शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

भाज्यांची गोष्ट

एका घरी एकदा सगळ्या भाज्या एकत्र आल्या. त्यांची एक सभाच भरली म्हणा ना. त्या घरचा मालक एक नावाजलेला सामाजिक कार्यकर्ता होता. त्याचं बोलणं, वागणं, चर्चा, त्याच्याकडे येणारे-जाणारे, त्यांची आपसात होणारी बोलणी; यामुळे त्या भाज्यांच्याही मनात विचार आला होता की, आपलाही एक समाज असावा आणि आपल्या सगळ्यांमध्ये सामाजिक भावना, सामाजिक जबाबदारी असावी. त्यासाठी सभा भरली होती. बटाट्याने प्रास्ताविक भाषण करून भूमिका मांडली. सगळ्यांच्या मनातीलच तो बोलल्याने सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिले. समता आणि आदर या दोन गोष्टी आचरणात आणायच्या असा ठराव सगळ्यांनी मिळून केला. विदेशी तत्वांशीही या दोन मूल्यांना धरूनच व्यवहार करायचा असेही सर्वानुमते ठरले. सभा आटोपल्यावर त्यांचे प्रतिनिधी मंडळ मालकाकडे गेले. त्यांनी आपला विचार, नुकतीच पार पडलेली सभा आणि त्यातील निर्णय यांची त्याला माहिती दिली. त्यालाही फार छान वाटलं. मुळात त्याचा पिंड सामाजिकतेचा असल्याने त्याने भाज्यांना प्रोत्साहनच दिले. दुसऱ्या दिवशीपासून कार्यवाही सुरु झाली. त्या दिवशी वांग्याची भाजी होती. समतेचे तत्व आचरणात आणावयाचे असल्याने स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याने, त्याला मिळालेल्या सूचनेप्रमाणे एक किलो वांग्याच्या भाजीत एक किलो तेल, एक किलो मीठ, एक किलो तिखट, एक किलो हळद, एक किलो मसाला, एक किलो बटाटे, एक किलो टमाटे, एक किलो गुळ, एक लिटर पाणी टाकले. भाजी तयार झाली. मालक जेवायला बसले. भाजीचा पहिला घास त्यांनी तोंडात टाकला आणि थु थु करत पानावरून उठले. त्यांना भाजी काही आवडली नव्हती. दुपारी भाज्यांची पुन्हा सभा भरली. पहिल्या दिवशीच्या अनुभवावर त्यात चर्चा झाली. मिरचीने मुद्दा मांडला- आपण आज फक्त एकच मूल्य आचरणात आणलं. ते म्हणजे समता. पण सगळ्यांना समान आदर द्यावा हे आपण विसरलो. त्यावर सभा आटोपली. पुन्हा भाज्या मालकाकडे गेल्या. सभेची माहिती दिली. मालक `बरं' म्हणाले. नंतरच्या दिवशी पुन्हा भाजीची वेळ झाली. तेव्हा आचाऱ्याने त्याला मिळालेल्या सूचनेप्रमाणे केले. सगळ्या गोष्टी सारख्या प्रमाणात तर टाकल्याच, पण समान आदराचे मूल्य जोपासायला म्हणून मागेपुढे न करता सगळ्या गोष्टी एकाच वेळी कढईत टाकल्या. दुपारी मालक जेवायला बसले. आदल्या दिवसाप्रमाणेच पुन्हा थु थु करत उठले. भाज्यांना अतिशय वाईट वाटले. पुन्हा सभा भरली. उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगावर सगळ्यांनी खूप विचार केला. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून सगळ्या भाज्या मालकाकडे गेल्या. सामाजिकता, समता आणि आदर ही मूल्ये; इत्यादी बाबी न सोडता विद्यमान पेचप्रसंगातून काय मार्ग काढता येईल यावर मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांनी मालकाला केली. मालक डोके धरून विचार करू लागला. काही दिवस झाले. मालकाने अजूनही डोके सोडले नाही म्हणतात.

- श्रीपाद कोठे

नागपूर

१७ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा