शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

पं. नेहरूंचे गांधीजी- २

अलीपूर कारागृहात असतानाच्या आपल्या मनस्थितीचे वर्णन पं. नेहरूंनी आत्मकथेच्या अखेरी अखेरी केले आहे. ते लिहितात- `एप्रिल महिना उजाडला अलीपूर जेलमध्ये माझ्या कानावर आलेल्या अप्रिय बातम्यांमुळे माझे मनस्वास्थ्य बिघडून गेले होते. एके दिवशी तुरुंगाच्या सुपरींटेंडन्टनी सहजगत्या मला सांगितले की, गांधीजींनी कायदेभंग परत घेतला. इतकी वर्षे महत्वाची मानलेली चळवळ संपुष्टात आली हे ऐकून मनाला दु:ख झाले. तथापि, असा शेवट व्हावयाचा हे ठरलेलेच होते, अशी माझी मी समजूत काढली. त्यानंतर माझ्या हाती `स्टेट्समन' पडला व कायदेभंग थांबवताना गांधीजींनी केलेला खुलासा पाहिल्यावर माझे अंत:करण अंधारात खचत चालले आहे असे मला वाटले. कायदेभंग करण्यात गांधीजींनी यथोचित वर्तन केले असेच मला वाटले. पण त्यांनी जी कारणमीमांसा मांडली होती ती मात्र बुद्धीची अवहेलना करणारी होती. राष्ट्रीय चळवळीच्या पुढाऱ्यांनी असल्या तर्कशास्त्राचा अवलंब करावा ही विलक्षण गोष्ट होय.'

पुढे ते लिहितात- `गांधीजींच्या व माझ्यामध्ये अफाट दर्या पसरला आहे, असे मला वाटते. गेली कित्येक वर्षे ज्या स्नेहबंधनांनी मी त्यांच्याशी निगडीत होऊन गेलो होतो, ती तुटून जात आहेत असे वाटून अंत:करणात सुरी खुपसल्याप्रमाणे मला वेदना झाल्या. कित्येक वेळपर्यंत माझ्या मनात तुफान माजून राहिले होते. गेल्या एक-दोन वर्षात गांधीजींनी केलेल्या गोष्टी मला फारशा पसंत नव्हत्या. कायदेभंगाच्या चळवळीत आपले सहकारी गुंतले असता त्यांनी चालू केलेले उपवास व उत्पन्न केलेले नवे नवे प्रश्न, त्यांनी स्वत:च उपस्थित केलेल्या अनेक भानगडी व त्यामुळे त्यांच्यापुढे पडलेले विलक्षण पेच या सर्व गोष्टींच्या मी विरुद्ध होतो. मी थोडावेळ तुरुंगाबाहेर होतो. तेवढ्या वेळात हे सर्व भेद माझ्या पूर्णपणे लक्षात आले होते.'

`एकदम मनात विचार आला की, अलीपूरच्या तुरुंगात आपण एकाकी कोंडलेलो आहोत. मला सर्व जीवन असार व अरण्यवत भासू लागले. आतापर्यंत अनेक बिकट धडे मी गिरवले असतील; परंतु सर्वात बिकट व दु:खदायक असा धडा मला आता गिरवावयाचा होता. तो असा की, आपण दुसऱ्या कोणावरही विसंबून राहता कामा नये. आयुष्याच्या मार्गावर सोबतीची पर्वा न करता चालत राहिले पाहिजे. दुसऱ्यावर विसंबून राहिले म्हणजे निराशा व्हावयाचीच.'

`माझ्या अंत:करणातील हे वादळ ज्यांनी माजविले त्या गांधींची मला पुन्हा आठवण आली. गांधीजी म्हणजे किती असामान्य माणूस ! त्यांच्या स्वभावातील गोडी किती अनुपम, किती अनिवार्य, आणि जनमनावरील त्यांचे प्रभुत्व तरी किती सूक्ष्म पण गाढ ! त्यांच्या केवळ लेखांवरून आणि उक्तींवरून गांधीजींची खरी कल्पना येणार नाही. त्यापेक्षा कितीतरी पटींनी त्यांचे व्यक्तित्व मोठे आहे. त्यांनी केलेली हिंदुस्थानची सेवा तरी किती विशाल आहे बरे ! हिंदी जनतेत त्यांनी मनुष्यपणा निर्माण केला. धैर्याचा स्फुल्लिंग चेतवला. शिस्त व सहनशक्ती यांचे बीजारोपण केले आणि ध्येयासाठी हसतमुखाने त्याग करावयास आणि त्या त्यागाला अनुरूप असा विनय अंगी धारण करण्यासही त्यांनीच ना शिकविले? धैर्याच्या खंबीर पायावरच शीलसंवर्धन करता येईल असे ते म्हणत असत. ज्याच्यापाशी धैर्य नाही; त्याच्यापाशी नीती, धर्म, प्रेम- काहीही असणे शक्य नाही. मनावर भीतीचे दडपण असेल तर सत्य अथवा प्रेम यांची साथ फार काळपर्यंत करता येणार नाही. हिंसेबद्दल मनात आत्यंतिक तिटकारा असूनही `भ्याडपणा हा हिंसेपेक्षा देखील तिरस्करणीय आहे' असे ते म्हणत असत.'

`गांधीजी हिंदुस्थानचे अनन्यसाधारण असे प्रतिनिधी बनले. या पुरातन आणि हतदैवी देशाचे अंत:करणच त्यांच्या शब्दांवाटे प्रकट होत होते. गांधीजी म्हणजेच जणू काही हिंदुस्थान असे वाटावे. त्यांच्यातील उणीवादेखील हिंदुस्थानच्या राष्ट्रदेहातील उणीवा होत्या. त्यांचा अपमान झाला तर तो, गांधीजी या व्यक्तीचा नसून सर्व राष्ट्राचा झाला असे वाटत असे. व्हाईसरॉय वगैरेसारखे जे सद्गृहस्थ गांधीजींची नालस्ती करीत, त्यांना आपण सर्व राष्ट्राच्या हृदयाला सुया बोचीत आहोत याची जाणीव नसावी. परंतु आज गांधीजींचे धोरण, त्यांची देशसेवा, त्यांचे माझ्यावर झालेले अनंत उपकार याविषयी प्रश्नच नव्हता. या सर्व गोष्टी मान्य असल्या, तरीही इतर बाबतीत माणूस घोडचुका करणार नाही असे थोडेच आहे? त्यांचे ध्येय तरी कोणते? इतक्या वर्षांचा सहवास घडूनसुद्धा मला त्यांचे ध्येय स्पष्टपणे कळलेले नव्हते. त्यांना तरी स्वत:च्या ध्येयाची स्पष्ट कल्पना आलेली आहे की नाही, याची मला शंकाच वाटत होती.'

गांधीजी म्हणजे एक कोडे आहे, विसंगतीचे एक उदाहरण आहे. सर्वच असामान्य माणसे, मला वाटते अशी असतात. कित्येक वर्षे मला एक गूढ पडले आहे की, पददलित माणसांविषयी ज्याला इतके गाढ प्रेम व आस्था वाटते, त्याने पददलित वर्ग हमखास उत्पन्न करणाऱ्या व त्याला पिसून काढणाऱ्या समाजरचनेला पाठिंबा द्यावा हे कसे? अहिंसेचा जो एवढा मोठा कैवारी, त्यानेच निर्भेळ हिंसा व दडपशाही यावर आधारलेल्या सामाजिक व राजकीय संस्थांना मान्यता द्यावी, हा काय न्याय? स्वत:ला ते कधीकधी समाजवादी म्हणवतात. पण त्या शब्दाला त्यांच्या कोशात विशिष्ट अर्थ आहे. व्यवहारात समाजवाद या शब्दामुळे ज्या आर्थिक घटनेचा बोध होतो, तो त्यांच्या व्याख्येत बसत नाही. त्याच्या मागोमाग बऱ्याच प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्या शब्दाचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या तोंडी असणाऱ्या समाजवादाचा `भूतदयावादाचे कडबोळे' एवढाच अर्थ करता येईल.'

`दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींच्या मनात कल्पनातीत स्थित्यंतरे घडून आली व त्या योगाने प्रचंड विचारमंथन होऊन त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन पार पालटून गेला. तेव्हापासून एका ठाम विचारसरणीच्या स्थिर पायावर त्यांच्या कल्पनांना अधिष्ठान सापडले असून गांधीजींच्या विचारात आता स्थित्यंतराला वाव उरलेला नाही. हिंसाकर्माशी निगडीत झालेल्या समाजवादाविषयी व विशेषत: मार्क्सवादाविषयी त्यांचे मन साफ नाही. कलह व हिंसा यांचा भपकारा वर्गकलह या शब्दातून येत असल्याने त्यांना तो शब्ददेखील त्याज्य वाटतो. जनतेच्या राहणीचे मान काही एका किमान दर्जापलीकडे जावे अशी त्यांची मुळीच इच्छा नाही. काही मूठभर सुखासीन लोक विषयकर्दमात लोळत आहेत तेवढे पुरे; त्यांची संख्या वाढवून परिस्थिती अधिकच बिघडविण्यात काय हशील? विशिष्ट मर्यादेपलीकडे सुखसाधनांची वाढ व्हावी याविषयी ते उत्सुक नसल्याने समाजवाद जे चित्र रेखाटतो, ते त्यांना यत्किंचितही विलोभनीय वाटत नाही. मग भांडवलशाही अंशत: तरी का मान्य करावयाची? वास्तविक त्यांना दोन्ही पद्धतींबद्दल तिटकाराच आहे. परंतु भांडवलशाही सध्या प्रत्यक्ष विद्यमान आहे म्हणून, तिच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही म्हणून व सपशेल उपासमारीपेक्षा ती जरा बरी म्हणून, ते भांडवलशाहीला मान्यता देतात इतकेच.'

`आत्यंतिक सुख व स्वास्थ्य मिळविणे हे ध्येय न मानता, लोकांनी जीवन अधिक नीतीमय करावे, दुराचरणाचा त्याग करावा, चैन सोडावी आणि अशा रीतीने स्वत:ची आत्मोन्नती साधित जावे, अशी त्यांची इच्छा आहे. ज्या कोणाला जनतेची सेवा करावी असे वाटत असेल त्याने जनतेची आर्थिक उन्नती साधणे हेच आपले मुख्य काम आहे असे न समजता स्वत:च्या राहणीचे मान कमी करून सामान्य जनांच्या पायरीवर यावे व त्यांच्याशी मिसळावे. खरी लोकशाही ती हीच, असे त्यांचे मत असल्याचे १७ सप्टेंबर १९३४ रोजी गांधीजींनी काढलेल्या जाहीर पत्रकावरून दिसून येईल.'

`ही दृष्टी बहुधा पुरातन काळाशी संलग्न झालेली आढळते. त्या काळाची परिस्थिती बदलून स्वप्नातही कधी कल्पना आली नसेल इतकी साधनसंपत्ती मानवजातीच्या हाती आता जमा झाली असली, तरी आमच्या मनाभोवती पडलेले भूतकाळाचे पाश अद्यापि ढिले झालेले नाहीत. दुसरे ज्याला `तमोयुग' म्हणतात तेच आपले `कृतयुग' अशी समजूत करून घेऊन कॅथॉलिक लोक मध्ययुगीन काळाकडे माना मुरडून पाहत आहेत. `इस्लामी लोकशाही'चे युग पहिल्या खलिफाच्या सदा विजयी राजवटीत होऊन गेले म्हणून मुसलमानांची दृष्टी त्या जमान्यावर खिळून राहिली आहे व वैदिक काळ आणि रामराज्य यांची स्वप्ने हिंदू लोक या घडीला पाहत आहेत. इतिहास मात्र कानाशी ओरडून सांगतो आहे की, त्या सुवर्णयुगात अन्नवस्त्रादी अत्यावश्यक गोष्टीदेखील जनतेला मिळत नसत. लोकांना फाके मारावे लागत. शिखरावरच्या मूठभर लोकांनी अत्यानंद चाखला असेल; कारण आत्मिक विलास उपभोगण्यासाठी आवश्यक ती साधने व स्वास्थ्य त्यांना लाभत होते. पण इतरांची दशा पुसाल तर उदरभरणासाठी घाम शिंपित राहण्यापलीकडे त्यांनी काही केले असेल अशी कल्पनासुद्धा करवत नाही. उपाशी पोटाला संस्कृती कसली आणि वेदांत कसला? पोटाला गोळाभर अन्न कसे मिळवायचे या विवंचनेतच ते निमग्न असणार.'

व्यक्तीची मानसिक, नैतिक व आध्यात्मिक उन्नती करून त्याद्वारे परिस्थितीत बदल करावा, असे गांधीजींना वाटते. दुराचरणाचा व भोगलोलुपतेचा मार्ग वर्जून लोकांनी शुद्ध व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. मद्यपान, धुम्रपान इत्यादी व्यसने सोडा, कामवासनेचे दमन करा, असा त्यांचा आग्रहाचा उपदेश आहे. पण माणसाची लुटारू वृत्ती उतावी, मातावी आणि ती स्वैर सुटावी अशीच सध्याची समाजव्यवस्था आहे. त्यात मनुष्याच्या अधम वृत्ती `गवता ऐशा उदंड' पोसतात हेही तितकेच खरे आहे. दुसऱ्याला जमिनीवर लोळवून जो त्या मुडद्यांच्या उंच राशीवर उभा राहील तो यशवंत ठरतो. असल्या आकांक्षा व असल्या भावना समाजात जोपासल्या जात असता व शिखरावरची माणसे त्यांच्या संमोहनाला बळी पडत असता, नीतिमान मानव निर्माण करण्याचे आपले ध्येय जयास जाईल असे गांधीजींना वाटते तरी कसे?'

अलीपूर कारागृहातील मनस्थितीचे हे लांबलचक विवरण खूप गोष्टी स्पष्ट करणारे आहे. गांधीजींच्या संबंधात नेहरूंचे मत जसे यातून स्पष्ट होते; त्याप्रमाणेच- भारतीय संस्कृती, समाजव्यवस्था, चिंतन याबद्दलची त्यांची प्रतिकूल मते; पाश्चात्य धार्जीणेपणा; मार्क्सवादी हिंसेला नसलेला विरोध; मात्र भारतीय आत्मरक्षेसाठी बळाच्या वापरला असलेला विरोध; गांधीजींना वर्गसंघर्ष शब्द चालत नाही यावर तक्रार पण आपल्याला रामराज्य शब्द चालत नाही यातील विसंगती; या साऱ्याचेही दर्शन होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाजात वाईट गोष्टींची चलती आहे म्हणूनच माणूस घडवण्याची गरज आहे, समाजात वाईट गोष्टींची चलती नसती तर माणूस घडवण्याची गरजच पडली नसती; या अतिशय साध्या आणि मुलभूत मुद्याविषयीची नेहरूंची भोंगळ संभ्रमावस्था; या साऱ्यावर पं. नेहरूंचे हे गांधीजी विषयक कथन प्रखर प्रकाश टाकते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १५ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा