रविवार, २ जानेवारी, २०२२

पेहेराव

नववर्ष स्वागताच्या पार्टीत बंगलोरला एक आक्षेपार्ह प्रकार घडला. ती घटना आक्षेपार्ह आहेच. पण त्या निमित्ताने काहीही बरळत सुटायचे याला काय म्हणावे? नशीब ही घटना पार्टीत सहभागी असलेल्यांच्याच मर्यादेत घडली. नाही तर शिमगा ठरलेलाच होता. कुणा एका नेत्याने या प्रकारावर बोलताना मुलींच्या पेहेरावाविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावरील मीडियाची आणि तथाकथित आधुनिकतावाद्यांची प्रतिक्रिया मात्र अनावश्यक आणि अयोग्य आहे. पेहेरावावर नाराजी व्यक्त करणे म्हणजे लिंगपिसाटपणा, हीन वृत्ती (त्यांचा शब्द sexist comment) असा मिडिया आणि आधुनिकतावादी यांचा आक्षेप आहे. पेहेरावावरील नाराजीत आक्षेपार्ह काय आहे? हां, एखाद्याचे मत असू शकते की, अशा पोशाखात काही वावगे नाही किंवा अशा पोशाखामुळे महिलांवर अत्याचार होतात हा तर्क बरोबर नाही. हे मत असायला हरकत नाही. पण पेहेराव हा चर्चेचा विषय असूच शकत नाही हा तर्क नसून कुतर्क आहे. समाजात घडणाऱ्या, समाजात प्रचलित, समाजाला प्रभावित करणाऱ्या सगळ्या गोष्टींची साधकबाधक चर्चा होणारच, नव्हे ती व्हायलाच हवी. कोणत्याही सार्वजनिक व्यवहाराला किंवा समूहाला immunity का असावी? मुस्लिमांच्या व्यवहाराची चर्चा नको, ख्रिश्चनांच्या व्यवहाराची चर्चा नको, दलितांच्या व्यवहाराची चर्चा नको, स्त्रियांच्या व्यवहारांची चर्चा नको.... का? का नको? पेहेराव हा एक स्वतंत्र समाजशास्त्रीय विषय आहे की नाही? त्याची विविध अंगांनी साधकबाधक चर्चा होणे, करणे, त्यावर मत प्रदर्शित करणे हा लिंगपिसाटपणा किंवा हीन वृत्ती असू शकत नाही.

- श्रीपाद कोठे

३ जानेवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा