काल `अन्नदाता सुखी भव - ५' लिहून पूर्ण केलं तेव्हा डोक्यात होतं की, उद्या अर्थकारणाच्या प्रत्यक्ष करण्याच्या काही गोष्टींचा उहापोह करावा आणि विषय पूर्ण करावा. परंतु काल लेख पोस्ट केल्यानंतर समोर आलेली एक बातमी आणि एक व्हिडीओ यांनी या विषयाची व्याप्ती मी समजतो त्याहीपेक्षा किती मोठी आहे याचा जणू प्रत्यय आणून दिला. अन ती मालिका बाजूला ठेवून वेगळा लेख लिहायचे ठरवले. अर्थात हा विषय त्या लेखमालेच्या विषयवस्तूवर परिणाम करणारच आहे. बातमी होती एका पुस्तिकेची. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने भारतात सुमारे पाच वर्षांपूर्वी छापल्या गेलेल्या आयुर्वेदाशी संबंधित एका १६ पानांच्या चोपड्यावर सणसणीत बातमी तयार करून पहिल्या पानावर छापली आहे. भारत स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांना नकार देणारा आणि गोमूत्रावर जगणारा देश आहे असा त्या बातमीचा आशय आहे. उघड आहे की भारताची सार्वत्रिक नालस्ती करणे हाच यामागील खोडसाळ हेतू आहे. हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे असे नाही आणि हा शेवटला प्रयत्न आहे असेही नाही. त्याला जी उत्तरे ज्यांनी ज्या ठिकाणी द्यायची ते लोक त्या ठिकाणी ती उत्तरे देतीलच. कायदेशीर बदनामीचे खटले वगैरे मार्ग आहेतच. परंतु हा विषय त्याहून अधिक व्यापक आहे.
न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने जे म्हणायचे ते म्हटले. पण अशीच मते आपल्या येथेही मांडली जातात की नाही? सरळ उत्तर आहे की मांडली जातात. न्यूयॉर्क टाईम्ससारखा विचार करणारे लोक इथेही आहेत. काल या चोपड्यावर जी चर्चा झाली त्यातही आपल्या येथीलच एका महाभागाने त्या चोपड्यात `मां संस्कारी होना चाहिए' या वाक्यावर अन त्यातील संस्कारी या शब्दावर आक्षेप घेत, त्या शब्दामुळे टीका होत असल्याचे मत मांडले. सर्वसाधारण भारतीय माणसाला याचे आश्चर्य वाटते. संस्कारी शब्द चुकीचा कसा असा प्रश्न त्याला पडतो. मातेने संस्कारी नव्हे तर कसे असावे, असे तो विचारील. कारण असे आक्षेप कुठून जन्म घेतात, कसे जन्म घेतात याच्या खोलात तो जात नाही. `व्यक्तीवाद' हे त्याचे उत्तर आहे. व्यक्ती अंतिम, व्यक्ती महान, व्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राहायला हवे, व्यक्तीला सगळे कळते, व्यक्तीला निर्णयाचे अनिर्बंध अधिकार असायला हवेत; हे जे `आधुनिक तत्व' म्हणून स्वीकारले आहे त्याचा हा परिणाम आहे. मग एखादी गोष्ट मांडणाऱ्या व्यक्तीला काय अभिप्रेत आहे यापेक्षा मी त्याचा जो अर्थ लावीत असेल तोच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि अंतिम ठरतो. का? मला तसे वाटते. त्यामुळे मनमानी पद्धतीने अर्थ लावणे, मनमानी पद्धतीने निंदानालस्ती करणे. मनमानी पद्धतीने टिंगलटवाळी करणे. हे प्रकार होत राहतात. `मी' सोडून सगळं जग, सगळी माणसे, सगळे विचार, सगळ्या भावना, सगळ्या पद्धती; टाकावू आहेत, चुकीच्या आहेत, हिणकस आहेत, मस्करीच्याच लायकीच्या आहेत; हा व्यक्तीवादाचा अर्थ आहे. बरे हा व्यक्तिवाद एका व्यक्तीसाठी उभा राहतो. एका व्यक्तीचे विचार, व्यवहार, भावना त्याच्यासाठी महत्वाच्या ठरतात पण सगळ्यांचा विचार चुकीचा ठरतो. म्हणजे `तुम्ही मूर्ख आहात' हे वाक्य बरोबर ठरते आणि `तू मूर्ख आहेस' हे वाक्य मात्र चुकीचे ठरवले जाते.
या सगळ्याचा प्रतिवाद करणारेही `ही आमची पद्धत नाही' याच युक्तिवादात गुंतून पडतात. याच्या बाहेर यायला ते तयार नसतात. त्यांना लक्षातच येत नाही की, आज हे `आमचे अन तुमचे' कालबाह्य झाले आहे, निरर्थक झाले आहे. आज जग भूगोल आणि राज्यसत्ता या अर्थाने वेगवेगळे असले तरीही त्यातील वैचारिक, भावनिक, व्यावहारिक, संकल्पनात्मक अंतर मिटून गेलेले आहे. त्यात कुठेही `आमचे अन तुमचे' राहिलेले नाही. म्हणूनच आज आपल्यासकट सगळ्यांनी डोळे मिटून स्वीकारलेली मूल्ये, तत्व आणि कल्पना यांना आव्हान देण्याची, त्यांच्यातील दोष दाखवून देण्याची गरज आहे. दुर्दैवाने तसे होत नाही. खेदाने म्हणावे लागते की, ज्यांनी या देशाचा पर्यायाने येथील विश्वकल्याणी संस्कृतीचा ध्वज हाती घेतला आहे तेदेखील हा वेध घेण्यात, त्या दृष्टीने वैचारिक मांडणी करण्यात कमालीचे तोकडे पडतात. केवळ गोडगोड स्वप्नरंजन किंवा आज असलेली सत्तानुकुलता याच्यापुढे त्यांचे एकही पाउल पडताना दिसत नाही.
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीच्या निमित्ताने जे एवढे विवेचन केले त्यात काडीचाही अतिरेक नसून वास्तविक स्थिती त्याहूनही भीषण आहे आणि ज्यांनी या सगळ्या आक्रमणाला केवळ भारतासाठी नव्हे, संपूर्ण मानवतेसाठी आणि विश्वकल्याणासाठी आव्हान देण्याची गरज आहे, ते किती तोकडे पडतात हे निदर्शनास आणून देणारा एक व्हिडीओ आज पुढ्यात आला. हिंदी भाषेतील या व्हिडीओचे शीर्षकच आहे- `मुझे सनी लिओनि बनना है'. जवळपास १० मिनिटांच्या या व्हिडीओत एक तरुणी आणि तिचे आईवडील यांचा संवाद आहे. `तुला पुढे काय करायचे आहे?' या घराघरातील संवादाचा हा व्हिडीओ. भारतीय आई वडील मुलगी यांच्यातील हा संवाद. त्याच्या शीर्षकावरूनच संवादाची कल्पना येऊ शकते. तिथेही हतबल आई वडील आणि उद्दाम मुलगी. विचारांची खोली वगैरे तर दूरच विचार वगैरेशी काहीही संबंध असण्याचीच गरज नाकारणारा हा काळ, किती जटील प्रश्न तुमच्या आमच्यासमोर फेकतो आहे हे दाखवणारा हा संवाद आहे. हे सगळे बरोबर आहे असे नाही. हे निरुत्तर करणारे आहे असेही नाही. परंतु या साऱ्याला आजच्याच भाषेत, आजच्याच शैलीत, आजच्याच भावविश्वाला धरून निरुत्तर करण्याएवढे सायास, व्यासंग, चिंतन, पुढाकार, मांडणी यांची मात्र वानवा जाणवते. उथळ तू तू मी मी, छापील वैचारिकता आणि वातावरण आणि परिस्थिती लादत असलेले विषय यातून बाहेर पडून वेध घेणाऱ्या वैचारिकतेचा सशक्त लोंढा आवश्यक आहे हे मात्र खरे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २३ जून २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा