बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

सारखेच शिक्षण कशाला?

'समता' या विषयावर आतापर्यंत पुष्कळदा लिहिलं आहे. त्याबाबतीत माझी मते स्पष्ट आहेत. आज पुन्हा हा विषय डोक्यात येण्याचे कारण म्हणजे हाथरस. अर्थात सध्याच्या घटनेची चर्चा मला करावयाची नाही. ती पुष्कळ होते आहे. होत राहील. ही घटना हे फक्त माझा मुद्दा मांडण्याचे निमित्त. मुद्दा हा की, समता तत्त्वाने केलेले घोळ. आपण कितीही नाकारले तरीही भारतात किमान दोन प्रकारचं जीवन आहे. एक साधनसंपन्न, शिक्षणसंपन्न, शिष्टाचारसंपन्न; आणि दुसरं; त्याविरुद्ध. शहरी आणि ग्रामीण असंही म्हणता येईल. या दोन्ही प्रकारच्या समाजांना सारखेच नियम, सारखेच शिक्षण इत्यादी असू शकते का? याचं स्पष्ट उत्तर नाही असं असलं तरीही, आपली व्यवस्था त्याच मार्गाने जाते. ग्रामीण जीवनाला पोषक असं शिक्षण, तसे शिक्षणाचे विषय, त्यासाठीची कौशल्ये, तंत्र, वातावरण, साधने, कालावधी; अशा पुष्कळ गोष्टी भिन्नच असणे योग्य. शहरी विद्यार्थ्यांना जे आणि जसे शिकवले जाते, ते आणि तसेच ग्रामीण भागात का शिकवावे? ग्रामीण भागातून विलक्षण प्रतिभा असलेले विद्यार्थी पुढे येतात हे खरे आहे. पण किती प्रमाणात? अन तसे विद्यार्थी हे मुळातच विशेष क्षमता घेऊन जन्माला आलेले असतात. वेगळे शिक्षण असले तरीही ते पुढेच येतील आणि शहरी विद्यार्थ्यांना टक्कर देतील. परंतु उरलेल्या ९९ टक्के विद्यार्थ्यांचे काय? त्यावर केवळ चित्रपट काढणे पुरेसे ठरेल का? समता समता हा घोष करण्यापेक्षा, प्रामाणिक सदहेतूने वास्तवाला अनुसरून शिक्षण इत्यादींची रचना आपल्याला का करता येऊ नये?

- श्रीपाद कोठे

६ ऑक्टोबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा