सोमवार, १५ मे, २०१७

पाहा विचार करून...

आफ्रिका सोडून संपूर्ण जगावर मोठा सायबर हल्ला झाला. आपल्या येथे सुद्धा रिझर्व्ह बँकेने काही सूचना जारी केल्या. जगभरातच याची चर्चा सुरु आहे. हा हल्ला आटोक्यात आला असून सुरक्षेची चर्चा सुरु झाली आहे. परंतु जी माहिती नको त्याच्या हाती लागून गेली त्याचे काय? त्याचा वापर तर तो करणारच. त्या माहितीच्या आधारे जगभरात उत्पात करून होईपर्यंत नव्याने करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांचा भेद करण्याची क्षमता व कौशल्य हे लोक विकसित करणार आणि पुन्हा हल्ला करणार. डिजिटल व्यवहारांचे आक्रमकपणे व अभिनिवेशाने समर्थन करणारेही आता बिचकू लागले आहेत. तुमचे-आमचे, तूतू-मीमी हे होईलच. संपूर्ण जगाची कबर खोदल्या गेली तरीही तूतू-मीमी सोडायचं नाही, सुटणार नाही असा शाप देऊनच माणसाला जन्माला घातलं असणार. मात्र या माणसांमधीलच काही हाताच्या बोटावर मोजावेत असे अपवाद असलेल्यांनी याचा अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा.

एक गोष्ट निर्विवाद आहे की, सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन तत्वांवर वर्तमान सभ्यता- संस्कृती- जीवन- उभे आहे. यावर या जीवन पद्धतीचे समर्थक आणि टीकाकार दोघेही एकमत होतील. पण गमतीची गोष्ट म्हणजे- या जीवनपद्धतीने ज्या समस्यांच्या गर्तेत माणसाला लोटले आहे, त्या समस्यांची सोडवणूक करण्याचे, त्या समस्यांवर केले जाणारे उपाय सुद्धा; सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन गोष्टींवरच आधारित असतात. नव्हे- सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; याच दोन संदर्भात विचार करण्याचं आमच्या बुद्धीचं प्रचंड conditioning झालेलं आहे. अगदी प्रामाणिकातल्या प्रामाणिक व्यक्ती अन प्रयत्नसुद्धा याला अपवाद नाहीत. जे ही बाब समजू शकतात त्यातील ९० टक्केहून अधिक तूतू-मीमी मध्ये अडकलेले असतात. काही चांगला बदल खरंच घडून यायचा असेल तर या जगातील ७०० कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोक विचारी अन सुजाण झाले पाहिजेत; हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नाही.

वर्तमान जगण्याच्या मूळ तत्वांना खूप आदर्श, आध्यात्मिक तत्वांचा मुलामा देण्याचे सुद्धा प्रयत्न होतात. हे अगदी सहज शक्य आहे. पण आध्यात्मिकता अथवा आदर्श ही आंतरिक प्रकृती आहे. चराचराला कवेत घेणे, चराचराशी एकरूप होणे, चराचराशी समत्वाचा व्यवहार, चराचराचं एकत्व; इत्यादी गोष्टी आंतरिक प्रकृतीशी संबंधित आहेत. बाह्य व्यवहारात विषमता, विविधता, अल्पता, वेगवेगळेपणा, आटोपशीरपणा; याच गोष्टी असू शकतात. आंतरिक प्रकृतीचा अखंड विस्तार आणि बाह्य व्यवहार छोट्या छोट्या मर्यादांमध्ये; हेच जीवनाचे सूत्र असू शकते.

शांतपणे विचार करणाऱ्यांसाठी फक्त एक संकेत- भारताच्या आर्थिक इतिहासाचे नवनवे अध्ययन आणि त्याचे निष्कर्ष आता समोर येत आहेत. त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही. परंतु भारताच्या त्या वैभवकाळात - भारत राजकीय दृष्टीने अशांत होता, आजच्यासारखे केंद्रीभूत शिक्षण- संशोधन नव्हते, जातीव्यवस्था अतिशय भक्कम होती, संपन्नता असूनही सुरक्षेचे उपाय वाढवण्याची गरज तर पडत नव्हतीच उलट घरांना कुलूपे न घालण्याचे प्रयोग यशस्वी होत असत, सारे काही कोणाच्या तरी हातात घट्ट धरून ठेवण्याची पद्धती नव्हती, एकच एक सत्ताकेंद्र नसल्याने नियमांची विस्कळीतता होती. या सगळ्या गोष्टींचा विचारही व्हायला नको?

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

महायुद्धांचे आकडे

गेले दोन दिवस सिरीया आणि अफगाणिस्थानातील अमेरिकेच्या हल्ल्यांची चर्चा आहे. काल तर अण्वस्त्र वगळून आज जगात असलेल्या बॉम्बपैकी सगळ्यात मोठा बॉम्ब अमेरिकेने वापरला. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का अशी सार्थ शंका व्यक्त होऊ लागली आहे. विविध लहानमोठी युद्धे आणि दोन जागतिक महायुद्धे यांच्या माध्यमातून जगावर सत्ता स्थापन करणे किंवा अवांच्छित शक्तींना नियंत्रित करणे यांचे प्रयत्न जगभरात होत आलेले आहेत. अगदी भारतात देखील. रावण वा कंस यांना नियंत्रित करण्यासाठी श्रीराम व श्रीकृष्ण यांनी युद्ध केले. तर राजसूय इत्यादी यज्ञाच्या वेळी होणाऱ्या लढायातून वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न झाले. सिकंदराने विश्ववर्चस्वासाठी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी तत्कालीन आतंकवाद निपटून काढण्यासाठी लढाया केल्या. गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास तर ताजा आहेच. वर्चस्व अथवा त्रासदायक शक्तींचे नियंत्रण या दोनच गोष्टी लढाया अथवा युद्ध यांच्या मुळाशी पाहायला मिळतात. यातील त्रासदायक गोष्टींचे नियंत्रण ही अपरिहार्य आणि आवश्यक बाब आहे. वर्चस्व ही ना अपरिहार्य बाब आहे ना आवश्यक. पण त्रासदायक गोष्टींच्या नियंत्रणासाठी वर्चस्व आवश्यक होऊन बसते. कालांतराने या वर्चस्वातूनच त्रासदायक गोष्टी जन्माला येतात. मानवजातीपुढील हा एक dilemma किंवा paradox आहे.

भारताने यावर उत्तर शोधले आहे. अस्वस्थता आणि संघर्ष या परिस्थितीत करावयाचा व्यवहार आणि शांततेच्या परिस्थितीत करावयाचा व्यवहार यांची फोड करून. जगाला या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हे पूर्ण लक्षात घेऊनच वाटचाल करावी लागते हे भारताचे म्हणणे आहे. याला अनुसरूनच त्याने कामे इत्यादीची वाटणी केली होती. समाजाला, माणसाला अधिकाधिक `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याचा प्रयत्न सतत व्हावयास हवा ही त्याची एक बाजू आणि त्याला emergency अन contingency यांच्यासाठी सिद्ध ठेवायला हवे ही दुसरी बाजू. `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याची बाजू अधिक मजबूत करत दुसऱ्या बाजूची गरज कमी करत जाणे हे भारताचे प्राचीन सूत्र. यालाच म्हणायचे सभ्यता आणि संस्कृती. जगाने तर याचा काही विचारच केला नाही. परंतु भारतही मार्गच्युत झाला. त्यामुळे आज स्थिती अशी आहे की गांधी आणि सावरकर यांच्यावरून आपण भांडत बसतो. गांधी आणि सावरकर दोघेही आवश्यक असतात हे आम्हाला उमगतच नाही. emergency अन contingency च्या वेळी गांधी उपयोगाचा नाही म्हणून आम्ही त्याला शिव्या घालतो आणि `मन-बुद्धी'च्या श्रीमंतीच्या मार्गात सावरकर अडथळा ठरतात म्हणून त्यांना शिव्या घालतो. शिव्या घातल्या की प्रतिक्रिया होऊन त्यांचे समर्थक गटतट निर्माण होतात. माणूस आणि समाज जिथल्या तिथेच राहतो. आपले कर्मदरिद्रीपण महापुरुष आणि परिस्थिती यांच्यावर ढकलून आम्ही मूर्खता कुरवाळत बसतो. दोघेही आवश्यक आहेत. दोघांची वेगवेगळी स्थाने आहेत. दोघांची बलस्थाने आहेत अन दोघांच्या मर्यादा आहेत. त्यांचा योग्य उपयोग करून आम्हास पुढे जायचे आहे हे भान आम्ही गमावून बसलो आहोत. जगाला ही दृष्टी देणे हेच भारताचे प्रयोजन आहे. आम्हालाच त्याचे आकलन होत नसेल तर आम्ही जगासंबंधीचे कर्तव्य काय पार पाडणार? अन भारत जगाला ही दृष्टी देणार नाही, जगाच्या जीवनात ती पूर्ण मिसळून टाकणार नाही तोवर; महायुद्धांचे आकडे मोजणे संपणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ एप्रिल २०१७

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

सूर्यनारायण राव


जगरहाटीप्रमाणे सूर्यनारायण राव गेलेत. सुदीर्घ आणि कृतार्थ जीवन जगून गेलेत.
तीन-चार वर्षांपूर्वी विजयादशमीला जोडून रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचे एक शिबिर नागपूरला झाले होते. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलेले देशभरातील सुमारे शंभरेक प्रचारक त्याला आले होते. त्यातील सगळ्यांनीच पाच दशकांहून अधिक काळ संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले होते. काहींनी तर सहा-सात दशके सुद्धा. त्यावेळी नागपूरच्या विश्व संवाद केंद्राने त्या सगळ्या प्रचारकांच्या मुलाखती घेण्याचा एक उपक्रम केला होता. या निमित्ताने या व्रतस्थ जीवनांना बोलके करणे, त्यांचं जीवन आणि रा. स्व. संघाची वाटचाल यांची प्रेरक माहिती गोळा करणे हा त्याचा हेतू. माझ्याकडे त्यातील तीन नावे आली होती. त्यातील एक होते- सूर्यनारायण राव. त्यापूर्वी त्यांना पाहिले होते. भेटणे, बोलणेही झाले होते. पण ते प्रतिनिधी सभेतील व्यवस्था म्हणून, कधी बौद्धिक वर्गाच्या वा अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा एखाद्या वेळी एखादा प्रश्न विचारण्यापुरते. मुलाखतीच्या निमित्ताने मात्र त्यांना जवळून पाहता आले, समजून, जाणून घेता आले.
रेशीमबागेतील यादव भवनाच्या तळमजल्यावरील त्यांच्या खोलीत मी पोहोचलो तेव्हा दुसरे एक ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी तिथे बसले होते आणि त्यांची चर्चा सुरु होती. सूर्यनारायण राव संघाचे पहिले अखिल भारतीय सेवाप्रमुख राहिले होते, तर रंगा हरीजी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख राहिलेले. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समग्र साहित्याचे जे १२ खंड गुरुजी जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित झाले त्याचे संपादन देखील रंगा हरीजी यांनीच केले होते. दोघेही अतिशय ज्येष्ठ, अत्यंत कर्तृत्वसंपन्न, प्रज्ञावान प्रचारक. तरीही मी तिथे पोहोचताच रंगा हरीजी लगेच उठून, नमस्कार करून तिथून गेलेत. मुलाखतीची वेळ ठरलेली होती, मुलाखत घेणारा आला होता; त्यामुळे चर्चा ताबडतोब बंद. अनुशासन आणि साधेपणा, सहजता यापेक्षा वेगळी आणि अधिक काय असू शकते? त्या दोघांपुढे मी कोणीच नव्हतो. थोडा वेळ थांबावे लागले असते तरीही काहीच हरकत नव्हती. पण मला थांबावे लागले असते तर त्याने संघ आणि त्या दोन ज्येष्ठ प्रचारकांच्या महानतेला किंचित धक्का लागला असता ना !!
माझे स्वागत करून मराठीत म्हणाले- बसा. अन मला प्रश्न केला - which language? मी हसत म्हणालो- as you wish. but of course not tamil. त्यावर तेही दिलखुलास हसले. अन म्हणाले- ok. we will start and will proceed naturally आणि इंग्रजी व हिंदीत ही मुलाखत पार पडली. अधून मधून एखादा शब्द वा छोटेसे वाक्य मराठीतही. बोलणे सुरु करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहायकाला आवाज दिला. मी म्हटले, काही हवे आहे का? मी देतो. सांगा. ते नाही म्हणाले. सहायक आल्यावर म्हणाले- दोन पेले पाणी भरून इथे ठेव. सहायकाने पाणी ठेवल्यावर गप्पा सुरु झाल्या आणि सुमारे नऊ दशकांचा जीवनपट आणि संघाचा इतिहास उलगडू लागला. धिप्पाड शरीरयष्टीचे सूर्यनारायण राव थोडे थकले होते, पाय कामातून गेल्याने उठबस नव्हती, वॉकरशिवाय पान हलत नव्हते; पण आवाज आणि स्मृती मात्र खणखणीत होती. बोलण्याच्या ओघात सव्वा तास कसा गेला कळलेच नाही. बोलणे मात्र पूर्ण झालेच नव्हते. कारण त्यांच्याकडे सांगायला खूप होते आणि मला ऐकण्यासारखे खूप होते. मग तेच म्हणाले- तुम्ही परवा या. उद्या तर विजयादशमी. उत्सव आणि सणाचा दिवस. परवा संध्याकाळी समारोप आहे. तुम्ही दुपारी या. मला मिळालेला हा आनंददायी बोनस होता.
ठरल्याप्रमाणे गेलो. सूर्यनारायण राव तयारच होते. मी विचारले- कालचा दसरा उत्सव कसा वाटला? प्रसन्न होऊन म्हणाले- खूप छान. उत्सव छान झाला. संख्याही भरपूर होती. मी पहिल्यांदाच नागपूरचा दसरा उत्सव पाहिला, त्यात सहभागी झालो. कधी योग आला नव्हता. पुन्हा तास- सव्वा तास बोलणे झाले. त्यांनी एक छान आठवण सांगितली. गोळवलकर गुरुजी तामिळनाडू प्रवासात होते. ते सुर्यनारायण राव यांच्या घरी गेले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे गुरुजींनी सगळी चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की, त्या कुटुंबात एक चिंता आहे. सूर्यनारायण राव यांची बहीण आणि नंतर राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय मंडळात राहिलेल्या रुक्मिणी अक्का यांना नागपूरला शिकायला जायचे होते आणि नागपूरला तर त्यांचे कोणीच नव्हते. गुरुजी लगेच म्हणाले- गोळवलकरांचे घर तुमचे नाही का? आणि रुक्मिणी अक्का पुढील व्यवस्था होईपर्यंत गुरुजींच्या घरी राहिल्या. बोलणे संपवून निरोप घेऊन मी उठलो. निघण्यापूर्वी त्यांना नमस्कार केला आणि दाराकडे वळलो त्यावेळी ते म्हणाले- माफ करा हं. तुम्हाला निरोप द्यायला मी दारापर्यंत येऊ शकत नाही. यावर मी काय बोलणार? एक आवंढा गिळला आणि बाहेर पडलो.
सूर्यनारायण राव १९४६ साली प्रचारक निघाले. महात्मा गांधीजींची हत्या झाली त्यावेळी गुरुजी मद्रासला प्रतिष्ठित नागरिकांच्या कार्यक्रमात होते. सूर्यनारायण राव त्यावेळी तिथे गुरुजींसोबत होते. नंतरच्या घटनाक्रमात त्यांना अटक झाली होती. कारागृहात असताना त्यांनी संपूर्ण विवेकानंद साहित्य अनेकदा वाचून काढले होते. ते त्यांना अक्षरशः पाठ होते. पृष्ठ क्रमांकासह. त्यानंतर अनेक वर्षांनी विवेकानंदांचे ते संपूर्ण साहित्य मद्रास कारागृहाच्या ग्रंथालयाला देण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी सूर्यनारायण राव यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. स्वामीजींच्या शिकागो भाषणाच्या शताब्दीनिमित्त नागपूरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी दिलेले संदर्भ ऐकून सगळेच अवाक् झाले होते. प्राचार्य राम शेवाळकर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ते तर अक्षरशः भारावून गेले होते. तोवर शेवाळकर संघ वा संघ परिवाराचे विरोधक नसले तरीही फार जवळ सुद्धा नव्हते. परंतु त्या भाषणाने त्यांना अधिक जवळ आणले होते.
दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडूत संघाचे काम रोवण्यात सूर्यनारायण राव यांचे फार मोठे योगदान आहे. तामिळनाडूत ४० च्या दशकातच काम सुरु झाले होते तरीही ते रुजले नव्हते. अन्य प्रांतांच्या तुलनेत तामिळनाडू प्रांत संघाच्या कामात एकदम पिछाडीवर होता. कुख्यात आणीबाणीनंतर तेथील कामाने वेग घेतला. त्यासाठी एक घटना सांगता येईल. संघाच्या इतिहासात प्रथमच आणीबाणीनंतर सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण आधी तयार करून देशभर एकाच वेळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार ते भाषण `तुघलक'चे संपादक चो रामस्वामी यांच्याकडेही पोहोचवण्यात आले. त्यावर चो रामस्वामी यांचे म्हणणे पडले की, भाषण ठीक आहे. मात्र संघावर अनेक आरोप होत असतात, आक्षेप घेतले जातात त्यांना कोणी अधिकाऱ्याने सविस्तर उत्तरे दिली पाहिजेत. त्यानुसार त्यांनी आपल्या संपादक विभागातील सहकाऱ्यांना अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातील संघविषयक बातम्या व लेखांचे अध्ययन करून चार पानांची एक प्रश्नावली तयार केली आणि सहकाऱ्यांना त्या प्रश्नावलीसह मद्रासच्या संघ कार्यालयात पाठवले. तेथे सूर्यनारायण राव यांनी त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. हा सगळा मजकूर सुमारे ५१ पानांचा झाला. चो रामस्वामी यांनी त्याचे संपादन करून ती उत्तरे विस्तारपूर्वक `तुघलक'मध्ये छापली. परिणामी संघाचे काम सुरु करा, अशी मागणी करणारी ६०० पत्रे २० दिवसात संघाच्या मद्रास कार्यालयात आलीत. येथून संघाच्या कामाने तामिळनाडूत उचल घेतली.
महाराष्ट्राचे एक माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांचे काका स्वामी चिद्भवानंद यांचे अनेक आश्रम आणि मठ तामिळनाडूत आहेत. ते संघाचे कट्टर विरोधक होते. मात्र सूर्यनारायण राव यांनी एका कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले. त्यांनी स्पष्ट नकार दिला. सूर्यनारायण राव मात्र त्यांच्या मागेच लागले. स्वामी चिद्भवानंद त्यांना म्हणाले- मी एका अटीवर येईन. मी वेळेचा आणि शिस्तीचा अतिशय भोक्ता आहे. तुमचा कार्यक्रम शिस्तशीर आणि वक्तशीर होणार असेल तरच मी येतो. सूर्यनारायण राव हो म्हणाले. स्वामीजी कार्यक्रमाला आलेत आणि तेथील शिस्तशीरपणा आणि वक्तशीरपणा यांनी इतके प्रभावित झाले की, तेथेच त्यांनी जाहीर केले की, राज्यभरातील त्यांचे मठ आणि आश्रम संघासाठी सदैव खुले राहतील. सूर्यनारायण राव यांनी तामिळनाडूत संघकार्यासाठी एक भक्कम आधार त्यांच्या रूपाने उभा केला होता.
रेशीमबागेत माझ्याशी झालेल्या बोलण्यात त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले- ९० च्या दशकात संघ म्हातारा झाला अशी एक चर्चा संघात आणि संघाबाहेरही सुरु झाली होती. आम्हा कार्यकर्ता मंडळींच्या मनातही पुढील वाटचालीचा गंभीर विचार सुरूच होता. अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते वृद्ध होत होते. तेव्हा सरसंघचालक रज्जुभैय्या यांच्याशी हा विषय बोलावा असे ठरले. त्यावेळच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला आणि रज्जुभैय्यांना याबद्दल पत्र लिहिण्याचे ठरले. ते काम सूर्यनारायण राव यांच्यावर सोपवण्यात आले. त्यानुसार त्यांनी सगळ्यांच्या वतीने सरसंघचालकांना एक पत्र लिहून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पदावरून दूर व्हावे आणि तरुण कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवावी असा विषय मांडला. स्व. रज्जुभैय्या यांनी याला संमती दिली आणि आपणही वृद्ध झालो असल्याने आपणही निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना परिचित आहे.
सूर्यनारायण राव यांच्या रूपाने संघाच्या महत्वाच्या सात दशकांच्या इतिहासाचा साक्षीदार आणि संघाचा इतिहास घडवणारा एक शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १९ नोव्हेंबर २०१६

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

थोडे वेगळे


झोपेतून उठलो. किती वाजले म्हणून फोन पाहिला तर ३-४ मेसेजेस. आश्चर्य वाटलं. पाहिलं तर मेसेजेस india mart चे. मी काहीही न करताच माझा पासवर्ड इत्यादी आलेले. दिवसाची सुरुवात झाली तेवढ्यात एक फोन- `सर आपने फर्निचर का ऑर्डर दिया था.' त्याला तोडत म्हटले- `नाही, मी ऑर्डर दिली नाही.' फोन बंद केला. त्यानंतरही दोन फोन. अखेर खडसावलं. तेव्हा ब्याद गेली. ज्या कंपनीचे सीम आहे त्या कंपनीचे तीन चार मेसेजेस - why worry about cash. use this and that. pls download.
cashless economy चा विचार करताना याचाही विचार व्हायला हवा. प्रगती हवी तर हा त्रास सहन करायलाच हवा किंवा या त्रासावर हे १० उपाय आहेत, अशासारखे सल्ले `शहाणपण' या सदरात मोडणार नाहीत. हां ज्यांना त्यात आनंद वाटतो त्यांनी जरूर ते करावे, पण आमच्या कल्पनाचित्रातील जग साकारायचे असल्याने तुम्ही त्रास सहन करायलाच हवा हे म्हणणे योग्य नाही. पैसा, खरेदी-विक्री, वादावादी, भांडणे अन ती सोडवणे, कायदा अन त्याची कलमे तोंडी लावत जगणे, भौतिक आणि लौकिक गोष्टीतच ज्यांना जीवन घालवायचे त्यांनी घालवावे पण सगळ्यांनी तसेच जगावे हा दुराग्रह चुकीचा.
@@@@@@@@@@@@@@@
थोडे unaccounted money बद्दल...
कालच गुरु नानक जयंती झाली. त्यांच्याबद्दल असं सांगतात की, आपल्या उदासीन मुलाने व्यापार करावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना काही पैसे दिले आणि व्यापार करण्यास सांगितले. नानकदेवांनी ते पैसे गोरगरिबांना वाटून टाकले. एका अर्थी हा आर्थिक गुन्हाच म्हणायला हवा. मात्र त्याने नुकसान झाले नाही. उलट गरीबांचा तर फायदा झालाच पण जगाला नानक देव लाभले. गेल्या अनेक दशकात गोळा झालेल्या काळ्या पैशाने आतंक, दहशतवाद, अमली पदार्थांचा विळखा, नक्षलवाद इत्यादी समस्या अक्राळविक्राळ झाल्या यात वादच नाही. परंतु त्याच्या नावावर काही सकारात्मक गोष्टीही आहेत हे विसरायला नको. राजकारणात अमाप काळा पैसा आहे. त्याचे असंख्य दुष्परिणाम आहेतच. पण, त्या काळ्या पैशाने लाखो लोकांचे भरणपोषण केले आहे, लाखो लोकांना दहा-वीस रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत मदतही केली आहे. अनेकांची आजारपणे, अनेकांची महागडी ऑपरेशन्स या unaccounted money तून झाली आहेत. अनेक मुलींचे संसार सुरु झाले आहेत. अनेकांची शिक्षणे झाली आहेत. असंख्य सामाजिक, सांस्कृतिक संस्था उभ्या झाल्या आणि चालल्या आहेत. देवस्थानांजवळ असलेल्या unaccounted money तून लाखो लोकांची पोटे भरत असतात. त्यात अनेक गरजूही असतात. या गरजूंची पोटे भरायची म्हटल्यास सरकारला किती अन काय काय करावे लागेल? या अन्नछ्त्रांसाठी लागणारे सामान आणि माणसे यांचे केवढे अर्थकारण चालते. गृहिणींच्या हाती असलेल्या, डब्यात लपवलेल्या पैशातून घरात आलेली अडचण कळतही नाही आणि सुटून जाते. आपल्या समाजाच्या या सवयीमुळेच जागतिक मंदी आमच्यासाठी फार महत्वाची ठरली नाही. parallel economy मुळेच समाजाला फार प्रश्न पडलेही नाहीत. unaccounted money, parallel economy ही पूर्णत: वाईट, कुचकामाची आणि चिरडून टाकण्याच्या लायकीची हा विचार एका टोकाचा आहे.
मात्र, या unaccounted money चा अतिरेक झाला आणि अधूनमधून त्याच्या नाड्या आवळल्या नाहीत तर ते सगळ्याच दृष्टीने घातक ठरते. त्यासाठी cautious and prudent अप्रोच हवा. अर्थव्यवस्था cashless असो की रोखीची, मोठ्या नोटा असोत वा लहान, unaccounted money जनरेट होतच असतो. कारण ती समाजाची गरजही असते. अर्थव्यवस्थेचीही गरज असते. वेळोवेळी आढावा आणि छोटेमोठे उपाय करून त्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते, करायला हवे. रिझर्व्ह बँक करीत असलेले cash reserve ratio सारखे उपाय याचाच भाग असतात. मोठ्या नोटा रद्द करण्याचा ताजा निर्णय असाच एक उपाय आहे. ती जादूची कांडी नाही. अर्थात हा उपाय वेगळ्या पद्धतीने करता आला असता. तो perception चा भाग आहे. मात्र हा उपाय वेगळ्या पद्धतीने करता आला असता असे कोणी म्हटले तर त्याकडे संशयाने पाहण्याचे कारण नाही. खुद्द स्टेट बँक ऑफ इंडिया या सगळ्यात मोठ्या बँकेने याच वर्षी एप्रिल महिन्यात सादर केलेल्या एका अहवालात याची चर्चा केली होती.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आज एका अर्थवाहिनीचा एक कार्यक्रम झाला. `अर्थकारणात महिलांचे स्थान' हा त्याचा विषय. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या त्याला उपस्थित होत्या. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी भारतीय कुटुंब व्यवस्थेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या- आपल्या आजी पणजी कोणाला न कळता पैसा वाचवून ठेवत. कशासाठी? कोणाची तब्येत बिघडली, धान्य किराणा आणायला पैसा नसला इत्यादी कारणांसाठी. त्या स्वत:साठी पैसा जमवत नसत. येथपर्यंत सगळे ठीक होते पण नंतरचे वाक्य जे स्मृती इराणी बोलल्या ते योग्य म्हणता येणार नाही. त्या म्हणाल्या- आता महिलांनी आपल्यासाठी पैशाचा विचार केला पाहिजे. ज्या भारतीय कौटुंबिक मूल्यांचा आपण गौरवाने उल्लेख करतो आणि सगळे जग ज्या कौटुंबिक मूल्यांसाठी भारताचे उदाहरण देतात त्या कौटुंबिक मूल्यांनाच हे छेद देणे आहे. स्वत:चा विचार न केल्यामुळे आपल्या महिलावर्गाला त्रास सोसावा लागला यात वाद नाही. पण त्यावरचा उपाय त्यांनी स्वार्थाचा विचार करणे हा नसून बाकीच्यांनी त्यांचा विचार करणे हा आहे. प्रत्येकाला स्वत:चा विचार करायला शिकवून जगाचं सोडा स्वत:चं देखील भलं होणं कठीण. आज जबाबदार म्हणवणारे लोक आणि एकूणच विचारप्रवाह अधिकृतपणे स्वार्थी होण्याचा उपदेश देत असतील तर पुढील ५० वर्षात जगाचं वाटोळं झालेलं असेल.
कुटुंब कसं असतं? जिथे कायदे आणि नियम नाहीत, पण जबाबदारी आहे. जिथे शिक्षा वगैरे नाही स्नेहाचं बंधन आहे. जिथे वागणे, बोलणे, खाणे, पिणे, सवयी कशाचेही साचे नाहीत आणि तरीही कुटुंब एक युनिट आहे. तिथे किती जवळ यायचं यालाही बंधन नाही, किती दूर जायचं यालाही बंधन नाही. तरीही ते तुटत नाही. कुटुंब हे समाजाचं प्राथमिक स्वरूप आहे आणि `वसुधैव कुटुंबकम' ही आमची आकांक्षा आहे. आजच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, किरकोळ गोष्टी, आधुनिक म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या गोष्टी यांचा विचार, यांची चिकित्सा, यांचे विश्लेषण या भूमिकेतून व्हायला हवं. तरंच काही आशा बाळगता येईल.
@@@@@@@@@@@@@
पुराणमित्येव् न साधु सर्वम्
नचापि काव्यम् नवमेतवद्यम
सन्त: परिक्षान्यतरद भजन्ति
मूढ: परप्रत्ययनेन बुद्धिः ......... (कालिदास)
जुनं ते सगळं योग्य असं नाही. नवीन ते सर्व कल्याणकारी असंही नाही. संत सारासार विचार करतात. मूर्ख लोक दुसऱ्याचे अनुकरण करतात.
सध्या इतकंच.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १५ नोव्हेंबर २०१६

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

नाण्याची दुसरी बाजू


नाण्याची एकच बाजू आपण पाहू शकतो. नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी पाहणे कोणालाही शक्य नाही. कोणीही कितीही विद्वान, कर्तृत्ववान वगैरे असला तरीही नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी पाहणे जमुच शकत नाही. ती आपली अंगभूत मर्यादा आहे. हां, पण एकदा एक बाजू; त्यानंतर दुसरी बाजू; असे पाहता येते. दोन्ही बाजू पाहिल्यानंतर त्या स्मृतीत साठवून, एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे समजून नाणे मात्र एकच आहे ही धारणा पक्की होते. त्यामुळे नाण्याची देवाणघेवाण करताना आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहत नाही. ते नाणे आहे एवढेच पाहतो. हाच विवेक. दुर्दैवाने आज हा विवेक आपण गमावून बसतो आहोत. आपल्या अहंमन्य दांभिकतेपोटी अनेक चुकीच्या गोष्टी आपण करतो आहोत आणि त्यातून एक सार्वत्रिक निराशा, असंतोष, हतबलता आणि त्याच्या परिणामी उद्रेक घडवून आणतो आहोत. विचार करण्यासारखा आणखी एक पैलू म्हणजे, ही एकांगी अहंमन्य दांभिकता भलेपणातूनदेखील आलेली असू शकते. चांगले असण्याचा, भले करण्याचा देखील प्रचंड अहंकार असतो. तो वाईटाच्या अहंकारापेक्षा घातक असतो. कारण वाईट गोष्ट ही मुळातच वाईट असते, त्रासदायक असते. तिला सहानुभूती मिळत नाही आणि जो वाईट वर्तन करतो तोदेखील मनातून त्या कृतीला पाठींबा देत नाही. चांगल्या गोष्टीला मात्र सहानुभूती आणि समर्थन असते. त्यामुळे त्यातील दुसरी बाजू लक्षात घेतली जात नाही आणि प्रचंड एकांगीपणा जन्माला येतो. आजच्या तारखेतील दोन उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. त्यांच्यात तसे कोणतेही साम्य नाही. मात्र त्याच्या हाताळणीमागील मानसिकता सारखीच आहे. भलं करण्याच्या अहंमन्य एकांगीपणातून आलेली.
आजच एक बातमी वाचली. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेटबाबत केलेल्या सर्वेक्षणाची. हेल्मेट कसे योग्य इत्यादी गोष्टी त्यात ओघानेच आल्या. आपल्याला जो निष्कर्ष काढायचा आहे त्यासाठी अशी सर्वेक्षणे बेमालूमपणे करवून घेणे, त्याचे निष्कर्ष ढोल बडवत प्रचारित करणे, त्यातून दडपण उभे करणे आणि आपले निष्कर्ष गळी उतरविणे ही आज नवीन बाब राहिलेली नाही. हे सर्वेक्षणदेखील त्यातीलच म्हणायला हवे. अन्यथा- हेल्मेटच्या फायद्यांचा अभ्यास करताना, ते अडचणीचे आणि uncomfortable असू शकते याचाही अभ्यास का होऊ नये. नाण्याची एकच बाजू पाहण्याचा एकांगी अहंमन्यपणा याशिवाय दुसरे कारण असू शकत नाही. एखाद्या गोष्टीचा प्रामाणिक, कळकळीने विचार करत असतानाही, त्याची दुसरी बाजू असू शकते आणि ती तेवढीच खरी असू शकते हे २१ व्या शतकातही समजू नये ही मानवी शोकांतिका आहे. पण भलेपणाची समज आणि ठेका आम्हालाच मिळालेला आहे हा समज जर सोडायचाच नसेल तर `गाढवापुढे वाचली गीता...' याशिवाय दुसरे काहीही प्रत्ययाला येऊ शकत नाही.
दुसरा विषय सध्या सुरु आहे तो- समान नागरी कायद्याचा. अनेकांना धक्का बसेल, अनेकांना पटणार नाही आणि हा किंवा तो गट असाच विचार करू शकणाऱ्यांना बंडखोरी वाटेल; पण समान नागरी कायदा करणे मला मान्य नाही. मुळात असे कायद्यावर कायदे करत जाणे निरर्थक आहे. प्रत्येक कायदा करताना आता सारे काही छान सुरळीत होईल अशी प्रचंड आशा बाळगली जाते. अन काहीच काळात तसे काहीही होत नसल्याचा प्रत्यय येतो. हा जगभरातील हजारो वर्षांचा अनुभव आहे. याचा अर्थ कायदे नकोत असाही नाही. परंतु कायदे म्हणजे काय? कायदे कशासाठी? कायद्याच्या मर्यादा आणि बलस्थाने कोणती? कायदा राबवणे आणि त्यामागील मानसिकता? समाजाची जडणघडण आणि वाटचाल, मानवी वर्तन यासारख्या अनेक गोष्टींची जी समज विकसित व्हायला हवी ती झालेलीच नाही. ही समज विकसित होण्याची प्रक्रिया कायम दुर्लक्षित राहते. त्याऐवजी कायदे करून टाका ही `टोळी मानसिकता' सोपी आणि सोयीची वाटते. मुळातच परिवर्तन म्हणजे काय? कशासाठी? कसे? परिवर्तन सत्तेद्वारे होते का? होऊ शकते का? तसे केल्यास होणारे परिणाम काय असतात? परिवर्तनाची एखाद्याची कल्पनाच योग्य, तीच सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे का? एखाद्याची परिवर्तनाची कल्पना राबवण्यासाठी सत्तेचा वापर हा राक्षसीपणा नाही का? नाण्याची एकच बाजू पाहून तेवढीच खरी मानण्याचा दुराग्रह एवढेच त्याचे स्वरूप म्हणावे लागेल.
समान नागरी कायद्याचे उदाहरण घेतल्याने त्याच्या थोड्या तपशीलाची चर्चा अप्रस्तुत ठरू नये. विवाहपद्धती आणि कुटुंब व्यवस्था हा यातील कळीचा मुद्दा आहे. या दोन्हीही गोष्टी मानवी गरज, सामाजिक व्यवस्था, आर्थिक बाजू, धार्मिकता या सगळ्यांचे संमिश्रण असते. विवाह केवळ मानवी गरजेसाठी आहे असे म्हणणे जसे चुकीचे, तसेच ती फक्त सामाजिक व्यवस्था आहे किंवा त्याला फक्त आर्थिक वा धार्मिक अर्थ आहे हे म्हणणेही चुकीचे. सगळ्याच गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. अन या सगळ्या बाबी प्रत्येक व्यक्तीसाठी आणि समाजासाठी वेगवेगळ्या असतात. मूलतः प्रत्येक व्यक्ती ज्या एका परिपूर्णतेकडे कळत वा नकळत चालतो, त्याला साहाय्य करेल अशाच पद्धतींचा अवलंब माणूस करीत असतो. ही अतिशय धीमी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. त्यात घिसाडघाई करणे, अन्य कोणी अवाजवी लुडबुड वा हस्तक्षेप करणे यामुळे खरे तर त्या त्या व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहाच्या वाटचालीचा बट्ट्याबोळ होतो. त्यासाठी अवाजवी दंडव्यवस्था सर्वनाशाला कारणीभूत ठरते. जात आणि जातीयता यांचे आजचे चित्र याची साक्ष ठरावे. एक पत्नी वा एक पती ही आदर्श व्यवस्था आपण म्हणू शकतो. परंतु तसेच असले पाहिजे ही एकांगी भूमिका होईल. काही लोक लग्न न करताही राहू शकतील, तर दोन बायका किंवा दोन पती ही काहींची आवश्यकता असू शकेल. प्रभू राम एकपत्नीव्रती होते, तर त्यांचे पिता दशरथ यांनी तीन विवाह केले होते. भगवान कृष्णांनी एक सहस्र विवाह केले, तर त्यांचे आईवडील तसे नव्हते. शिवाजी महाराजांनी एकाहून अधिक विवाह केले म्हणून ते वाईट ठरत नाहीत किंवा स्वामी विवेकानंदांनी विवाह केला नाही म्हणून तेही अयोग्य ठरत नाहीत. जास्त विवाह करणाऱ्या लोकांबद्दल जशा चर्चा होतात, तशाच विवाह न करणाऱ्या लोकांबद्दलही होतात. कमी किंवा जास्त विवाह याची अनेक कारणे असू शकतात. एकाच आयुष्यात पाच-सहा लग्न केले तर चालते, तेवढेच घटस्फोट घेतलेत तरीही चालते; पण घटस्फोटाशिवाय एकाच वेळी एकाहून अधिक लग्न चालत नाहीत. का? कोणी जर ते सांभाळू शकत असेल तर त्याचे स्वातंत्र्य का हिरावून घ्यावे? हां, त्याच्या कृत्याची जबाबदारी त्याची राहील एवढे पुरेसे. ती जशी पुरुषाची राहील तशीच स्त्रीचीही राहील. जबाबदारी घ्यावी आणि आपापला मार्ग निवडावा. विवाह कसा करायचा याचीही एकसमान तऱ्हा असण्याची गरज नाही.
बुरखा किंवा तलाक हेदेखील मुद्दे आहेत. मानवीयता आणि मुस्लिम महिलांचा विकास यासंदर्भात ते योग्य असले तरीही परिवर्तन हे आतून आणि त्याच्या अंगभूत गतीने व्हावे. बुरखा प्रथा असणाऱ्या मुस्लिम समाजात सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या महिला नाहीत का? राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या महिला नाहीत का? अमेरिकेत अजून महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही पण पाकिस्तान, बांगलादेशात झाल्या आहेत. तीन वेळा तलाक म्हणून तलाक देणाऱ्या मुस्लिम समाजात तसे न वागणारेही भरपूर आहेत. बहुविवाह न करणारेही आहेत. आजवर झालेले परिवर्तन कसे अन कशाच्या आधारे झाले? तोच प्रवाह पुढे कसा जाईल एवढेच पाहणे पुरेसे असते. उगाच आक्रस्ताळेपणा करणे, जिथेतिथे दंडशक्ती वापरणे; मुख्य म्हणजे मला वाटते ते, मला वाटते त्या गतीने व पद्धतीने व्हायला हवे हा दुराग्रह पथभ्रष्ट करतो. परिवर्तने हिंदूंची असोत की मुस्लिमांची; भले याचे असो वा त्याचे अंगभूत रीतीने व गतीने व्हावे. मुख्य म्हणजे चांगलेपणाचे साचे बनवणे आणि सगळ्या जगाला त्या साच्यात घालणे, त्यासाठी सत्ता राबवणे; कधीच इष्ट नाही. लाल, काळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या, भगव्या, बहुरंगी सगळ्याच रंगांना हे लागू होते. मानवाच्या आंतरिक वातावरणाचा, आंतरिक पर्यावरणाचा सत्तानिरपेक्ष विकास व्हायला हवा. त्यावर भर देणे मानवी इतिहासात अजून तरी सुरु झालेले नाही. ते व्हायला हवे एवढे मात्र खरे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ ऑक्टोबर २०१६

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

`प्रामाणिक पण अयोग्य' हिंदू वा भारतीय विचार विश्वापुढील आव्हान

पाकिस्तानी कलाकारांच्या संदर्भात सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कलाकारांवर अशी बंधने असू नयेत, असाही त्यातील एक सूर आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अनेकांना तसे प्रामाणिकपणे वाटते. कला, कलाकार, सादरीकरण यांचा आणि दहशतवाद, दोन देशातील संघर्ष- वाद यांचा काय संबंध असा त्यांचा प्रामाणिक प्रश्न असतो. याचा अर्थ त्यांचा युक्तिवाद बरोबर असतो असे नाही, पण त्यांचे वाटणे प्रामाणिक असते. या अयोग्य पण प्रामाणिक मताचा अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना वेगवेगळी आहे; हा सिद्धांत या विचारांच्या मुळाशी आहे. वर्तमानात ज्याला `वैज्ञानिक विचारपद्धती' म्हटले जाते ती हीच. या विश्वातील यच्चयावत प्रत्येक बाब सुटी सुटी आहे. हे सगळे सुटे भाग जोडून हे विश्व आकारास आलेलं आहे असा विचार हे लोक करतात. कधी काही समस्या आली तर संबंधित सुटा भाग काढून टाकायचा, त्याजागी दुसरा बसवायचा म्हणजे झाले. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना परस्परांशी जैविक पद्धतीने जोडल्या असून त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. त्या विलग करता येत नाहीत. खाणेपिणे, कपडेलत्ते, वागणेबोलणे, चालणेफिरणे यासारख्या मोजमाप करता येईल अशा गोष्टी; मन आणि त्याच्या चलनवलनावर परिणाम करतात हे त्यांना मान्य नसते. शरीर वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळी, भावना वेगळ्या, विचार वेगळे, बाह्य घडामोडी वेगळ्या असा त्यांचा समज असतो. यातील काहीही वेगळं नसून त्यातील प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकीवर परिणाम होतो हे त्यांना मान्य नसते. परिणामांचा हा आंतरिक फापटपसारा शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांसारखा म्हणता येईल. कुठून कुठे काय पोहोचवतं माहीत नाही. त्यासाठी बुद्धीची सूक्ष्मता हवी. अर्थात रक्तवाहिन्या हे फक्त उदाहरण आहे. त्या प्रत्यक्ष दिसू शकतात आणि भावभावना आणि बाह्य गोष्टी यांना जोडणाऱ्या वाहिन्या दिसत नाहीत हा त्यातील ठळक भेद होय. त्यामुळेच अनेकदा- `पुरावे काय?' या प्रश्नावर येऊन चक्रव्यूह सुरु होतो. परंतु पुरावे नसतानाही अनेक गोष्टी वास्तव असतात. एखाद्या गोष्टीचे पुरावे नाहीत म्हणजे ती गोष्टच नाही असे होत नाही आणि एखाद्या गोष्टीचे पुरावे आहेत म्हणजे ती आहेच असेही होत नाही. मन कोणीही दाखवू शकत नाही पण ते नाही असे नाही. अन पुरावे असून ती गोष्ट नसते याचे उदाहरण म्हणून मकरंद अनासपुरे यांचा `कायद्याचं बोला' चित्रपट पाहावा. `कळते पण वळत नाही' अशी माणसांची स्थिती का असते याला तुकड्यात विचार करणाऱ्यांकडे काहीही उत्तर नसते. अशा वेळी ते फक्त चिडचिड करतात. आधुनिक विज्ञान (relativity and quantum mechanics च्या आधीचे) आणि त्या आधारावर विकास पावलेली विचारपद्धती, त्यातून घडलेले प्रबोधनपर्व हे सगळे याच्या मुळाशी आहे.

relativity and quantum mechanics यांच्यानंतरचे विज्ञान मात्र वेगळे आहे. ते या विश्वाला सुटे भाग एकत्र करून assemble केलेले समजत नाही. हे संपूर्ण विश्व एक एकसंघ एकक आहे. आपण त्या विश्वाच्या अंतर्गत असल्याने त्याचे संपूर्ण आकलन करू शकत नाही असे त्याचे म्हणणे आहे. हा विचार वेदांताकडे घेऊन जाणारा आहे. मात्र या आधुनिकोत्तर विज्ञानाच्या आधारावरील विचारपद्धती अजून विकसित झालेली नाही. त्यानुसार प्रबोधन ही त्याही पुढील पायरी. दुर्दैवाने या विश्वाच्या चुकीच्या धारणांवर आधारित विचार, कल्पना, संकल्पना, पद्धती, रचना, मान्यता, शब्दावली घेऊन आम्ही समस्यांची उत्तरे शोधीत आहोत. हिंदू वा भारतीय विचारविश्व हेदेखील या जंजाळात अडकले आहे. गेली तीन-चारशे वर्षे ज्या चुकीच्या रस्त्यावरून चालतो आहोत त्याच चुकीच्या रस्त्यावर आम्ही हवा असलेला पत्ता शोधत भटकतो आहोत. त्यामुळे आम्हाला पत्ता सापडणारच नाही. आम्ही मुक्कामावर पोहोचूच शकणार नाही. हिंदू अथवा भारतीय विचारविश्वापुढे हे खरे आव्हान आहे. आम्ही चालतो आहोत तो रस्ता, त्यावरील ओळखीच्या खाणाखुणा, त्याची दिशा हे सगळेच चुकलेले आहे हे समजावून देणे आणि योग्य रस्ता, दिशा आणि खाणाखुणा सांगणे; ही हिंदू अथवा भारतीय विचारविश्वाची पुढील दिशा असायला हवी. प्रथम त्यांनाच हे समजावून घ्यावे लागेल. त्यासाठी प्रचंड मोठा सायास लागेल आणि धीट व्हावे लागेल. राजकारणापल्याड जाऊन `प्रामाणिक परंतु अयोग्य' असा हा विचारव्यूह भेदावा लागणार आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ८ ऑक्टोबर २०१६

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

एकात्म मानववाद काय आहे?


भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' हा पक्षाचा वैचारिक आधार म्हणून स्वीकारला आहे. त्यामुळे अनेकांच्या कानावर `एकात्म मानववाद' हे शब्द पडले आहेत. परंतु `एकात्म मानववाद' म्हणजे नेमके काय? काय आहे हा `एकात्म मानववाद'? हे मात्र फारसे चर्चेचे विषय नसतात. एकूण `एकात्म मानववाद' याचं आकलन फारसं नाही हे वास्तव आहे. भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' म्हणजे `अंत्योदय' असं सोपं, सुटसुटीत समीकरण केलं आहे. ते योग्य तर नाहीच, पण घातकही आहे. फारशी साधकबाधक चर्चा आजवर झाली नसल्याने स्वाभाविकच `एकात्म मानववाद' याबद्दल गैरसमज आहेत आणि आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावून त्यावर टीकाटिप्पणीही होत असते.
एक बाब अगदी स्पष्ट आहे की, `एकात्म मानववाद' हे एक वैचारिक दर्शन आहे. दर्शन ते असते जे दिशा देते. म्हणूनच `एकात्म मानववाद' सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था आणि जीवन यांना दिशा देणारा विचार आहे. तो राजकीय किंवा आर्थिक कार्यक्रम नाही. तो राजकीय, आर्थिक नियोजनाचा आराखडा नाही. निवडणुका, राजकीय पक्ष, निरनिराळ्या नियुक्त्या, कार्यक्षेत्रे, कामाचे वाटप, निधीचे वाटप, आर्थिक रचना, उद्योगांचे स्वरूप इत्यादी गोष्टी त्यात नाहीत. तशी अपेक्षा ठेवून `एकात्म मानववाद' पाहिल्यास निराशाच पदरी पडेल. आपलं conditioning इतकं झालं आहे की, स्वयंपाक किंवा बालसंगोपन सुद्धा नेमक्या सूचनांशिवाय आपण करू शकत नाही. आपल्याला सगळे साचे तयार हवेत. त्यात कच्चा माल ओतून मूर्ती घडवणे एवढेच आपल्याला जमते. दृष्टी, कल्पना आणि हात वापरून मूर्ती तयार करणे आम्ही विसरलो आहोत. पण ही समस्या आपली आहे. त्यामुळे `एकात्म मानववाद' अपुरा वा चुकीचा वा निरर्थक ठरत नाही. आपल्या मर्यादांमुळे आम्हाला त्याचं आकलन होत नाही. `एकात्म मानववाद' सर्व प्रकारच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक रचना, व्यवस्था, त्यातील परिवर्तने यांची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे एक विचारदर्शन आहे, एखादा नियोजन आराखडा नाही हे नीट समजून घेणे आवश्यक आहे.
१९६५ च्या एप्रिल महिन्यात २२, २३, २४ आणि २५ तारखांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची मुंबईत चार भाषणे झालीत. ती भाषणेच एकात्म मानववाद म्हणून ओळखली जातात. त्यातील पहिले भाषण होते- `राष्ट्रवाद की सही कल्पना', दुसरे भाषण होते- `एकात्म मानववाद', तिसरे भाषण होते- `व्यष्टी, समष्टी मे समरसता' आणि चौथे भाषण होते- `राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना'. या सगळ्या भाषणांमध्ये धोरण, नीती, आकडेवारी इत्यादी नाही. सरकारी वा गैरसरकारी धोरणांची चिरफाड नाही. वर्तमान वा भूतकालीन संदर्भ हे विषयाच्या स्पष्टीकरणासाठी अन विवेचनासाठी आहेत. मग या भाषणांमध्ये एवढे काय आहे? त्यात मानवी जगण्याच्या अन त्यासाठी उभ्या करण्यात येणाऱ्या व्यवस्थांच्या संदर्भात मुलभूत तात्विक चिंतन आहे. राष्ट्र म्हणजे काय? आधुनिक राष्ट्रकल्पना काय आहे अन ती कशी विकसित झाली? भारतीय राष्ट्रकल्पना काय आहे? दोन्हीतील मूलभूत फरक काय? सुख म्हणजे काय? जीवनाची दृष्टी कशी असावी? राज्य म्हणजे काय? समाज म्हणजे काय? पैशाकडे कसे पहावे? आदर्श काय असावेत? व्यक्ती आणि समाज कसा विचार करतात? अनेक राष्ट्रे संपून का गेलीत? धर्म म्हणजे काय? सत्ता आणि संपत्ती यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थाने कोणती? त्यांच्या मर्यादा काय? चतुर्विध पुरुषार्थ, मानवाचे स्वरूप; इत्यादी गोष्टींची या भाषणांमध्ये चर्चा आहे.
अशा प्रकारे विचार करण्याची आणि तो देशासमोर ठेवण्याची गरज दीनदयाळजींना का वाटली? `एकात्म मानववाद' मांडण्यापूर्वीच्या एका लेखात त्यांनी हे स्पष्ट केले आहे. `समाजवाद, प्रजातंत्र आणि हिंदुत्ववाद' या शीर्षकाच्या लेखात लोकशाही, समाजवाद, सर्वोदय, यंत्रवाद, भांडवलशाही; या साऱ्याचा आणि त्यातील प्रत्येकाच्या मुळाशी असलेल्या तत्वज्ञानाचा परामर्श घेऊन, त्यांच्या यशापयशाची आणि संभाव्यतांची चर्चा करून शेवटी निष्कर्ष मांडताना दीनदयाळजी म्हणतात- `आपणास राजनैतिक, आर्थिक, सामाजिक आणि सैद्धांतिक अशा सर्वच आघाड्यांवर यंत्रवादाशी सामना करावा लागेल. धर्मराज्य, प्रजासत्ताक, सामाजिक समानता आणि आर्थिक विकेंद्रीकरण हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. या सर्वांचा संमिलीत निष्कर्षच आपणास एक असे जीवनदर्शन देईल की ज्यामुळे आपण आजच्या झंझावाती वादळामध्येही सुरक्षित राहू शकू. आपण त्याला कोणतेही नाव देऊ शकतो- हिंदुत्ववाद, मानवतावाद किंवा आणखी कोणताही नवा वाद. पण हाच एकमेव मार्ग भारतीय आत्म्याला अनुरूप असा होईल. तोच जनतेमध्ये नवीन उत्साह निर्माण करील आणि कदाचित संभ्रमाच्या चौरस्त्यावर उभ्या असलेल्या विश्वालाही तो मार्गदर्शन करू शकेल.' १९६५ साली एप्रिल महिन्यात सगळ्या देशापुढे `एकात्म मानववाद' ठेवून दीनदयाळजींनी त्यांना वाटणारी ही गरज पूर्ण केली.
आपण ज्या मार्गाने आजवर चालत आलो त्याने लोक, समाज, राज्य, यंत्र या सगळ्यात एक संघर्ष उत्पन्न केल्याचे रोज पाहायला मिळते. यातील प्रत्येक घटकाची ओढाताण, प्रत्येक घटकाला कमी वा अधिक महत्व- स्थान- प्राधान्य- प्रमाण- यामुळे जन्माला येणारे दु:ख, अस्वस्थता, उद्रेक, असमाधान, अशांती; आज नवीन राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर `एकात्म मानववाद' लक्षणीय ठरतो. हा सार्वत्रिक संघर्ष आणि असमाधान दूर करण्यासाठी; प्रत्येक घटकाचे महत्व, स्थान, प्राधान्य, प्रमाण कमी वा अधिक होऊ नये हे आवश्यक आहे. परंतु हे कमी आहे की अधिक आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निर्णय कसा करायचा? त्यासाठी हवी दृष्टी. ही दृष्टी विकसित होण्यासाठी हवा ठोस विचार. असा विचार आकारास येण्यासाठी हवे तत्वज्ञान आणि असे तत्वज्ञान सिद्ध होण्यासाठी हवे जीवनाचे दर्शन. असे जीवनाचे दर्शनच या सगळ्या धावपळीला दिशा देऊ शकते. `एकात्म मानववाद' हे असे दिशा देणारे दर्शन आहे.
काय सांगते हे दर्शन?
१) आत्यंतिक व्यक्तिवाद नको.
२) आत्यंतिक समाजवाद नको.
३) पैशाचा अभाव नको तसेच पैशाचा प्रभावही नको.
४) संघर्षाऐवजी समन्वयाची कास धरावी.
५) राजकीय सत्ता सर्वोपरी आणि सर्वेसर्वा नाही.
६) माणूस हा आर्थिक, राजकीय वा सामाजिक प्राणी नाही.
७) माणूस हा शारीरिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यासोबतच मानसिक, बौद्धिक व आत्मिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यांनी संचालित होत असतो.
८) माणूस हा ठोकळा वा यंत्र नाही. (यंत्रवाद म्हणताना दीनदयाळजींना यंत्रांचा अतिरेक नसावा हे जसे अभिप्रेत होते तसेच माणूस हा यंत्र नाही; किंबहुना हे विश्व म्हणजे चार भाग जोडून बनवलेले यंत्र नाही हेही अभिप्रेत होते. विचार आणि दृष्टीतील यांत्रिकता हा यंत्रवाद याचा आशय.)
९) मानव हा या विश्वापासून वेगळा isolated नाही. माणूस, समाज, निसर्ग, ब्रम्हांड, अन या सगळ्याचे मूळ जे काही असेल ते; या सगळ्यांचा समन्वय सुखासाठी आवश्यक. सगळ्यापासून फटकून अथवा सगळ्यावर सत्ता गाजवण्याच्या वृत्तीतून सुखी होता येणार नाही.
१०) उच्च प्रेरणांच्या अभावी मानवी जाणिवांचा आणि प्रेरणांचा विकास अशक्य. अन या विकासाअभावी सुखशांतीपूर्ण सह अस्तित्वाकरीता माणूस सहकार्यही करणार नाही.
११) विचार आणि चेतनेचा विकास झालेला माणूस. नराचा नारायण होण्याचा ध्यास घेतलेला माणूस. त्याच्या आधारे मर्यादांची जाण असणाऱ्या व्यवस्था. सामूहिक पुरुषार्थाच्या आधारे या व्यवस्थांच्या द्वारे सगळ्यांचे संपूर्ण सुख.
१२) यासाठी अनुकूल जीवनशैली.
एकात्म मानववादाचे हे काही ठळक पैलू. यांच्यावर एक नजर टाकली तरीही एक गोष्ट लगेचच स्पष्ट होते की, राजकीय पक्ष, राजकीय सत्ता यांची यातील भूमिका मर्यादित आहे. ती मुलभूत आहे असेही नाही. हा समाजाने समाजासाठी करावयाचा विचार आहे. ही समाजाने स्वत:साठी स्वीकारावयाची दिशा आहे. राजकीय सत्तेला वेठीला धरून व्यक्ती वा समाजाच्या इच्छांची आवर्तने पूर्ण करण्याचा खटाटोप किंवा व्यक्ती व समाजाच्या इच्छांच्या आवर्तनांचा उपयोग करून घेत सत्ता बळकट करण्याचा उपद्व्याप; असे `एकात्म मानववादाचे' स्वरूप नाही. एकात्म मानववाद हजारो वर्षांच्या मानवी संचितातून निघालेले नवनीत काय आहे याचा मार्ग आणि दिशा स्पष्ट करतो. त्यासाठी सत्ता, पक्षोपपक्ष यांच्यासोबतच समाजाकडूनही विशिष्ट गुणांची, कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची, समजूतदारीची अपेक्षा करतो. readymade tailored सुखाचा दावा एकात्म मानववाद करीत नाही. खोट्या आणि फसव्या कल्पना आणि दावे तो मोडीत काढतो. तो ना आशावादी आहे ना निराशावादी. एकात्म मानववाद यथार्थवादी आहे. तो डावा किंवा उजवा नाही, तर सरळमार्गी आहे.
एकात्म मानववाद समजून घेण्यासाठी आणि त्यातील खाचखळगे, शंकाकुशंका यांच्या समाधानासाठी दीनदयाळजींचं अन्य साहित्य आणि विशेषत: त्यांची `चिती' कल्पना आणि `लोकमत परिष्काराचा' विचार समजून घेणे आवश्यक आहे. अन्य विचारधारांच्या तुलनेत हे एकात्म मानववादाचे वैशिष्ट्यही आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २० सप्टेंबर २०१६