शबरीमलाचे अय्यप्पा वेगळे आणि अन्यत्रचे अय्यप्पा वेगळे आहेत का? या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर आहे – हो. हे वेगवेगळे अय्यप्पा आहेत. अन या होकारार्थी उत्तरातच अनेक रहस्ये आहेत. या होकारार्थी उत्तराचे विश्लेषणच भारतीयता आणि हिंदुत्व यांचे वेगळेपण समजावून देऊ शकते. सगळ्या जगाचा एक देव. अन हे जग म्हणजे त्याचीच लहर, येथील कृत्याचे चांगले वा वाईट फळ त्याच्याच हाती, तो कसा हे ठरवणारे एखादे पीठ, त्या पीठानुसार सगळे निर्णय; हे सारेच भारतीय, हिंदू धर्मविचाराला छेद देणारे. भारतीय, हिंदू धर्मविचारानुसार प्रत्येकाचा ईश्वर निराळा. कोणाचा आपसात जुळला तर जुळला, नाही जुळला तर नाही जुळला. जुळलाच पाहिजे हे आवश्यक नाही. मुळातच तुमचा ईश्वर हा तुमचा आदिबिंदू आणि तुमचा अंतिम बिंदू. ईश्वराला तुमच्या पद्धतीने आकार, रूप, रंग, गुण बहाल करा. ईश्वर हा काही एक निश्चित गुणांचा (भौतिक, रासायनिक, मानसिक, आध्यत्मिक) पुतळा नाही. प्रत्येकाचा ईश्वर त्याच्या त्याच्या भावानुसार, आध्यात्मिक विकासानुसार वेगवेगळा. व्यक्तीच्या विकासाप्रमाणेच तोही विकसित होतो. कोणी एकाने (एकाने याचा अर्थ, व्यक्तीने किंवा शास्त्रानेही) ठरवायचे आणि बाकीच्यांनी मानायचे हे मुळातच अमान्य. ईश्वर, धर्म हे मानण्याचे विषय नाहीत. हे अनुभूतीचे, विकसनशील विषय आहेत. `सर्वं खल्विदं ब्रम्ह’ किंवा `सर्वं विष्णुमयं जगत’ किंवा `चराचरात ईश्वर आहे’ इत्यादी सिद्धांत नाहीत. तो त्या त्या व्यक्तींचा अनुभव आहे. ज्याला घ्यायचा त्याने घ्यावा. कोणाला केव्हा लाभेल तेही सांगता येत नाही. परंतु तो सगळ्यांना लागू करावयाचा सिद्धांत नाही. ज्याला ३३ कोटी देव मानायचे आहेत त्याने ते मानावेत. ती त्याच्या विकासावस्थेची गरज आहे. प्रत्येकाने ३३ कोटी देव मानावेत असे नाही. ज्याला ईशत्व हवे त्याने त्यासाठी प्रयत्न करावे, ज्याला इहत्वासाठी ईशत्व हवे, त्याने त्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक व्यक्तीला यासाठी पूर्ण स्वातंत्र्य. कारण प्रत्येक जण जीव म्हणून वेगळा आहे. मूळ तत्व म्हणून एक असला तरीही. जीवाला जीवाचे गुणधर्म, जीवाच्या मर्यादा राहणारच. त्यामुळे त्याने आपापल्या पद्धतीने चालावे. अगदी जेवढे जीव तेवढे देव, तेवढ्या उपासना, तेवढे पंथ, तेवढ्या पद्धती राहू शकतील. त्यात चित्रविचित्रता राहील. जोवर कोणाच्या जीवित, वित्ताची sizable हानी होत नाही तोवर त्यात ढवळाढवळ अयोग्य.
या अनुषंगाने भगवान अय्यप्पाचा विचार कसा होऊ शकेल. ज्यांना सध्याच्या पद्धतीला आक्षेप आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने दुसऱ्या अय्यप्पा स्वामींची निर्मिती करावी. अगदी `केवळ मासिक पाळी सुरु असणाऱ्या महिलांसाठीच’ असेही मंदिर उभे करता येईल. पण जबरीने कोणाला आपल्या पद्धतीने वागायला लावणे पूर्णत: चुकीचे, अधार्मिक, आध्यात्मविरोधी. आध्यात्मिक अनुभूतींना सिद्धांत ठरवून व्यवहाराची जी मोडतोड करण्याची आज जी धडपड दिसते ती धर्म, ईश्वर, आध्यात्म यांचा भारतीय आशय समजून न घेतल्यामुळे.
स्वाभाविक प्रश्न येतो की, ज्या हिंदू समाज सुधारकांनी मंदिर प्रवेशाचे प्रयत्न गेल्या शतकात केले त्याबद्दल काय? एक गोष्ट स्पष्ट असायला हवी की, ते सारेच प्रयत्न सामाजिक होते. जड समाजाला जागे करण्याचे, त्या समाजातील तमोगुण घालवण्याचे ते प्रयत्न होते, त्या समाजातील दुष्टता घालवण्याचे ते प्रयत्न होते. यासाठी समाजाला जवळच्या असणाऱ्या धर्म या विषयाची मदत घेण्याचा, त्यावर आघात करून ती जडता, ती तमोमयता घालवण्याचा तो प्रयत्न होता. तेच त्याचे प्रयोजन होते. ते प्रयोजन आता संपले आहे. अस्पृश्यता, महिला, जगासोबत चालण्याची तयारी, विज्ञान इत्यादी ज्या गोष्टींसाठी त्या समाज सुधारकांनी प्रयत्न केले ते पुरेसे फलद्रूप झाले आहेत. त्यासाठी आता धर्माचा, धार्मिकतेचा आधार घेण्याची गरज नाही. समाजाने ते विषय स्वीकारले आहेत. आता धर्माला धर्माचे काम करू द्यायला हवे. बदललेल्या परिस्थितीचा सांगोपांग विचार करायलाच हवा. गेल्या शतकातील तर्क आणि युक्तिवाद आता निरर्थक झाले आहेत. उदाहरण म्हणून आरक्षणाचे घेता येईल. आरक्षण ही सामाजिक, आर्थिक उन्नती आणि सन्मान यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आता कोणकोणत्या हेतूंनी वापरली जाते हे आपण अनुभवतो आहोत. धर्म, मंदिर प्रवेश, परंपरा, रूढी इत्यादी सुद्धा आपापल्या इच्छा वा आपले विचार लादण्यासाठी वापरले जाऊ नयेत.
राज्यघटना की आस्था असाही प्रश्न उभा राहतो. एक मूलभूत गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की, आपण ज्याबद्दल बोलतो ती राज्यघटना आहे/ असते. राष्ट्रघटना अशी काही बाब अस्तित्वातच नाही/ असू शकत नाही. राज्य, राष्ट्र, देश या सगळ्या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यांची सरमिसळ करून गोंधळ निर्माण करण्यात हशील नाही. लोकांनी एकमेकांची डोकी फोडली तर राज्याने दोषींवर कारवाई करावी. ते नक्कीच राज्याचे काम आहे. त्यासाठी राज्यघटनेचा हवाला द्यावा. पण तेच तत्व, कोणी जबरदस्तीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करील तर त्यांनाही लागू व्हायला हवे. कारण डोकी फोडणे किंवा जबरदस्तीने मंदिरात घुसणे किंवा हट्टीपणाने बातम्या देण्याचा प्रयत्न करणे; या सगळ्याच बाबी सारख्याच आततायीपणाच्या समजल्या पाहिजेत. अन आततायीपणा नियंत्रित करणे हे राज्याचे काम आहे. राज्यघटनेने त्याबद्दल बोलावे. मात्र कोणी कशी उपासना करावी, कोणी आपल्या उपासनेत कोणाला येऊ द्यावे किंवा येऊ देऊ नये; हे राज्य, राज्यघटना किंवा न्यायालये यांनी ठरवू नये.
भावजीवनाच्या विषयांनी भौतिक जीवनाचे अति नियंत्रण करण्याचा किंवा भौतिक जीवनाने भावजीवनाचे अति नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नये. भौतिक जीवन आणि भावजीवन हे दोन्ही राज्याने, राज्यघटनेने, न्यायालयाने, समाजाने, माणसांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी प्रथम आपल्या डोक्यात पोसून ठेवलेले साचे फोडून फेकून द्यायला हवेत. व्यक्तीने समाजावर आणि समाजाने व्यक्तीवर स्वार होणे दोन्ही चूक. यांचा समतोल साधण्यासाठी `धर्म’जाणीव निर्माण होणे, व्यापक होणे, त्याची समज वाढणे खूप गरजेचे आहे. आज धर्माचा धोषा लावणाऱ्यांची धर्मसमज नीट आहेच असेही नाही. व्यक्ती आणि समाज, भावजीवन आणि भौतिक जीवन यांचा मिलनबिंदू राज्यघटना होऊ शकत नाही. धर्म हाच परस्परविरोधी भासणाऱ्या, भिन्न प्रवृत्तीच्या घटकांचा मिलनबिंदू असतो. सगळ्यांनी धर्म समजून घ्यायला हवा.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १७ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा