गुरुवार, २० जानेवारी, २०२२

भाजप

भारतीय जनता पार्टी हा आज संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष झाला आहे. ही त्याची फार मोठी विशेषता म्हणता येत नसली तरीही एक विशेषता निश्चित म्हणता येईल. भारतीय जनता पार्टी हा अनेक अर्थांनी वेगळा राजकीय पक्ष आहे. राजकीय आकांक्षा नसलेल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातून त्याचा १९५१ साली जन्म झाला. त्यानंतरच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत काही काळ संपूर्ण लोप पावून आणि नंतर दुसरे नाव, दुसरा झेंडा घेऊन भाजपने वाटचाल केली आहे. हेही एक आगळेपण म्हणावे लागेल. स्वत:चे अस्तित्व पूर्ण संपवून टाकून पुन्हा उभा राहणारा आणि अस्तित्व संपवण्यापूर्वीच्या मूळ प्रवाहाशी अशा रीतीने पुन्हा जोडून घेणारा की, कोणालाही हे दोन वेगळे पक्ष आहेत असे वाटूही नये. लोपलेल्या प्रवाहाशी सांधा जोडून पुन्हा तो प्रवाह एकसंध आणि सशक्तपणे वाहता करणे हे स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि श्री. लालकृष्ण अडवाणी यांचे कर्तृत्व आणि कौशल्य म्हटले पाहिजे. अर्थात पक्षाचे लहान मोठे सगळे कार्यकर्ते आणि नेते, तसेच रा. स्व. संघाची पक्षाच्या पाठीशी उभी असलेली शक्ती यांनाही नाकारून चालणार नाही. पक्षाच्या या विलय आणि पुनर्जीवनाच्या मुळाशी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण, संवर्धन हे कारण होते. व्यक्तिगत राजकीय आकांक्षा यापाठी नव्हती हे भाजपच्या वाटचालीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या देशाची गरज ओळखून, परिस्थितीची हाक ओळखून पक्षाचा विलय करणे आणि आपल्या समर्पणाला दुबळेपणा समजून त्यावर राजकीय पोळी शेकून घेण्याचा कावेबाजपणा लक्षात घेऊन पुन्हा नव्याने सुरुवात करणे; हे राजकीय पक्षांच्या इतिहासात पाहायला न मिळणारे अनोखे उदाहरण म्हणता येईल. १९५१ साली शून्यातून सुरु झालेला हा प्रवास आज संपूर्ण देशाचा पक्ष, केंद्रात सत्तेवर असणारा पक्ष, बहुतांश राज्यात सत्तेवर असणारा पक्ष आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष येथवर पोहोचला आहे. भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही नावांवर अधिकार सांगणाऱ्या अन लोकांनी हा अधिकार मान्य केलेल्या भाजपची ही वाटचाल; संघटनात्मक, राजकीय, सामाजिक, वैचारिक अशा विविध अंगांनी समजून घेण्याची, तपासण्याची, अभ्यासण्याची गरज आहे. त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू, त्याची शक्तिस्थाने आणि दुर्बल स्थाने, त्याच्यापुढील अडचणी आणि आव्हाने, मर्यादा; यांचीही साधकबाधक चर्चा पक्ष म्हणून आणि देश म्हणूनही गरजेची आहे.

भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतर वर्षभराच्या आतच झालेल्या लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे तीन खासदार निवडून आले. त्यानंतर विजयाची ही कमान वाढतच राहिली आणि १९६७ च्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत खासदारांची संख्या ३५ पर्यंत पोहोचली. १९७१ च्या पाचव्या लोकसभेत मात्र ही संख्या लक्षणीय घटली. चवथ्या आणि पाचव्या लोकसभेच्या दरम्यान दोन महत्वाच्या घटना घडल्या होत्या. काँग्रेस पक्षात फूट पडून श्रीमती इंदिरा गांधी सर्वेसर्वा होणे आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची निर्घृण हत्या. या दोन्ही घटनांनी भारतीय जनसंघ आणि भारतीय राजकारण या दोहोत लक्षणीय बदल झाले. आणीबाणीने भारतीय जनसंघाचा बळी घेतला आणि जनता पार्टीतील सत्तेच्या साठमारीने भारतीय जनता पार्टीचा उदय झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या जैविक नात्याचा तो ठाम उच्चार होता. मात्र पक्षाने `गांधीवादी समाजवाद’ स्वीकारल्याने पक्षाविरुद्ध देशभर विपरीत प्रतिक्रिया उमटली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सिद्ध केलेल्या `एकात्म मानववादाला’ भाजपने सोडचिठ्ठी दिली अशी सर्वत्र चर्चा झाली. संघाच्या नात्यावरून जनता पार्टी सोडून जनसंघाच्या लोकांनी भाजप स्थापन केला तरीही, वैचारिक दृष्टीने संघ विचारांशी फारकत घेतली असे चित्र निर्माण झाले. त्यावर बराच खल होऊन भाजपने पुन्हा एकदा `एकात्म मानववाद’ स्वीकारला. दरम्यान, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येने सारीच समीकरणे बदलली. त्या घटनेने कॉंग्रेसला अभूतपूर्व बहुमत मिळवून दिले. भाजपची लोकसभेतील खासदार संख्या दोनवर घसरली. काही महिन्यांच्या भारतीय जनसंघाने पहिली लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी खासदारांची संख्या तीन होती. १९८४ मध्ये ही संख्या त्याहूनही खाली गेली. मात्र शहाबानो प्रकरण, राम जन्मभूमी आंदोलन, लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा, बोफोर्स प्रकरण, यासारख्या घटनांनी भाजपला राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. त्यानंतर स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात प्रथम १३ दिवस, नंतर तेरा महिने आणि त्यानंतर संपूर्ण कालावधीची सरकारेही केंद्रात सत्तारूढ झाली. आज देशाच्या सगळ्या भागात अस्तित्व असलेल्या भाजपचे सुमारे साडेतीनशे खासदार आणि विविध राज्य विधानसभांमध्ये शेकडो आमदार आहेत. देशाचे पंतप्रधान, दीड डझन राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या पदांवर भाजपचे नेतृत्व केलेल्या व्यक्तीच विराजमान आहेत. शून्यातून इथवर पक्षाची राजकीय शक्ती वाढलेली आहे. आज भाजपशिवाय भारतीय राजकारणाचा विचार करताच येत नाही ही स्थिती आहे.

आणीबाणीनंतर देशाच्या राजकारणात एक मोठा बदल असा झाला की, देशभरातील युवा नेतृत्व मोठ्या प्रमाणात राजकारणात सक्रीय झालं. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अनेक युवक आणीबाणीविरुद्ध केलेल्या संघर्षातून राजकारणात दाखल झाले. स्वाभाविकच देशभरात राजकीय आकांक्षा वाढीस लागल्या. व्यक्तिगत, प्रादेशिक, भाषिक राजकारण आकार घेऊ लागले. आपली राजकीय शक्ती कमी होत असल्याची आणि इंग्रजांविरुद्ध केलेल्या संघर्षाचे आपले पुण्य क्षय होत असल्याची जाणीव कॉंग्रेसला झाली. त्या धास्तावलेपणातून कॉंग्रेसने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. व्यक्तिगत, प्रादेशिक, भाषिक राजकीय आकांक्षांनी छोट्या छोट्या समूहांना, छोट्या छोट्या विषयांना हाती घेऊन राजकीय शक्ती संपादन केली. ही संख्या वाढू लागली. परंतु या साऱ्यांची दृष्टी लहान आणि स्वार्थी होती. यातील कोणत्याही व्यक्ती वा पक्षाकडे अखिल भारतीय दृष्टी नव्हती. देशाच्या दीर्घकालीन कल्याणाची तळमळ नव्हती. स्वत:चे आणि गटाचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी राजकारण करण्यातच या गटांना स्वारस्य होते. दुसरीकडे रा. स्व. संघाच्या दूरगामी राष्ट्र उभारणीची प्रेरणा घेऊन आणि अखिल भारतीय दृष्टी घेऊन चालणारा भाजप होता. राजकारणात संख्याबळाला महत्व असतेच. भाजपलाही आपली संख्यात्मक वाढ करणे क्रमप्राप्त होते. यातून देवाणघेवाण आणि तडजोडीचे राजकारण पुढे आले. निवडणूक जिंकणे याला प्राधान्य मिळाले. विविध विषयांवर निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भूमिका घेण्याची सुरुवात झाली. राजकीय आकांक्षा बाळगणाऱ्या आणि थोडीबहुत शक्ती असणाऱ्या गटांना आणि व्यक्तींना सामावून घेताना कसरत होऊ लागली. राजकीय आखाड्यातील अन्य प्रतिस्पर्धी लक्षात घेऊन प्रचार, पैसा, प्रतिमा, प्रदर्शन, आश्वासने हे सारे सुरु झाले. संख्याबळ तसेच शक्ती वाढवण्यासाठी आणि राजकीय आखाड्यातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागल्या. याचे दोन परिणाम झाले. एक तर - कार्यकर्ता आधारित पक्ष; ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ पक्ष; आदर्शांचा आग्रह धरणारा पक्ष; उक्ती आणि कृती एकच असणारा पक्ष; नैतिकता जपणारा पक्ष; हे चित्र बदलायला सुरुवात झाली. दुसरा परिणाम म्हणजे – कार्यकर्ता बदलू लागला. साधेपणा, अध्ययनशीलता, व्यसनांपासून दूर राहण्याचा आग्रह, वरिष्ठांच्या पुढेपुढे न करणे, सामान्य माणसाशी जिवंत संबंध, कष्ट, समाजाबद्दल आत्मीयता, पक्षनिष्ठा, उपक्रमशीलता; अशा गोष्टी हळूहळू मागे पडू लागल्या. आधी याकडे डोळेझाक, मग थोडी अपरिहार्यता आणि नंतर सवय; असा बदल घडून आला. यातून पक्षाची वीण आणि पीळ उसवत गेली. भाजपचा काँग्रेस झाला असे उघड बोलले जाऊ लागले.

निवडणूक जिंकण्याचे विविध उपाय, पद्धती गेल्या काही वर्षात भाजपने आत्मसात केल्या आहेत. त्याला भाजपचा वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्नही पक्ष करतो आहे. `One booth, ten youth’ ही घोषणा आणि तसा प्रयत्न हे योग्यच आहे. परंतु हे दहा युवक कार्यकर्ते म्हणायचे का? निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडून त्याचा लाभ पक्षाला मिळावा यासाठी हा प्रयत्न योग्यच आहे पण या युवकांना कार्यकर्ता निश्चितच म्हणता येणार नाही. व्यक्तीजीवनातील आणि समाजजीवनातील राजकारणाचा प्रभाव आणि राजकारणाची भूमिका लक्षात घेऊन राजकीय पक्षांशी जवळीक ठेवणारे असंख्य लोक आज समाजात आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्या फार मोठ्या राजकीय आकांक्षा असतीलच असे नाही, पण त्याच्या मनात काही ना काही हिशेब नक्कीच असतात. त्यांचा पक्षासाठी उपयोग करून घेणे हे चांगले व्यवस्थापन म्हणता येईल, पण त्यांना कार्यकर्ता म्हणणे ही स्वत:चीच फसगत करून घेणे आहे. निष्ठा, विचार, ध्येय, वृत्ती, व्यवहार हे कार्यकर्त्याला साजेसे असतात का हा महत्वाचा मुद्दा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला ऐतिहासिक आणि वैचारिक संबंध पक्षाला कार्यकर्ता आधारित पक्ष ठरवण्यास पुरेसे नाही. संघ भाजपला कमीअधिक मदत करत असेल वा नसेल; मुद्दा हा की पक्षाला म्हणजेच सर्वोच्च नेतृत्वापासून अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत; संघविचार, संघव्यवहार, संघभाव याबद्दल आस्था असणारे आणि तशा जगण्याचा आग्रह ठेवणारे; यांचे प्रमाण किती आहे हा. संघाच्या शाखेत, उत्सवात, गणवेशात, बैठकीला गेले की आपली बांधिलकी पूर्ण झाली आणि मग बांधिलकीचा तो धनादेश वठवायला आपण मोकळे; असा विचार करण्याचे प्रमाण अधिक असेल तर ते पक्ष म्हणून आणि देश म्हणूनही विपरीत ठरेल. सत्ता काय, आज आहे उद्या नाही; हे म्हणणे ठीक आहे. परंतु आमच्याकडे सत्ता आहे त्यामुळे आम्हाला अन्य कशाची फिकीर करण्याचे कारण नाही; असा व्यवहार असेल तर त्याचे समर्थन करता येत नाही. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवला तरीही ग्राम पंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडून येणाऱ्या पक्ष प्रतिनिधींच्या व्यवहाराची खात्री देता येईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. खासदारांचे पगार, भत्ते वाढवणे ही सामान्य प्रक्रिया असू शकेल; पण ते नाकारण्याची हिंमत भाजपचे किती खासदार दाखवू शकतात? स्व. नानाजी देशमुख यांनी ही हिंमत दाखवून उदाहरण घालून दिले होते, हे फक्त सांगण्यापुरतेच राहते. विषय फक्त पैसा हा नाही, सामान्य जनतेत संदेश देण्याचा आहे. शेकडो खासदार आणि हजारो आमदार असताना, दृष्ट लागावे असे किंवा आव्हान देता येणार नाही असे, पुरेसे लोकसभा वा विधानसभा मतदारसंघ का निर्माण करता आले नाहीत? पुरेशा संख्येतील अशा मतदारसंघांनीच पक्षाचा प्रचार केला असता. त्यासाठी पंतप्रधांना जास्त कष्ट देण्याची गरज पडली नसती. पण तसे झाले नाही. त्या त्या लोकप्रतिनिधीची कळकळ, दृष्टी, निर्णयक्षमता, धडाडी; यासोबतच कायदे-नियम आणि पक्षाची कार्यपद्धती हे सगळेच तपासण्याची गरज आहे.

भारतीय जनता पक्षाची शक्ती, स्वीकार्यता आणि प्रतिनिधित्व निर्विवादपणे वाढले आहे. परंतु त्या प्रमाणात विश्वासार्हता वाढली आहे का? आगामी २०१९ च्या निवडणुकीत काय होईल हा भविष्याच्या गर्भातील प्रश्न आहे पण आज जी सर्वेक्षणे होत आहेत ती पूर्ण विश्वास दाखवणारी का नाहीत याचा विचार व्हायला हवा. सर्वेक्षण करणाऱ्या संस्था किंवा माध्यमे एवढे म्हणून चालणार नाही. दुसरा विचारच येऊ शकणार नाही, पण परंतु होणार नाही; असं वातावरण, असा विश्वास दुर्दैवाने पक्षाला जागवता आलेला नाही. समाजाचा पुरेसा विश्वास आणि पक्षांतर्गत परस्पर विश्वास या दोन्हीचा अधिक गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे. नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये परस्पर विश्वासाची कमतरता सगळ्याच स्तरांवर जाणवते हे वास्तव आहे. यासाठी जो आणि जसा संवाद हवा तो नाही. कोणालाही मोकळेपणाने, दबावाशिवाय आपले विचार, आपल्या भावना बोलता यायला हव्या. मुख्य म्हणजे बोलले गेलेले तेवढ्याच आस्थेने, गांभीर्याने ऐकले जायला हवे. औपचारिक, अनौपचारिक असा दोन्ही प्रकारचा संवाद हवा. स्वसमर्थन, फ्लेक्सप्रसिद्धी हे टाळले जायला हवे. प्रतिमा निर्माण हे कधीकधी फायद्याचे असले तरीही त्यावर अवलंबून राहणे किंवा त्याच्या आहारी जाणे किंवा त्याहून अधिक सशक्त पर्यायांची गरज न वाटणे; हा धोक्याचा कंदील आहे. पक्षाने गेल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची प्रतिमा निर्मितीसाठी मदत घेतली. ते बोलून चालून व्यावसायिक. कधी इकडे, कधी तिकडे. पक्ष, धोरणे, समाज यांच्याशी त्यांची बांधिलकी नसते. कधी अवास्तव, कधी अतिव्याप्त अशी भाषा, अशा कल्पना यांचा वापर करण्यात त्यांना अडचण वाटत नाही. मात्र दीर्घ कालावधीत पक्षाला हे हानिकारक ठरते. प्रतिमा निर्माणाचा विवेकी वापर करावाच पण मनामनातला विश्वास, मनामनातील आपुलकी, व्यक्तीव्यक्तीचा जैविक आत्मीय संबंध; हीच पक्षाची ताकद असायला हवी. यात पक्ष कमी पडतो.

पक्षाची प्रस्तुती हाही महत्वाचा विषय आहे. अन मोठाही. कोणताही लहान वा मोठा कार्यक्रम, बैठकी कशा होतात; त्यावर खर्च किती केला जातो; तिथली भाषा, वातावरण कसे असते; खाण्यापिण्याला किती महत्व दिले जाते, त्यावर किती खर्च होतो; पैशाचे प्रदर्शन, पैशाची उधळपट्टी होते का; हे सगळे समाज पाहत असतो. माध्यमांमधील पक्षाची प्रस्तुती हाही विषय असतो. प्रकाशवाणीवरील चर्चांमध्ये मोठ्याने, आक्रमक, आक्रस्ताळे बोलूनच म्हणणे सिद्ध करता येते असे नाही. उलट पुष्कळदा ते नकोसे वाटते. कधीकधी तर उत्तरे दिली नाहीत तरी चालू शकतं. लोक समजूतदार असतात, विचार करत असतात. आवश्यक आणि पुरेशा बोलण्यासोबतच मौनसुद्धा प्रभावी ठरू शकते. समाज माध्यमात होणाऱ्या चर्चा, घडवून आणल्या जाणाऱ्या चर्चा, केला जाणारा प्रचार; वापरली जाणारी चित्रे, व्यंगचित्रे, ग्राफिक्स टोकदार असायला हरकत नाही पण असभ्य आणि अनावश्यक आक्रस्ताळे नकोत. विरोधकांशी आपण राजकीय लढाई खेळतो आहोत, ही काही दोन शत्रूंची लढाई नाही; हे भान असले पाहिजे. समाजाला संतुलित गोष्टी पटतात आणि आवडतात. एवढेच नाही तर असंतुलित वागण्याबोलण्याने समाजाच्या सवयी, समाजाची मानसिकता, समाजाची विचारशक्ती यावर विपरीत परिणाम होऊन समाजाचे कायमस्वरूपी नुकसान होते. भाजपने राजकीय लढाई जिंकायला हवी असे वाटणाऱ्या लोकांनाही या लढाईत समाजाचे नुकसान मात्र अपेक्षितही नाही आणि पटणारेही नाही.

भारतीय जनता पक्ष हा आता सत्तारूढ पक्ष झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकच कच्छ आंदोलन, काश्मीर आंदोलन, शेतकरी आंदोलने यांची गरज उरलेली नाही. अशी आंदोलने करणे अपेक्षित नाही अन योग्यही नाही. आता पक्षाच्या आंदोलन क्षमतेचा नव्हे प्रशासकीय क्षमतेचा कस लागणार आहे. यात दोन घटक असतात. एक राजकीय नेतृत्वाची प्रशासकीय क्षमता आणि कौशल्य; अन दुसरा घटक प्रत्यक्ष प्रशासन व्यवस्था, प्रशासन रचना, प्रशासन पद्धती आणि प्रशासनात काम करणारी माणसे. यातील राजकीय नेतृत्वाची क्षमता आणि कौशल्य विकसित करणे हे पक्षाच्या हाती असू शकते. पक्षाने ते आताहून अधिक जाणीवपूर्वक आणि अधिक प्रमाणात करायला हवे. प्रशासन व्यवस्था, प्रशासन रचना, प्रशासन पद्धती प्रभावी, कालानुरूप आणि समाजोन्मुखी करणे पक्षाच्या हाती नसले तरीही पक्षाची त्यात भूमिका राहू शकते. प्रशासनाचे सर्वांगीण अध्ययन आणि सहकार्य मिळवणे या महत्वाच्या बाबी. यात पक्ष कमी पडतो असे म्हणावे लागेल. अन प्रशासनात काम करणारी माणसे हा पूर्णत: पक्षाच्या परिघाबाहेरील विषय आहे. प्रशासनासोबतच भाजपसाठी अतिशय महत्वाचा विषय म्हणजे, भविष्याची दृष्टी. भाजपचे वेगळेपण हे केवळ पक्षाचे नाव, पक्षाचा झेंडा किंवा वेगळ्या पद्धतीने राज्यशकट हाकारणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. ते वेगळेपण भारताविषयीची धारणा आणि त्यानुसार देश आणि समाज उभा करण्यात योगदान देण्याची दृष्टी यात आहे. या संदर्भात पक्ष खूपच मागे आहे असे वाटते. भारत, भारताची संस्कृती, भारताची वैशिष्ट्ये, भारताचा मूळ भावात्मक विचार, एकात्म मानववाद, अशा अनेक पैलूंबाबत विचार होताना दिसत नाही. मंथन होताना दिसत नाही. याबद्दल फार आस्था असल्याचे जाणवत नाही. भारतीय जीवन दृष्टीच्या तात्त्विक, वैचारिक, व्यावहारिक, धोरणात्मक बाबींचा विचार पक्षाच्या स्तरावर होणे; त्याविषयी नेते, कार्यकर्ते यांचं वारंवार प्रबोधन आणि मंथन होणे, पक्षाच्या माध्यमातून समाजात या विषयांची व्यापक चर्चा होणे; या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आहे का याचा आढावा घ्यायला हवा. सत्ता मिळवणे, ती राबवणे एवढेच भाजपकडून अपेक्षित नाही. त्याहून अधिक काही अपेक्षित आहे. आजवर त्याचा गांभीर्याने विचार झाल्याचे दिसत नाही. देवाणघेवाण, जोडतोड, लोकरंजन, लोकानुनय, सत्तासंतुलन या वर्तमानातून पक्षाला पुढे कसे घेऊन जायचे हे भाजपपुढील आव्हान आहे. भाजपला असे वाटते का हा एक वेगळा प्रश्न आहे. समाजातील विचारी, कर्तृत्ववान, अभ्यासू, समर्पित व्यक्तींशी संपर्क; त्यांना केवळ पक्षाचे न बनवता त्यांचे अनुभव, चिंतन आणि ज्ञान यांचा देशासाठी उपयोग कसा करता येईल याचा विचार; पक्षाने त्यांना वा त्यांनी पक्षाला नियंत्रित करण्याऐवजी निर्भेळ, निर्मळ आदानप्रदानाची प्रक्रिया तयार करणे आणि त्यासाठी वातावरण तयार करणे; या गोष्टींकडेही लक्ष देणे भारताचा सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपकडून व्हायला हवे. राजकारण आणि सत्ता ही मिरवण्याची किंवा गाजवण्याची गोष्ट नाही, हे केवळ बोलून उपयोगाचे नाही. ही भावना तिच्या सर्व अंगांनी आणि सर्व अर्थांनी पक्षात झिरपणे, रुजणे; पक्षाच्या ध्येयातच नव्हे धोरणात आणि व्यवहारात प्रतिबिंबित होणे यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२१ जानेवारी २०१९

(साप्ताहिक विवेकच्या विशेष ग्रंथात प्रकाशित लेख.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा