काल सकाळपासूनच इंदिरा संत यांची `अजून नाही जागी राधा' मनात फिरू लागली. त्यांच्या कुब्जेने ठाण मांडले. `कुब्जा' !! भारतीय पुराणातील एक स्त्री. कृष्णचरित्राच्या संदर्भात तिचा उल्लेख. श्रीमद भागवतातील ही कथा. ब्रम्हवैवर्त पुराणात सुद्धा तिची कथा. संत सूरदास यांनीही तिच्यावर पद रचले. विष्णू पुराणात किंवा अन्य पुराणात तिचा उल्लेख नाही. रामानंद सागर यांच्या `कृष्ण' मालिकेने ती घराघरात पोहोचवली. कुब्जा ही कंसाची दासी. कुबड आलेली. कृष्ण तिला सरळ आणि सुंदर बनवितो, अशी कथा. तिची कृष्णावर प्रीती जडते आणि कंस वधानंतर कृष्ण तिच्या घरी जाऊन तिची इच्छा पूर्ण करतात असाही उल्लेख. राम अवतारात त्यांच्यावर अनुरक्त झालेली शूर्पणखाच कुब्जा होऊन पुनर्जन्म घेते असाही पुराणात उल्लेख. राम एकपत्नी व्रतधारी असल्याने तिची अपूर्ण राहिलेली इच्छा कृष्ण रुपात पुरवतो. भगवान आपल्या भक्तांना समभावाने कसे वागवतो; त्याच्याजवळ सुरूप, कुरूप असा भेद कसा नाही या अर्थाने सूरदास कथा उलगडतात. रामानंद सागर कंसाच्या जाचातून कुब्जेची सोडवणूक या अंगाने कथा रचतात.
इंदिरा संत यांची कुब्जा मला या सगळ्याहून वेगळी वाटते. व्यक्तिगत आणि विश्वात्मक अशा दोन्ही छटा त्यात जाणवतात. अतिशय नादमधुर आणि आटोपशीर अशी ही कविता समजायला तशी सोपी, पण तशी अवघड देखील. शिवाय चित्रमयी. केवळ बारा ओळींची ही आशयगर्भ कविता. पहिल्या चार ओळीत कुब्जेची मनस्थिती, तिचा अचंबा चपखल बसला आहे. त्या चार ओळी आहेत-
अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
अचंबित होऊन कुब्जेच्या मनात प्रश्न येतो- कृष्णाचा प्राण असलेली राधा अजून उठलेली नाही, गोकुळाला जाग आलेली नाही; अशा भल्या पहाटे पलीकडे हा श्रुतीमधुर पावा का वाजतो आहे? ती शोध घेण्याच्या मनस्थितीत आहे. अजून तिला त्या बासरीचा आनंद झालेला नाही. त्या अवेळी बासरी का वाजते आहे हा कुब्जेला पडलेला प्रश्न आहे. दारावरून काही वाजत जात असेल किंवा कुठून गाण्याचे, वाद्यांचे, भजनाचे, band चे आवाज येत असतील तर आपल्या मनात जसे प्रश्न येतात- कोणाकडे? काय? केव्हा? तसाच प्रश्न तिच्या मनात.
नंतरच्या चार ओळीत त्या क्षणांचे, पहाटेचे अधिक स्पष्ट उठावदार वर्णन आणि ती मधुर बासरी ऐकून झालेली कुब्जेची अवस्था येते. त्या ओळी आहेत-
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकून अपुले तनमन
चंद्र मावळतो आहे म्हणजे नक्कीच तो पहाटेचा प्रहर आहे. मावळणारा तो चंद्र रात्रीसारखा शुभ्र नाही केशरी आहे. केशरी चंद्र कधीतरीच दृष्टीस पडणारा. चंद्र म्हणजे शुभ्रच, हे समीकरण. पण अवेळी वाजणाऱ्या पाव्याचे सूर जसे नव्हाळीचे तसाच हा चंद्रही नव्हाळीचा. पहाटेचा वारा सुटला आहे. अशा वेळी, अशा नव्हाळीच्या वातावरणात कानी पडलेल्या मंजुळ स्वरांनी कुब्जा देहभान हरपली आहे. यमुनेवर स्नानाला गेलेली, कंसाकडे चंदनाची उटी घेऊन जायला उशीर होऊ नये म्हणून लगबगीने गोकुळ जागे होण्याआधीच तयारीला लागलेली कुब्जा, अर्ध्या पाण्यात उभी असलेली कुब्जा; तनमन तिथेच टाकून, स्तब्ध होऊन, मोहित झाल्याने देहभान हरपून तशीच उभी आहे. तिचं स्नान, तिची पुढची कामे, चंदन उगाळणे वगैरे राहिले बाजूला. अन तो पावा का वाजतो आहे हा मनात उठलेला प्रश्नही मनच गळून गेल्याने उरलेला नाही. त्याऐवजी तनमनाचा विसर पाडणाऱ्या एका अननुभूत आनंदात ती बुडून गेलेली आहे.
अखेरच्या चार ओळीतील पहिल्या दोन ओळीत कुब्जेची हीच भावावस्था पुढे येते. उरलेल्या दोन ओळीत ती देहमनाच्या भानावर येऊन आनंदाचा जो अनुभव घेतला तो सांगते. त्या ओळी आहेत-
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधले थेंब सुखाचे
`हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव'
देहभान हरवलेल्या कुब्जेने मग काय केले? हे संपूर्ण विश्वच ओठांना लावले आणि तो गारुडी मुरलीरव ती घटघटा प्यायली. आकंठ. तृप्त होईपर्यंत. उन्हातान्हातून आल्यावर प्रचंड तहान लागते तेव्हा आपण असेच अख्खा तांब्या तोंडाला लावून तेवढे लोटाभर पाणी ढकढका पितो. त्यावेळची शरीरमनाची तगमग आणि ती तगमग शांतवण्याचा प्रयत्न आपण अनुभवलेला असतो. कुब्जेची ही तगमग किती मोठी आणि ती शांतवण्याचा प्रयत्न किती मोठा? तर तिला साधंसुधं फुलपात्र अथवा तांब्या पुरत नाही, ती अख्खं विश्वच ओठांना लावते. ही साधी तहान नाही, युगायुगांची महातहान आहे. अननुभूत तगमग आणि ती शांत करणे आहे. का आहे ती महातहान? कारण ती कुब्जेची आहे. कुब्जा म्हणजे पाठीत वाकलेली. म्हणजेच कुरूप. म्हणजेच नाकारल्या गेलेली. जन्माला घालणाऱ्या ईश्वराने तिला रूप नाकारलं. त्या विश्वनिर्मात्याच्या नकारापासून सुरु झालेली आणि या विश्वातही सुरूच राहिलेली नकारमालिका जिने प्रत्यक्ष भोगली त्या कुब्जेच्या त्या भोगण्यातून, त्या सोसण्यातून उपजलेली असल्याने ती महातहान. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या साऱ्याच ऐहिक, लौकिक, पार्थिव सुखांचे नकारच जिच्या वाट्याला आलेत अशा कुब्जेची ही कहाणी. या जगात माझं जर काहीच नाही, माझ्यासाठी जर काहीच नाही; तर मी या जगात आले तरी कशाला? का जन्माला घातले मला? ज्याने या प्रश्नांचा अनुभव घेतला असेल अशालाच समजू शकणारी ही महातहान. या विश्वात तर उजेडाचा एकही किरण नाही अन त्याच वेळी आभाळी चंद्र असणे तर दूरच, एखादी चांदणीही नाही; अशा उजेड काय असतो याचाही अनुभव नसलेल्या; सुखाची चवही न चाखलेल्या कुब्जेची ती तगमग असते. अशा कुब्जेला मधुमधुर पाव्याचा आनंद लाभण्याचा तो क्षण. अन तोही फक्त तिच्यासाठी, तिच्यापुरता. तिला तिचं सुख लाभल्याचा तो आनंद ती वेडी होऊन, डोळ्यात पाणी आणून सांगते- `हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव'. आपल्यासाठी काहीही नाही या भावनेतून बाहेर पडण्याचा तो क्षण. अभावांच्या सागरात बुडत असताना हाती लागलेल्या भावकणाचे वर्णन करणारी ही भावस्पर्शी, भावमयी कविता. केवळ कुब्जेची नाही, या जगातल्या अभावांच्या सागरात गटांगळ्या खाणाऱ्या सगळ्याच लिंगभेदातीत कुब्जांची !!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ जुलै २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा