बुधवार, २९ एप्रिल, २०१५

समतेच्या नावानं चांगभलं

`समतेला माझा विरोध का?' या २२ एप्रिलच्या माझ्या लेखावर पुष्कळ वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. या प्रतिक्रियांमुळे माझी भूमिका स्पष्ट करण्याची पुन्हा संधी मिळाली. त्यासाठी प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. जी टीका करण्यात आली वा आक्षेप नोंदवण्यात आले त्यातील तीन प्रमुख आहेत. १) समता व समानता या दोन भिन्न बाबी आहेत. २) विकासासाठी संधींची समानता आवश्यक. ३) निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता यांची तुलना अयोग्य आहे.

या तिन्हीतील कुठलाच मुद्दा नवीन नाही. वरवर पाहता बिनतोडही आहे. मात्र थोडा खोलवर विचार केला तर त्यातील फोलपणा लक्षात येईल. समता आणि समानता या दोन भिन्न बाबी आहेत हे म्हणणे ठीक, पण त्यातील नेमका फरक सांगणे अवघड आहे. समता ही मनातील एक उच्च भावना आहे, पण त्याचे व्यवहारातील रूप कसे असेल? प्रेम ही जशी लक्षणांवरून जाणावयाची गोष्ट आहे, तशीच समता ही लक्षणांवरून जाणावयाची बाब आहे. अन ही लक्षणे समानतेच्या अधिकाधिक जवळ जाणारीच असावी लागतील. समुद्र आणि त्याच्या लाटा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण स्वतंत्र नाहीत. त्या अन्योन्याश्रयी आहेत. समुद्राशिवाय लाटा नाहीत आणि लाटांशिवाय समुद्र नाही. त्या केवळ भिन्न अवस्था आहेत. तसेच समता आणि समानता यांचे आहे. मनातील समता व्यवहारात येताना समानतेच्या रूपानेच येऊ शकते.

याच्याशीच संबंधित मुद्दा म्हणजे, निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता. निसर्गदत्त विषमता कोणीही नाकारत नाही. नाकारू शकत नाही. पण मानवनिर्मित विषमता मोडून काढण्याची चर्चा होते. प्रश्न असा आहे की, ही मानवनिर्मित विषमता येते कोठून? तिचे मूळ कोठे आहे? तिचे मूळ निसर्गदत्त विषमतेतच आहे याचा विसर पडतो. एखादी व्यक्ती स्वार्थी वा दुष्ट असते आणि ती शोषण, हिंसा वा अन्य तशा प्रकारच्या गोष्टी करते. पण स्वार्थी अथवा नि:स्वार्थी, दुष्ट अथवा सुष्ट हे भेद, ही विषमता निसर्गदत्त नाही का? निसर्गदत्त विषमता ही रूप, गुण, बुद्धी, परिस्थिती, वृत्ती, स्वभाव; अशा सगळ्याच प्रकारची असते. मानवी विषमता त्यातूनच जन्मास येते. अन ही निसर्गदत्त विषमता मिटवण्याचा रामबाण उपाय आज तरी माणसाकडे नाही. दुष्टाला सुष्ट करण्याची काय प्रक्रिया आहे? शिक्षण, संस्कार, विपश्यना वगैरे सारख्या पद्धती खरेच या जगातील सगळी कटुता, कृपणता, क्रूरता वगैरे घालवू शकतात? बरे आज एक कोटी दुष्टांना सुष्ट केले तरी उद्या तसेच तयार होतीलच ना? रोज लाखो बालके स्वत:चा पिंड घेऊन जन्माला येत असतात. शिवाय जगात घडणाऱ्या घटनांच्या क्रियाप्रतिक्रियातून माणसांचे वर्तन, विचार घडत, बिघडत असतात. पैसा, साधने, तंत्रज्ञान, माणसे यांचे कमीअधिक प्रवाह गरजेनुसार वाहत असतात. तेव्हा निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता या दोन गोष्टी नसून, एकीतूनच दुसरी जन्म घेते, हे समजून घेणे गरजेचे आहे.

तिसरा मुद्दा आहे- विकासासाठी संधींची समानता. हा तर फारच तकलादू आहे. यातून जंगलचा न्यायच उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि आज तेच पाहायला मिळत आहे. गॅट किंवा डंकेल प्रस्ताव आणि संपूर्ण जागतिकीकरणाची प्रक्रिया याच युक्तिवादावर आधारित होती. आज मात्र विपरीत चित्रच पाहायला मिळते. अगदी साधी गोष्ट आहे- रिलायन्स आणि खेडेगावातील एखादा दरिद्री शेतकरी यांना समान संधी आहे. पण रिलायन्स भाजी विकण्याचा दरिद्री शेतकऱ्याचा व्यवसाय करू शकते, पण दरिद्री शेतकरी रिलायन्स उभे नाही करू शकत. उलट यातून विनाश होतो तो दरिद्री शेतकऱ्याचाच. कायदे वगैरेची चर्चा न केलेलीच बरी. न्याय मागण्याची समान संधी असतानाही आज त्या संदर्भात काय स्थिती आहे? खरे तर सत्ता गाजवणे, कोणापेक्षा तरी वरचढ होणे, जग मुठीत बाळगणे, सर्वशक्तिमान होणे, वगैरे वगैरे असंख्य नावांनी मानवाच्या मनात अंगभूत असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरीपुंचा पुरता बंदोबस्त होईपर्यंत संधींच्या समानतेतून चांगलेच उत्पन्न होईल ही आशा करणे भाबडेपणाचे आहे. देण्यात आलेली संधी प्रत्येक जण उदार, विशाल मनाने आणि सद्वृत्तीने वापरेल याचा काय भरवसा? उलट तसे न होण्याचीच शक्यता अधिक. संधी मिळायचा अवकाश की मनातील स्वार्थ, सत्तालालसा उफाळून आल्याच म्हणून समजा. मुख्य म्हणजे स्वत: पुढे जाण्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलणे, दुसऱ्याचे पाय खेचणे किंवा दुसऱ्याचे अहित करणे यात काय वावगे आहे, या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत संधींची समानता काय आणि किती साध्य करू शकेल?

मग उपाय काय? उपाय आहे- माणसापुढे जगण्याचे व्यापक प्रयोजन ठेवणे. जगणे म्हणजे पैसा, वस्तू, साधने यांचा संग्रह वाढवीत जाणे नाही आणि जगणे म्हणजे जगवणे, ही व्यापक दृष्टी रुजवीत जाण्याची नितांत गरज आहे. मला पुढे जायचे आहे, मला अमुक मिळवायचे आहे, याच्यावर मात करायची आहे, त्याच्यावर मात करायची आहे (याच्यावर, त्याच्यावरमध्ये निसर्गही आला), याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे वगैरे चुकीची प्रयोजने काढून टाकण्याची गरज आहे. संपूर्ण जीवनदृष्टीच बदलावी लागेल. ही जीवनदृष्टी बदलली की समता वगैरे आपोआपच साध्य होईल आणि मानव त्याहूनही खूप पुढे निघून जाईल. समतेसाठी आटापिटा करून ती साध्य होणार नाही आणि विपरीत परिणाम करेल. कारण माणसाच्या मनात आमुलाग्र बदल करण्याची, त्याच्या मनात उच्चतर भावांची प्रेरणा देण्याची शक्ती त्यात नाही. उच्चतर आदर्शांच्या साधनेने, रुजवणुकीनेच काही तरी मार्ग निघू शकेल. अर्थात- संपूर्ण गीता सांगितल्यावरही तुझा निर्णय तू घे असे सांगणाऱ्या पार्थसारथ्याची परंपरा मी सांगतो. त्यामुळे माझे म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह नाही. प्रत्येकाचा आपापला विचार असावा.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २९ एप्रिल २०१५

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

भवभयातील रतीरंग

आज रात्री बरोब्बर ७० वर्षे होतील. २८ आणि २९ एप्रिल १९४५ च्या मधली रात्र...!!!

जवळपास साडेचार महिन्यांपासून, तारीखच सांगायची तर १६ जानेवारी १९४५ पासून अडॉल्फ हिटलर बर्लिन शहरात एका भुयारात राहत होता. सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा शेवट नजरेच्या टप्प्यात आला होता. आपल्या क्रौर्यगाथांनी दहशत निर्माण करणारा, वंशश्रेष्ठतेचा दुराग्रही योद्धा चारही दिशांनी घेरला गेला होता. अमेरिका, सोव्हिएत युनियन यांच्या मित्र देशांच्या फौजा जर्मनीत घुसून बर्लिनच्या दिशेने पुढे सरकत होत्या. लाखो माणसांना मुंगीसारखे चिरडून टाकणारा हिटलर एका भुयारात लपून बसला होता. उंदरासारखा असे मात्र म्हणता येणार नाही. कारण तिथूनही आपली सत्ता चालवण्याचा त्याचा आटापिटा सुरूच होता. जर्मनीची हार होणार हे निश्चित झाल्यावर त्याने जर्मनीतील सगळी औद्योगिक प्रतिष्ठाने जमीनदोस्त करण्याचा हुकुम त्या भुयारातून दिला. ही औद्योगिक प्रतिष्ठाने शत्रूच्या हाती पडू नयेत हा उद्देश. शस्त्रास्त्र मंत्री अल्बर्ट स्पिअर याला या कामाची जबाबदारी त्याने सोपवली. स्पिअरने काहीही प्रतिसाद न देता त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. २० एप्रिल १९४५ ला त्याचा ५६ वा वाढदिवस होता. त्याच दिवशी सोव्हिएत फौजांनी जर्मनीची राजधानी बर्लिनवर तुफान बॉम्बहल्ला केला. पूर्ण जर्मनी भाजून काढली. बर्लिनच्या संरक्षणासाठी जर्मन फौजांनी यावे ही त्याची आज्ञा पाळण्यास लष्कराने नकार दिल्याची बातमी त्याला २२ एप्रिल रोजी देण्यात आली तेव्हा तो पूर्ण निराशेत बुडाला आणि त्या क्षणी त्याने सर्वप्रथम आपला पराभव अटळ असल्याचे मान्य केले. त्याच दिवशी त्याने हेही जाहीर केले की, शेवटपर्यंत आपण बर्लिनमध्येच राहू आणि अखेरीस स्वत:वर गोळी झाडून घेऊ. डॉ. वेर्नर हेस यांना त्याने आत्महत्येची खात्रीची पद्धत कोणती याची माहितीही विचारली. डॉ. हेस यांनी बंदूक व विष यांचा एकत्र उपयोग करण्याचा सल्ला दिला. ज्यावेळी फिल्ड मार्शल हर्मन गोरिंग याला याविषयी कळले तेव्हा त्याने हिटलरला एक तार पाठवली. १९४१ च्या निर्णयाप्रमाणे आपण तुमचे उत्तराधिकारी असल्याने आता तसे जाहीर करावे, असे त्याने त्या तारेत म्हटले होते. यावर हिटलर संतापला आणि त्याने गोरिंगला काढून टाकण्याचे आदेश दिले. २७ एप्रिल १९४५ रोजी बर्लिनचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटला. हिटलरचे अधिकारी तहाच्या व शरणागतीच्या हालचाली करीत असल्याचे त्याला कळले. त्याचा नुसता संताप संताप होत होता. सगळीकडून घेरला गेलेला, अधिकारी, सैन्य सगळे सोडून जात असलेले, पराभव समोर दिसतोय आणि स्वत: एकाकी असहाय्य अशी त्याची अवस्था झाली होती.

दरम्यानच्या काळात त्याने आपली प्रेयसी ईव्हा ब्राऊन हिला बर्लिनला बोलावून घेतले होते. त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान असलेली ईव्हा ब्राऊन १९२९ पासून म्हणजे १६ वर्षांपासून त्याची प्रेयसी होती. ती छायाचित्रकार होती. हिटलरची उपलब्ध असलेली अनेक छायाचित्रे तिनेच काढली आहेत. पूर्ण घायाळ झालेल्या प्रियकराच्या हाकेला ओ देऊन तीही त्याच्याकडे भुयारात आली. २८ आणि २९ एप्रिलच्या मधल्या रात्री त्या दोघांनी विवाह केला. भुयारात सोबत असलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या उपस्थितीत, जगाला हालवणाऱ्या हिटलरचा विवाह झाला. विवाहाच्या प्रमाणपत्रावर ईव्हा ब्राऊनने आपले नाव बदलून ईव्हा हिटलर असे केले. नवविवाहित जोडप्याने उपस्थितांना अल्पाहार दिला आणि ते आपल्या शयनकक्षात गेले. तेथे रात्री हिटलरने आपले मृत्युपत्र लिहिले. २९ एप्रिलच्या पहाटे चार वाजता त्याने मृत्युपत्रावर सही केली. २९ एप्रिल रोजीच त्याला त्याचा सहकारी, इटलीचा बेनिटो मुसोलिनी आणि त्याची पत्नी क्लारा यांना मारून व उलटे करून लटकावल्याची बातमी कळली. त्या क्षणी त्याने आधीच घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्याला देण्यात आलेल्या सायनाइड विषाबद्दल त्याला संशय निर्माण झाला तेव्हा त्याने ते आपली लाडकी कुत्री ब्लोंडी हिला खाऊ घातले. ब्लोंडी तत्काळ मरण पावली. हिटलरच्या मनाची खात्री पटली. ३० एप्रिल रोजी सोव्हिएत फौजा भुयारापासून १६०० फुटांवर येउन पोहोचल्या होत्या. हिटलरने भुयारातील सहकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यांना सूचना दिल्या. दुपारी एक वाजता जोडप्याने दोन सहकारी आणि खानसामा याच्यासोबत जेवण घेतले. नंतर त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. दुपारी अडीच वाजता ते आपल्या खाजगी कक्षात गेले. तासाभराने म्हणजे ३० एप्रिल १९४५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हिटलरच्या शयनकक्षातून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला. काही मिनिटे वाट पाहून सहकारी आत गेले तेव्हा एका सोफ्यावर अडोल्फ व ईव्हा निष्प्राण पडलेले होते. अडोल्फच्या डाव्या बाहुपाशात असलेली ईव्हा शांत होती. तिच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. अडोल्फच्या कपाळातून उजव्या बाजूने रक्त येत होते. ठरल्याप्रमाणे आधी ईव्हाने सायनाइडचे चोकलेट खाल्ले आणि ती मेल्याची खात्री झाल्यावर अडोल्फने स्वत:वर गोळी झाडून घेतली. सहकाऱ्यांनी लगेच त्यांचे मृतदेह बाहेर आणले. शत्रू तोंडावर उभाच होता. त्याच्या हाती ते लागायला नको होते. त्यामुळे दोन्ही निष्प्राण देहांवर पेट्रोल टाकण्यात आले आणि ते पेटवून देण्यात आले. त्यावर आतील कागदांच्या चळती आणून टाकल्या गेल्या. काहीही मागे राहू नये याची काळजी घेतली गेली. तरीही सोव्हिएत फौजांनी काही अवशेष नंतर हस्तगत केलेच आणि अनेक वर्षेपर्यंत, अनेकदा त्याची छाननी, तपासणी, खात्री करून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. न जाणो, हातावर तुरी देऊन हिटलर निघून तर गेला नसेल आणि हे अवशेष अन्य कोणाचे तरी असतील. अचानक हिटलर कुठून तरी टपकेल तर !! भवभयाचे किती रंग !!!

भयापोटीची आक्रमकता, आक्रमणातून उत्पन्न झालेले भय, अस्तित्वाचे भय, अस्तित्व संपल्यानंतरही उरलेले कल्पनेतील भय... भवभयाचे कितीतरी रंग... अन त्यात मिसळलेला ईव्हा आणि अडोल्फचा रतीरंग...!! सगळे राख होणार हे दिसत असूनही, असे काय होते की तिने त्याच्याकडे यावे? पुढचा दिवसही आपला नाही हे ठाऊक असतानाही लग्न करण्याची काय गरज होती? कोणते समाधान मिळाले दोघांनाही? कोणता आनंद मिळाला? चाळीस तासांपेक्षाही कमी अवधीच्या या संसाराने कोणते पूर्णत्व बहाल केले असेल त्यांना? जगाला नाचवणाऱ्या योद्ध्याला कोणती कमतरता होती? आणि कोणतेही भविष्य नाही, नावही बदनामच होणार हे माहित असतानाही कोणती प्रीती होती? भयाने अंतर्बाह्य वेढले असतानाही, कोणता आधार पुरवला असेल या रतीरंगाने? या पृथ्वीच्या रंगमंचावरील नाटकांना अंत नाही हेच खरे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
२८ एप्रिल २०१५

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

समतेला माझा विरोध का?

१९ एप्रिल २०१५ रोजी मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ती अशी-
समता दोन प्रकारांनी येऊ शकते-
१) सगळ्यांनी शहाणं होऊन.
२) सगळ्यांनी गाढव होऊन.
यावर एका मित्राने प्रतिक्रिया व्यक्त केली की, `हे कोणाच्याच हातात नाही, त्यामुळे ती (समता) कधीच येणे शक्य नाही.'

माझ्या पोस्टवरच्या सहज प्रतिक्रियेतून त्याने या विश्वातलं एक प्रखर सत्य अधोरेखित केलं. काळाचा महिमा म्हणा वा अन्य काहीही विश्लेषण करा. पण आज आपल्या मनावर, बुद्धीवर काही गोष्टींचा, काही घोषणांचा, शब्दांचा, काही कल्पनांचा एवढा पगडा आहे की, आपण त्याबाबत विचार करण्याची शक्तीच गमावून बसलो की काय असे वाटावे. समता किंवा समानता या अशाच कल्पना आहेत.

आज आपण स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वत्रयी फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली आहे. ही तत्वं आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे तर भगवान बुद्धाच्या विचारातून घेतली आहेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यावर वाद करण्याचे कारण नाही. पण सगळ्यांची भूमिका हीच असेल असे म्हणणे धाडसाचेच नव्हे तर चुकीचे ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे, या तीन तत्वांचा आग्रह धरताना वा त्यानुसार वागताना कुठेही बौद्ध विचारांचा मागमूस दिसत नाही. उलट पाश्चात्य जीवन मूल्यांचीच त्याला जोड असते. त्यामुळे समाजात व्याप्त अशा अर्थानेच मी चर्चा करणार आहे. त्यामुळे मी राज्यघटनेच्या विरोधी आहे किंवा डॉ. आंबेडकर मला मान्य नाहीत वगैरे किंकाळ्या मारण्यात अर्थ नाही. याचवेळी हेही विनम्रतेने नमूद करणे आवश्यक आहे की, समजा माझा राज्यघटनेशी किंवा डॉ. आंबेडकर यांच्याशी मतभेद असला तरीही त्यात काही गैर असण्याचे किंवा वाटण्याचे कारण नाही.

समतेवर माझा पहिला आक्षेप हा की, समता असूच शकत नाही. विषमता हाच या विश्वाचा पाया आणि आधार आहे. कोणाला पटून किंवा न पटून त्यात काहीही बदल होणार नाही. जी गोष्ट अस्तित्वातच नाही किंवा अस्तित्वात येउच शकत नाही, त्यासाठी रक्त, वेळ, पैसा, ऊर्जा, बुद्धिमत्ता, भावना; वाया घालवणे व्यर्थ आहे. या एका मुद्यावरून जे वाद, भांडणे, संघर्ष चहूकडे होताना दिसतात ते उबग आणणारे तर आहेच, पण दु:ख दायकही आहे. त्यातून काही चांगले, अर्थपूर्ण हाती लागण्याऐवजी त्रागा, संताप, मनस्ताप आणि कटुता एवढेच हाती लागते. हे सगळे होणे अपरिहार्य आहे. एखादी मौल्यवान गोष्ट समाजाच्या गळी उतरवायची असेल, प्रस्थापित करायची असेल तर हे होणारच; असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. हा युक्तिवाद सशक्त आहे यात वादच नाही. पण आमच्या अनुभवावरून काहीच शिकायचे नाही का, हा मूळ प्रश्न आहे. रस्ता चुकला असला तरीही पुढेच चालत राहायचे का? कधी कधी प्रवासात रस्ता चुकतो. ओळखीच्या खुणा दिसत नाहीत किंवा वेळ लागूनही नेमक्या ठिकाणी पोहोचत नाही, तेव्हा शंका येतेच की रस्ता तर नाही ना चुकला. मग त्याची खात्री करून घ्यावी लागते आणि प्रसंगी ज्या रस्त्याने जात असतो तो टाकून देऊन माघारी फिरावे लागते. तेच योग्य, उचित आणि शहाणपणाचे असते. समतेच्या बाबतीतही हे करण्याची गरज आहे.

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. काही जणांना जीवनात खूप काही मिळवायचे असते, तर काही जण संतुष्टीचे जीवन जगत असतात. काही अधिकार गाजवण्याच्या वृत्तीचे असतात, तर काही तसे नसतात. काही कठोर व्यवहारी असतात तर काही भावनांना अधिक महत्व देणारे असतात. काही पैशाच्या मागे धावणारे असतात तर काही कला साहित्य निसर्ग वगैरेत रमणारे असतात. काही संथ असतात तर काही वेगवान असतात. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या, गरजा वेगळ्या, परिस्थिती वेगळी. या सगळ्यासह जेव्हा माणसे जगतात तेव्हा विषमता राहणे, निर्माण होणे अपरिहार्य ठरते. अगदी छोटेसे उदाहरण. कोणत्याही कुटुंबात पाहायला मिळू शकते. पत्नीला चित्रपट पाहायला जायचे आहे आणि पतीला मात्र छानसे पुस्तक वाचायचे आहे; किंवा त्या दोघांची अदलाबदल करून; अशा वेळी कोणाला तरी आपले म्हणणे बाजूस ठेवावे लागते आणि समतेचे तत्व बाधित होते. दिसायला खूप छोटी गोष्ट आहे. कदाचित टिंगलटवाळी करावी अशी. पण थोडे गांभीर्याने आजूबाजूला पाहिले तर अशासारख्याच गोष्टींवरून घराघरात अशांतता आणि चौकाचौकात चर्चा झडताना दिसत नाहीत का?

चर्चा काय होतच राहतात. त्याचे काय एवढे? हे म्हणणे ठीक आहे, पण अशा चर्चातूनच अपेक्षा निर्माण होतात. मग अपेक्षा आणि अपेक्षाभंग यांचे चक्र सुरु होते. त्यातून मानसिक, सामाजिक, आर्थिक ताण सुरु होतात. एक सामाजिक वातावरण, शब्दावली, आनुषंगिक अर्थ अशी साखळी तयार होते. मग आपण शेतकरी आणि उद्योगपती यांना समान मानू लागतो. त्या दोघात असलेला जमीन अस्मानाचा फरक नजरेआड होऊ लागतो. लहान मुले आणि मोठी माणसे यांना समान समजू लागतो. अन लहान मुलांच्या समस्यांचे एक वेगळे जग आकाराला येते. एवढेच नाही तर त्या हाताळण्याची एक वेगळी समस्या पालकांसाठी तयार होते. रागावणं, बोलणं, टोमणे मारणं, एखादी कृती करणं,  एखादी गोष्ट करणं किंवा न करणं यांचे आग्रह, लकबी; अशा एक ना अनेक असंख्य गोष्टी समतेच्या चष्म्यातून पाहिल्या की नवीन समस्यांना जन्म देतात. सामान्य माणूस आणि राजकीय नेते समान आहेत ही धारणा मान्य केल्याने केवढा घोळ झाला आहे याचा विचार तरी आमच्या मनाला शिवतो का? या दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. म्हणूनच नेत्यांनी जाणूनबुजून व्रतस्थतेने खडतर आयुष्य जगले पाहिजे. तो जेव्हा पैसा आणि अन्य सर्व प्रकारच्या धनसंपत्तीचा लोभ धरतो आणि आपणही माणूस आहोत असा युक्तिवाद करतो; तेव्हा सगळी सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्था भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच दोघांमध्ये समानता राहायला नको. भूमिकेनुसार अनेक गोष्टी बदलत असतात, बदलायला हव्यात.

तरुण पिढीत वाढत असलेली उच्छ्रुंखलता, उर्मटपणा, बेपर्वा वृत्ती, या समानतेचीच देण आहेत. एवढेच नाही तर आपल्या वयाला न साजेसे असे वर्तन जेव्हा ज्येष्ठ पिढी करते तेव्हा ती समतेच्या या मूल्याने पोसलेल्या अहंगंड वा न्यूनगंडाने पछाडलेली असते असेच म्हणावे लागेल. स्त्री पुरुष समानतेचा घोळ तर सगळ्यांच्या परिचयाचा आहेच. वानगीदाखल दोनच गोष्टींचा उल्लेख पुरेसा ठरावा. एक म्हणजे- महिलाविषयक कायदेशीर तरतुदी आता प्रश्नांकित होऊ लागल्या असून त्या पातळ होऊ लागल्या आहेत. दुसरा उल्लेख एका व्यंगचित्राचा - या व्यंगचित्रात काही मुली दारू पिताना दाखवल्या होत्या आणि त्यावर लिहिले होते- `पोरगी शिकली, प्रगती झाली.' या गोष्टींचे समर्थन करणारे लोकही आहेत. म्हणजे केवळ पुरुषांची बरोबरी करायची या एकाच वेडाने झपाटलेल्या स्त्रिया दारू पिणे, जुगार खेळणे, शिव्यागाळी, सिगारेट पिणे, अन्य अमली पदार्थांचे सेवन, बेफाम गाड्या हाकणे; या आणि यासारख्या गोष्टींचे सर्रास समर्थन करतात. का? समानता. दुसरीकडे, हे करीत असताना त्या नकळत ही कबुली देतात की, एखादी गोष्ट चांगली का तर ती पुरुष करतात म्हणून. म्हणजे पुरुष करतात ते सगळे चांगले अशी कबुली देऊन, चांगले वाईट याचा विचार न करता ते करत सुटायचे. ही समता म्हणायची? जगात चांगल्या आणि वाईट, सभ्य आणि असभ्य, स्वार्थी आणि सर्वसमावेशक, एकांगी आणि एकात्म; अशा सगळ्याच वृत्ती असतात. त्यांच्यातील संघर्षात काय उचलून धरायचे आणि काय टाकून द्यायचे, हे कसे ठरवणार? कोण ठरवणार? समतेचे तत्व स्वीकारले तर यातून मार्ग कसा काढायचा? आज संपूर्ण मानवता या संभ्रमात सापडली आहे.

याशिवायही एक मोठे कारण आहे, ज्यामुळे माझा समतेला विरोध आहे. ते कारण आहे दांभिकता. अन ही दांभिकता आपल्या प्रगतीला, आपल्या विकासाला, आपल्या समजूतदारीला, आपल्या परिपक्वतेला अडसर उत्पन्न करते. प्रत्येक जण स्वत:ला सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वशक्तीसंपन्न, परिपूर्ण समजू लागला आहे. मला असे वाटते की मीच बरोबर, माझ्याहून मोठा कोण आहे? मग प्रत्येकच लेखक स्वत:ला कुसुमाग्रज समजू लागतो. चळवळीतला प्रत्येक व्यक्ती स्वत:ला डॉ. आंबेडकर समजू लागतो. प्रत्येक हिंदुत्ववादी स्वत:ला सावरकर समजू लागतो. प्रत्येक विचारवंत स्वत:ला विवेकानंद, अरविंद समजू लागतो. आपल्यापेक्षा सकस, अर्थपूर्ण, आशयसंपन्न काही असू शकते आणि मी स्वत:ला अधिक पूर्ण, अधिक सक्षम करायला हवे ही भावना हळूहळू लोप पावत आहे. दुसऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा स्वत:च्या क्षमता, योग्यता आणि रुची या आधारे केल्या जातात; तर स्वत:च्या अपूर्णता, त्रुटी लक्षातही घेण्याची गरज वाटत नाही. अशा दोन्ही अंगाने समतेचे तत्व आपली मानसिकता बिघडवून टाकते. या जगात लोखंड, सोने, तांबे, पितळ, माती, पाणी असे सगळेच असते. प्रत्येकाचे महत्व आहे, स्थान आहे, वैशिष्ट्य आहे. पण ते समान नाही. माणसांचेही तसेच आहे. असंख्य आकार प्रकारची माणसे आहेत. त्यांनी परस्पर सौहार्द, सहकार्य करीत; सुखपूर्ण, आनंददायी जीवन जगावे. त्यांना तसे जगता यायला हवे. पण त्याचा मार्ग समतेतून जात नाही. समता हे तत्व वा आदर्श होऊच शकत नाही. प्रत्येकाच्या मनातील भावनांचे उन्नयन आणि संवेदनशीलता या आधारावर तो मार्ग प्रशस्त होतो. आमचा रस्ता चुकलेला आहे. कारण जेथे जावयाचे त्याची काहीही खुण मार्गावर दिसत नाही. वेळही खूप झालेला आहे. दुराग्रह सोडून आमच्या ध्येयाच्या दिशेने जाणारा योग्य मार्ग पकडणे आवश्यक आहे. त्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २२ एप्रिल २०१५

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

वाद महत्वाचा की जीवन?

एखादी गोष्ट अन त्या गोष्टीचा वाद या दोन वेगळ्या बाबी असतात. जसे हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद, उपभोग आणि उपभोगवाद, स्त्री आणि स्त्रीवाद, विज्ञान आणि विज्ञानवाद, बुद्धी आणि बुद्धिवाद. ही यादी खूप वाढवता येईल. त्यात अधिकचा तपशील यापलीकडे अर्थ नाही. मूळ गोष्ट ही की या दोन स्वतंत्र बाबी आहेत. एखादी गोष्ट अंतिम म्हटले की, त्याचा वाद होतो. जसे उपभोग ही सामान्य गोष्ट आहे. आवश्यक बाब आहे. त्याविना जीवनच राहणार नाही. पण उपभोग ही अंतिम गोष्ट म्हटली की समस्या सुरु होतात. मग सगळ्या गोष्टींचा विचार त्याच संदर्भात आपण करू लागतो. कोणतीही गोष्ट योग्य का किंवा अयोग्य का? कोणतीही गोष्ट का करायची किंवा का करायची नाही? फार काय अन्य एखाद्या गोष्टीचा, घटनेचा, विचाराचा, व्यक्तीचा, वक्तव्याचा- अर्थ आणि आशय लावताना किंवा समजून घेताना ज्या वादाचे आपण असतो त्या अनुषंगानेच समजून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. यामुळे कोलाहलाशिवाय दुसरे काहीही हाती लागत नाही. एवढेच नाही तर सगळ्या गोष्टी स्वच्छपणे समजून घेण्याची क्षमताच आपण हळूहळू गमावून बसू लागतो.

उपभोगाचे उदाहरण घेता येईल. उपभोग या सामान्य गोष्टीचा माणूस विचार करतो तेव्हा अडचण येत नाही. प्रत्येकाने आवश्यक तेवढा, योग्य प्रकारचा उपभोग, योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. त्याला तो मिळाला पाहिजे. त्यासाठी त्याने व इतरांनीही प्रयत्न केले पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे. पण उपभोगाचा उपभोगवाद होतो तेव्हा काय होते? उपभोग ही अंतिम गोष्ट ठरते आणि सगळ्या गोष्टींचा अर्थ त्याच अनुषंगाने लावला जातो. म्हणजे कसे? तर एखादी व्यक्ती किती उपभोग घेते त्यावर तिची योग्यता आणि श्रेष्ठता ठरू लागते. मग कोण किती पाणी वापरतो, कोण किती वाहनांचा उपभोग घेतो, कोण किती जमिनीचा उपभोग घेतो, किती वस्तूंचा उपभोग घेतो, किती पैशाचा उपभोग घेतो; यावरून व्यक्तीचे स्थान, व्यक्तीचे मानपान, व्यक्तीचे लहानमोठेपण, व्यक्तीची योग्यता ठरू लागते. गंमत अशी की, त्या उपभोगाची गरज आहे का वगैरे विचारही मग गौण ठरू लागतो. एवढेच कशाला त्या उपभोगाने निर्माण केलेल्या समस्यांचा विचारही केवळ उपभोगाच्या संदर्भातच केला जातो. जसे अनियंत्रित, अंदाधुंद उपभोगाने आज अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. पर्यावरणाच्या, आरोग्याच्या, मानसिकतेच्या, दृष्टीकोनाच्या अशा अनेक. मात्र त्याचा बहुश: विचार कसा केला जातो- येत्या काही वर्षांनी पाणी, तेल, जमीन, अन्नधान्य इत्यादी उपलब्ध झाले नाही तर काय करायचे? म्हणजे भविष्यात उपभोग मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या तर काय? पण उपभोग सर्वोच्च ठरला की, त्यासाठीची जीवघेणी धडपड सुरु होते, स्पर्धा सुरु होते, अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतात; या साऱ्यातून आंतरिक शांतीचा, गुणांचा ऱ्हास होऊ लागतो. बाह्य प्रकृतीत तर बिघाड होतोच पण आंतरिक प्रकृतीही बिघडते. उपभोगाची स्पर्धा सुरु झाली की मग तो उपभोग खनिज तेलाचा असो की सौर उर्जेचा, तो बाह्य आणि आंतरिक संतुलन नष्ट करणारच. पण या साऱ्याचा विचार गौण ठरतो आणि विचार, चिंतन, योजना, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी फक्त पर्याय शोधण्यासाठी धडपडू लागतात. कारण उपभोग हा जीवनाचा भाग न राहता, जीवनाचा सर्वोच्च संदर्भबिंदू होऊन जातो.

हेच सूत्र सगळ्या गोष्टींना लागू होऊ शकते. स्त्री, पुरुष, विज्ञान, बुद्धी, समाज, लोकशाही, भाषा, प्रांत, बाजार, उपभोग, भांडवल, श्रम, ग्राम, शहर, पर्यावरण, साहित्य किंवा अशा असंख्य बाबी आवश्यक आणि योग्यच आहेत. पण त्यांना अवास्तव महत्व दिले की त्याचे वाद होतात आणि त्यातून संकटपरंपरा जन्माला येते. कोणतीही एक गोष्ट अंतिम वा सर्वोच्च नाही. हे सारे जीवनाचे विविध अंग आहेत. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीचा विचार समग्र जीवनाच्या संदर्भात व्हायला हवा. जीवनाचा विचार यातील एकाच्या वा अनेकांच्या संदर्भात होऊ नये. तंत्रज्ञान असो की पर्यावरण, विज्ञान असो की साहित्य, स्त्री असो की पुरुष, बुद्धी असो की प्रशासन; आपापल्या ठिकाणी कितीही उच्च, उदात्त, उत्तम, अचूक असोत, त्यांना काहीही अर्थ नाही. त्यांच्या स्वीकार वा नकाराचा, त्यांच्या योग्य वा अयोग्यतेचा विचार अत्यंत असंतुलित, विविधांगी, परस्पर विरोधी गोष्टींनी, स्वविरोधी गोष्टींनी भरलेल्या या जगाच्या आणि जीवनाच्या संदर्भातच करणे शहाणपणाचे असते. एक गोष्ट दुसरीवर कुरघोडी करू पाहते तेव्हा संघर्ष आणि असंतुलन निर्माण होते. कारण या जगाचे किंवा जीवनाचे विक्षिप्त कडबोळे आपल्यापैकी कुणीही तयार केलेले नाही. आपली स्वप्ने किंवा कल्पना यावर ते बेतलेले नाही. हे जग आणि हे जीवन आपले गुलाम नाही तर आपण त्याचे गुलाम आहोत, याचा विसर अनर्थकारी ठरत असतो. एका अणुबॉम्बने घातलेला हैदोस ठाऊक असतानाही, आज जगात हजारो अणुबॉम्ब आहेत आणि त्यात भर घालण्याचीच स्पर्धा सुरु आहे; तरीही आपण विचार करायला तयार नाही हे दुर्दैवी आहे. आणि, एक वेळ अणुविघटन करणारा अणुबॉम्ब आम्हाला समजतो, पण मनबुद्धीत लपून बसलेले अणुबॉम्ब आम्हाला कळत नाहीत, हे त्याहून मोठे दुर्दैव आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ७ एप्रिल २०१५

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

पाश्चात्य मनोविकृतीचे ताजे उदाहरण

स्टीफन हॉकिंग. एक नावाजलेले, गाजलेले, चर्चित असे नाव. या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाने नुकतेच आपले नाव पेटंट केलेले आहे. पेटंट कायद्यानुसार आपण ज्या गोष्टीचे पेटंट करतो ती कशाकशासाठी वापरता येणार नाही याची वर्गवारी असते. अशा वर्गवारीतील ४१ व्या वर्गासाठी या वैज्ञानिकाने आपल्या नावाचे पेटंट केले आहे. औद्योगिक रसायने, रंग, दारू अशा अनेक गोष्टींसाठी खूप सारे वर्ग असतात. ४१ व्या वर्गासाठी पेटंट केल्याने शिक्षण व मनोरंजनाच्या सेवांसाठी त्याचे नाव वापरता येणार नाही. वर्गवारीतील १५, २४ आणि २६ व्या वर्गांसाठी त्याने पेटंट न केल्याने त्याच्या नावाचे पोस्टर, गालिचे वा कृत्रिम फुले सुद्धा लोकांना तयार करता येतील. हा सगळा तपशिलाचा आणि काहीसा किचकट भाग आहे. मूळ मुद्दा वेगळा आहे.

मुद्दा हा की ही पेटंट कल्पना मुळातच किती योग्य आहे. महात्मा गांधींनी ही कल्पना पूर्णपणे फेटाळून लावली होती. आपल्या लिखाणाचा उपयोग कोणीही करू शकतो, अशी त्यांची भूमिका होती. कधी काळी कट्टर मार्क्सवादी विचारवंत म्हणून ओळखले जाणारे, `हिंदू अर्थशास्त्र'चे लेखक, नागपूर विद्यापीठाचे एके काळचे विद्वान कुलगुरू, दिवंगत डॉ. म. गो. बोकरे यांनीही अशीच भूमिका घेतली होती. भारतीय विचार परंपरेतही याचा मागोवा घेता येतो. वेद, उपनिषदे किंवा अन्य साहित्य असो किंवा आजीबाईचा बटवा म्हणून ओळखले जाणारे वनौषधींचे ज्ञान असो. त्यात कोणी काय शोधले, कोणी काय प्रयोग केले, कोणी किती कष्ट घेतले काहीही माहीत नाही. क्षणभर आपल्याला वाटू शकते की, किती ही कृतघ्नता? पण श्रेय अथवा कमाई यासाठीच जगणे असते, अशा प्रकारचे कंडीशनिंग झालेल्या आपल्याला तसे वाटणे स्वाभाविक असले तरीही योग्य नाही.

आपल्या येथील सगळ्या विचारपरंपरा, ज्ञानपरंपरा, लोकपरंपरा, संशोधनपरंपरा यांच्या मुळाशी निखळ विश्वकल्याणाची प्रेरणा होती. तसेच या सगळ्या विश्वप्रपंचाकडे पाहण्याची एक विशेष दृष्टी होती. विश्वकल्याणाची ही प्रेरणा आणि विश्वप्रपंचाकडे पाहण्याची विशेष दृष्टी यांचे मूळ ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्रात आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणत असत की- जगातील सगळे साहित्य लोप पावले तरीही हरकत नाही, पण एवढा एक मंत्र लोप पावायला नको. संपूर्ण विलयातून पुन्हा ओजस्वी आणि उर्जस्वल मानवी सभ्यता उभी करण्याची शक्ती त्या मंत्रात आहे. म्हणूनच आमच्या येथे ज्ञान वा संशोधन यावर कोणताही एकाधिकार नाही. ते सगळ्या जगासाठी आहे. कोणीही ते घ्यावे आणि स्वत:चे अन जगाचे कल्याण करावे. आपण विचार करीत नाही म्हणून; पण हळदीचा वापर कसा आणि कशासाठी करायचा येथपासून तर भरतनाट्यम पर्यंत, किंवा योगासनांपासून तर वस्त्र प्रावरणांपर्यंत असंख्य गोष्टी सहजतेने सगळ्यांपर्यंत पोहोचल्या. स्वयंपाक असो की स्वेटर विणणे, संपूर्ण समाज सहजतेने त्याचे ज्ञान मिळवीत राहिला.

खरे तर पाश्चात्य देशातही हीच पद्धती होती. पण २० व्या शतकात जागतिक मानवी मनाने स्वार्थाची जी अभूतपूर्व उसळी घेतली त्याने सारी मानवी सभ्यता अस्ताव्यस्त करून टाकली आहे. मानवी मनातील स्वार्थ ही स्वाभाविक बाब असली तरीही त्याला नियंत्रित करून आणि आळा घालूनच स्थिर, सुखी, शांततामय समाजाची उभारणी होऊ शकते. अन असा समाजच व्यक्तीच्याही सुख शांतीपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे, हे हजारो वर्षांच्या मानवी संचिताचे सार आहे. यात व्यक्ती वा समाज यांचे १०० टक्के समाधान होऊ शकत नाही. पण तसे होणे ही निव्वळ एक कल्पना आहे. प्रत्यक्षात ते अशक्य आहे. हा सारासार विचार आणि विवेक सोडून व्यक्ती आणि समाज यांच्यात सांगड घालण्याचे प्रयत्न करण्याऐवजी, संघर्ष उभा करून केवळ स्वार्थसाधनेसाठी ज्या अनिष्ट बाबी मानवतेच्या पदरात टाकण्यात आल्या त्यातील एक म्हणजे- पेटंट. आज त्याचा प्रचंड राक्षस उभा झाला आहे. स्टीफन हॉकिंगच्या पेटंटने ही गोष्ट अधोरेखित केली आहे.

एक तर एखाद्या गोष्टीवर, वस्तूवर, विचारावर, कृतीवर, नावावर कोणाचाही स्वामित्व अधिकार असूच कसा शकतो? माणसाला सारे काही देणारा निसर्ग आहे. नाव देणारा समाज आहे. विचार किंवा कल्पना देणारी अज्ञात अशी शक्ती आहे. अगदी विज्ञान सुद्धा कोणाही मानवाचे गुलाम नाही. उदाहरण घ्यायचे तर गुरुत्वाकर्षणाचे किंवा सापेक्षतेचे किंवा अगदी कोणत्याही विज्ञान शाखेच्या कोणत्याही सिद्धांताचे घेता येईल. ज्या क्षणी ती गोष्ट त्या त्या व्यक्तीच्या मनात जन्माला आली त्या क्षणी ती कशी आली? समोर एखाद्या गोष्टीचे, प्रयोगाचे किंवा अन्य कशाचे निरीक्षण करताना अथवा केल्यावर त्याच्या मनात वा बुद्धीत एखादी गोष्ट प्रतीत झाली म्हणजे काय? थोडा शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की, हे सारे वैज्ञानिक ज्ञान सुद्धा अचानक एखादा दिवा लागावा तसेच कुठून तरी चित्तात उदय पावत असते. त्याशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. म्हणजे तेदेखील कुणा अज्ञात शक्तीनेच दिलेले आहे. मग असे असताना- अज्ञात शक्तीने, समाजाने, निसर्गाने दिले असताना- त्यावर स्वामित्व कसचे? म्हणूनच ईशावास्य उपनिषद म्हणते- `ईशावास्यं इदं सर्वं'.

पाश्चात्य समाजाने गेली अनेक शतके जोपासलेले स्वार्थ आणि स्पर्धेचे तत्वज्ञान आणि विशेषत: गेल्या शतकात त्याला अनुसरून उभ्या केलेल्या अनेक गोष्टी यांना पूर्णत: तिलांजली दिल्याशिवाय जगाला सुख, शांती, समाधान मिळू शकणार नाही. अंधाराशिवाय दिवस असू शकत नाही तसेच उजेडाशिवाय देखील दिवस असू शकत नाही. सुखाशिवाय किंवा दु:खाशिवाय मानवी जीवन असूच शकत नाही. त्यामुळे केवळ स्वप्नमय वितंडवाद करण्यापेक्षा व्यवहारी विचार करण्याची गरज आहे. भारतीय परंपरेने तो केलेला आहे. म्हणूनच स्वार्थीपणा पूर्ण निपटून काढणे अशक्य आहे हे मान्य करूनही, माणसाला नि:स्वार्थ करण्याचाच प्रयत्न करावा लागेल. त्याला पर्याय नाही; हे लक्षात घेतले पाहिजे. या जगातील कशाचाही विचार हा सर्वसाधारण पद्धतीने, तारतम्यानेच करायचा असतो हे भान सुटायला नको, एवढेच. एकीकडे सगळ्या क्षेत्रात, सर्व स्तरांवर पूर्ण मोकळीक हवी असे म्हणत असतानाच, दुसरीकडे पेटंट सारख्या गोष्टी उचलून धरणाऱ्या आधुनिकतेचे खरे रूप ओळखण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ६ एप्रिल २०१५