शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

गुलजार, गुड्डीचे गीत आणि धर्म

हृषीकेश मुखर्जी आणि गुलजार यांच्या `गुड्डी' या चित्रपटाची सुरुवातच एका गोड प्रार्थनागीताने होते. त्याचे शब्द आहेत- `हमको मन कि शक्ती देना'. अतिशय गोड असे हे प्रार्थनागीत सुप्रसिद्ध आहे. त्याचं दुसरं कडवं आहे- `मुश्किले पडे तो हम पे, इतना कर्म कर... साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर...' पुढे आणखीन दोन ओळीही आहेत, पण या दोन महत्वाच्या. आमच्यावर संकटे आली तर आम्ही धर्माचा साथ द्यावा आणि धर्ममार्गावर चालावे, अशी शक्ती आम्हाला दे; अशी ही प्रार्थना आहे. गुलजार सारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने हे गीत लिहिलं आहे हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. दुसरे म्हणजे- धर्म या शब्दाने घडवून आणलेले या जगातील आजवरचे सगळ्यात मोठे लोकवस्तीचे स्थलांतर गुलजारजींनी स्वत: अनुभवलेले आहे. त्याचे चटके सोसत ते स्वत: स्थलांतरित झालेले आहेत. धर्म या शब्दाने घडवलेला भीषण नरसंहार, धर्म या शब्दाने घेतलेला लाखो लोकांचा बळी, धर्म या शब्दाने घडवलेले हजारो बलात्कार, धर्म या शब्दाने केलेली संपत्ती- कलावैभव- नातीगोती- प्रेम- विश्वास- यांची अमाप राखरांगोळी; हे सारे गुलजार नावाच्या संपूर्णसिंह कालरा यांनी प्रथमपुरुषी अनुभवलेले आहे. तरीही त्यांनी गुड्डीच्या प्रार्थनागीतात धर्म हाच शब्द वापरला आहे. धर्म शब्दाचा हा भीषण अनुभव घेतल्यानंतर २४ वर्षांनी आणि आजपासून फक्त ४१ वर्षांपूर्वी त्यांनी धर्म शब्द वापरला. एक गोष्ट आणखीनही आवर्जून लक्षात ठेवायला हवी की, गुलजार रूढ अर्थाने धार्मिक- देवभोळे- भक्त वगैरे नाहीत. रा.स्व. संघ, विहिंप यांच्याशी सुद्धा त्यांचा दुरूनही संबंध नाही. उलट तथाकथित धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या वर्गातच त्यांची उठबस आणि वावर आहे. तरीही गुड्डीच्या प्रसिद्ध प्रार्थनागीतात त्यांनी धर्मावर चालण्याची मनीषा व्यक्त केली आहे. कोणताही शब्द उगीचच, विचार न करता वापरणाऱ्यातील ते नाहीत.

एवढ्या विवेचनाचे कारण एकच आहे. आज धर्म या शब्दाला प्राप्त झालेला आणि चिकटविण्यात आलेला चुकीचा अर्थ आणि त्या आधारे समाजात माजलेला आणि माजवण्यात येणारा गोंधळ याकडे लक्ष वेधणे. रा. स्व. संघ, त्याचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व. दत्तोपंत ठेंगडी गेली अनेक दशके सातत्याने अन आग्रहाने हा विचार मांडत होते की, `धर्म' म्हणजे religion नव्हे. ते चुकीचे भाषांतर आहे. त्यामुळे खूप घोळ, गोंधळ आणि गडबड होत आहे आणि पुढेही होईल. `धर्म' म्हणजे मत/ पंथ/ संप्रदाय/ उपासना पद्धती/ पूजा पद्धती/ देव- पूजा- कर्मकांड- नाही. या सगळ्याचा धर्मात समावेश होऊ शकतो आणि याशिवायही धर्म असू शकतो. धर्म आणि या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अगदी निरीश्वरवादी, जडवादी हे सुद्धा धर्माशिवाय राहू शकत नाहीत. धर्म काढून टाकला तर कुठल्याच गोष्टीला काहीही अर्थ राहणार नाही. एका संस्कृत सुभाषितात सुद्धा हा विचार मांडण्यात आला आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन हे पशु आणि माणूस यांच्यात समान आहे आणि केवळ धर्म हीच अशी गोष्ट आहे की ज्यामुळे माणूस आणि पशु यांच्यात फरक करता येईल. श्रीकृष्णाने जेव्हा `यतो धर्मस्ततो जय:' अशी घोषणा केली तेव्हा त्याला हाच धर्म अधोरेखित करावयाचा होता. महर्षी वेद व्यास ज्यावेळी म्हणाले- `ऊर्ध्वबाहू विरौम्येष, नच कश्चित शृणोति माम, धर्माद अर्थश्चकामश्च, स धर्म: किं न सेव्यते' त्यावेळी त्यांनाही हाच धर्म अभिप्रेत होता.

इंग्रज येथे आले त्यावेळी अनेक संकल्पना आणि शब्द त्यांच्यासाठी नवीन होते. त्यामुळे त्यांचे त्यांनी चुकीचे भाषांतर करून ठेवले. धर्म या शब्दाचेही तसेच झाले. परंतु हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या आपल्या समाजात अनेक संकल्पना देखील समाजासोबतच विकसित झालेल्या आहेत. त्या संकल्पनांचे शब्द आणि अर्थ समाजाच्या रक्तातून वाहत आहेत. धर्म संकल्पनेचेही तसेच आहे. अन तेच गुलजारजींच्या गुड्डीमधील प्रार्थनागीतातून सहज श्वासासारखे अभिव्यक्त झाले आहे. धर्माचा चुकीचा अर्थ लावल्याने काय काय झाले व होत आहे आणि धर्म म्हणजे नेमके काय; हे वेगळे विषय आहेत. मात्र, धर्म म्हणजे आम्ही आज समजतो ते नाही हे समजून घेणे आणि चुकीचे समज आपल्या मनातून, डोक्यातून काढून टाकणे प्रथम गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २२ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा