अभिजित भट्टाचार्य यांना मिळालेल्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारावर होणारी टीका मला मान्य नाही. मी त्यांचे अभिनंदन करतो. फक्त या अभिनंदनासोबत एक अपेक्षा व्यक्त करतो की, जगाची नीट न्यायपूर्ण आर्थिक घडी बसवण्यासाठी काही मार्ग आणि उपाय त्यांनी सांगावे. भारतात मोदी सरकार असल्याने आणि सध्या भारताला हिंदुत्वाचा विळखा असल्याने भारताचं भलं होणं अयोध्येतल्या प्रभू रामावर सोपवू. पण आज अमेरिका ते रशिया, व्हाया चीन आणि इक्वेडोरपासून श्रीलंकेपर्यंतची सगळी स्थानके; येथील आर्थिक स्थिती; संपत्तीचे असमान वाटप आणि आहे रे - नाही रे यांच्यातील जमीन आस्मानाचे अंतर; जागतिक मंदी; जागतिक कुपोषण; बँका आणि कंपन्या बुडणे; युनोची दिवाळखोरी; अशा अक्षरशः न संपणाऱ्या यादीची लांबी कशी कमी करता येईल याचा मार्ग दाखवला तर पुढेमागे बिचाऱ्या भारताला काही शिकता येईल. मागे आणखीन एक बंगाली बाबू आदरणीय अमर्त्य सेन यांनाही नोबेल मिळाले होते. त्यावेळीही आशा जागी झाली होती पण काही साधलं नाही. बांगला भाषिक आणि मुस्लिम अशाही एका मोठ्या अर्थतज्ञाला बांगलादेशातील प्रयोग वगैरे लक्षात घेऊन नोबेल मिळाले होते. पण अजून बांगला देशाचे आर्थिक चित्र चांगले झाल्याचे कोणी बोलताना दिसत नाही. तेव्हा अभिजित बाबू काही करतील अशी आशा अन अपेक्षा ठेवून त्यांचे अभिनंदन करतो.
- श्रीपाद कोठे
१५ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा