सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

मोगरा

(जुनं लिखाण संगणकात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. कात्रणांच्या धारिका न जाणो खराब झाल्या तर. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा. हे काम जसजसे होईल, त्यातील खूप तात्कालिक वा प्रासंगिक नसलेले लिखाण मित्र मैत्रिणींसाठी, चोखंदळ वाचकांसाठी सादर करत जाईन.)

मोगरा

बहर संपला अन अंगणातल्या मोगऱ्याला कात्री लागली. पावसाचं पाणी पिउन तो पुन्हा डवरेल व पुढच्या चैत्राच्या सुरुवातीला पुन्हा बहरेल. लोभस व सुगंधी अशा या लहानशा मोगऱ्याचं नातं खूप लहानपणीच जुळलं. सकाळच्या शाळेसाठी उठताना कधीतरी आकाशवाणीच्या अर्चनातले सूर कानी पडत, `मोगरा फुलला, मोगरा फुलला; फुले वेचिता बहरू कळियासी आला'. ज्ञानेश्वरांच्या मोगऱ्याचा अर्थ तेव्हा कळत नव्हता. आजही तो कळतो का हा प्रश्नच आहे. मोगऱ्याशी नातं मात्र त्यामुळे जुळलं आणि मग त्याला अनेक अंकुर फुटत गेले.

उन्हाळ्यात मोकळ्या गच्चीत उघड्यावर झोपताना वर चढलेला मोगरा आपल्या घमघमाटासह केव्हा अंगाई गाऊन पापण्या मिटायला लावी ते कळतही नसे.

एकदा मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला काय द्यावं असा विचार करता करता हाच मोगरा साहाय्याला धावला. छान टपोरी टपोरी सुगंधी फुलं ओंजळभर निवडून घेतली. तिच्या घरी गेलो. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं, हात पुढे कर. तिने तीर्थ प्रसादासाठी करावा तसा हात पुढे केला. म्हटलं असा नाही, छान खोल ओंजळ कर. तिने ओंजळ केली. मी आपली मोगऱ्याची ओंजळ तिच्या ओंजळीत रिती केली. `वाढदिवसाला मोगरा देऊन तू माझं आयुष्य सुगंधित केलंस,' ती म्हणाली. माझा मनमोगरा फुलून आला.

पंडित ओंकारनाथ ठाकूर हे भारतीय संगीत इतिहासातलं एक अजरामर नाव. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बडोद्याला जाण्याचा योग आला होता. तिथे या मोगऱ्याचं नातं आणखीन घट्ट झालं. दोन दिवसांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी फिरायला निघालो. सूरसागर तलावापासून गायकवाडांच्या राजवाड्याकडे जाताना उजव्या हाताला योगी अरविंद आश्रमाचं आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. योगी अरविंद प्राध्यापक म्हणून गायकवाडांकडे नोकरी करीत असताना या इमारतीत राहत होते. नंतर त्यांनी नोकरी सोडली. पण मुक्काम बरेच दिवस याच ठिकाणी होता. याच इमारतीत त्यांनी योगाचा अभ्यासही केला. त्याच ठिकाणी आता हे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. फिरत फिरत या केंद्रात गेलो. इथे योगी अरविंद यांची नामसमाधी आहे. ती पाहण्यासाठी समाधी मंडपात गेलो. समोरील दृश्य बघून प्रसन्न वाटलं. मन अवाक झालं. शुभ्र संगमरवरी समाधीवर पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांची शेज होती. समाधीचा चौथरा मोगऱ्याच्या फुलांनी पूर्ण भरून गेला होता. वातावरणात अनोखा स्वर्गीय सुगंध दरवळत होता. सर्वत्र शांत, नि:स्तब्ध वातावरण होतं. त्या धवल पवित्रतेला मान झुकवून केंद्राचा परिसर पाहायला निघालो.

मुख्य इमारतीत खालच्या बाजूला ग्रंथालय, वाचनालय व त्याच्यावर ध्यानगृह आहे. ध्यानगृहात पोहोचलो. योगी अरविंदांच्या आश्रमाची एक विशेषता आहे. कोठेही जा, कोणत्याही ईश्वरी रुपाची प्रतिमा दिसणार नाही. त्या जागी दिसेल केवळ शालीने झाकलेल्या दोन चरणांची तसबीर. भगवंतांचे सुकुमार चरणकमल ! थोडा वेळ ध्यानगृहात बसलो. आणखीही काही जण होते. पण एका अनामिक ओढीने लक्ष वेधले. त्या चरणकमलांच्या तसबिरीपुढे बसलेल्या शुभ्रवसना एकाग्रचित्त युवतीने ! थोडावेळ बसून बाहेर पडलो. केंद्राच्या परिसरात इकडे तिकडे थोडा वेळ हिंडलो. आता निघायचं असा विचार करून निघण्यापूर्वी पुन्हा समाधीचं शीतल सुगंधित पावित्र्य तनामनात साठवून घ्यावं म्हणून पावलं तिकडे वळली. समाधी मंडपात पोहोचलो आणि काय आश्चर्य ! तीच ध्यानमंदिरातली शुभ्रवसना युवती तिथे उपस्थित होती. समाधीवर डोके टेकून निघणार तोच ती जवळ आली. औपचारिक चार वाक्यं बोलली आणि सुंदरसं हसून म्हणाली, `हात पुढे करा.' मी हात पुढे केला तर म्हणाली, `अंहं!' नंतर तिने ओंजळ करून दाखवली आणि म्हणाली- `अशी!' मी ओंजळ पुढे केली आणि तिनं समाधीवरची मोगऱ्याची टपोरी फुलं माझ्या ओंजळीत टाकली. मी अंतर्बाह्य शहारलो. काही दिवसांपूर्वी मी दिलेली मोगऱ्याची फुलं पाहून मैत्रीण म्हणाली होती- `तू माझं आयुष्य सुगंधित केलंस.' आज एक चक्र पूर्ण झालं होतं. त्या अनामिकेने माझ्या ओंजळीत मोगऱ्याची फुलं टाकली आणि मलाही म्हणावंसं वाटलं, `तू माझं आयुष्य सुगंधित केलंस.' पण मला हे म्हणताच आलं नाही. कारण फुलं ओंजळीत टाकल्याच्या दुसऱ्याच क्षणी ती बाहेर पडून चालायला लागली होती. मी अस्वस्थ झालो.

त्या अस्वस्थ मनस्थितीतच बाहेर पडलो. बाजूलाच उभ्या असलेल्या चौकीदाराशी औपचारिक दोन शब्द बोलावेत म्हणून त्याच्याजवळ गेलो. दोन चार वाक्यांची देवाणघेवाण झाल्यावर त्याने विचारले, `साहेब आपण त्या तरुणीला ओळखता?' म्हटलं, मुळीच नाही. आता त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, `ही मुलगी कधीही कोणाशी बोलत नाही. ती डॉक्टर आहे. गायकवाडांच्या रुग्णालयात नोकरी करते. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत. २५ हजार पगार आहे. संध्याकाळी ५-६ वाजता इथे येते. समाधीची शेज करते. ध्यान करते व आठ-नऊ वाजता निघून जाते. कोणाशीही काहीही न बोलता.' आता थक्क होण्याची पाळी माझी होती. पंचविशीच्या आसपासची ती सुंदर गुजराथी तरुणी. ती तरुण होती, सुंदर होती, हुशार होती, कर्तृत्ववान होती, तिच्याकडे पैसा होता. सारं काही होतं. तरीही रोजची सायंकाळ ती अरविंद आश्रमात घालवीत होती. एकटीनं. तिला घरी काही असह्य त्रास होता का? प्रेमभंग वगैरे झाला होता का? की, अदृष्टाच्या जन्मजात ओढीमुळेच ती मित्र मैत्रिणी, मौजमजा, कुटुंबीय, छंद सारं सोडून तिथे येत होती. कुणास ठाऊक? पण ती माझ्याशी का बोलली? तिनं माझ्या ओंजळीत मोगऱ्याची फुलं का टाकलीत? कधीतरी कुणाच्या तरी आयुष्यात फुलवलेले दोन सुगंधित क्षण परत करण्यासाठी तर परमेश्वराने ही लीला रचली नसेल? ती अनामिका अरविंद आश्रमात अजूनही येत असेल का? कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. माझं व मोगऱ्याचं नातं आता असं प्रश्नांकित झालं आहे. मोगऱ्यानी मला कधीही बांधलं नाही. पण त्याचा सुगंध या प्रश्नांना बाजूस सारून व्यापून राहिला आहे. अंगणात फुललेला मोगरा पाहिला, त्याचा सुवास दरवळला की माझाही मनमोगरा आताशा डवरून येतो.

- श्रीपाद कोठे

(शुक्रवार, २० जुलै २००१- लोकसत्ता)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा