बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

वैचारिक ओकाऱ्या

एका मित्राशी जरा वादावादी झाली. मग त्याने एका महान संपादकाने लिहिलेल्या लेखाची लिंक पाठवली. मी असल्या लिंक वगैरे वाचत नाही असा त्याला परतीचा संदेश दिला. तो लेख मी आधीच वाचलेला होता. त्यात त्या संपादकाने मांडणी केली आहे की, देशभरात सगळीकडे भाजपला सत्ता मिळवून देण्याचे रा.स्व. संघाने ठरवले आहे. त्यानंतर त्यांचा पूर्ण अजेंडा राबवला जाईल. मी लिंक वाचत नाही असे म्हटल्याने मित्राची पंचाईत झाली. पण त्याला अपेक्षित हेच होते की- बोला यावर. संघ अन तुम्हीही म्हणता की, संघाला राजकारण करायचे नाही. आता बोला. आहे ना गंमत? आमच्या भागात एक म्हण आहे- `बाजारात तुरी, अन भट भटणीला मारी.' म्हणजे संघाची किंवा माझी भूमिका काय आहे हे गेलं उडत. त्याबद्दल कोणी विद्वान काही म्हणतात त्यावर बोला...!! यालाच म्हणतात- जाणूनबुजून असेल तर तमाशा, अजाणता असेल तर बावळटपणा.

तथाकथित स्वातंत्र्य, समता, लोकशाही, जागतिकीकरण, ज्ञानयुग, तंत्रज्ञान युग वगैरेंनी बाकी काय चांगलं- वाईट  केलं ते थोडं बाजूला ठेवू, पण या गोष्टींनी सगळ्याच गोष्टींचं बेसुमार सुमारीकरण केलं हे मात्र निर्विवाद. कोणीही उठावे अन काहीही करावे, कोणीही उठावे अन काहीही लिहावे, कोणीही उठावे अन काहीही बोलावे; कशाला काही धरबंद नाही. बरं जे करायचं, लिहायचं, बोलायचं ते तरी सुसंगत, विचारपूर्वक, `अभ्यासोनि प्रकटावे' असे असते का? नाव नको. आधी जसं संघाबद्दल उदाहरण दिलं तशी उदाहरणं कुठेही पाहायला मिळतात. धर्म, देव, धार्मिकता, शास्त्र, रूढी, लोकाचार, समजुती, परंपरा, तत्वज्ञान यांच्याही बाबतीत. म्हणजे मोठ्याने कर्णकर्कश्श भोंगे कोणी वाजवतात म्हणून देव धर्म वाईट. का बुवा? ते नाही विचारायचं. एखाद्या कुठल्या देवदेवतेच्या आख्यायिका वगैरे थेट उपनिषदांच्या एखाद्या सिद्धांताशी झुंजवायच्या. का? आम्हाला वाटते म्हणून.

राजकारण, समाजकारण, चळवळी यातही तेच. आज हिंदुत्वाची शक्ती वाढली आहे. त्यामुळे अनेक हौशे, नवशे, गवशे स्वत:ला हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणवून घेतात. आपापल्या ठिकाणी ते त्यांना वाटेल ते करतात. अन सगळे तोंडसुख येते हिंदुत्वाच्या वाट्याला. यात केवळ समाजोपयोगी वा समाजविघातक एवढाच भेद असतो असे नाही. काही प्रामाणिक मतभेद सुद्धा असू शकतात. पण लगेच कावकाव सुरु होते- ते असे म्हणतात, ते तसे म्हणतात. अगदी स्वातंत्र्य चळवळीत किंवा ज्यांना आपण आदर्श म्हणतो अशा नेत्यांमध्येही मतभेद राहत होतेच ना? कॉंग्रेसमध्येही हिंदुत्ववादी होतेच. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातच नव्हे तर गांधीजी व रवींद्रनाथ टागोर यांच्यातही मोठे मतभेद होते. डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या रिपब्लिकन विचारांचे किती गट आहेत? किंवा कम्युनिस्ट विचारधारा किती धारांनी वाहते? पण त्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत. त्या चळवळी वा विचारधारा मानणाऱ्या व्यक्तींची कृत्ये त्यांच्या तत्वज्ञानाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी वापरली जात नाहीत. हिंदुत्व मात्र या साऱ्याला अपवाद.

सध्या साहित्यिक राजीनामे प्रकरण सुरु आहे. साहित्य आणि समाज यांचा खरंच कसा आणि किती संबंध असतो, यावर किती जण सखोल विचार करतात. साहित्याने जग बदलता आलं असतं तर आजवर काय कमी साहित्य निर्माण झालं आहे? असा प्रश्न समोर आला की दुसरे कुणी उठतात, अन साहित्य वगैरे झूठ आहे असा सूर आळवतात. साहित्याची अतिरेकी भलावण आणि साहित्य झूठ अशा भूमिका घेणारे दोघेही सारखेच उथळ आणि पोकळ. तेच सरकार आणि समाज यांच्या बाबतीत. एक तर सरकार सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार किंवा सरकार ही निरर्थक गोष्ट आहे. बस, दोनच भूमिका अन त्यांचे अभिनिवेश. घरात तरी आई वडिलांचे मुलांवर पूर्ण नियंत्रण असते का? म्हणजे काय त्यांचे काहीच नियंत्रण नसते?

मुळातच या जगातील बहुतेक सगळ्या गोष्टी multifaceted, multidimensional असतात. त्यातील जेवढे आपल्या शरीर-मन-बुद्धीच्या आवाक्यात आले ते लगेच त्रिकालाबाधित सिद्धांताच्या रुपात बाहेर टाकण्याची सवड आणि सोय सध्याच्या जीवन रचनेने आणि तंत्रज्ञानाने करून दिलेली आहेच. वरून या multifaceted, multidimensional जगातील असंख्य गोष्टी प्रत्येकाच्या मन-बुद्धीत इच्छेने वा अनिच्छेने कोंबत राहणारी प्रक्रिया आणि व्यवस्थाही आहेच. मग रोज अजीर्ण होईपर्यंत, प्रकृतीला झेपेल न झेपेल याकडे लक्ष न देता वेगवेगळी माहिती, मते इत्यादी कोंबत राहायचे. ते पचणे शक्यच नसते. कारण त्यासाठी मूळ पचनशक्ती आणि अवकाश लागतो. त्या दोन्हीचा अभाव. त्यामुळे जिकडे तिकडे बेसुमार वैचारिक, बौद्धिक, मानसिक, संकल्पनात्मक ओकाऱ्या. याच ओकाऱ्या कधी फेसबुकवरील चर्चा, कधी व्होट्स अॅपवरील पोस्ट, दूरचित्रवाणीवरील बडबडी, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, घराघरातील चर्चा-वादविवाद, चहाटपरी वा पानठेल्यावरील गप्पा यातून सांडत राहतात. याची कारणे काय वगैरे चर्चा करता येतील. पण बेसुमार सुमारीकरण याच्या मुळाशी आहे हे खरे.

पुढील काळ कसा राहील? कुणास ठाऊक?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १४ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा