रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

नेता ऐसा मिळे अम्हाला...

केंद्र सरकारच्या एका ग्रामविकास योजनेचं उद्घाटन आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. राजकारण, राजकीय नेते, सत्ताकारण यावर मतप्रदर्शन करण्याचं मी नेहमीच टाळतो. पण आजचा कार्यक्रम, त्यातील पंतप्रधानांचे भाषण, त्यातून पुढे आलेली योजना आणि त्यामागची दृष्टी याचं अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही. सध्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे आणि त्या निमित्ताने खूप बरीवाईट चर्चा सुरु आहे. ती चर्चा करणाऱ्यांनी आणि ज्यांना स्वत:चं, समाजाचं, देशाचं भलं व्हावं असं वाटतं त्या सगळ्यांनी तो कार्यक्रम, त्यातील भाषण जरूर ऐकावं. एकीकडे बारामतीची कुस्ती खेळतानाच दुसरीकडे देशाची, त्यातील ग्रामीण भागांची, समस्यांची, त्यावरील उपायांची, त्यातील खाचखळग्यांची अचूक जाण; प्रत्यक्ष कृतीसाठी दिशादर्शक कल्पना; प्रेरक भाषा; सर्वसमावेशकता; स्वत:चा वाटा उचलण्याचा संकल्प; अशा अनेक गोष्टी केवळ अर्धा तासात, समोर कागदाचा चिटोराही न ठेवता करणारे पंतप्रधान या देशाने पहिल्यांदाच पाहिले आहेत. एकीकडे प्रचाराचे दौरे आणि भाषणांची रणधुमाळी सुरु असतानाच, संपूर्ण देशाच्या ग्रामविकासाच्या संदर्भात मन-बुद्धीची एवढी तयारी आणि टीकेचा वर्षाव सुरु असतानाही मन-बुद्धीचा एवढा समतोल; या काही खायच्या गोष्टी नाहीत. एका संघगीताच्या काही ओळी सहजच ओठावर येतात-

धीरवृत्तीचा उंच हिमालय,

भीषणतेतही निर्भय निश्चल,

नेता ऐसा मिळे आम्हाला,

काय असे मग उणे,

यशाने दुमदुमवू त्रिभुवने...

आणि हे करण्यासाठी मुहूर्त लोकनायक जयप्रकाश नारायण आणि श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या जयंतीचा. स्वत:ला जयप्रकाशजींचे वारसदार म्हणवून घेणारे फक्त आणि फक्त मोदीविरोधात बुडून गेले असताना हा नेता त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशापुढे, खासदारांपुढे देशाला पुढे नेण्याचा कृती कार्यक्रम ठेवतो- तोही `अरे हे तर सहज शक्य आहे' असं कोणाच्याही तोंडून निघावं अशा स्वरूपाचा. केवळ मोदी पंतप्रधान आहेत म्हणून केंद्र सरकारने देऊ केलेली मदत नाकारण्यात धन्यता मानणारे जेपीभक्त कुठे आणि अशी मदत नाकारणाऱ्यांनाही आपल्या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मानसिकता कुठे?

देशाच्या ४०० जिल्ह्यात रात्रीचा मुक्काम करणारे मोदी कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. कुठे पाण्याची टाकी असते तर पाण्याचे नळ नसतात; तर कुठे नळ असतात तर पाण्याची टाकी नसते; ही आपल्या ग्रामविकासाची अवस्था माहीत असणारा आणि आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करणारा हा नेता, स्वत:चे सोडून दुसरे गाव दत्तक घ्या- ही व्यावहारिक सूचना करायलाही विसरला नाही. आपण काही नवीन करीत आहोत असा आव न आणता अन्य लोक अशा प्रकारच्या ग्रामविकासासाठी जे प्रयत्न करीत आहेत त्याचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. एवढेच नाही तर त्या प्रयत्नांची दृकश्राव्य ओळखही करून देण्यात आली. ही निधी देणारी योजना नसून, विकासाची नवीन दृष्टी विकसित करणारी योजना असल्याचे सांगतानाच- supply driven development ऐवजी demand driven development ची कल्पना अभ्यासक, कार्यकर्ते आणि विचारक यांच्यापुढे त्यांनी ठेवली.

आजच्या योजनेचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील-

१) खासदाराने ग्रामीण भागात जावे.

२) ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडावे.

३) आपण काय सांगतो, त्याऐवजी लोक काय सांगतात ते ऐकावे.

४) आज्ञा देऊन कामे करण्यापेक्षा प्रेरणा देऊन कामे करण्याची पद्धत अवलंबावी.

५) छोट्याशा कामाला मोठ्ठा वळसा घालावा लागणारी पद्धत बदलून तिथल्या तिथे अनेक गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

६) आपणही एक गाव दत्तक घेणार असल्याची स्वत: पंतप्रधानांची भूमिका. (ही आजवर ऐकू न आलेली भाषा आहे.)

७) योजनेच्या यशासाठी प्रामाणिकता, कळकळ आणि भावना महत्वाची आहे यावर भर.

यादी आणखीनही करता येईल. मुख्य मुद्दा आहे- या जबाबदारीच्या, पुढाकार घेण्याच्या, झूल उतरवून काम करण्याच्या, कामाच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवू नये हे स्पष्टपणे सांगण्याच्या, स्वत:चा वाटा उचलण्याच्या गोष्टी बोलणेही बंद झाले होते. जमिनीवरील पाय उचलले गेले होते. पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जमिनीवर ठाम पाय रोवण्याची चर्चा सुरु झाली आहे. खरे तर या जगातील सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी माणसाच्या (समाजाच्या) मनातील भावना आणि डोक्यातील विचार हेच असतात. प्रत्यक्ष कृती आणि त्याचा परिणाम या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आजवर आपण भावना आणि विचार अडगळीत ढकलून सारे काही केवळ वरवर करीत राहिलो. भावना आणि विचारांना हात घालून आणि प्रवाहित करून कृतीला चालना द्यावी लागेल. पंतप्रधान तेच करीत आहेत. नेत्याने दुसरे करायचे तरी काय असते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांच्या आजच्या आवाहनाला सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अन्य खासदार, कम्युनिस्ट खासदार, अन्य समर्थक व विरोधक प्रतिसाद देतील? प्रत्यक्ष काही करून दाखवण्याची, प्रत्यक्ष समाजाचे भले करण्याची ही संधी खासदार उपयोगात आणतील? समाज पाहणार आहे, लोक पाहणार आहेत, जग पाहणार आहे. १०० खासदारांनी जरी हे करून दाखवले तरी पुरे. अन्य ७०० खासदारांच्या पाठीशी लागून जनताच त्यांना हे करायला भाग पाडेल. एकदा ही साखळी प्रक्रिया सुरु झाली की, राजकारणात तग धरण्यासाठी जमिनीवर राहून काम करण्याला पर्याय राहणार नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ११ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा