शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

आदरणीय नयनतारा सहगल जी,

सप्रेम नमस्कार...

कशा आहात? आज तुम्हाला मनमोकळं पत्र लिहिण्याची इच्छा झाली. तुम्ही मायना वाचला असेलच, पण खरं सांगू का; मला तुम्हाला आज्जी म्हणायचीच खूप इच्छा होतेय. तर मी या पत्रात कधी तुम्ही मोठ्ठ्या लेखिका वगैरे समजून लिहीन तर कधी आज्जी म्हणून. चालेल ना?

एक तर आधीच सांगून टाकतो की, मी खुश नाहीय. तुम्ही येणार होत्या आमच्या विदर्भात. तेही यवतमाळसारख्या जिल्हा स्थानी. एवढ्या दुरून. विशेष म्हणजे तुम्हाला आवतण होतं. ते आवतणच परत घेतलं की हो. हे काही बरं नाही झालं. दुष्काळात राहिलो तरी कोणाला घराची दारं बंद करण्याची रीत नाही हो आमची. त्यामुळे तुम्हाला येऊ नका सांगितलं त्याचं वाईट वाटतंच बघा. अन हे तोंडदेखलं नाही बरं का. पण हे पत्र फक्त तेवढ्यासाठी नाही. आता तुम्हीही अखेरच्या वळणावर वळल्या आहात. एवढ्या तेवढ्या मानपानाचे वाईट वाटून घेण्याचे दिवस केव्हाच सरलेत नाही का? अन तुम्हाला आवतण होतं तेसुद्धा केवळ वडीलधाऱ्या म्हणून नव्हतंच ना. तुमची वयोज्येष्ठता हा गौण भाग होता अन आहे. तुमची लेखनतपस्या, ज्ञानसाधना यासाठी तुम्हाला आमंत्रण होतं. त्यामुळे तोच या पत्राचा विषय.

यवतमाळच्या साहित्य संमेलन आयोजकांनी तुम्हाला येऊ नका असं सांगितलं अन तासा दोन तासातच तुमचं भाषण वाचायला मिळालं की हो मला. एका दमात भाषण वाचलं. पण ते वाचल्यावर मनात काही प्रश्नही आले बघा. कोणत्याही कार्यक्रमापूर्वी मुख्य वक्त्यांची, पाहुण्यांची जी भाषणं तयार होतात ती काही निवडक लोकांच्याच हाती असतात. तयारी म्हणून, व्यवस्था म्हणून. पण तुमचं भाषण लोकांच्या हाती लागून, त्याचा मराठी अनुवाद होऊन, ते माध्यमांमध्ये जगभर एवढ्या लवकर कसं काय पसरलं असेल? वयाच्या नव्वदीत सुद्धा तुमचा हे सगळं करण्याचा उत्साह आणि तडफ खरंच विलक्षण. पण ही तडफ तुमचीच असेल का, अशीही शंका येऊन गेलीच. अन ही तडफ तुमची असेल यावर अजूनही विश्वास नाही बसत. गेल्या दोन दिवसात या सगळ्या प्रकाराची पाळेमुळे खणून काढणे सुरु झाले आहे. अन त्यातून काय ते सत्य बाहेर येईलही. तूर्तास तुम्हाला अन मला त्याचा त्रास सोसण्याशिवाय पर्याय नाही. त्यात मी पडणारही नाही. माझ्या दृष्टीने या मानापमान नाटकापेक्षा तुमच्या भाषणाची किंमत अधिक आहे. त्यावरच मला तुमच्याशी बोलायचे आहे.

तुमच्या बाल्यावस्थेतील आठवणीपासून तुम्ही भाषणाला सुरुवात केली आहे. त्यावेळच्या ब्रिटीश दडपशाहीची अन त्याविरुद्ध केलेल्या संघर्षाची आठवण तुम्ही करून दिली आहे. भारताच्या गौरवाचा, समावेशी संस्कृतीचा उल्लेखही तुम्ही केला आहे. अन आज आपण त्या गौरवमयी भारताचा वारसा सांगण्याच्या लायकीचे आहोत का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. प्रामाणिकपणे सांगतो की, तुमच्या व्यथेशी मी सहमत आहे. पण असे का झाले, अशी परिस्थिती का बदलली? या प्रश्नाची चर्चा मात्र मला तुमच्या भाषणात दिसली नाही. या परिस्थितीवर उपाय काय याचाही खल दिसला नाही. आपणासारख्या ज्येष्ठ व्यक्तीकडून केवळ स्थिती वर्णनापेक्षा या मूलभूत चिंतनाची अपेक्षा होती अन आहे. पण तुम्ही निराश केले. या ऐवजी याच्या त्याच्याकडे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निर्देश करण्याचा राजकीय शहाजोगपणा तेवढा तुम्ही दाखवलात. राजकारण करण्याला माझा विरोध नाही. त्यासाठी अगदी साहित्य संमेलनाचा वापर करायलाही माझी हरकत नाही. पण मग आम्ही राजकारण करू, अन तुम्ही मात्र नैतिक साहित्यिक सामाजिकता सोडता कामा नये; अशी अपेक्षा बरोबर म्हणता येईल का? नाहीच म्हणता येणार. पण ही चुकीची अपेक्षा तुम्ही ठेवली. तुम्ही राजकारण कराल तर बाकीचेही करतीलच. त्यावर नाराजी का? स्वातंत्र्याचा जयघोष करताना, आपल्यासोबत दुसऱ्यांना स्वातंत्र्य देणे अध्याहृतच असते ना? आम्हाला स्वातंत्र्य हवे, तुम्हाला ते मिळणार नाही; ही भावना निखालस चुकीची आहे.

जे स्वातंत्र्याचे तेच अभिव्यक्तीचेही. तुमचे निमंत्रण मागे घेतल्याचे जगजाहीर झाले आणि एकच गदारोळ झाला. निमंत्रण का मागे घेतले, कोणी आणि कोणत्या पद्धतीने मागे घेतले, एवढा मोठा निर्णय घेण्यात कोण होते; याचा विचारही न करता; निर्णय देऊन लोक मोकळे झाले. अन लगोलग बहिष्कार सुरु झाले. बरे इथे तरी थांबले का चक्र. नाही. नियोजित संमेलन अध्यक्षांना सल्ले देण्यापासून, त्यांनीही बहिष्कार घालावा येथपर्यंत विचारमंथनाचा तमाशा सुरु झाला. दैनिक लोकसत्ता काय, साप्ताहिक साधना काय, निरनिराळ्या कवी- लेखक- संस्था वा संघटना काय, व्यक्तिश: स्वनामधन्य लेखक-विचारक काय; सगळ्यांना एवढा ऊत आला की विचारू नका. जणू कोणाला वाटावे की, संमेलन अध्यक्षच या प्रकरणामागे आहेत. तुमचा अपमान का वा कसा झाला, कोणी केला; याहूनही या मंडळींना अधिक स्वारस्य संमेलन अध्यक्षांनी आपल्या कळपात सामील व्हावे यातच !! सगळीच गंमत. अरे ज्या संमेलन अध्यक्षांचे चार दिवस आधीपर्यंत कौतुक करीत होता, त्यांच्या विचारावर- विवेकावर- समजूतदारीवर- संवेदनशीलतेवर एवढा अविश्वास? तोही दुसऱ्या कोणीतरी काही केले म्हणून !! लगेच आपले मापदंड जाहीर करून संमेलन अध्यक्षांना प्रमाणपत्रे बहाल करण्याची तयारी? आमच्या कळपात येणार नाही त्याला जगणे मुश्कील करण्याची ही कोणती मानवीयता आणि संवेदनशीलता? हा कोणता विचारीपणा?

मी आपल्यापेक्षा फार लहान आहे, सगळ्याच अर्थाने; पण जगद्वंद्य बापूजींच्या हत्येपासून यवतमाळ संमेलनापर्यंत मला हीच धटिंगणशाही दिसते एवढे खरे. हा प्रवास गांधी हत्येपासून आणीबाणी, शिखांचे शिरकाण, गोध्रा, गुजरात करत तुम्ही उल्लेख केलेल्या, दाभोळकर- पानसरे- कलबुर्गी- पर्यंत झालेला मला दिसतो. नशीब आता थोडी परिस्थिती बदलली आहे. नाही तर १९४८ ची जाळपोळ करायला काय लागते? माफ करा, पण या साऱ्या आक्रस्ताळेपणाबद्दल, ज्या पद्धतीने हे सारे घडते त्यातील अनाकलनीयतेबद्दल आपण बोलल्याचे स्मरत नाही. हां, तुम्ही आणीबाणीविरुद्ध भूमिका घेतली होती. पण तेवढी lip service म्हणजे खूप महान कामगिरी म्हणता येईल का? अन हो, हा विषय आला म्हणून... काही शहाणे ताज्या वादातही स्त्रीवाद घुसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही आणीबाणीला विरोध केला तेव्हाही एका स्त्रीच्या विरोधात उभ्या होता. तेव्हा नेमका कोणत्या स्त्रीवर अन्याय होत होता? तुमच्यावर की इंदिराजींवर? तुम्ही स्त्रीवादी म्हणून समजल्या जाता. जरा स्त्रीवादी लोकांना समजावून सांगा की, सगळ्या गोष्टी अशा विशिष्ट चष्म्यातून पाहणे चुकीचे असते म्हणून. असो. थोडे विषयांतर झाले.

तर मुद्दा हा आहे की, परिस्थिती फारच वाईट आहे का? मला अजिबात तसे वाटत नाही. तुम्ही मोकळेपणाने बोलता, लिहिता आहात, तुमच्या बाजूने लोक उभे होत आहेत; अन तरीही परिस्थिती वाईट? काही तर्क, काही आधार हवा की नको? अन त्याहून महत्वाचा मुद्दा हा की, स्थिती जी आणि जेवढी खराब असेल त्यासाठी काय आणि कोण जबाबदार? मी माझे सगळे आग्रह, सगळे विचार, सगळे समज सोडून देऊन तुमचा भक्त व्हायला तयार आहे. एका अटीवर. जगातला एखादा समाज, एखादा देश असा दाखवा जेथे कोणती समस्या नाही, जेथे कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही, जेथे कणभर लबाडी वा लुबाडणूक नाही. मी या गोष्टींचे समर्थन करीत नाही. अजिबातच नाही. कल्पनेतसुद्धा नाही. अन या साऱ्या अमानवीय गोष्टी दूर करण्याचाच प्रयत्न सदैव असायला हवा हेही मान्यच. त्यावर वाद नाहीच. मतभेद नाहीच. पण असे कुठे झालेले आहे का? हजारो वर्षे झाली हजारो लोक आपापल्या परीने हे करीत आहेत. सगळेच अप्रामाणिक, तत्वशून्य वगैरे म्हणावेत का? आपल्यासारख्या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध लेखकांनी, विचारकांनी या मुळापर्यंत जायला हवे. पण त्यासाठी आपले अहंकार आणि कवटाळून ठेवलेली गृहितके सोडण्याची तयारी हवी. दुर्दैवाने तुमच्या संप्रदायात ती नाही. आपण चुकलेलो आहोत, आपण भरकटले आहोत, आपल्याजवळ कोणतीही जादूची कांडी नाही; हे मान्य करण्याएवढे उमदे मन तुमच्या संप्रदायाकडे नाही.

तुम्ही भारताचा मोठा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे भाषणात. माझा प्रश्न आहे, तुम्हाला भारत म्हणजे काय अभिप्रेत आहे? `जे जे जगी दिसते तया, माझे म्हणा करुणा करा’ असा भारत होता आणि आज नाही. तर का नाही? नेमके कुठून तो बदलला? ज्या काश्मीरशी तुमचं अतिशय भावनिक नातं आहे, त्या काश्मीरवर कोणी हल्ले केले? हल्ल्यांची सुरुवात कधी झाली? कारुण्यमूर्ती बुद्धाच्या देशाच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहिला? अन कृपा करून हे सांगू नका, की कोणी आपल्यावर हात उगारला तरी आपण हात जोडून उभे राहावे? तसे सांगणार असाल तर माझा थेटच प्रश्न आहे- यवतमाळकरांनी हात उगारल्यावर तुम्ही शांत का बसला नाहीत? तुम्हाला सन्मान हवा, प्रत्येक व्यक्तीला सन्मान हवा, आदर हवा, त्याने केलेल्या लहानमोठ्या गोष्टींचं कौतुक हवं, त्याला मान्यता हवी; अन एवढ्या मोठ्या देशाला समाजाला, शतकानुशतके जे काही सोसावं लागलं त्याबद्दल त्याने चकार शब्दही काढायचा नाही? आज तंत्रज्ञानाने हाती दिलेल्या आयुधांचा वापर करून चार टुकार ओळी खरडणारे पोरंपोरी सुद्धा आत्मसन्मान वगैरे गोष्टी करतात, तुमच्या मागे झुंडीने उभे होतात; पण या देशाची सहिष्णुता उत्पन्न करणाऱ्या, येथील कणाकणात ती रुजवणाऱ्या, त्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या, त्याची किंमत चुकवणाऱ्या समाजाने अक्षम्य उपहास, अवहेलना, टवाळी, आघात सहन करूनही तोंडातून चकार शब्द काढायचा नाही ही अपेक्षा ठेवता? मुळात तुमची ही अपेक्षा राक्षसी, अमानवीय आहे. शतकानुशतके अमानुषता आणि खोटेपणा सहन केल्यानंतर कोणा सावरकरांना वा हेडगेवारांना ते सहन झाले नसेल तर ते पाप कसे ठरू शकते? तुम्हाला केवळ निमंत्रण नाकारणे जीवनमरणाचा प्रश्न होऊ शकतो आणि या समाजाने चुपचाप मरून जावे अशी अपेक्षा करता? आणि जेव्हा अन्याय सहन करणारा बोलू लागला, तेव्हा त्याच्या बोलण्यानेच वातावरण बिघडते म्हणून कांगावा करायचा? कोणत्या बुद्धीवादात बसते हे? मूळ क्रियेचा विचार बासनात गुंडाळून जो उफराटा विचार तुम्ही करता त्याला विचार कसे म्हणायचे?

या देशाला संघर्ष नकोच आहे. अशांती नकोच आहे. पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक जीवाची सुखशांतीच त्याला हवी आहे. पण ती कशी येईल, अनेक प्रयत्नांनी ती येत नसेल तर का येत नाही; याचा विचार नको करायला? नुसतीच चारदोन सोयीच्या घटनांची वर्णने आणि याच्या त्याच्यावर दोषारोपण यांनी मानवी सुखशांति प्रत्यक्षात येईल का? ज्येष्ठतेच्या नात्याने, `नका रे बाबांनो भांडू’ एवढे आवाहन सुद्धा तुम्ही कधी केलेले नाही. तुमच्या ताज्या भाषणातही ते नाही. का? कारण `जे जे जगी दिसते तया, माझे म्हणा करुणा करा’ हे तुम्हाला मान्यच नाही. भारताचा गौरव वगैरे तुमच्यासाठी फक्त शब्द आहेत, स्वत:चे आणि स्वत:च्या संप्रदायाचे राजकारण करण्यासाठीचे. `वसुधैव कुटुंबकम’ हा आहे भारत. तुम्हाला तर वेगळा विचार करणारेच आपले वाटत नाहीत, वाटले नाहीत कधी. संप्रदायांचे तणाव असोत वा जातींचे, भाषांचे कर्कशपण असो की प्रांतांचे; ते दूर करण्याचे, कमी करण्याचे प्रयत्न, अबोल प्रयत्न, निरपेक्ष प्रयत्न; या देशात जर कोणी केले असतील तर ते केवळ आणि केवळ तुम्ही ज्यांना शत्रू मानता त्यांनीच. दाखवा नाही तर उदाहरणे. तुम्ही आणि तुमच्या संप्रदायाने सत्तेशिवाय काय केले, अन जे काही केले त्यातसुद्धा कळकळ आणि प्राण किती ओतले; याचा लेखाजोखा मागायची वेळ आलेली आहे. इतिहास याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. इतिहास काय किंवा काळ काय; तो ना तुमचा मिंधा असतो ना तुम्ही ज्यांना शत्रू समजता त्यांचा. तो त्याचे काम करतो. आज तो सत्याला प्रकाशमान करतो आहे. अन म्हणूनच तुमचा जळफळाट होतो आहे.

भारत म्हणजे जोडणे. मनांना जोडणे, भावनांना जोडणे, विचारांना जोडणे. जोडत, जोडत एक अखंड शुभसाखळी तयार करणे. मग पाकिस्तान म्हणून देश तोडणे ही भारतीयता असू शकते का? किंवा अगदी कालपरवा `भारत तेरे तुकडे होंगे’ ही भारतीयता असू शकते का? अशा वेळी तुम्ही तोंडात मिठाची गुळणी धरण्यानेच वास्तविक वातावरण बिघडत असते. अगदी प्रारंभापासून चुकीच्या गोष्टींना चूक म्हणण्याची हिंमत दाखवली असती आणि वेगळा मार्ग असला तरीही कोणीही आमचा शत्रू नाही ही भूमिका ठेवली असती, तर आजची स्थिती उद्भवलीच नसती. महात्मा गांधींचा तुम्ही उल्लेख केला आहेत. पण तुमचे गांधी कोणते आहेत? रामायण, महाभारत, भगवद्गीता, उपनिषदे, या देशाची प्राचीनता, या देशाची महानता, या देशाची हजारो वर्षांची सामाजिक- आर्थिक- राजकीय- सांस्कृतिक- आध्यात्मिक- धडपड; वगळून उरलेले गांधीजी. तुमच्या संप्रदायाचे हे selective असणे हेदेखील आजच्या स्थितीचे महत्वाचे कारण आहे हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला असता तर बरे झाले असते. हा देश, इथला समाज, त्याचे तत्वज्ञान, त्याची जीवनपद्धती, त्याची सखोलता, त्याची जीवन सार्थकता, त्याने उभारलेले विश्वकल्याणाचे तत्वज्ञान आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न, त्यासमोर उभी झालेली- उभी केलेली- आव्हाने; या सगळ्यांच्या संदर्भात आत्मनकाराची, आत्महीनतेची तुमच्या संप्रदायाने सातत्याने जोपासलेली भावना हीच आजच्या दुरवस्थेचे कारण आहे. खोटेनाटेपणा, अपूर्णता, स्वप्नाळूपणा, एकांगीपणा, exclusion ची वृत्ती, सिंहावलोकनाला सातत्याने, आडमुठेपणाने नकार; आत्मधुंदी; या सगळ्यावर वास्तविक तुमच्या सारख्या व्यक्तीने बोलायला हवे. तुमच्या मागून येणाऱ्यांना हे सारे समजावून सांगायला हवे. लोकशाही, समाजवाद, भांडवलशाही, कम्युनिझम, विज्ञान, तंत्रज्ञान, निरनिराळे सामाजिक, आर्थिक प्रयोग, मानवाचा विचार, जगाचा विचार, जगण्याचा विचार, अपूर्णता, मर्यादा, अपरिहार्यता; अशा अनेक अंगांनी सामान्य माणसाची जाण, जाणीव, प्रगल्भता वाढेल यासाठी काही तरी करायला हवे होते. तुम्ही ते केले नाहीत. अगदी यवतमाळ संमेलनासाठी तुम्ही तयार केलेल्या प्रस्तावित भाषणातसुद्धा त्याचा मागमूससुद्धा दिसत नाही.

कसले मार्गदर्शन होणार होते या भाषणातून? एकमेकांवर दुगाण्या झाडण्याचे? तुम्ही जे जे विचार आणि जो मार्ग जन्मभर कवटाळून बसला; त्याची तटस्थ चिकित्सा तुमच्याकडून आता नाही तर केव्हा अपेक्षित करायची? तुमचे आता जगप्रसिद्ध झालेले भाषण घोर निराशा करणारे ठरले आहे. तुमचे हे भाषण ना साहित्याची सेवा करणारे, ना भाषेची सेवा करणारे, ना समाजाची सेवा करणारे, ना विचारांना दिशा वा चालना देणारे. ते केवळ दिशाहीन, दुबळ्या, नाटकीय, छद्मी, भोंगळ, किळसवाण्या राजकीय उचापतींचे भाषण वाटते. माफ करा. पण भारतालाच काय, एखाद्या विचारी व्यक्तीलाही त्यातून काही मिळणार नाही. केवळ सोयीचे स्थितीवर्णन किंवा सद्भावांची पोपटपंची म्हणजे विचार अथवा चिंतन होत नाही. आधीच काढलेले निष्कर्ष म्हणजे विश्लेषण होत नाही.

काही ना काही कमीजास्त झाले असेलच पत्रात. एका मूर्ख नातवाची बडबड म्हणून आजीच्या नात्याने त्याकडे दुर्लक्ष करावे. आणखी काय लिहू? खूप खळबळ होती मनात म्हणून तुला आपली समजून लिहिलं. हा आपलेपणा तर समजून घेशील ना?

तुझाच

(उद्धट) नातू

(श्रीपाद कोठे, नागपूर, मंगळवार, ८ जानेवारी २०१९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा