येत्या विजयादशमीला रा. स्व. संघ ९६ वर्षे पूर्ण करेल. संघाबाबत तीन मुद्दे बरेचदा चर्चेत असतात.
१) संघाकडे स्वतःचा कोणी महापुरुष नाही.
२) संघ सगळ्याच महापुरुषांवर आपला दावा सांगतो.
३) विश्वगुरुच्या आकांक्षेत supremacy आहे. ती मान्य होऊ शकत नाही.
एक लक्षात घ्यायला हवं की, आजकाल आपणच terms ठरवायच्या अन त्यानुसार मूल्यमापन करायचं अशी पद्धत आहे. संघाच्या बाबतीत हा प्रकार अधिकच असतो. मुळातच आपणच terms ठरवून मूल्यांकन करणं चुकीचं. ते संघाबाबत असो वा अन्य संदर्भात. त्यामुळेच या आक्षेपांबाबत संघाला काय वाटतं हे लक्षात घेऊन चर्चा व्हायला हवी.
- पहिला आक्षेप हा की, संघाकडे स्वतःचा महापुरुष नाही. हा आक्षेप एका अर्थी खराच आहे. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी, अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाळ उपाध्याय, एकनाथजी रानडे, अशोक सिंघल; किंवा आपापल्या ठिकाणी मोठी कामं उभी करणारी, भरपूर योगदान देणारी मंडळी; ही एका अर्थी महापुरुषच आहेत. तरीही समाजाच्या ऐतिहासिक विकासक्रमाचा विचार केल्यास त्याला एक मर्यादा आहे. मोठी सामाजिक मान्यता हे महापुरुष समजण्याचं एक माप असतं. त्या अर्थाने संघाकडे स्वतःचा महापुरुष नाही हे खरं आहेच. पण संघाला मुळात काय वाटतं? आपल्याकडे स्वतःचा महापुरुष नाही याची खंत, याचं दु:ख संघाला वाटतं का? याचं उत्तर नकारार्थी आहे. कारण महापुरुष निर्माण करणे, त्याचा पंथ विकसित करणे आणि त्या आधारावर आपला दबदबा निर्माण करणे हे संघाला करायचेच नाही. एक जुने ज्येष्ठ पत्रकार दि. वि. गोखले म्हणत असत, 'संघाने खूप मोठी माणसे निर्माण केली. परंतु सगळी बिना चेहऱ्याची.' हे अगदी खरं आहे. मात्र अनेकांना वाटतं की, संघाकडे स्वतःचा महापुरुष असायला हवा अन तसा तो नाही. त्यामुळे हा संघाचा मोठा दोष आहे. अशा लोकांचं तसं वाटणं त्यांच्यापुरतं ठीक असू शकतं पण वास्तव नाही आणि संघाचं ठीक मूल्यमापन करणारंही नाही.
- दुसरा आक्षेप असतो की, सगळ्याच महापुरुषांवर संघ दावा सांगतो. हा तर हास्यास्पद प्रकार आहे. राष्ट्रजीवन ही कुणा एकाची जहागिरी नसते. परंतु ती आपली जहागिरी असावी असं वाटणारेच असा आक्षेप घेऊ शकतात. राष्ट्रजीवन ही जहागिरी नसल्यानेच अनेक जण आपापल्या पद्धतीने, जे जे योग्य वाटतं, त्या त्या वेळी जाणवतं; त्यानुसार योगदान देतात. प्रत्येकाचं योगदान राष्ट्रजीवन पुष्ट करणारं असतंच, पण राष्ट्रजीवनाला तेवढंच पुरेसं नसतं. असंख्य महापुरुषांचं हे योगदान आणि त्या योगदानाची मर्यादा दोन्ही लक्षात घ्यावे लागते. म्हणूनच संपूर्ण राष्ट्रजीवनाचा विचार करताना कोणालाही वगळून चालत नाही अन कोणालाही समग्रता देऊनही चालत नाही. प्रत्येकाचा योगदानासाठी गौरव करावा लागतो, त्याच्या विचाराची आणि कृतीची प्रासंगिकता विशद करावी लागते, त्याच्या जीवनकार्यातील गतार्थता ठरवावी लागते, अन पुढे चालावं लागतं. यालाच म्हणतात विभूतीपूजा न करणे. संघ विभूतीपूजा करत नाही आणि आक्षेप घेणारे विभूतीपूजेत अडकतात. एवढेच याबाबत म्हणता येऊ शकेल.
- तिसरा आक्षेप विश्वगुरु शब्दावर. कारण त्यात supremacy झळकते. इथे बराचसा वैचारिक गोंधळ आहे. कारण श्रेष्ठता आणि वर्चस्व यातील फरक बहुसंख्य लोकांना फारसा आकलन होत नाही. श्रेष्ठता ही योग्य गोष्ट आहे आणि ती मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे. खरं तर वर्चस्व भावनेचा त्याग केल्याखेरीज श्रेष्ठ होताच येत नाही. अन असे श्रेष्ठत्वच मानवाला पुढे घेऊन जाते. माणसाला माणूस बनवते. पुढे जाऊन अतिमानव पदी बसवते. वर्चस्वभावना, supremacy मात्र मानवाचे अवमूल्यन करते. आज अगदी रोजच्या व्यक्तिगत संबंधांपासून सगळीकडे हा गोंधळ पाहायला मिळतो. त्यामुळेच विश्वगुरु शब्दाला आक्षेप घेण्यात येतो. श्रेष्ठत्व आणि वर्चस्व यातला फरक नीट समजून घेणे हाच यावरचा उपाय असू शकतो.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, ५ ऑक्टोबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा