गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

लक्ष्मीपूजन

श्रीसूक्त. देवी लक्ष्मीच्या आराधनेचे प्राचीन सुक्त. ऋग्वेदाच्या दुसऱ्या अध्यायातील सहावे सुक्त. अनुष्टुभ छंदातील हे सुक्त आनंदकर्दम ऋषींनी रचलेले. १५ श्लोकांच्या या सुक्तात श्रीलक्ष्मीचं वर्णन आणि आवाहन आहे. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही हे या सुक्तातून स्पष्ट होते. धन, धान्य, पशु, गायी, फळफळावळ, दुधदुभते, पुत्रपौत्र, जमीनजुमला, वनेउपवने अशा सगळ्या गोष्टींचा `लक्ष्मी'मध्ये अंतर्भाव आहे. विनिमयाचे साधन म्हणून उपयोगात येणारा पैसा हा लक्ष्मीचा लहानसा आणि म्हटलं तर दुय्यम असा भाग. जीवनासाठी आवश्यक अशा साऱ्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी. पैसा हे देवाणघेवाणीच्या व्यवहाराचं फक्त एक साधन आहे. आजच्या संदर्भात या वैशिष्ट्याचा आवर्जून विचार करायला हवा. आज आपण दुर्दैवाने पैसा म्हणजेच लक्ष्मी समजू लागलो आहोत. त्यामुळे पैसा कसा निर्माण होईल हाच एक ध्यास माणसाने घेतला आहे. त्यामुळे कृषी जर पैसा उत्पन्न करू शकत नसेल तर त्याऐवजी व्यवसाय उभे करा किंवा सेवाक्षेत्राचा आधार घ्या, असाच प्रवाह आहे. मुळात जीवनासाठी शेती, जंगले, जमीन, पाणी, उद्योग, सेवा, वस्तू, ज्ञान, कलाकौशल्य या सगळ्याच गोष्टी हव्यात. मात्र आज एखादी गोष्ट करायची वा नाही किंवा उचलून धरायची वा नाही याचा निकष `त्यातून पैसा निर्माण होतो का?' एवढाच राहीला आहे. अगदी शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही. यातून एक अंतर्विरोध निर्माण होतो. जसे जगण्याला दुधदुभते लागते. आनंद साजरा करायला दुग्धजन्य पदार्थ लागतात. पण पशू मात्र दुर्लक्षित. त्यांची संख्या कमी होते याचा विचारच नाही. दुधदुभते आणि दुग्धजन्य पदार्थ वाढत्या लोकसंख्येसाठी हवेत तर पशूंची संख्याही वाढायला हवी. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था हवी. त्यांना चरण्यासाठी आणि राहण्यासाठी जागा हवी. त्यांची देखभाल करायला आणि अन्य कामांसाठी कुशल माणसे हवीत. यासाठी वातावरण हवे. आज तर शहरांची अंदाधुंद वाढ करून माणसे, सिमेंटकॉंक्रीट, गाड्या यांनी जमिनी व्यापून आणि आच्छादित करून टाकण्याची चढाओढ सुरु आहे. वातावरण, जगण्याचे मापदंड, पद्धती, संस्कार असे आहेत जे जमिनीपासून आणि पशुंपासून दूर घेऊन जातात. पशुंचे प्रेमसुद्धा त्यांच्यातील एक होऊन जगावे असे नाही; तर त्यांचे फोटो काढावे, त्यांच्या कारुण्यपूर्ण बातम्या दाखवाव्या किंवा एखाद्या निमित्ताने त्यांच्या चाऱ्यासाठी चार पैसे द्यावे इत्यादी प्रकारचे दिखावटी. मग भेसळयुक्त किंवा सकस नसलेले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वाट्यास येतात. भारतीय लक्ष्मीकल्पनेत हे बसणारे नाही. लक्ष्मीचा संबंध चांगल्या जगण्याशी आहे. पैसा माणसाला जगवत नाही. तहान लागल्यावर पैसा पिता येत नाही. भूक लागल्यावर पैसा खाता येत नाही. लज्जारक्षण वा थंडी, वारा, उन, पाउस यापासून शरीराचं रक्षण पैसा करू शकत नाही. कलाकौशल्याचा आनंद पैसा देऊ शकत नाही. ज्ञानार्जित सन्मान, प्रतिष्ठा पैसा देऊ शकत नाही. नाती वा मैत्र यातील गोडवा पैसा देऊ शकत नाही. उत्तम आरोग्य पैसा देऊ शकत नाही. निरामय मन-बुद्धी पैसा देऊ शकत नाही. आध्यात्मिक आनंद पैसा देऊ शकत नाही. पैसा केवळ साधनांच्या देवाणघेवाणीच्या उपयोगात येतो. त्याचे ते आणि तेवढेच महत्व आहे. परंतु `लक्ष्मी' ही त्याहून अतिशय विशाल आणि जीवनव्यापी संकल्पना आहे. `लक्ष्मी'चं हे रूप नीट समजून घेणं म्हणजे लक्ष्मीपूजन. आजच्या संदर्भात तर ते अधिकच आवश्यक आहे.

या श्रीसुक्ताच्या आठव्या श्लोकात एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कामना व्यक्त करण्यात आली आहे. `अलक्ष्मी'चा नाश होवो. संपूर्ण जगात हिंदू जीवनदर्शन सोडून हा विचार कोणी केलेला नसेल. लक्ष्मी हवी पण अलक्ष्मी नको. ही कामना ठीक आहे, पण त्यासाठी `अलक्ष्मी म्हणजे काय?' याचा विचार क्रमप्राप्त ठरतो. सूक्ताच्या पाचव्या आणि सहाव्या श्लोकातही `अलक्ष्मी' शब्द आला आहे आणि तिचा नाश होवो असे म्हटले आहे. पाचव्या श्लोकात तो दु:ख, दारिद्र्य या अर्थाने आला आहे, तर सहाव्या श्लोकात अधिक व्यापक अर्थाने हा शब्द आला आहे. तिथे म्हटले आहे- हे माते, आमचे आंतरिक आणि बाह्य दारिद्र्य दूर कर. या साऱ्याचा एकत्रित विचार केला तर `अलक्ष्मी' म्हणजे काय हे स्पष्ट होते. श्रीलक्ष्मीच्या समोर घोडे आणि मागे रथ असून मोठ्या डौलात हत्तीवर बसून येणाऱ्या कमलासनी लक्ष्मीचे स्वागत सूक्ताच्या तिसऱ्या श्लोकात आहे. हे वर्णन सुद्धा महत्वाचे आहे. जी वाजतगाजत, डौलात येते ती श्रीलक्ष्मी आणि जी लपूनछपून, न दिसता चोर दरवाजाने येते ती अलक्ष्मी. भ्रष्ट मार्गाने येणारी, चोरी- डाकेगिरी अशा पद्धतीने येणारी, अन्याय करून मिळवलेली, हपापलेपणा करून मिळवलेली, समाधान शांती गमावून मिळवलेली, खोटेपणा फसवेगिरी करून मिळवलेली, जीवनाचे पोषण न करणारी, जीवनाकडे पाठ फिरवणारी (जीवन याचा अर्थ व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, पर्यावरणीय जीवन, ऐहिक आणि पारलौकिक जीवन) ही सगळी `अलक्ष्मी'. या अलक्ष्मीचा नाश होऊन लक्ष्मी प्रसन्न होवो ही श्रीसुक्ताची कामना आहे.

श्रीलक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी समजल्या गेलेल्या या अलक्ष्मीचा सूक्ष्म, व्यापक आणि सखोल विचार आवश्यक आहे. त्याशिवाय श्रीलक्ष्मीची खरी, पुरुषार्थी आणि पवित्र आराधना करता येणार नाही. वर्तमान संदर्भात हा विचार करायला हवा. `पैसे खाणे' हा सगळ्यांना माहिती असलेला एक अलक्ष्मीचा प्रकार. याचेही अनेक पदर, प्रकार, उपप्रकार आहेत. `दैनिक लोकसत्ता'ने तर काही वर्षांपूर्वी `भ्रष्टाचाराचे भेद अनेक' अशी एक मालिकाच काही महिने चालवली होती. ज्यात भ्रष्टाचाराची काही प्रकरणे, त्याच्या अनेक पद्धती, त्याची मीमांसा केली होती. याच विषयावरून केंद्रातील याआधीचे सरकार लोकांनी मोडीत काढले. आजही अशा बातम्या यत्रतत्र पाहायला, ऐकायला मिळत असतात. परंतु अलक्ष्मी केवळ या भ्रष्ट किंवा अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांपुरती मर्यादित केली जाऊ शकत नाही. रा. स्व. संघाचे चवथे सरसंघचालक स्व. रज्जुभैय्या यांचे एका विजयादशमी उत्सवातील भाषण मला आठवते. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी `एबिसिएल' नावाची एक कंपनी काढली होती. त्यावेळी ते आर्थिक दृष्ट्या कंगाल झाले होते. त्यांनी स्वत:ची दिवाळखोरी जाहीर केली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी `एबिसिएल'तर्फे जागतिक सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. स्व. रज्जुभैय्या त्या भाषणात याचा उल्लेख करून म्हणाले- अशा प्रकारातून निर्माण होणारा पैसा आम्हाला नको. महिलांच्या देहाचे प्रदर्शन मांडून त्याचा बाजार करून निर्माण केला जाणारा पैसा लक्ष्मी नसून अलक्ष्मी आहे. महाराष्ट्रात डान्स बार प्रकरण हे असेच एक उदाहरण आहे. त्यातून पैसा निर्माण होत असेल लक्ष्मी नाही. एकीकडे शिक्षण, लष्कर, हवामान या आणि अशा अन्य अनेक क्षेत्रात माणसे मिळत नाहीत आणि पोटाच्या नावाने दारूचा पूर, शरीराचा बाजार मांडला जातो. हा बाजार केवळ डान्स बारमध्येच नाही तर जाहिरातीतही मांडला जातो. जाहिरातीतील दिशाभूल आणि स्त्री वा पुरुष देहाचा बाजार पैशाची निर्मिती करतात लक्ष्मीची नाही. `बिग बॉस'सारखे कार्यक्रम किंवा रियालिटी शो इत्यादी अलक्ष्मी जन्माला घालतात.

भ्रष्टाचाराची चर्चा होते तेव्हा गरिबी किंवा पुरेसा पैसा न मिळणे ही कारणे सांगून कधीकधी समर्थनाचा सूर लावला जातो. जसे पोलीस खाते. पोलिसांना पुरेसा पैसा मिळत नाही म्हणून पैसा खाण्याकडे त्यांची वृत्ती असते असे बोलले जाते किंवा रोजगार नसणे किंवा असलेल्या रोजगारातून पैसा न मिळणे हे कारणही पुढे केले जाते. मात्र ही कारणे बरोबर असली तरीही समर्थनीय नाहीत. पैसा कमी असेल तर आहे तेवढ्या पैशात जगले पाहिजे. अगदी टोकाचा विचार करायचा तर मरणाला सामोरे जाण्याची तयारीही हवी. पण भ्रष्ट व्यवहार, चोरी, लबाडी, लुबाडणूक करायची नाही असाच बाणा हवा. गरीब श्रीमंत असा भेद करून अयोग्य व्यवहाराचे समर्थन होऊ नये. अयोग्य व्यवहार गरीब माणसाचा असला तरीही त्यातून अलक्ष्मीच निर्माण होते. उलट अयोग्य व्यवहार न करता संघर्षपूर्ण जीवन जगल्यास, मनात येणाऱ्या चार गोष्टी बाजूला ठेवाव्या लागल्या तरीही चालेल पण सचोटी सोडणार नाही, अशा पद्धतीने वागल्यास बाहेरील लक्ष्मी मर्यादित राहिली तरीही आंतरिक लक्ष्मी कितीतरी मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. यालाच सत्व म्हणतात. हजारो वर्षे भारताने हीच शिकवण दिली आणि ती जगूनही दाखवली. इतिहासात किंवा वर्तमानातही याचे दाखले मिळतात. या देशात घरांना कुलुपे लावली जात नसत किंवा भिकारी सापडत नसत, चोर नव्हते; अशी जी वर्णने विदेशी प्रवाशांनी लिहून ठेवली ती या सचोटीचे द्योतक आहेत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या अतिशय दुर्दैवी असल्या तरीही, वावगे न वागण्याचा जो पिंड या मातीने घडवला आहे त्याचे ढळढळीत उदाहरण आहेत. सगळ्यांना जगण्याची साधने, जगण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध झालाच पाहीजे. त्यावर वाद वा मतभेद होण्याचे कारण नाहीच. मात्र गरिबी वा अपुरा पैसा हे, भ्रष्ट वा अयोग्य आर्थिक व्यवहारांचे अथवा गुन्ह्यांचे समर्थन ठरू शकत नाही. अशा प्रकारे मिळणारा पैसा ही अलक्ष्मीच होय.

पैशाच्या मागे धावणे, प्रकृती- कुटुंब- संबंध- छंद- पर्यटन- साधना- अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून पैसा कमावण्याच्या मागे लागण्यातून अलक्ष्मी जन्म घेते. अनेकदा असे पैशाच्या मागे लागणे नसते, पण खूप कष्ट करून अधिकाधिक पैसा मिळवणे हा भाग असतो. त्यामुळे खूप कामे करणे, हाती आलेले काम कोणाला मिळू नये अथवा सुटून जाऊ नये असा प्रयत्न करून क्षमतेपेक्षा अधिक स्वत:ला राबवणे यातूनही अलक्ष्मी जन्म घेते. वैद्यकीय व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, कला क्षेत्र यात हे प्रकार होतात. त्यातून शरीर आणि मन दोन्हीवर ताण येतो. कधीकधी केवळ हा ताणदेखील जीवघेणा ठरतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. यात कष्ट, कौशल्य, वैधता सारे असले तरीही त्यातून निर्माण होणाऱ्या पैशाला लक्ष्मी म्हणता येणार नाही. लक्ष्मी ही जीवनाभिमुख असली पाहिजे. तिने समाधान जन्माला घालायला हवे. असमाधान असेल तिथे अलक्ष्मीच राहील. हे असमाधान पैशाचे असेल किंवा अन्य कशाचेही. ते योग्य नाही. पैशासाठी डॉक्टरांकडून होणारी अडवणूक, शिकवणी वर्ग, दिवाळीसारख्या प्रसंगी गाड्यांचे भाडे वाढवणे यासारखे सगळे प्रकार अलक्ष्मी जन्माला घालतात. अनावश्यक अथवा कमी आवश्यक वस्तूंचे अमाप उत्पादन, खरेदी-विक्री, उपभोग हेदेखील अलक्ष्मीचे पोषण करतात. सौदर्य प्रसाधने किंवा शीतपेये ही याची ठळक उदाहरणे आहेत. यात जीवनावश्यक गोष्टी दुर्लक्षित होण्यासोबतच, नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळपट्टी आणि माणसाच्या आंतरिक आणि बाह्य पोषणाची हेळसांड या बाबीही आहेत. सणवार, लग्न वा अन्य समारंभ, उत्सव, महोत्सव यावेळी होणारे पैशाचे प्रदर्शन, अनेक गोष्टींची उधळपट्टी, प्रतिष्ठा वा दिमाख यावरील खर्च, प्रत्यक्ष पैशांची उधळण हे सगळेच अलक्ष्मी या सदरात मोडणारे.

अलक्ष्मीची जशी एक व्यावहारिक बाजू आहे तशीच एक व्यवस्थात्मक बाजूही आहे. व्यावहारिक बाबतीत व्यक्ती स्वप्रयत्नाने काही प्रमाणात अलक्ष्मी दूर ठेवू शकतो, तिची निर्मिती थांबवू शकतो किंवा तिचा नाश करू शकतो. व्यवस्थात्मक बाबतीत मात्र व्यक्ती ही व्यक्ती म्हणून खूप काही करू शकत नाही. उदाहरणार्थ- आजच्या उद्योगांची व्यवस्था. त्यालाही खूप कोन आहेत. त्यातील एक आहे वेळेचा. आज मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये ४-४, ५-५ तास नोकरीवर जाण्यायेण्यात खर्च होतात. हे केवळ महानगरांमध्ये आहे असे नाही, तर वर्धा-नागपूर, कामठी-नागपूर, नागपूर-काटोल अशी up-down करणारी मंडळीही खूप आहेत. जाणेयेणे, वाहतुकीची कोंडी, स्वत: वाहन चालवीत असल्यास त्याचा ताण, सार्वजनिक वाहनाने प्रवास करीत असल्यास मनस्ताप अशा अनेक गोष्टी माणसाला वेगवेगळ्या अर्थांनी खाऊन टाकतात. त्याच्या मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकासाची; कौटुंबिक आणि व्यक्तिगत आनंदाची ही हानी आहे. यातून लक्ष्मी कशी साकार होणार? गंमत म्हणजे याचा आता आपल्याला सराव होऊ लागला असून यालाच आपण `जीवनसंघर्ष' म्हणून गौरवू लागलो आहोत. target हाही एक महत्वाचा पैलू. महिन्याला इतकी औषधे विकली जायलाच हवीत, महिन्याला इतकी यंत्र विकली जायलाच हवीत, रोज अमुक एवढं उत्पादन झालंच पाहिजे, इतक्या केसेस पूर्ण व्हायलाच हव्या, अमुक target तमुक target, कामाशी बांधिलकी, commitment अशा अनेक प्रकारांनी चक्क वेठबिगारी चालते. अपघात किंवा आईवडिलांना, मुलाबाळांना दवाखान्यात घेऊन जाणेही मुश्कील व्हावे अशा स्तरालाही हे प्रकार कधी कधी पोहोचतात. नोकरी जाण्याच्या भीतीची तलवार तर सतत टांगलेली असते. जीवन आणि प्रपंच तर चालवायचा असतो. अशा स्थितीत माणूस मन मारून, त्रास सहन करून, मनाविरुद्ध काम करीत असतो.

उद्योग, व्यवसाय किंवा एकूणच अर्थकारणाच्या धोरणात्मक आणि सैद्धांतिक अशाही बाजू असतात. उदाहरणार्थ- उद्योग अथवा व्यवसाय राखीव असावेत की नाही, हा धोरणात्मक त्याच वेळी सैद्धांतिक प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा टीव्हीवर चर्चा सुरु होती. त्यातून माहिती पुढे आली की, सुरुवातीला काही हजार उद्योग राखीव स्वरूपाचे होते. आता ती संख्या डझनात आहे. जसे भाजी विक्रीचा व्यवसाय. रिलायन्ससारख्या कंपनीला भाजी विक्रीसाठी परवानगी का देण्यात यावी? ज्या उद्योगांना कमी भांडवल लागते, कमी कौशल्य लागते, ज्यांचा व्याप आणि संबंध स्थानिक पातळीशी असतो, त्या उद्योगात मोठ्या महाकाय उद्योगांना परवानगी द्यायला नको. पण ती दिली जाते. ही धोरणात्मक बाब आहे. याची सैद्धांतिक बाजूही आहे. सगळ्यांना समान संधी, समान न्याय हा सिद्धांत असेल तर महाकाय उद्योगांना भाजी वा किराणा विक्रीची परवानगी का नको? ही धोरणे आणि त्याच्या मुळाशी असलेले सिद्धांत यांचा फेरविचार, त्यांची फेरमांडणी व्हायलाच हवी. होत असते आणि होईलही. परंतु सामान्य माणूस त्या संदर्भात फार काही करू शकत नाही. त्यातून जन्माला येणारी अलक्ष्मी थांबत नाही. नाही म्हणायला, बहिष्कार आणि लहान व्यापारी वा उद्योग यांच्याकडूनच खरेदी करण्याचा निश्चय सामान्य माणूस करू शकतो. सध्या तसे प्रयत्न सुरूही आहेत. मात्र त्यांना मर्यादा असते. मोठा उद्योग आपला व्यवसाय सुरु करताना लहान व्यापारी व उद्योग मारून टाकण्याचे काम प्राधान्याने करतात. शिवाय दिमाख आणि प्रतिष्ठा या दोन बाबीही असतात. दिमाख आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवून सामान्य माणूस अलक्ष्मीची निर्मिती काही प्रमाणात कमी करू शकतो.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, २८ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा