भारताने श्रीलंकेला मदत केल्याची छोटीशी बातमी पेपरला आहे. चांगले आहे. मनाने सहजच आठवले; स्वामी विवेकानंद पहिला विदेश प्रवास आटोपून भारतात परतले तेव्हा त्यांचे पहिले स्वागत आणि मानपत्र अर्पण कोलंबोला झाले होते. त्यांचे भाषणही झाले होते. ते भारतातील पहिलं स्वागत होतं. मानपत्र आणि भाषण दोन्हीत तसा उल्लेख तर होताच पण त्याला सगळ्यांची स्वीकृती होती. गेल्या उण्यापुऱ्या सव्वाशे वर्षात असं काय आणि काय काय झालं की, श्रीलंका आणि भारत यांचं एकत्व मनातूनही पुसलं जावं? गडबड फार मोठी आहे. नीट समजून घेतली तर. हा हिंदू/ भारतीय समाज बाह्य आघातांचाच विचार करू लागला आहे. त्यावरच त्याचं लक्ष आहे. स्वतःची शक्ती, सत्व, जीवन यांच्याकडे लक्ष देण्याची त्याला गरज वाटेनाशी झाली. अन तो दुबळा होतो आहे. सबळ होण्याचा त्याचा अर्थदेखील बदलला आहे. त्यामुळेच अखंड भारत म्हटल्यावर सुद्धा आम्हाला फक्त पाकिस्तान आठवतो. वास्तविक भारत म्हणजे काय? हे समजून घ्यायला स्वामीजींचं कोलंबो भाषण पुरेसं आहे. त्याचं वारंवार वाचन सुद्धा आपली जाणीव, दृष्टी आणि चिंतन घडवू शकतं, व्यापक करू शकतं, त्याला दिशा देऊ शकतं. हां, आम्हाला ते आवडेल आणि पटेल का ही मात्र शंका मनात आहे.
- श्रीपाद कोठे
३० नोव्हेंबर २०१९