मंगळवार, ४ जुलै, २०१७

अन्नदाता सुखी भव - ५


पैशाची मालकी आणि माणसाचं जगणं, यावर जगात खूप खल झाला आहे आणि सुरु आहे. पुढेही सुरु राहील. त्यातील दोन प्रवाह महत्वाचे आहेत. एक प्रवाह म्हणतो- पैसा आणि जगणं हे ज्याचं त्याचं वैयक्तिक आहे आणि दुसरा प्रवाह म्हणतो- पैसा आणि जगणं समाजाचा भाग आहे. एकानुसार व्यक्ती महत्वाची आहे, दुसऱ्यानुसार समाज महत्वाचा. एकाच्या मते समाज नावाची गोष्ट निरर्थक आहे. समाज असला काय किंवा नसला काय फरक पडत नाही. किंबहुना समाज वगैरे जेवढ्या लवकर मोडीत काढता येईल काढायला हवा. दुसऱ्याच्या मते समाज हाच सर्वेसर्वा आहे. व्यक्तीला काही अर्थ आणि महत्व नाही. व्यक्ती संपली तरी चालेल. एकाला ढोबळमानाने भांडवलवाद म्हणतात तर दुसऱ्याला समाजवाद. यालाच उजवे- डावे अशाही संज्ञा आहेत. पुष्कळदा वादविवादात हे शब्द आपण ऐकतो. त्या त्या संदर्भात एखाद्या एखाद्या वेळी त्या त्या बाजूचे म्हणणे तर्कसंगत, युक्तीसंगत वाटते किंवा असते. परंतु एकंदर विचार करता या दोन्ही प्रवाहात एकांगीपणाचा मुलभूत दोष आहे.
व्यक्ती आणि समाज या दोन्हीही बाबी योग्य, अपरिहार्य, आवश्यक आहेत. व्यक्तीच्या जगण्यासाठी समाज आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी व्यक्ती, हेच वास्तव आहे. व्यक्तीने समाजावर आणि समाजाने व्यक्तीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला की संघर्ष निर्माण होतो. आज असा संघर्ष सार्वत्रिक, सार्वदेशिक पाहायला मिळतो. गेल्या काही वर्षात उपभोगवाद आणि लोकशाही यांनी एक तिसरा प्रवाह जन्माला घातला आहे. हा तिसरा प्रवाह उपभोगाच्या अंगाने व्यक्तिवादी आहे, अन लोकशाही अंगाने समाजवादी आहे. याला स्वत:साठी पूर्ण व्यक्तीस्वातंत्र्य हवे. त्याच्या व्यक्तिगत उपभोगात समाजाची लुडबुड नको. पण त्याच वेळी लोकशाहीवादी असल्याने सगळ्यांना उपभोग मिळायला हवा हे त्याचे मत. अन सगळ्यांना उपभोग मिळण्याची व्यवस्था समाजाने करायला हवी हा त्याचा सिद्धांत. समाज म्हणजे कोण तर समाजाची प्रतिनिधी असलेली राजसत्ता. म्हणजेच- त्या व्यक्तीसह सगळ्या लोकांच्या उपभोगाची व्यवस्था समाज/ सत्तेने करावी. परंतु व्यक्तीच्या जीवनात वा उपभोगात दखल मात्र काडीचीही देऊ नये; असे यांचे म्हणणे असते. हा स्वत: गोंधळलेला आणि समाजात गोंधळ निर्माण करणारा वर्ग आहे. अनेकदा हे लोक स्वत:शीच विसंगत वागतात, बोलतात, विचार करतात. आधुनिक, पुरोगामी इत्यादी विशेषणे ते स्वत:ला लावत असतात.
काही अर्थपूर्ण विचार करायचा असेल तर या गोंधळाच्या पलीकडे जाऊन मुलभूत बाबींचा शोध आणि मांडणी करावी लागेल. तो एक प्रकारचा मध्यममार्ग राहील. आपण ना व्यक्तीला संपवू शकत ना समाजाला. ना व्यक्तीची अबाधित सत्ता राहू शकते, ना समाजाची. कारण व्यक्तीची अबाधित सत्ता राहिली तर त्याचं रोजचं जगणं सुद्धा कठीण होईल. हे समजायला काहीही कठीण नाही. त्यासाठी फार विचाराची गरज नाही. दुसरीकडे समाज सर्वेसर्वा राहिला तर व्यक्तीची गळचेपी ठरलेलीच. त्यातून माणूस जनावर होईल किंवा वेडा होईल. माणसाच्या विकासासाठी आणि चांगल्या, सुखपूर्ण, आनंदी जीवनासाठी व्यक्ती आणि समाज दोघांचेही अस्तित्व, महत्व आणि आवश्यकता मान्य करायला हवे, लक्षात घ्यायला हवे. शिवाय हेही लक्षात घ्यावे लागेल की, याचा एखादा नियम-कायद्यांचा निर्जीव आराखडा, निर्जीव चौकट तयार करता येत नाही, येणार नाही. कारण व्यक्ती व समाज या दोन्हीही जिवंत गोष्टी आहेत. त्यामुळेच प्रवाहमान आहेत. म्हणूनच नियम-कायदे करावे अन राबवावे तर लागतीलच. त्यासोबतच त्यांच्या मर्यादाही ठरवाव्या लागतील, लक्षात घ्याव्या लागतील. किती बांधायचे, किती सोडायचे, किती ताणायचे, कुठे दुर्लक्ष करायचे, कुठे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे या सगळ्याचा तारतम्याने विचार होणे गरजेचे. हे तारतम्य जाणीवेतून येते. त्यामुळे व्यक्तीच्या, समाजाच्या जाणीवा विकसित होणे गरजेचे. दोन अधिक दोन बरोबर चार, अशा गणिती पद्धतीने किंवा आजकाल ज्याला वैज्ञानिक पद्धती म्हणतात तशा काटेकोर पद्धतीने हे तारतम्य आणि या जाणीवा विकसित होऊ शकत नाहीत. व्यक्तीचा मूळ पिंड, माणसाच्या मूळ वृत्ती-प्रवृत्ती, वातावरण, शिक्षण-वळण, प्रभाव, परिस्थिती, संवेदना, विचार, साधना, अवकाश अशा अनेक बाबी त्यासाठी विचारात घ्याव्या लागतात. या जगाचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. समाजाचा मोठा वर्ग असा जाणीवसंपन्न होणे ही प्राथमिक आवश्यकता आहे.
भांडवलवाद आणि समाजवाद यांना टाळून, त्यातील एकांगीपण बाजूला करून, त्यातील योग्य बाबींचा विचार करून, पर्यायी व्यवस्था विकसित करणे म्हणजे; पंडित नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था नाही, हे स्पष्ट असणे फार फार महत्वाचे आहे. कारण दोन्ही विचारप्रवाहातील थोड्याथोड्या, बऱ्या वाटणाऱ्या, तांत्रिक व व्यवस्थात्मक बाबी एकत्र करून एक कडबोळे म्हणजे पर्याय नाही. नवीन, तिसरा पर्याय हा तांत्रिक बाबींशी संबंधित नाही; तर जीवनदृष्टी, जीवनहेतू, जीवनाचा आशय यांच्याशी संबंधित असायला हवा. लोकशाहीचा देखील याच अंगाने विचार व्हायला हवा. लोकशाही म्हणजे लोकांची शाही असे एक ढोबळ समीकरण आहे. मात्र मुळातच `शाही' यातील वर्चस्वाचा भाव निकोप जीवनदृष्टीला घातक आहे. शिवाय लोकांचे वर्चस्व म्हणजे कोणाचे वर्चस्व आणि कशाचे वर्चस्व? उन्नत जाणिवांचे लोक `शाही' गाजवू लागले तर कदाचित उपयोग होईलही, पण उन्नत जाणिवांचे लोक हे किती प्रमाणात वास्तव असू शकते? बरे काळाच्या एका टप्प्यावर ते वास्तव असेल तरीही कालप्रवाहात ते किती टिकेल? लोक ही एकजिनसी बाब आहे का? असू शकते का?
चांगल्या जगण्यासाठी पर्याय काय? असा प्रश्न पडलेल्या भारतातील आणि जगभरातील सगळ्यांना या साऱ्या बाबी लक्षात घ्याव्याच लागतील. त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. या लेखमालेचा मूळ विषय असलेल्या अर्थचक्राच्या संदर्भात या गोष्टी लक्षात घेऊन काय विचार केला जाऊ शकतो हे पुढील भागात. (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २२ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा