शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

पं. नेहरूंचे गांधीजी- १

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अल्मोड्याच्या जिल्हा कारागृहात आपली आत्मकथा १४ फेब्रुवारी १९३५ रोजी लिहून पूर्ण केली. त्यावेळी ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या या आत्मकथेत महात्मा गांधी यांच्याबद्दल देखील त्यांनी स्वाभाविकपणेच लिहिले आहे. १९१९ साली काँग्रेसचे अधिवेशन अमृतसर शहरात भरले होते. त्याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. १९१९ काँग्रेस ही पहिली गांधी-काँग्रेस होती, असे मत नेहरूंनी आत्मकथेत मांडले आहे. त्या अधिवेशनाला लोकमान्य उपस्थित होते तरीही लोकांचा ओढा आणि कल गांधीजींकडे होता. त्यानंतर १९२० च्या १ ऑगस्टला लोकमान्यांचे निधन झाल्यावर गांधीजींसोबत आपणही मुंबईला गेलो होतो असे नेहरूंनी लिहिले आहे.

आपले वडील मोतीलाल नेहरू आणि गांधीजी यांच्या संबंधांबद्दल नेहरूंनी लिहिले आहे- `गांधीजींबद्दल त्यांना (वडिलांना) वैयक्तिक आकर्षणही वाटत होते. परंतु ही जोडी पाहून नवल वाटण्यासारखे होते. एक संत, विलास परान्मुख, धर्मनिष्ठ, आयुष्यातील शारीरिक व इंद्रीयजन्य सुखांचा त्याग करणारा; तर दुसरा विलासी, जीवनातील अनेकविध सुखांचा आस्वाद घेण्यात तत्पर व इहलोकीच्या अस्तित्वानंतरच्या गोष्टींबद्दल बेफिकीर ! मानस पृथक्करणाच्या भाषेत सांगायचे तर अंतर्मुख व बहिर्मुख व्यक्तींची ही युती झालेली होती. भेद असूनही सामान्य आशाबंधांनी दोघेही निगडीत झाले होते. दोघांचे राजकीय पंथ भिन्न झाल्यावरदेखील त्यांच्यातील स्नेहबंध दृढ राहिला.' गांधीजी व मोतीलाल नेहरू यांचे राजकीय पंथ भिन्न झाल्याचे जवाहरलाल यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

काँग्रेसमध्ये गांधीयुग सुरु झाल्याने काय फरक पडला याचे सुंदर वर्णनही या आत्मकथेत करण्यात आले आहे. जवाहरलालजी म्हणतात- `कोलकाताच्या अधिवेशनापासून काँग्रेसच्या राजकारणात गांधीयुगाला प्रारंभ झाला व ते युग अद्यापि चालू आहे. गांधीयुगापासून काँग्रेसचे स्वरूप अजिबात पालटले. युरोपियन पोशाख गेला व त्याच्या जागी खादीची वस्त्रे आली. काँग्रेसमध्ये कनिष्ठ, मध्यमवर्गीय प्रतिनिधींचा भरणा झाला. अधिवेशनात हिंदुस्थानी भाषा अधिकाधिक प्रचारात येउन काँग्रेस अधिवेशनात नवे चैतन्य, नवा उत्साह व नवी कळकळ दृष्टीस पडू लागली.'

काल काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या नेहरू जयंती कार्यक्रमात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी इंग्रजीला दुय्यम स्थान देत असल्याची तक्रार केली. त्या संदर्भात पं. नेहरू यांच्या वरील लिखाणाचा संदर्भ महत्वाचा ठरावा. पूर्वी गांधीजी व नेहरू असा संघर्ष होता आणि आता मोदी व राहुल असा संघर्ष आहे. महात्मा गांधीजींच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे सहज लक्षात येणारे आहे. तरीही `गांधी-नेहरू विचारधारा' असाच शब्दप्रयोग होत राहणार असेल तर कठीण आहे.

गांधीजींनी सुरु केलेल्या खिलाफत चळवळीच्या संदर्भात आपल्या आत्मकथेत लिहिताना पं. नेहरू म्हणतात- `खिलाफतीच्या चळवळीला प्रामुख्य देण्यात आल्यामुळे पुष्कळ मौलवींनी व मुसलमानांच्या धार्मिक पुढाऱ्यांनी चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे चळवळीला थोडेसे धार्मिक वळण लागले. चळवळीच्या धार्मिक व आध्यात्मिक बाजूवर गांधीजी नेहमीच भर देत असत. त्यांच्या धर्मात कडवेपणा अथवा असहिष्णुता नव्हती, परंतु जीवनाकडे धार्मिक दृष्टीने पाहण्याची शिकवणूक त्यापासून मिळत असे. त्याचा परिणाम चळवळीवर फार झाला. जनसमुदायात तरी निदान, चळवळीला धार्मिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. बहुतेक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या नेतृत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत व ते गांधीजी बोलतील तसे बोलत असत.'

यासंबंधात आपल्याला काय वाटत होते हेदेखील पं. नेहरूंनी अतिशय स्पष्ट शब्दात नमूद केले आहे. ते लिहितात- `हिंदू व मुसलमान समाजात वाढीस लागलेल्या या भावनांकडे पाहून मला थोडीशी काळजीच वाटत असे. मला ही गोष्ट बिलकुल पसंत नव्हती. जाहीर सभातून हे मौलवी, मौलाना आणि स्वामी जे विचार प्रदर्शित करीत ते फार प्रतिगामी स्वरूपाचे असत. समाजशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास याबद्दलच त्यांचे ज्ञान इथून तिथून चुकीचे वाटत होते. प्रत्येक गोष्टीला धर्माची फोडणी दिल्यामुळे स्पष्टपणे विचार करणे अशक्य होऊन बसे. गांधीजींचे काही काही शब्दही कर्णकटू वाटत. उदा.- `रामराज्य' हा त्यांचा नेहमी येणारा शब्द घ्या. पण त्यांना थोपवण्याची शक्ती माझ्यात नव्हती. शब्द रूढ आणि जनतेला ज्ञात आहेत म्हणून गांधीजी ते वापरीत असतील, असे स्वत:चे समाधान मी करून घेत होतो. कारण लोकांची अंत:करणे काबीज करण्याची कला त्यांना पूर्णपणे अवगत होती. त्यांची भाषा उलगडणे मुष्किलीचे होई. पण ते थोर असामान्य पुरुष आहेत, विजयी सेनानी आहेत, एवढी गोष्ट आम्हाला समजण्याइतके त्यांच्याविषयीचे ज्ञान आम्हाला होऊन चुकले होते. त्या काळापुरता तरी आम्ही त्यांच्या हाती कोरा चेक दिला होता. त्यांच्या लहरी व त्यांचे छंद याबद्दल आपसात चर्चा सुरु झाली की आम्ही अर्धवट थट्टेने म्हणत असू की, स्वराज्य मिळाल्यावर मात्र या प्रकारांना पायबंद घातलाच पाहिजे !' स्वत: पं. नेहरूंच्या या लिखाणावर वेगळी टिप्पणी करण्याची गरज नाही. `रामराज्य' हा शब्दही कर्णकटू वाटणारे पं. नेहरू सगळ्यांबद्दल सहानुभूती ठेवणारे कसे काय असू शकतील?

गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. त्याबद्दल पं. नेहरू लिहितात- `१९२२ च्या सुरुवातीला यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे सर्वच देखावा पालटला. तुरुंगात आम्हाला कळले की, गांधीजींनी चळवळीचे सर्व चढाऊ कार्यक्रम बंद केले असून कायदेभंगाची चळवळ थांबविली आहे. ती बातमी ऐकून आम्ही थक्क झालो, गोंधळून गेलो. वृत्तपत्रात बातमी वाचली की, चौरीचौरा नावाच्या गावी खेडुतांच्या जमावाने पोलिसांचा प्रतिकार करण्याच्या उदेशाने पोलिसांसकट चौकीला आग लावून दिली आणि त्यामुळे सहासात पोलिस जळून मेले. काही आठवडे गेल्यावर सरकारने गांधीजींना पकडून त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावली. १९२२ मध्ये कायदेभंग बंद केला ही गोष्ट योग्य झाली असली, तरी फार मोठ्या चळवळीचा कासरा ताणून ती एकाएकी थांबविल्यामुळे देशात घातुक मनोवृत्तींची वाढ झाली असण्याचा संभव आहे. राजकीय क्षेत्रात व्यक्त होणारी निष्फळ व पांगलेली हिंसावृत्ती मावळली, पण व्यक्त होण्यासाठी कोठे तरी ती अवकाश शोधीत होतीच. त्यामुळे नंतरच्या काळात जातीय तंटे विकोपास गेले असावेत.'

आपल्या आत्मकथेत एका ठिकाणी गांधीजींबद्दल ते लिहितात- `मनुष्यनिर्मित वस्तूंमधील सौंदर्य अथवा कला पारखण्याची शक्ती गांधीजींच्या अंगी फारच थोडी होती. नैसर्गिक सौंदर्याचे मात्र ते कौतुक करीत. ताजमहाल म्हणजे जबरदस्तीने राबविण्यात आलेल्या मजुरांच्या घामाचे घनीभूत स्वरूप. याहून त्याची मातब्बरी नाही, असे त्यांना वाटे. त्यांची सुवासाबद्दलची अभिरुचीही माफक असे. तथापि जीवनकलेचे तंत्र त्यांनी आपल्या परीने हुडकून काढले होते व आपल्या जीवनाला एखाद्या कलाकृतीची प्रमाणबद्धताही प्राप्त करून दिली होती. त्यांची प्रत्येक हालचाल अर्थपूर्ण व निर्दोष अशी असे. त्यात एक विशिष्ट चारुता प्रत्ययास येई. खडबडीतपणाचा, तीक्ष्णपणाचा, लवलेशही त्यांच्यापाशी नव्हता. मध्यमवर्गात भरपेट सापडणाऱ्या हीन व सवंग अभिरुचीचा मागमूसही त्यांच्या अंगी दिसत नसे. मन:शांतीचा जो दिवा त्यांना गवसला, त्याच्या दिव्य तेजाची पखरण त्यांनी इतरांवर केली व त्याच्या उजेडाने उजळलेल्या आयुष्याच्या नागमोडी मार्गावर मोठ्या निश्चयाने व निर्भयतेने ते आपली पावले टाकीत राहिले.'

१९२४ साली गांधीजी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याबद्दल नेहरू लिहितात- `१९२४ च्या डिसेंबरात बेळगाव येथे जे काँग्रेस अधिवेशन भरले त्याचे गांधीजी अध्यक्ष होते. गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे महाध्यक्ष बनून राहिलेल्या गांधीजींना काँग्रेसचे अध्यक्ष करणे म्हणजे थोडा विडंबनाचाच प्रकार होता ! त्यांचे अध्यक्षीय भाषण मला आवडले नाही. मला ते मुळीच स्फूर्तीदायक वाटले नाही. गांधीजींनी सांगितल्यावरून नव्या वर्षासाठी काँग्रेस कमिटीच्या चिटणीसाच्या जागी माझी निवड झाली. मी म्हणजे काँग्रेसचा मिराशी चिटणीस बनत चाललो होतो ! माझ्या इच्छेची कोणी पर्वाच करीत नसे !'

१९३३ च्या राजकारणाबद्दल लिहिताना पं. नेहरू लिहितात- `मुंबईमध्ये तुरुंगातून नुकतेच सुटून आलेले काही मित्र व सहकारी मला भेटले. समाजवादी तत्वांचा प्रभाव येथे बऱ्याच प्रमाणात दिसून आला. काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या काही कृत्यांबद्दल त्यांच्यामध्ये बराचसा असंतोषही पसरलेला दिसत होता. राजकारणाकडे पाहण्याच्या गांधीजींच्या आध्यात्मिक दृष्टीकोनावरही त्यांनी सडेतोड टीका केली. टिकेपैकी बराचसा भाग मलासुद्धा मान्य होता.'

आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका गांधीजींना आवडल्या नव्हत्या हे सांगताना पं. नेहरू आत्मकथेत लिहितात- `विवाहाच्या छोट्या निमंत्रण पत्रिका हिंदुस्थानी भाषेत छापून घेतल्या होत्या. पण लिपी मात्र रोमन होती. ही एक नवलपरीचीच गोष्ट झाली. हिंदी भाषा रोमन लिपीत लिहिण्याची पद्धत सैन्यात व मिशनच्या संस्थांमधून तेवढी प्रचलित आहे. मी हा प्रयोग म्हणून करून पाहिला. अनुकूल- प्रतिकूल दोन्ही प्रकारची मते मला ऐकावयाला मिळाली. पण बहुसंख्य लोक प्रतिकूलच दिसले. माझी कल्पना गांधीजींना पसंत पडली नाही. संपन्न परंपरेच्या कोणत्याही भाषेची लिपी बदलणे म्हणजे मर्मस्थानाची शस्त्रक्रिया करण्यासारखे आहे. साहित्यात लिपीला अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान प्राप्त झालेले असते. लिपी बदलली की शब्दांचे निराळेच स्वरूप आपल्यापुढे उभे राहून त्यातून निराळ्याच ध्वनींची व कल्पनांची निर्मिती होऊ लागते. अशा परिस्थितीत जुनी लिपी काढून टाकणे हे अंगावरील कातडी सोलून काढण्यासारखे मोठे क्रूर कर्म होईल. नव्या लिपीमुळे देशातील शैक्षणिक प्रगतीलासुद्धा पायबंद बसण्याचा संभव आहे.' नेहरूंच्या या कथनाला अनुसरून असे म्हणण्यास वाव आहे की, श्रीमती सोनिया गांधी यांची रोमन लिपीत लिहिली जाणारी हिंदी भाषणे गांधीजींना खचितच आवडली नसती.

१९३० च्या दशकाच्या सुरुवातीला आपण समाजवादाकडे वळू लागलो होतो आणि काँग्रेसमधील पुष्कळ सहकाऱ्यांना समाजवाद मान्य नव्हता, असे सांगून नेहरू लिहितात- `डिसेंबरअखेर गांधीजींनी मद्रासहून मला पत्र पाठवले. तेव्हादेखील हीच अडचण पुन्हा उपस्थित झाली. `मद्रास मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या मुलाखतीचे कात्रण त्यांनी मजकडे पाठविले होते. बातमीदाराने मजविषयी प्रश्न टाकला असता त्यांनी माझ्या कार्याबद्दल जवळजवळ दिलगिरी व्यक्त करणारे उद्गार काढले होते व काँग्रेसच्या नावाने मी या नव्या विचारसरणीचा प्रचार करणार नाही, असा माझ्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वासही प्रकट केला होता. माझ्याबद्दलचा हा उल्लेख तर मला पसंत पडला नाहीच पण जमीनदारी पद्धतीचे त्यांनी जे समर्थन पुढे मांडले होते, ते वाचून माझे डोके बरेच गरम झाले. ती पद्धती म्हणजे राष्ट्राच्या व शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचे एक इष्ट अंग आहे, असे त्यांना वाटत असल्याचे पाहून मी थक्कच झालो. कारण पुरेसा मोबदला मिळून या पद्धतीची इतिश्री झाली तर ती खुद्द जमीनदार- तालुकदारांनाही हवी आहे. तथापि गांधीजींना मात्र ती पद्धती इष्टच वाटत होती आणि निधीधारकत्व वगैरेसंबंधी आपले विचार ते अद्यापि बोलून दाखवीतच होते. माझ्या-त्यांच्या दृष्टीकोनात केवढा हा मतभेद? भविष्यकाळी त्यांच्याबरोबर आपण कसे सहकार्य करणार, असे विचार माझ्या मनात आले.' श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेत समाविष्ट केलेला समाजवाद नेहरूंच्या विचारांशी जुळणारा नक्कीच आहे, पण मग गांधीजींचे काय? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने देणे आवश्यक आहे.

बिहारमध्ये झालेला मोठा भूकंप म्हणजे अस्पृश्यतेच्या पापाबद्दल ईश्वराने दिलेली शिक्षा आहे, असे उद्गार गांधीजींनी काढले होते. त्यांचे हे विधान आपल्याला मुळीच पटले नव्हते व ते वाचून आपली मती गुंग होऊन गेली होती, असेही नेहरूंनी आत्मकथेत नमूद केले आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा