अन्नदान, विद्यादान, ज्ञानदान, द्रव्यदान, न्यायदान या साखळीत काही दशकांपासून एका दानाची वाढ झाली आहे. मतदान. दान ही वास्तविक एक वृत्ती आहे. पण ती लोप पावत असून व्यापार अथवा करार असं स्वरूप घेते आहे. प्रेम, मैत्री, नाती, जीवन, भक्ती या गोष्टी देवाणघेवाण, हिशेब किंवा करार अशा नाहीत; हे तोंडाने म्हणण्यापुरते राहिले की काय अशी स्थिती येते आहे. हा बदल केवळ काळाचा बदल नाही तो आतल्या वृत्तीचा बदल आहे. म्हणूनच त्याची दखल घेऊन हा वृत्तीबदल थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा. सध्या निवडणूक वारे आहेत. त्यामुळे मतदानाचा विचार. मत हे दान असेल (अन ते तसेच असावे) तर त्याकडे तसेच पाहायला हवे. मतदान करून जनतेने आपला प्रभाव आणि शक्ती वापरली पाहिजे, मतदान केलेच पाहिजे, मतदान अधिकाधिक व्हावे, मतच दिले नाही तर सत्तेकडून अपेक्षा करणे किंवा सत्तेविषयी तक्रार करणे किंवा सत्तेचे मूल्यांकन करणे योग्य नाही; ही सगळी मते म्हणजे सौदेबाजीच. देवाणघेवाण, हिशेब, करार. वास्तविक मतदान होवो वा न होवो, अगदी शून्य टक्के मतदान झाले तरीही निवडून येणाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी समाजपोषक, समाजाची धारणा करणारी, समाजाच्या कल्याणाचीच कामे करायला हवीत. तशाच प्रकारची भाषा हवी. कारण आपण जी भाषा उपयोगात आणतो त्यातूनच कालांतराने भावधारणा होते. मतदानाचा आग्रह करतानाच, त्याच श्वासात; निवडून येणाऱ्यांनी, सत्तेने मतांचा विचार करू नये; जनतेच्या दबावाचा विचार करू नये; आपले कर्तव्य करावे; हे बोललं, लिहिलं, सांगितलं गेलं पाहिजे. तरच ते योग्य वृत्तीचा, योग्य भावाचा, योग्य विचारांचा परिपोष करेल. सत्तेचं गमावलेलं character दबावातून परत येणार नाही, तर योग्य वृत्तीपोषणातून परत येईल. त्यासाठी दानाचा भाव जागा कसा होईल याचा विचार प्राधान्याने व्हायला हवा.
- श्रीपाद कोठे
४ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा