७ जून २०१८. देशाच्या इतिहासातील एक नोंद घेण्यासारखा दिवस. भविष्यावर 
लांब सावली पडेल असा दिवस. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते, माजी 
राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा 
वर्गाच्या तृतीय वर्षाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित 
होते. वास्तविक सरदार वल्लभभाई पटेल यांचे बंधू व कॉंग्रेसचे तत्कालीन नेते
 विठ्ठलभाई पटेल यांच्यासह गांधीजी, नेताजी यांच्यापासून अनेक लहानमोठे 
काँग्रेस नेते संघाच्या कार्यक्रमात येऊन गेलेले. पण १९४७ साली देशाला 
इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून संघ आणि काँग्रेस यांच्यात 
कॉंग्रेसनेच जो दुरावा निर्माण केला होता त्या पार्श्वभूमीवर हा बदल 
लक्षणीय ठरतो. दुसरे म्हणजे, कॉंग्रेसने निर्माण केलेल्या दुराव्याचा उपयोग
 करून घेत; हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वविरोधी असे जे समाजाचे वैचारिक 
विभाजन आणि ध्रुवीकरण कम्युनिस्ट लोकांनी प्रयत्नपूर्वक घडवले; त्यालाही 
मिळालेली ही चपराक होती.
 डॉ. प्रणव मुखर्जी तीन दिवस नागपुरात होते.
 त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या भेटीगाठी, त्यांची देहबोली, त्यांचे 
खाणेपिणे, त्यांची वेशभूषा; इत्यादी गोष्टी हा त्यांच्या व्यवहाराचा शब्द 
होत्या. या व्यवहाराच्या शब्दांचा वाच्यार्थ, लक्षणार्थ आणि भावार्थ यांची 
चर्चाही यानिमित्ताने भरपूर झाली. प्रत्येकाने आपापल्या परीने त्यात भाग 
घेतला वा त्यातून काही तरी ग्रहण केले. त्यांच्या या व्यावहारिक 
शब्दांबरोबरच समारोप समारंभात प्रत्यक्षपणे त्यांनी स्वत:च्या विचारांनाही 
शब्दरूप दिले. त्यांच्या व्यावहारिक शब्दांची जेवढी चर्चा झाली तेवढी 
त्यांच्या विचारशब्दांची मात्र झाली नाही. त्यांच्या भाषणात संघाबद्दल एकही
 शब्द नव्हता. अन विषयाच्या दृष्टीने सरसंघचालक आणि डॉ. मुखर्जी यांच्या 
भाषणात फारसा भेद नव्हता. मुळीच नव्हता म्हटले तरीही चालेल. पण खरेच त्याचा
 एवढाच अर्थ आहे का?
 भाषेच्या संदर्भात letter and spirit असा 
शब्दप्रयोग केला जातो. शब्द आणि त्याचा भावार्थ. त्यालाच reading between 
the lines असेही म्हटले जाते. डॉ. मुखर्जी यांच्या प्रकट भाषणाचा हा 
भावार्थ आणि लक्षणार्थ फार मोठा आहे. विरोधी विचाराच्या लोकांनी एकत्र 
येणे, विचारांची देवाणघेवाण करणे, सद्भावांचा सेतू बांधणे याच्या पलीकडेही 
ते भाषण काही सांगून जाते. मुळात त्यांचे भाषण पहिल्या शब्दापासून शेवटच्या
 शब्दापर्यंत हा शब्दांपलीकडील आशय सांगणारेच होते. १) भारत हे एक राष्ट्र 
नाहीच, २) भारतीय राष्ट्र १९४७ रोजी जन्माला आले, ३) भारतीय समाज हा 
सुव्यवस्थित समाज नव्हताच, ४) भारतीय समाजाचे या जगात काही योगदान नाही, ५)
 माणसाचा, समाजाचा, जीवनाचा विचार हा भारताबाहेरील जगाचीच मक्तेदारी आहे, 
६) भारताला इतिहास, संस्कृती आदी काही नाही, ७) भारताने संस्कृतीचा जुना 
धागा तोडून टाकला आहे किंवा तोडून टाकायला हवा, ८) राष्ट्रवाद ही संकुचित 
आणि भयानक गोष्ट आहे, ९) राष्ट्र म्हणजे राज्य, १०) सगळ्यांच्या 
कल्याणासाठी विविधता संपुष्टात आणायला हवी; अशा ज्या बाबी आपल्या आणि 
जगाच्या मनीमानसी गेल्या सुमारे २०० वर्षात रुजवण्यात आल्या आहेत; त्या 
सगळ्यांना डॉ. मुखर्जी यांनी आपल्या छोट्याशा भाषणाने वाऱ्यावर उधळून लावले
 आहे. कम्युनिस्ट, समाजवादी, साम्राज्यवादी ब्रिटीश, स्वार्थांध विश्व आणि 
भाजपेतर सत्तांध भारतीय राजनीती, तसेच या सगळ्यांनी पोसलेले देशी वा विदेशी
 विचारविश्व; या सगळ्यांना दिलेले हे एक सणसणीत उत्तर होते. डॉ. मुखर्जी जे
 बोलले हे सारेच संघ, संघप्रणीत संस्था; एवढेच नव्हे तर महर्षी दयानंद, 
स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. 
राधाकृष्णन असे अनेकानेक लोक गेली अनेक दशके बोलत आहेत. काँग्रेसमध्येही 
अशा लोकांचा एक प्रवाह होताच. परंतु या सगळ्यांना सुव्यवस्थित रीतीने, 
नियोजित पद्धतीने बाजूला करून; शिक्षण, प्रसार माध्यमे, सामाजिक चर्चा, 
साहित्य, चित्रपट, नाटके या साऱ्यातून अधिकृत वा अनौपचारिक रीतीने अभारतीय 
विचार आणि भारताविषयी चुकीच्या आणि नकारात्मक, अभावात्मक गोष्टी मुख्य 
प्रवाहाच्या रुपात प्रवाहित आणि प्रचारित करण्यात आल्या. रा. स्व. संघ 
आपल्या शक्तीने आणि पद्धतीने त्याचा मुकाबला करीत होता. परंतु संघाचा विरोध
 करणारे, देशाचे सर्वोच्च पद भूषविणारे डॉ. मुखर्जी जेव्हा, हेतूपुरस्सर 
डावलले जाणारे सत्य उचलून धरतात, ठामपणे त्याचे प्रतिपादन करतात तेव्हा तो 
विचार, ते सत्य मुख्य प्रवाह होण्याची वाट चालू लागते. डॉ. मुखर्जी सत्य 
बोलले, संघ जे बोलत होता तेच बोलले हे महत्वाचे नाही; ते सत्य डॉ. मुखर्जी 
बोलले हे महत्वाचे आहे. म्हणून त्याला ऐतिहासिक महत्व आहे.
 आमची 
लोकशाही परंपरा `लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ येथून सुरु 
झालेली नसून हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे, असे डॉ. मुखर्जी म्हणतात 
तेव्हा ते लोकशाहीचा स्वभाव आणि संसदीय लोकशाहीपेक्षाही अधिक व्यापक असा 
आशय आपल्यासमोर ठेवतात. आज लोकशाही म्हटल्याबरोबर संसद, विधिमंडळ, 
निवडणुका, पक्षोपपक्ष, संघर्ष हेच चित्र बहुसंख्य जनता पाहू शकते. हे 
बाजूला सारून लोकशाही समजून घेणे, सहमती वा सर्वसहमती ही सुद्धा लोकशाही 
असू शकते या भावनेचा अभाव, लोकशाहीसाठी गटतट असलेच पाहिजेत असे नाही, गटतट 
असेल तरच ती लोकशाही असे नसते; या साऱ्याचा विचार आज कोणी करीत नाही अन 
कोणी केला तर त्याला लोकशाहीविरोधी ठरवायलाही आम्ही कमी करत नाही. रा. स्व.
 संघात लोकशाही नाही हा आरोप आपल्या या संकुचित दृष्टीमुळेच होत असतो. 
मात्र डॉ. मुखर्जी यांनी ज्या प्राचीन भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला त्याचा
 आशय नीट समजून घेतला तर, आज लोकशाहीच्या नावावर जो बुजबुजाट आणि संघर्ष 
पाहायला मिळतात ते कमी होऊ शकतील.
 आत्मनिषेधाच्या समाजव्यापी 
भावनेलाही त्यांनी आपल्या भाषणातून खडसावले. नालंदा, तक्षशीला 
विद्यापीठांनी तत्कालीन जगाचे पोषण केले किंवा आधुनिक शासन-प्रशासन 
विचारांचा पाया घातला जाण्याच्या हजारो वर्षे पूर्वीच भारतात सुविकसित 
शासन-प्रशासन पद्धती प्रचलित होती; याकडे डॉ. मुखर्जी यांनी आपल्या भाषणात 
लक्ष वेधले तेव्हा; भारत वा भारतीय समाज याविषयी विलक्षण न्यूनगंड आणि 
आत्मनकाराची भावना त्यांनी खोडून काढली. नालंदा तक्षशीला यासारखी 
विद्यापीठे गंमत गंमत म्हणून उभी होत नाहीत. त्यामागे परिश्रम आणि साधना 
असते. ज्ञानाची, कौशल्याची उपासना असते. अन हे सारे रिकाम्या पोटी होऊ शकत 
नाही. पोट रिकामे राहू नये यासाठी उद्योग, व्यापार, शेती हे लागते. उद्योग,
 व्यापार, शेती, नगरांची उभारणी आणि व्यवस्था, इमारती आणि जीवनाच्या असंख्य
 गोष्टी चालण्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन हेही लागते. 
आम्ही जगाचे पोषण करत होतो याचा अर्थ हे सारे आमच्याकडे होते अन ते जगाच्या
 कल्याणार्थ वापरण्याची दृष्टी आणि दानतही होती. आधुनिक विज्ञान, 
तंत्रज्ञान, समाजविज्ञान, राज्यशास्त्र, राज्यतंत्र, तत्वज्ञान यांची भाषा 
आणि अवकाश वेगळा असेल; पण याचा अर्थ आम्ही काही विचारच केला नव्हता वा आमचे
 काही चांगले जीवनच नव्हते, असा होत नाही. समाजात व्याप्त असलेल्या या 
भावनेचा राजकारणाशी फारसा संबंध नाही. ती घातक मात्र आहे. ही आत्मनकाराची 
भावना चुकीची आहे, म्हणून ती टाकून द्यायला हवी हा त्यांचा मथितार्थ आहे. 
संसदेच्या सहाव्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारावरील चाणक्याच्या श्लोकाचा 
उल्लेख करून त्यांनी सांगितले की, आम्ही आजही जुन्या भारताशी नाळ जोडून 
ठेवलेली आहे. भगिनी निवेदितांनी सांगितलेल्या from the past, by the 
present, for the future या सुत्रालाच मुखर्जींनी अधोरेखित केले. 
राज्यघटनेतील चित्रे लपवणे किंवा त्यांना हेतूपुरस्सर विरोध करणे अयोग्य 
असल्याचा संदेशच जणू त्यांनी दिला.
 या सगळ्यापेक्षाही अधिक मूलभूत 
होते त्यांनी केलेले राष्ट्र आणि राष्ट्रीयतेचे विवेचन. `विविधतेत एकता’ या
 सर्वपरिचित सूत्राचा उल्लेख त्यांनी केला. सगळेच जण सर्वदा `विविधतेत 
एकता’ हे बोलत असतात. अन दुसऱ्याच क्षणी म्हणतात- कोणी हिंदू नाही, कोणी 
मुस्लिम नाही, कोणी ख्रिश्चन नाही, काही जातीपाती नाहीत, कोणी मराठी नाही, 
कोणी मद्रासी नाही, कोणी बंगाली नाही, कोणी हिंदी नाही; इत्यादी. आपण ज्या 
तत्वाचा उच्चार करतो, त्याला किती हास्यास्पद ठरवतो आहोत हेही आपल्याला 
लक्षात येत नाही. आपण म्हणतो `विविधतेत एकता’ अन अर्थ करतो- विविधताशून्य 
एकता. एकतेच्या प्रयत्नांना यश का येत नाही, एकतेची भावना बळ का घेत नाही 
याचे हे कारण आहे. स्वामी विवेकानंद यांना एकदा अमेरिकेत असे विचारण्यात 
आले की, हिंदू धर्माची एवढी महती आपण सांगता मग आम्ही हिंदू व्हावे असे आपण
 सांगाल काय? त्यावर स्वामीजी म्हणाले- `नाही. मी म्हणेन, तुम्ही अधिक 
चांगले ख्रिश्चन व्हा, अधिक चांगले मुस्लिम व्हा, तुम्ही जे काही आहात ते 
अधिक चांगले व्हा.’ एकता ही एक आंतरिक गोष्ट आहे. बाह्य एकता शक्यही नाही, 
आवश्यकही नाही आणि ती निर्माण केलीच तर ती आंतरिक विभेद निर्माण करून मूळ 
हेतूलाच तडा देते. `विविधतेत एकता’ म्हणताना, विविधता राहणारच आहे हे आम्ही
 विसरून जातो. याचा अर्थ लगेच चातुर्वर्ण्य, जातीव्यवस्था वगैरे वगैरे 
करण्याची गरज नाही. समाजव्यवस्था काय, भाषा काय, अन्य सामाजिक आर्थिक 
राजकीय रचना काय; भेद, वेगळेपण, विविधता, विभिन्नता राहणारच आहे. 
जातीव्यवस्थेत शोषण होते आणि संसदीय व्यवस्थेत ते नाही असे तर नाही. मानवी 
जीवनाचे स्वरूपच असे आहे. या विश्वाचे स्वरूपच असे आहे. त्याचे योग्य 
व्यवस्थापन करून सगळ्यांना कमीत कमी त्रास आणि अधिकाधिक सुख कसे मिळेल हा 
विचार महत्वाचा. त्यासाठी आंतरिक एकतेचा वेध घ्यावा लागतो. ही आंतरिक एकता 
आंतरिक जाणीवा, समजूतदारपणा यांचा स्तर वाढला की उत्पन्न होते. हे आंतरिक 
उन्नयन म्हणजेच आध्यात्म. मानवाची आंतरिक उन्नती हा आमच्या राष्ट्रभावनेचा 
पाया आहे. या आधारावरच आम्ही भाषा, प्रांत, जाती, पद्धती, परंपरा, उपासना, 
राज्ये, सत्ता यांची विपुलता असूनही एक भारत, एक समाज, एक राष्ट्र म्हणून 
उभे राहू शकलो, हजारो वर्षे जीवित राहू शकलो. माझिनीचा मानवतावादी 
राष्ट्रवाद, हिटलरचा एकाधिकारवादी राष्ट्रवाद, किपलिंगचा साम्राज्यवादी 
राष्ट्रवाद, रुझवेल्टचा यथार्थवादी राष्ट्रवाद, आर्थिकतावादी राष्ट्रवाद, 
प्रादेशिक राष्ट्रवाद, भाषिक राष्ट्रवाद, पांथिक राष्ट्रवाद, सत्तासापेक्ष 
राष्ट्रवाद; या साऱ्यापेक्षा भारतीय राष्ट्रविचार भिन्न आहे. 
जीवनप्रवाहातील आवश्यक अशी स्वाभाविक विविधता जपून आंतरिक एकत्वाचा, आंतरिक
 उन्नतीच्या आधारे शोध आणि बोध घेत भारतीय राष्ट्र विकसित होते.
 
मानवी सौख्यासाठी हक्क, अधिकार, संघर्ष, कर्तव्ये यापेक्षाही प्रत्येकाचा 
आंतरिक विकास यावर त्याचा भर आहे. कोणत्याही लहान वा मोठ्या अस्मितेचा बळी 
देऊन नव्हे तर त्यांना सामावून घेत वाटचाल करणारा हा विचार असल्याने; तो 
वैश्विकतेच्या विरोधातही नाही. राष्ट्रीय एकतेसाठी मुस्लिमांनी गणपतीपूजन 
केले किंवा न केले; किंवा हिंदूंनी ईद साजरी केली किंवा न केली; किंवा अमुक
 समाजाने तमुक समाजाच्या महापुरुषाची जयंती साजरी केली वा नाही हे महत्वाचे
 नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने चालावे. परंतु दुसरा आपला शत्रू नाही
 हे लक्षात घ्यावे. दुसऱ्यावर स्वामित्व गाजवण्याची भावना योग्य नाही हे 
समजून घ्यावे. अन त्यानुसार व्यवहार असावा. याच व्यापक भावनेतून भूतकाळातील
 घटनांवर भूमिका घ्याव्या. याच व्यापक भावनेतून भविष्याची वाटचाल करावी. 
याच व्यापक भावनेतून स्वत:तील त्रुटी, कमतरता, लघुता यांना चिकटून न बसता 
त्या काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. ही आहे भारतीय राष्ट्रकल्पना. `वसुधैव
 कुटुंबकम’ हे त्याचे लक्ष आहे. डॉ. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणातून 
हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी एकत्र यायला हवे, विचारांचे 
आदानप्रदान करायला हवे, हे तर खरेच. पण हे तरी कशासाठी? केवळ बौद्धिक 
विरंगुळा म्हणून का? याचे उत्तर - बौद्धिक विरंगुळा म्हणून नव्हे तर 
मानवाच्या सुखी, समाधानी जगण्यासाठी हे आहे. त्यासाठी केवळ एकत्र येणे आणि 
आदानप्रदान पुरेसे नाही. त्यापुढील एकत्र वाटचाल महत्वाची असते. ही एकत्र 
वाट चालायची असेल तर त्याला दिशा हवी, अन योग्य दिशेसाठी ठोस वैचारिक आधार 
हवा. ठोस वैचारिक आधार नसेल तर काही साध्य होऊ शकत नाही. १९६८ पासून 
आजतागायत किमान समान कार्यक्रमाची कितीतरी आवर्तने आपण अनुभवली आहेत. शिवाय
 विचारांच्या विविधतेचा आदर ही फक्त पहिली पायरी असते. आपापल्या विचारांना 
घट्ट चिकटून बसणे हा अट्टाहास असू शकतो, शहाणीव नाही. विचारांवर विचार 
म्हणून माया करणे हास्यास्पद असते. सत्यान्वेषण आणि विश्वकल्याण ही 
विचारांची दिशा हवी. म्हणूनच 'तुमच्या विचारांसाठी मी उभा राहीन' असे 
म्हणणारा Voltaire आदर्श होऊ शकत नाही, तर 'साऱ्या विश्वातून उच्च विचार 
आमच्याकडे येवोत' अशी कामना करणारे वेद हाच आदर्श होऊ शकतो. महात्मा गांधी 
याच वेदोक्त विचारांचे पाईक असल्याने स्वतःच्या विचारांचा फेरविचार करीत 
आणि आपले नंतरचे म्हणणे मान्य करावे असे म्हणत. मानवी वाटचालीत विविध 
विचारांनी एकत्र येऊन पुढील वाटचाल देखील करायला हवी. डॉ. मुखर्जी यांनी 
एकत्र येणे आणि पुढील वाटचालीचा वैचारिक आधार, या दोन्ही गोष्टींची पूर्ती 
केली आहे.
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजवर हेच विचार मांडत आला आहे. 
आपण याच विचारांचे वाहक आहोत हेच संघ सांगत आला आहे आणि परिस्थिती आणि 
शक्तीनुसार तसा व्यवहार करीत आलेला आहे. विविध समाजगटांमध्ये संवाद वा 
संघटनांचे काम असो, देशव्यापी सेवाकार्ये असोत किंवा डॉ. मुखर्जी यांना 
समारोप कार्यक्रमाला आमंत्रित करणे असो; संघाने आपला विचार आणि व्यवहार 
जगासमोर मांडला आहे. प्रश्न त्यांचा आहे ज्यांना डॉ. मुखर्जी यांचे म्हणणे 
तत्वत:सुद्धा मान्य नाही. तेच लोक संघ सोडून बाकी सगळ्यांच्या एकतेचा विचार
 करतात, तेच लोक अन्य उपासना पंथांच्या संदर्भात अनुदार असतात. आता पाळी 
त्यांची आहे. भारतीय राष्ट्राच्या व्यापक प्रकृतीचा वारसदार कोण हे येणारा 
काळच सांगेल.
 - श्रीपाद कोठे
 नागपूर
 रविवार, १७ जून २०१८