शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

महाकवीच्या गावाची सफर

प्रसिद्ध हिंदी छायावादी कवी सूर्यकांत त्रिपाठी `निराला' यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीप्तीने काल त्यांची एक कविता टाकली आणि १०-१२ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. संस्कार भारतीच्या साहित्य विधेची एक अखिल भारतीय बैठक उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे होती. तीन दिवसांची बैठक आटोपल्यावर परतीच्या आरक्षणाप्रमाणे लोक परतत होते. एक पूर्ण दिवस माझ्याकडे रिकामा होता. बाकीही काही मंडळी होती. दिवस कसा घालवायचा यावर चर्चा सुरु झाली. संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. अध्यक्ष पाटण्याचे डॉ. शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव यांनी सुचवले- कवी `निराला' यांचे गाव इथून जवळ आहे. तिथे जाऊन येता येईल का पाहा. कार्यकर्त्यांनी विचारपूस केली तर ते शक्य होईल असे वाटले. मग काय? लगबग सुरु झाली. हिंदी साहित्य विश्वात ख्यातीप्राप्त डॉ. श्रीवास्तव यांच्यासह दुसऱ्या श्रेष्ठ साहित्यिकाच्या गावाची सफर म्हणजे आनंदच. डॉ. श्रीवास्तव, संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. संघटन मंत्री योगेन्द्रजी, अस्मादिक, अन्य दोन-तीन लोक असे `निराला' यांच्या `बैसवाडा' गावी निघालो. दीप्तीही होती सोबत.

दोनेक तासात उन्नाव वरून `बैसवाडा'ला पोहोचलो. प्रथम तेथील शाळेत गेलो. त्या शाळेला `निराला' यांचेच नाव आहे. शाळेचे मुख्याध्यापक, अन्य शिक्षक, कर्मचारी सगळेच आनंदून गेले होते. कवीचे गाव पाहायला आजकाल कोण जातात? पण ही देशभर फिरणारी बडी मंडळी (म्हणजे डॉ. श्रीवास्तव, योगेन्द्रजी) आपल्या छोट्याशा गावात आली याचं विलक्षण कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शिक्षक मंडळी आम्हाला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेली. तिथे `निराला' यांची एक कविता कोरलेली होती. हे कवीवर आणि कवितेवर प्रेम करणारे लोक आहेत हे वेगळे सांगण्याची गरज उरली नव्हती. डॉ. श्रीवास्तव प्रत्येक गोष्ट टिपून घेत होते. शांतपणे ऐकत होते. पाहत होते.

शाळेतून आमची गाडी गावातल्या `निराला' यांच्या घराकडे निघाली. अन्य साधारण खेड्यांप्रमाणेच बैसवाडाही होते. छोट्या बोळात गाडी अडली. ना मागे, ना पुढे. डॉ. श्रीवास्तव अन योगेन्द्रजी उतरले अन चालू लागले. आम्हाला त्यांचे अनुकरण करणे भागच होते. पाचेक मिनिटात आमचा ताफा विश्वप्रसिद्ध हिंदी कवी `निराला' यांच्या झोपडीत पोहोचला. तेथे कोणीही राहत नव्हते. ओसाड. आजूबाजूचे लोक जमले. कोणी काही, कोणी काही सांगू लागले. कोणी सुसंगत, कोणी असंगत. त्यात एक विचित्र वाटावा असा माणूस होता. गावात बहुतेक अशी माणसे असतातच. पूर्ण खेडवळ, जरा स्क्रू ढिला आहे की काय असे वाटावे असा, गबाळ्या. जे बोलेल ते समजून घेण्यासाठी ऐकणाऱ्याने श्रम करायला हवेत अशी अपेक्षा करणारा. १०-१५ मिनिटे आम्ही तिथे घालवली. डॉ. श्रीवास्तव खाली वाकले त्यांनी त्या ओसाड झोपडीला नमस्कार केला. तिथली चिमूटभर माती कपाळाला लावली. अन आम्ही परत निघालो. दाराबाहेर पाऊल टाकले तर तो विचित्र माणूस डॉ. श्रीवास्तव यांच्याजवळ आला अन काही सांगू लागला. एका कार्यकर्त्याने त्याला हाडहुड करून बाजूला केले.

आम्ही परत शाळेत आलो. तिथे गाडी उभी होती. गाडीत बसून उन्नावचा रस्ता धरला. जसे आम्ही गाव सोडले, तसे तोवर शांत असलेले डॉ. श्रीवास्तव हाडहुड करणाऱ्या त्या कार्यकर्त्याकडे वळले. त्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले- `त्या माणसाला तू असे का घालवून दिले. अशाच माणसांकडे अनेकदा पुष्कळ काही असते. अशी माणसे विचित्र असंबद्ध बोलत असतील. कंटाळवाणे वाटेल आपल्याला पण ते नीट शांतपणे ऐकले, संगती लावण्याचा प्रयत्न केला तर खूप काही पदरात पडते. अन आपल्या हाती काही लागले नाही, तरीही काय होते? त्या माणसाने `निराला' यांच्यासोबत काळ घालवला असेल. त्यांना कधी काही हवे नको पाहिले असेल. त्यांच्यासोबत रागाचे, हास्यविनोदाचे क्षण घालवले असतील. ते सांगण्याची त्याला जी ऊर्मी असते तिचेही महत्व आहेच ना? अन काहीच नसेल तरीही आपल्याला ज्या महाकवीबद्दल विलक्षण आदर आहे, त्याच्यासह राहिलेला एक माणूस म्हणून तरी त्याच्याशी नीट वागायला हवे की नको?' तो कार्यकर्ता खजील होऊन बसला होता. पण गाडीतील बाकीच्यांनाही, म्हणूनच मलाही- जीवनाची किती विलक्षण जाण प्राप्त झाली होती.

रस्त्यात एक छोटे गाव लागले. तेथील टपरीवर चहाचा आस्वाद घेऊन उन्नावचा प्रवास सुरु झाला. पुढच्या तासभर डॉ. श्रीवास्तव महाकवी `निराला' आणि त्यांचे `राम कि शक्तीपूजा' यावर बोलत होते. ज्यांना डॉ. श्रीवास्तव माहिती आहेत, त्यांना ज्यांनी ऐकले आहे असे समजू शकतील, आम्हाला त्यावेळी मिळालेली मेजवानी. स्वत: उत्कृष्ट ख्यातीप्राप्त साहित्यिक, हिंदीचे प्राध्यापक, भाषेवर प्रभुत्व, भाषेचा गोडवा, विद्वत्ता, वक्तृत्व अन काय नव्हते त्यांच्याकडे. व्यक्तित्वही प्रभावी. व्यक्तित्व अन वक्तृत्व असे की, अगदी अटलजी मंचावर असतानाही श्रोत्यांच्या मनात रेंगाळणार ते डॉ. श्रीवास्तवच. उन्नाव कधी आले ते कळलेच नाही.

काही योग नियतीने लिहून ठेवलेलेच असतात. असाच त्या दिवशीचा योग होता. `निराला' यांच्या गावची निराळीच सफर कायमचे आनंदनिधान झाली आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा