२९ ऑक्टोबर १८९६ रोजी लंडन शहरात `आत्मसाक्षात्कार' या विषयावर दिलेल्या व्याख्यानात स्वामीजी म्हणाले- `विषयभोगवासना कधीकधी अत्यंत धोक्याच्या पण अतिशय भुरळ पाडणाऱ्या एका आगळ्याच कल्पनेचे रूप घेत असते. ही कल्पना तुम्हाला नेहमीच ऐकू येईल. अगदी जुन्या काळीही ती होतीच. ती तुम्हाला प्रत्येक धर्माच्या अनुयायात आढळून येईल. ती कल्पना अशी की, अशी एक वेळ येईल की ज्यावेळी जगातली सर्व दु:खे लयास जातील, केवळ सुखेच मागे उरतील आणि ही पृथ्वी स्वर्ग होऊन जाईल. यावर माझा विश्वास नाही. ही पृथ्वी जशी आहे तशीच सदा राहणार आहे. असे म्हणणे फार कठोर आहे खरे, पण तसे म्हटल्याखेरीज काही गत्यंतर दिसत नाही. या जगातील दु:ख माणसाच्या शरीरातील संधिवातासारखे आहे. संधिवाताला तुम्ही एका अवयवातून हुसकून लावा, तो दुसऱ्या एखाद्या अवयवात शिरतो. तिथून हाकला की तो तुम्हाला आणखीच कुठेतरी सतावू लागतो. तुम्ही काहीही करा, तो आपले ठाण सोडायचा नाही. फार जुन्या काळी लोक जंगलात राहत आणि एकमेकांना मारून खात. आजच्या काळात ते एकमेकांचे मांस खात नाहीत खरे, परंतु अगदी मन लावून एकमेकांना ठकवितात. या ठकवाठकविने देशचे देश, शहरेची शहरे पोखरून निघत आहेत. हे काही प्रगतीचे चिन्ह नव्हे. आणि जगात जिला तुम्ही प्रगती म्हणता ती म्हणजे वासनांनी वासनांना गुणायचे याखेरीज आणखी दुसरे काय आहे? वासनांच्या संतत वृद्धीखेरीज आणखी काय आहे हे मला तरी काही कळत नाही. मला जर काही अगदी स्पष्ट दिसत असेल तर ते म्हणजे हेच की, दु:खे सगळी वासनांमुळे ओढवत असतात. वासना म्हणजे एखाद्या भिकाऱ्यासारखी दशा. तो सदा कशाची तरी भिक मागत असतो. कोणत्याही गोष्टीकडे `ही मला मिळाली पाहिजे' या वासनेखेरीज तो बघूच शकत नाही. सदा लसलस, सदा पाहिजे, पाहिजे, आणखी पाहिजे हीच भगभग. वासना तृप्त करण्याची आपली शक्ती जर गणितश्रेढीने वाढली तर वासनेची शक्ती भूमितीश्रेढीने वाढत असते. या जगातल्या सुखांची आणि दु:खांची बेरीज सदैव सारखी असते. समुद्रात एका जागी लाट उंचावली की दुसरीकडे त्यामुळे खळगा पडत असतो. जर एखाद्या माणसाला सुख लाभले तर दुसऱ्या एखाद्या माणसाला किंवा पशुला त्यासाठी दु:ख भोगावे लागते. माणसांची संख्या वाढत आहे आणि पशूंची संख्या घटत आहे. आपण त्यांना मारून टाकून त्यांची जमीन हिसकून घेत आहोत. आपण त्यांचे सगळे खाद्य लुबाडून घेत आहोत. असे असता- सुख वाढत आहे असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकू? प्रबळ देश दुबळ्यांचा फन्ना उडवीत आहेत. त्याने ते प्रबळ देश सुखी होतील असे का तुम्हास वाटते? मुळीच नाही. ते मग एकमेकांचा नि:पात करू लागतील. एक व्यवहारी माणूस या दृष्टीने मला हे मुळीच कळत नाही की या जगाचा स्वर्ग कसा काय बनणार आहे? वस्तुस्थिती याच्या अगदी विरुद्ध आहे. व्यवहारी दृष्टी सोडून तात्त्विक दृष्टीने विचार केला तरी मला हे शक्य दिसत नाही.'
- श्रीपाद कोठे
१३ ऑक्टोबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा