शनिवार, ८ जानेवारी, २०२२

दोन घटना, दोन तऱ्हा

महाराष्ट्रात नुकत्याच दोन घटना झाल्यात. एक सगळ्या जगाला ठाऊक झालेली भीमा कोरेगावची. दुसरी घटना एक आणि त्याच वेळी अनेक म्हणता येईल अशी, पण जगाला फारशी ठाऊक न झालेली. दुसरी घटना म्हणजे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताने २५५ ठिकाणी एकाच दिवशी घेतलेले हिंदू संमेलन. `सज्जन शक्ती सर्वत्र' अशी घोषणा देऊन हे आयोजन झाले. मी कोकण प्रांताचा नाही, त्यामुळे मी त्यात अगदी साक्षीदार म्हणूनही सहभागी नव्हतो. पण प्रश्न पडला मला- प्रसार माध्यमांनी याची काही दखल घेऊ नये?

कोकण प्रांत हा संघाच्या महाराष्ट्रातील चार प्रांतांपैकी एक. म्हणजे फक्त २५ टक्के महाराष्ट्रात २५५ ठिकाणी लोक जातपात, भाषा, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती हे सगळे बाजूला ठेवून एकत्र येतात. आपल्याला काय मिळेल याचा स्वार्थी विचार न करता एकत्र येतात. त्यात कोणावर दोषारोपण, हिंसा, तोडफोड असं काहीही होत नाही. याची दखल नाही. हे कसं होतं, हे कसं केलं गेलं/ केलं जातं याची चर्चा नाही. यासाठी prime time नाही.

भीमा कोरेगावची घटना संपूर्ण महाराष्ट्रात एकच होती. अर्थात त्यामुळे तिची दाहकता आणि गंभीरता कमी होत नाही. त्यामुळे त्याची दखल घेण्यात गैर काहीच नाही. मात्र `जे नसावं' असं आम्ही म्हणतो आणि तसं आम्हाला वाटतं; त्याची किती चर्चा, किती प्रसिद्धी, त्यासाठी किती वेळ आणि उर्जा? अन `जे असावं' असं आम्ही म्हणतो आणि तसं आम्हाला वाटतं; त्याची किती चर्चा, किती प्रसिद्धी, त्यासाठी किती वेळ आणि उर्जा?

समाजघातक गोष्टी समाजापुढे पोटतिडीकेने आणणारी प्रसार माध्यमे, समाजपोषक गोष्टी समाजाला सांगण्यासाठी कोणत्या निमंत्रणाची वाट पाहत असतात? आणि निमंत्रण मिळूनही त्याला वाटण्याच्या अक्षता का लावीत असतात?

- श्रीपाद कोठे

९ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा