शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

मूलभूत त्रुटी

- दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलिसांचा अत्याचार.

- नंदुरबारमध्ये नदीपात्रातील विहिरी न बुजवण्यावरून गोळीबार.

- मुंबईत एक कोटी रुपयांचे स्वच्छतागृह.

- सुरतच्या हिरे कंपनीने कर्मचाऱ्यांना मर्सिडीज मोटारी भेट दिल्या. हे कर्मचारी स्वत: देखील मर्सिडीज घेऊ शकत होते. या कंपनीने याआधीही मोटारी, सदनिका भेट दिलेल्या आहेत.

या आणि यासारख्या बातम्यांची यादी रोज करता येऊ शकेल. यावर तावातावाने चर्चा होत असतात. खोलात जाणे तसेही माणसाच्या स्वभावात नसते. त्यामुळे उपाय वा मार्ग सापडत नाही. आजच्या अर्थ विचारात काही मूलभूत त्रुटी आहेत. त्यांचा विचार केल्याशिवाय पुढचा मार्ग सापडणे अशक्य. त्रुटी-

- आजची व्यवस्था भोगाची सक्ती करते,

- आजची व्यवस्था पैसा कमावण्याची सक्ती करते,

- आजची व्यवस्था पैशाशिवाय जगता येणार नाही अशी स्थिती निर्माण करते,

- आजची व्यवस्था धनाधारित मूल्यांचे पोषण करते, त्यांनाच आधार मानते,

- प्रत्येक व्यक्ती, संस्था, काम, उपक्रम; आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण, स्वावलंबी, स्वयंपूर्ण असायला हवे असे मानते.

- प्रत्येक वस्तू किंवा सेवा पैसा उत्पन्न करू शकत नाही, सारखाच पैसा उत्पन्न करू शकत नाही; याचा विचार करीत नाही. टमाटे, हिरे, शिक्षण, पोळ्या करणे या सगळ्यांचे `पैसामूल्य' सारखे राहू शकत नाही हे आजची व्यवस्था लक्षात घेत नाही.

- आजची व्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करते, जीवनाचा संकोच करते, जीवन एकसुरी रटाळ बनवते.

- पर्यावरण, निसर्ग, प्रकृती, मोकळा वेळ, कला साहित्य, मन बुद्धीचा विकास, अध्यात्माची उपेक्षा करते.

- आधी हे जगून घ्या मग अध्यात्म पाहू, असा चुकीचा विचार करते.

- अध्यात्मिक मूल्य आणि वृत्ती असेल तरच भौतिक व्यवहारांना दिशा, स्थैर्य, मर्यादा, समावेशकता देता येईल; याकडे दुर्लक्ष करते.

आजच्या अर्थविचारातल्या या मूलभूत त्रुटी आहेत. त्यांना address न करता काहीही केले अन कितीही केले तरीही समाधानकारक फळ मिळू शकणे अशक्य. सरकार कोणाचेही असो.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा