचा प्रयत्न असेल तरीही साठी उलटलेल्या त्या महिलेला दुसऱ्या डब्यात जायला सांगून प्रश्न सुटला असता. परंतु प्रथम वर्ग म्हणजे फार मोठे, श्रेष्ठ, विशेष असे काहीतरी आणि ही विशेषता जपणे हे सगळ्यात महत्वाचे हा जो श्रेष्ठत्वगंड असतो त्यातून अशी अमानवीय घटना घडते.

या घटनेच्या एक दिवस आधीचीच दिल्लीतील घटना- एका मुलीने तक्रार केली की काही लोकांनी तिला रात्री त्रास दिला आणि तिचे कपडे फाडले. स्वाभाविक ती खळबळजनक बातमी झाली. परंतु २४ तास व्हायच्या आतच ती मुलगी बदलली. तिने तक्रार करण्यास नकार दिला. तपासात लक्षात आले की, ती मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची होती, मध्यरात्री दारू पिउन तर्र होती आणि गाडी चालवीत होती. या सगळ्या प्रकारामुळे आपणच फसू शकतो हे लक्षात आले तेव्हा तिने तक्रार करण्यास नकार दिला आणि तिचा कांगावा उघड झाला. हा सगळा प्रकार `पैशाचा माज' या सदरात मोडणारा आणि गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. वेगवेगळ्या शहरात चालणारे दुचाकी स्टंट, रेव्ह पार्ट्या आणि हुक्का पार्लरचे वाढते प्रस्थ, मादक पदार्थांचा चिंताजनक विळखा, या साऱ्याशी संबंधित निरनिराळ्या स्तरावरील लोक, त्यांचे लागेबांधे, टोळ्या हे सगळे प्रकार अर्थ प्रभावाची गुन्हेगारी नाहीत तर काय?

अगदी आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण हा माज पाहू शकतो. साधं गाड्या नीट पार्क करण्याचं उदाहरण घेऊ या. कुठेही कशीही गाडी उभी करणं हा जणू काही आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या थाटात लोक वागत असतात. शिवाय कोणी काही बोलायचं वा हटकायचं नाही. तसं केलं तर शिवीगाळ, मारहाण, कुजकट बोलणे वगैरे अंगावर घेण्याची तयारी ठेवावी लागते. बरे वरून पोलिस बिलिस आमचं काही वाकडं करू शकत नाहीत, ते आमच्या खिशात आहेत हा आव. हा आवही खरा असतो कारण पोलिसांचे हात ओले होतच असतात. नागपुरातील एका सदनिकेतील रहिवासी अनेक वर्ष एका राजकीय नेत्याच्या गाडी पार्किंगमुळे बेजार होते. हा नेता रात्री केव्हातरी येणार, त्यावेळी लोक झोपले असतात वगैरेकडे दुर्लक्ष करून हॉर्न वाजवणे, गाडीचा आवाज, त्याच्या बोलण्याचा आवाज, शिवाय सकाळी बाकीच्यांना आपापल्या गाड्या काढताना अडचण होईल याचा विचार न करता अस्ताव्यस्त पद्धतीने गाडी लावणे; हे सगळे डोक्यावर चढून बसलेल्या पैशाचे प्रताप नव्हे तर काय? बरे हा नेता होता. पण सामान्य महाविद्यालयीन तरुणी अशा पद्धतीने वागतात तेव्हा काय म्हणायचे? नागपुरातीलच एका मोठ्या लेखिकेला हा अनुभव घ्यावा लागला आहे. त्या लेखिका तब्येत दाखवण्यासाठी म्हणून डॉक्टरांकडे जायला निघाल्या तेव्हा त्यांच्या फाटकासमोर तरुण मुलींचे एक टोळके आपल्या दुचाकींवर बसले होते. त्यांना बाजूला व्हायला म्हटले त्यावेळी प्रथम तर त्यांनी लक्षच दिले नाही. मग शिवीगाळ करत, बोटे मोडत, अद्वातद्वा बोलत कसे तरी ते टोळके बाजूला झाले. आई-बापांची कमाई अंगात आलेल्या या तरुणी गुन्हेगार नाहीत काय?

अशा या ढोबळ गोष्टींशिवाय अशा असंख्य सूक्ष्म गोष्टी आहेत ज्या लक्षात येत नाहीत, पण सखोल विचार केला तर त्यातील अर्थ प्रभावाचे गुन्हे ध्यानात येतील. आपण आपल्या जीवनशैलीने प्रदूषण किती वाढवत आहोत हे ध्यानात घ्यावे. प्रदूषण केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे खरे आहे. अगदी काहीही केले नाही तरीही दिवसाचे बारा तास आपण श्वासोश्वासाच्या माध्यमातून प्रदूषण करत असतो. मात्र आपल्या जगण्यातून प्रदूषण कमी कसे होईल, त्याची भरपाई कशी होईल याची काळजी न करता बेमुर्वतपणे ते वाढवीत राहणे याला गुन्हेगारीशिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. अनावश्यक खरेदी हादेखील गुन्हाच म्हणावा लागेल. अनेकदा अशा अनावश्यक गोष्टी कचऱ्यात टाकल्या जातात किंवा अनावश्यक खाणे केवळ चामडीच्या रुपात वाढत जाते. दोन्हीचा उपयोग नसतो. पण त्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या उर्जा, वेळ आणि कच्चा माल यांचे काय? तेही वाया जाणार. अनावश्यक खरेदी वा अनावश्यक उपभोग नियंत्रित केला तर त्यातून अन्य अनेकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील किंवा तेवढ्या गोष्टींची बचत होईल आणि पर्यायाने प्रदूषण टाळले जाईल.

वागताना, जगताना मात्र आपण एवढा आणि असा विचार करत नाही. एकूणच पैसा आला की आपण विचार न करता, सैलपणाने वागू लागतो. हा प्रकार देखील अर्थ प्रभावाच्या गुन्हेगारीतच मोडावा लागेल. हा मुख्यत: वृत्तीचा गुन्हा म्हणावा लागेल. बरे चारचौघात जमले की असे विषय काढायचे नसतात, बोलायचे नसतात. आपण सगळे हा अनुभव घेत असतो. मनातल्या मनात आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात, पण शिष्टाचाराच्या नावाखाली त्या चटईखाली ढकलून द्यायच्या असतात. आपल्या उक्ती-कृतीचं विश्लेषण, सामाजिक जबाबदारी, गरिबी, जाणीवा, योग्य-अयोग्य वगैरे गोष्टी अर्थ प्रभावासोबत कालबाह्य आणि टाकावू होतात. मग त्यांचा विचारही करायचा नसतो. ही वृत्ती आणि त्याला अनुसरून होणारी कृती हे कायदेशीर आणि सामाजिक दृष्टीने तर गुन्हे आहेतच; पण नैतिक आणि आध्यात्मिक अंगानेही ते गुन्हे आहेत. सत्य बोलणे, सत्य आचरण करणे, सत्याच्या बाजूने उभे राहणे, स्वत:ला अंतर्बाह्य शुद्ध करणे यासारख्या गोष्टींना पारखे करणारा हा अर्थ प्रभाव आहे.

अर्थाच्या अभावी चांगले जीवन जगता येत नाही. एवढेच नव्हे तर त्यातूनही गुन्हेगारी जन्माला येते. मात्र अर्थाच्या प्रभावानेही गुन्हेगारी जन्माला येत असेल तर काय करायचे? येथे एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी की, अर्थाचा प्रभाव आणि अर्थाची मुबलकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अर्थाचा प्रभाव हा मन-बुद्धीवरचा परिणाम आहे. जीवन जगण्यासाठी पुरेसा पैसा असणे आवश्यकच आहे. मात्र त्याची हाव सुटणे, मन-बुद्धी त्याच्या अंमलाखाली चालणे हे अयोग्य आहे. अर्थाचा हा प्रभाव रोखणे यासाठी सुद्धा मन-बुद्धीचाच उपयोग करून घ्यावा लागतो. ते संस्कारित असले की त्यावर अर्थाचा अनर्थकारी प्रभाव होत नाही. त्यासाठी त्याला समजवावे लागते की आनंद, सुख आणि पैसा हे पर्यायवाची शब्द नाहीत. पैसा पैशाच्या जागी आहे. आनंद आणि सुखाच्या परी निराळ्या असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक कविता आहे `या झोपडीत माझ्या'. त्यातील काही ओळी अशा आहेत-

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या... ...
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या... ...

ताऱ्यांकडे पाहून, प्रभुनाम गाऊन जे सुख आणि आनंद प्राप्त होतो त्याची मन-बुद्धीला जाणीव असेल तर अर्थाचा प्रभाव उत्पन्न होऊ शकत नाही. आनंदाच्या अशा अनेक परी असतात. चित्र काढण्यातला आणि चित्र पाहण्यातला आनंद, गाणी ऐकण्यातला आणि गाणी म्हणण्यातला आनंद, निसर्गात रमण्याचा आणि निसर्ग जतन करण्यातला आनंद, लेखनातला आणि वाचनातला आनंद, विनोदातला आणि गांभीर्याचा आनंद, चारचौघातला आणि एकांताचा आनंद, भजनाचा आणि ध्यानाचा आनंद; अशा आनंदाच्या असंख्य परी. त्यांचा मन-बुद्धीला परिचय झाला, त्यात रमणे सुरु झाले, त्याच्या परिणामी आतील व्यक्तित्व समृद्ध होऊ लागले की मग मन-बुद्धीवरचा अर्थाचा अनर्थकारी प्रभाव नष्ट होतो. सारे काही पैसा, पैसा आणि पैसाच असे जोवर राहील तोवर अर्थाचा प्रभाव आणि त्यातून जन्म घेणारी गुन्हेगारी राहील. ती कमी केल्यास सुख-शांती, न केल्यास दु:ख-अशांती. तुमची आमची इच्छा असो की नसो.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २७ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा