रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

संघ परिचय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता अपरिचित राहिलेला नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून संघ ओळखला जातो. तरीही संघाची ओळख पटलेली आहे का, असा प्रश्न विचारला तर तो वावगा ठरणार नाही. संघाचे समर्थक, संघाचे विरोधक, संघाबद्दल आस्था बाळगणारे, संघाला पाण्यात पाहणारे, एवढेच नव्हे तर संघाचे स्वयंसेवकही आपापल्या पद्धतीने संघाची ओळख पटवून देतात, संघाचे मूल्यमापन करतात किंवा संघाबद्दलचे आपले मत तयार करतात. त्यात काहीही तथ्य नसते असे नाही. परंतु ते परिपूर्ण असते असेही नाही. संघ स्वत:देखील स्वत:ची ओळख कधी कधी देतो. मात्र तीही पूर्ण ओळख असतेच असे नाही. विशिष्ट संदर्भ घेउन आलेले ते एक दर्शन असते. परिपूर्ण दर्शन मात्र नसते.

संघाचे भाष्यकार आणि थोर विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी संघाचे स्वरुप समजावून देताना भाषाशास्त्रातील अनन्वय अलंकाराचे उदहारण देत असत. अनन्वय अलंकार कसा असतो हे सांगण्यासाठी संस्कृत भाषेत एक श्लोक आहे.
`गगनं गगनाकारं, सागर: सागरोपमा:
रामरावणयोर्युद्धम, रामरावणयोरिव'
म्हणजे आकाश आकाशासारखंच आहे, सागर सागरासारखाच आहे आणि राम-रावण युद्ध हे राम- रावण युद्धासारखेच आहे. त्याप्रमाणेच संघही संघासारखाच आहे. तो नीट समजून घेण्यासाठी त्याचे विविधांगी, गुंतागुंतीचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात संघाला अशा विश्लेषणाची गरज नाही. इ.स. १९२५ पासून आजतागायत संघ त्याच्या पद्धतीने चालत राहिला आहे आणि वाढत राहिला आहे. मात्र संघाला याची गरज नसली तरीही संघाला जे साध्य करायचे आहे त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अशा विश्लेषणाची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे येते ती संघाची शाखा. एका मैदानावर भगवा ध्वज रोवलेला. त्यासमोर काही लोक एकत्र झालेले आणि त्यांचे काही कार्यक्रम. हे कार्यक्रम खेळ, नियुद्ध, संचलन, दंड, लेझीम, सूर्यनमस्कार, योगासने, व्यायामयोग, घोष, गीतगायन, कथाकथन, चर्चा, भाषण, प्रार्थना असे अनेक प्रकारचे असू शकतात. हीच सामान्यपणे समाजाला असलेली संघाची ओळख आहे. संघ काय करतो तर शाखा चालवतो. या शाखांमध्ये येणाऱ्या लहानमोठ्या साऱ्यांना स्वयंसेवक म्हणतात. या स्वयंसेवकांचे वर्षभरात काही कार्यक्रम होतात. त्यावेळी ते विशिष्ट गणवेश घालतात. या कार्यक्रमांमध्ये भाषणे होतात आणि त्यातून संघाचा विचार सांगितला जातो. याहून अधिक फारसे कोणाला ठाऊक नसते. अगदी संघाच्या स्वयंसेवकाला किंवा कार्यकर्त्यालाही! संघाचे काम करायला त्याची फारशी गरजही नसते.

संघाची कार्यपद्धती, त्याची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व रचना यांचा विकास, संघाचा इतिहास याविषयी अत्यल्प माहिती असते. संघाचे म्हणून काही साहित्य आहे, पुस्तके आहेत याची अनेकांना कल्पनाही नसते आणि तरीही एखादी व्यक्ती संघाचा कार्यकर्ता असते. एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी, क्वचित शालेय विद्यार्थी सायं शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह असतो. प्रभात शाखेचा एखादा स्वयंसेवक वा कार्यकर्ता निवृत्तीनंतरच संघाच्या शाखेत आलेला असतो. वयाच्या साठीत त्याने पहिल्यांदा संघाचा गणवेश घातलेला असतो. संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण कार्यकर्त्याने घेतलेलेच असते असे नाही. एक दिवस कधी तरी संघाच्या शाखेत आलेली व्यक्तीही आयुष्यभर संघाचा स्वयंसेवक असते. काही स्वयंसेवक काही दिवस, महिने वा वर्ष संघाचे काम करत असतात. तर काही आयुष्यभर संघाचे काम करतात. नवनवीन शाखा सुरू होत असतात. सुरू असलेल्या काही शाखा बंदही पडतात आणि पुन्हा सुरुही होतात. शाखा सुरू वा बंद करण्याचे आदेश निघत नाहीत. माणसांची उपलब्धता हाच एकमेव मुद्दा. माणूस उपलब्ध असेल तर शाखा चालते नाही तर बंद.

शाखा चालवणाऱ्या  या कार्यकर्त्यांना काहीही मिळत नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान एवढेच काय एखादे प्रमाणपत्रही नाही. प्रमाणपत्र मिळाले तरी त्याचा उपयोग तरी काय होणार हा एक वेगळाच प्रश्न आहे. असे प्रश्न ज्याच्या मनात येतात तो आपोआपच कामापासून दूर होतो. कारण काही देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. असे दूर झालेले लोकही संघाचे स्वयंसेवक मात्र राहतातच. त्यांच्या स्वयंसेवकत्वाला काहीही बाधा येत नाही. जसे काम करण्याच्या मोबदल्यात काहीही मिळत नाही. तसेच काम करण्यासाठी वा स्वयंसेवक होण्यासाठीही काहीही द्यावे लागत नाही. त्यासाठी नोंदणी, नोंदणी शुल्क वगैरे नसते. गणवेश, शिबिर, वर्ग, सहल यासाठीचा खर्च मात्र स्वत:च करावा लागतो. संघाचे काम चालवण्यासाठी स्वयंसेवक स्वत:च पैसा गोळा करतात. वर्षातून एकदा त्यासाठी गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होतो. ज्याला जितके पैसे द्यायचे असतील तितके तो भगव्या ध्वजापुढे समर्पण करतो. कोण किती देतो याची ना चर्चा होत ना त्यासाठी काही बंधन आहे. गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे हेदेखील बंधन नाही. गुरुदक्षिणा न देता वा त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता सुद्धा एखादी व्यक्ती स्वयंसेवक राहू शकते.

गेली ८९ वर्षे हा क्रम सुरू आहे. खरे तर आपण सारे हा एक चमत्कार घडताना पाहतो आहोत. काहीही आकर्षकपणा नाही, काहीही फायदा नाही, उलट तोटाच! आणि तरीही एखादे कार्य सतत चालूच राहते. विस्तारत राहते. समाजाला प्रभावित करीत राहते. याला आश्चर्य नाही तर काय म्हणणार? लोक संघाचे काम का करतात? संघ म्हणतो शाखा चालवा आणि लोक त्या चालवतात. हे कसे काय घडून येते. खरं तर यावर विश्वास बसणेही कठीण. पण जे प्रत्यक्ष दिसते ते नाकारणार तरी कसे? माणसे येतात- जातात, पिढ्या बदलतात, संकटे येतात, संघर्ष होतात, मतभेद होतात, तरीही सातत्य कायम राहते, ऊर्जा कायम राहते, प्रभाव कायम राहतो. हे कसे आणि का होते हा एक गूढ प्रश्नच आहे. याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. अगदी संघाकडेही नाही. खरे तर संघ याचा विचारही करीत नाही. सतत फक्त काम करीत राहायचे एवढेच संघाला माहीत आहे. असा सगळा `जर-तर'चा मामला असूनही, trial and error चे गणित असूनही, देशस्थ विस्कळीतपणाचा खाक्या असूनही संघ चालतो आणि वाढतो आहे. वयाची ८९ वर्षे पूर्ण केल्यावरही गतार्थ न होता सार्थ ठरतो आहे. संदर्भहीन न होता सयुक्तिक ठरतो आहे. या पृथ्वीवर एक आश्चर्य घडताना आपण पाहतो आहोत.

समाजाला हलवून टाकणाऱ्या अनेक व्यक्ती, चळवळी, उपक्रम, विचार या जगाने पाहिले आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभाव निर्माण करीत खळबळ उडवून दिली आहे. मात्र थोड्याच अवधीत त्या इतिहास झाल्या आहेत. खळबळ निर्माण करणारी व्यक्ती, कार्यक्रम वा विचार संघाजवळ कधीच नव्हते. तरीही समाजाला हलवून टाकणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, विचार यांच्यापेक्षा संघ उजवा ठरतो. ८९ वर्षे हा कालावधी खूप मोठा नाही, पण तो खूप लहानही खचितच नाही. सातत्य, विचारांची आणि कार्यपद्धतीची अखंडता, काळाबरोबर पावले टाकण्याची वृत्ती आणि क्षमता या साऱ्याच बाबतीत संघाचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे हे सारे एवढ्या शांतपणे की काही घडते आहे हे कुणाला जाणवू सुद्धा नये. ढोल पिटणे, जाहिरातबाजी, आक्रस्ताळेपणा यापैकी काहीही नाही. बरे संत प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीने हे केले तर समजून घेता येईल. परंतु संघाने मात्र सर्व प्रकारच्या गुणदोषांनी युक्त अशा लाखो सामान्य माणसांकडून ही मौन साधना करवून घेतली आहे. पिढी दर पिढी हजारो लोकांना टोकाच्या निरपेक्षपणे कार्याला प्रवृत्त करून कार्यरत ठेवण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. पद, प्रतिष्ठा, पैसा, मानसन्मान तर नाहीच पण ईश्वरप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती वगैरे अभौतिक किंवा मानसिक समाधान, आत्मिक समाधान वगैरे भावनिक बाबीही नाहीत. आणि तरीही संघाची यशस्वी वाटचाल यथार्थपणे सुरूच आहे.

संघाचा हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजाला अपरिचित अशी ८-१० माणसे केवळ एकत्र झाली होती आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर ती एकत्र झाली होती. त्यात विचार, ध्येयनिष्ठा वगैरे फारसे नव्हते आणि ८९ वर्षांच्या वाटचालीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव धारण करणारे काम दररोज देशभरात ५० हजार स्थानी चालते. यात ५० लाख स्वयंसेवक रोज एकत्र येतात आणि या मातृभूमीविषयीच्या आपल्या कर्तव्याचे स्मरण करून तिच्या उज्वल जीवनाविषयी प्रार्थना करतात. या व्यतिरिक्त हजारो स्थानांवर आठवड्यातून एकदा वा महिन्यातून एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून लाखो लोक एकत्र येउन या समाजाचा, देशाचा विचार करतात. त्यातील अनेक जण प्रत्यक्ष काही ना काही कामही करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे बिरुद न लावणाऱ्या परंतु संघ हीच प्रेरणा असलेल्या, तसेच वैचारिक आणि भावात्मक दृष्टीने संघाशी जोडल्या गेलेल्या आणि व्यवहारात संघाशी समन्वय राखून काम करणाऱ्या ३६ अखिल भारतीय संस्था आहेत.

या संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. संघाप्रमाणेच त्यांचेही स्वरुप अखिल भारतीय असेच आहे. राष्ट्रीय, अखिल भारतीय, आदी विशेषणे लावणाऱ्या अन् एखाद्या वस्ती वा गावापुरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थांसारखे हे स्वरुप नाही. तर या साऱ्या संस्था खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आहेत. संघाचे काम तर तालुका स्तरापर्यंत पोहोचले आहेच, पण अन्य ३६ संस्थांपैकी अनेक संस्थांचा पसाराही तालुका स्तरापर्यंत पसरला आहे, तर अन्य संस्थांचे काम जिल्हा स्तरापर्यंत तरी पोहोचलेले आहेच. भौगोलिक दृष्टीने विचार केला तर संपूर्ण देश संघाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कामाने व्यापला आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांचा विचार केला तर बहुतेक साऱ्या क्षेत्रात संघाचे काम पोहोचले आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक स्थितीतील लोक या कामाशी जोडले गेले आहेत. सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक संघाशी संलग्नित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये केवळ पुरुष येत असले तरीही राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलाही या कामात सक्रिय आहेत. अन्य संस्थांच्या कामातही महिलांचा सहभाग लक्षणीय असाच आहे. समाजाच्या प्रत्यक्ष सेवेची कामे दीड लाखाहून अधिक आहेत. लाखो स्त्री-पुरुष स्वत:साठी काहीही न मिळवता या सेवाकार्यांच्या माध्यमातून समाज सुशिक्षित, सुदृढ, सुसंस्कृत, आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नित्य आणि नैमित्तिक असे प्रत्यक्ष संघाचे काम, अन्य संस्था संघटनांचे काम, सेवाकार्य यासाठी माणसे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो स्त्री-पुरुष हुडकून काढणे हेच खरे तर एक अशक्य कोटीतील काम आहे. परंतु संघाने अशी माणसे नुसती हुडकून काढली नाहीत तर त्यांना कामाला लावले. कामांचे आणि माणसांचे नियोजन केले. व्यवस्था निर्माण केल्या आणि त्या सातत्याने पुढे सुरू ठेवल्या. लोक जुने होत असतात, निवृत्त होत असतात. हे अतिशय नैसर्गिक आहे. अशा लोकांच्या जागी नवीन माणसांना क्रियाशील करावे लागते. संघाने तेही यशस्वीपणे केले आहे. ही कामे करणारी माणसे शिकली सवरलेली आहेत. उच्चविद्या विभूषित आहेत. स्वत: कर्तृत्ववान आहेत. विचारी आहेत. अशा माणसांना थातुरमातुर वैचारिक वा भावनिक आवाहन बांधून ठेवू शकत नाही, सक्रिय ठेवू शकत नाही. एखादे साधे गणेशोत्सव मंडळ चालवणे आणि टिकवणे किती कठीण असते याचा अनुभव आपण सतत घेत असतो.

संघाने मात्र हे असाध्य, साध्य करून दाखविले आहे. इ. स. २००६ साली संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरूजी यांची जन्मशताब्दी होती. त्यासाठी देशभरात जे कार्यक्रम झाले त्यात ५ लाख गावातील लोक सहभागी झाले होते. देशात सुमारे ७ लाख गावे आहेत. म्हणजे ७० टक्केहून अधिक गावातील लोक यात सहभागी झाले होते. संघकार्याचा हा विस्तार केवळ देशातच झालेला आहे असे नाही, तर जगातील सुमारे ४० देशांमध्ये संघाचे काम चालते आणि सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी असे स्वरुप आता त्यास प्राप्त झाले आहे. ८९ वर्षांचा हा प्रवास सरळ होता असेही नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करीत हा प्रवास झालेला आहे. हा संघर्ष बाह्य होता, आंतरिक होता, परक्यांशी होता, स्वकीयांशी होता, राजकीय होता, सामाजिक होता, आर्थिक होता, भावनिक होता, शारीरिक होता, बौद्धिक होता. अनेकदा तर संघाचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न झालेला जगाने पाहिला आहे. ज्या समाजासाठी संघ अव्याहत काम करतो आहे त्या समाजाने प्रदीर्घ काळ त्याला मनापासून स्वीकारलेही नव्हते. संपूर्ण विपरीत परिस्थितीचा सतत सामना करीत संघ इथवर पोहोचला आहे.

हे करताना त्यातील अखंडत्वही कायम आहे. एकच संघधारा वाहते आहे. त्याच्या शतधारा झाल्या नाहीत हीदेखील एक लक्षणीय बाब आहे. छोटी मोठी कामेदेखील एकसंध फार कमी काळ टिकतात. कधी नेतृत्वावरून वाद तर कधी तात्विक वाद!! कधी कार्यपद्धतीवरून मतभेद. परिणाम मात्र एकच. संघटनेत फाटाफूट. संघकार्याचे वैशिष्ट्य हे की संघावर नाराज होउन बाहेर पडलेल्यांनी आपली वेगळी कामे सुरू केली पण पर्यायी वा समांतर संघ काढला नाही. ते शक्य झाले असते वा नाही हा मुद्दा वेगळा, पण कोणी पर्याय निर्माण करण्याचा गांभीर्याने विचारही केला नाही. याशिवाय जी कामे मूळ स्वरूपात टिकतात ती एका विशिष्ट मर्यादेतच काम करीत राहतात. सतत वर्धिष्णु राहूनही अखंडत्व कायम राखणे हेही एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. संघाची स्थापना १९२५ सालाची. महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय, सामाजिक क्षितिजावर उदय झाला १९२० साली. कम्युनिस्ट पार्टीची स्थापनाही १९२० सालाचीच. म्हणजे सर्वोदय आणि कम्युनिझम यांच्यापेक्षा संघ ५ वर्षांनी लहान. कम्युनिस्ट पार्टीने सर्व प्रकारचे मार्ग आपल्या कार्यवाढीसाठी अवलंबिले. हिंसाचारही नाकारला नाही. अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मोठा काळ सत्तेची सहानुभूती कम्युनिझमला मिळाली. गांधींच्या कार्याला तर देशात आणि जगातही अतिशय अनुकूलता होती व आहे. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही कामांची तुलना आज केली तर संघाचे यश आणखीनच ठळकपणे जाणवते.

केवळ विचार केला तरीही अंगावर शहारा यावा असा हा प्रवास आहे. जगाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या संघटनेचा प्रवास एवढा रोमांचक आणि अद्भुत राहिला असावा. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन करून भगवान शंकरांनी तांडव केले होते. संघाने मात्र शांतपणे हलाहल पचवून टाकले आहे आणि समाजावर मात्र शांती आणि सौहार्दाचा अमृतवर्षावच केलेला आहे. असे सारे असतानाही सर्वाधिक गैरसमज असणारी संघटनाही संघच आहे. मोठ्या प्रमाणावर हेटाळणी सहन करणारी संघटनाही संघच आहे. आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी झेलणारीही संघटना संघच आहे. संघाच्या वाट्याला एवढे शिव्याशाप, एवढे तर्ककुतर्क का आले वा येतात. संघाबद्दल एवढा गोंधळ का आहे? तरीही संघ का वाढला? तरीही संघ का काम करतो आहे? संघाला नेमके करायचे तरी काय आहे? कशासाठी एवढा सारा खटाटोप सुरू आहे? काय साध्य करायचे आहे? काय मिळवायचे आहे? संघाला स्वत:ची प्रतिमा आणि वास्तव याविषयी काय वाटते? आजवरचा प्रवास आणि विस्तार याविषयी संघाला काय वाटते?

या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, संघाबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि संघाविषयी सम्यक आकलन करून सारासार मत बनवण्यासाठी संघाची नीट ओळख करून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे ६ वेगवेगळ्या दृष्टींनी संघ समजून घ्यावा लागेल.
१) संघाचे संघटनात्मक स्वरुप
२) संघ विचारधारा
३) संघ भावधारा
४) संघ- समाज परिवर्तनाचे माध्यम
५) संघाची ऐतिहासिक भूमिका
६) वैश्विक सभ्यतेच्या प्रवासातील संघाचे योगदान

संघाने अशी मांडणी आजवर केलेली नाही. हे हिन्दू राष्ट्र आहे, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि या राष्ट्राने या जगातील आपला भार समर्थपणे वहन करावा एवढेच संघाने म्हटले आहे. या सहा कोनातून केलेले विश्लेषण परिपूर्ण असेल असेही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीकडे वाटचाल करीत असताना त्याचा असा आढावा घेणे आवश्यक मात्र आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ९ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा