मंगळवार, ४ जुलै, २०१७

सुविचारांवर जगणारा समाज


सुविचार ही काही नवीन बाब नाही. कित्येक वर्षांपासून शाळेतील भिंतींवर लावलेले सुविचार सगळेच अनुभवत असतात. कित्येक पिढ्या त्यावर पोसल्या आहेत. परंतु प्रत्येक हातातील मोबाईल आणि त्याला मिळालेली सोशल मीडियाची जोड यांनी या सुविचारांना एक वेगळा आकार, वेगळे रूपरंग आणि वेगळे परिमाण दिले आहे. अनेकदा अनेक महापुरुषांच्या नावाने एकच सुविचार फिरतो तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो. कधी कधी तर वाटते की, ढगात पोहोचलेल्या या महापुरुषांपैकी कोणी आपल्या नावाचा एखादा viral होणारा असा सुविचार पाहिला तर त्यालाच भोवळ येईल. आपण कधी असं बोललो होतो वा असं लिहिलं होतं असा प्रश्न त्याला पडेल. अनेकदा, मी तर म्हणेन शेकडा ९० टक्केहून अधिक वेळा, हे सुविचार अर्ध्या मिनिटात हवेत उडवून लावता येतात. पण त्यातून वातावरण असे तयार होते की, जगात आता फक्त साधुसंत उरले आहेत किंवा जगात त्रास- दु:ख- वेदना- उपेक्षा- अभाव- हे काही उरलेलेच नाही. एका passive मानसिक समाधानात माणसे तरंगू लागतात. प्रचंड एकांगीपण तयार होऊ लागतं. अशा एकांगी उपदेशातून सारासार विचार आणि सदसद्विवेकाला हळूहळू तिलांजली दिली जाते. जगातील कोणत्याही महापुरुषाने, कोणत्याही धर्मग्रंथाने, कोणत्याही विचारकाने, कोणत्याही शहाण्या माणसाने जगाचे द्वैती स्वरूप नाकारलेले नाही. हे जग रागद्वेषात्मक आहे. त्यात दोन परस्पर विरोधी भाव, विचार, घटना, कल्पना, प्रसंग, दिशा आहेतच. नव्हे असे परस्पर विरोधी आणि विसंगत असणे म्हणजेच हे जग. ही मूळ बाब स्वीकारून मग या जगात कसे राहावे यावर अनेकांनी सखोल खल केला आहे. आम्ही मात्र टिवल्याबावल्या करत करत त्या उपदेशामृतात इतके बुडतो की, सुविचारातून विचारशून्यतेकडे वाटचाल करू लागतो. एकांगी दृष्टी स्वीकारल्यावर विचारशून्यतेशिवाय दुसरे काय हाती लागणार? बरे या माऱ्याने आपण `संत' झाल्याच्या भ्रमात इतके विरघळतो की, त्या सुविचारातील तत्व आपल्या जगण्यावागण्याला लावून पाहिले पाहिजे असे आमच्या मनात डोकावत सुद्धा नाही. आमचा भूतकाळातील व्यवहार, आजचा व्यवहार, भविष्यातील व्यवहार, परीक्षेच्या क्षणीचा व्यवहार हे तपासण्याची तसदी घेण्याची आम्हाला गरजच वाटेनाशी होते. एक प्रकारच्या गुंगीत आम्ही जगायला लागतो. साधे एखाद्याशी चांगले बोलणे, विचारपूस करणे, शुभेच्छा देणे अथवा शुभेच्छा स्वीकारणे; यासारख्या निरुपद्रवी कृती करताना सुद्धा आपल्या मनात किती अन कोणकोणते हिशेब चालतात याचा धांडोळा आपण किती घेतो? चार जणांच्या ग्रुपमध्ये (whats app च्याच नव्हे, घरात, कार्यालयात, संस्थेत, in general) सुद्धा एखाद्याशी चांगले वागलो, त्याला शुभेच्छा दिल्या, त्याच्याशी मोकळेपणाने वागलो तर बाकीचे काय म्हणतील? त्या बाकीच्यांना काय वाटले म्हणजे माझा काय फायदातोटा होईल? असे असंख्य मुद्दे. शिवाय आपले अहंकार, आपले रागलोभ, आवडीनिवडी यांचा आपल्या वागण्या बोलण्यावर होणारा परिणाम वेगळाच. एखाद्याने वेगळा मुद्दा मांडला तरी लगेच अंतर तयार होते. किंवा एखाद्याने शुभेच्छा दिल्यावर त्याला मोकळ्या मनाने प्रतिसाद देण्यात सुद्धा कुचराई केली जाते. सुविचारांना मात्र तोटा नसतो. आपण स्वत: तयार करायचे, आलेले फिरवत राहायचे की झाले. आपण धन्य झालो. एकांगीपण, विचारशून्यता आणि फसगत ही आजच्या `सुविचारांवर जगणाऱ्या' समाजाची अंगभूत लक्षणे होऊ लागली आहेत. याच लक्षणांनी युक्त पार्थाला गीता सांगण्यासाठी पार्थसारथ्याने रक्त आटवले होते. अन त्यापूर्वी त्याची यथेच्छ निर्भत्सना करून आधी त्याचे डोके ताळ्यावर आणले होते. आज पुन्हा अशा एखाद्या पार्थसारथ्याची गरज आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १९ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा