मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

साधे तरीही कठीण

खूप साधी गोष्ट, तरीही अतिशय कठीण. संघाबद्दल अनेकांचे अनेक समज आहेत. हजारो स्वयंसेवक काहीही गडबड न करता, शिस्तीने, राहतात, कार्यक्रम करतात; मुख्य म्हणजे एकत्र येतात; याचा अर्थ तिथे खूप कडक काही तरी असलं पाहिजे असा अनेकांचा समज असतो/ आहे. कालच औरंगाबाद (६० हजार गणवेषधारी स्वयंसेवक) आणि यवतमाळ (१० हजार गणवेषधारी स्वयंसेवक) येथे असे भव्य कार्यक्रम झाले. लोकमत सारख्या संघ विरोधी समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांसकट अनेकांनी त्याचे छाया वृत्तांकन केले. प्रश्न असा की, हे लोक आले नसते किंवा आल्यावर निघून गेले असते किंवा काही गोंधळ केला असता; तर संघाने त्यांचे काय केले असते? संघ त्यांना काय करू शकला असता? काहीही नाही. संघ काहीही करीत नाही, करू शकत नाही. संघ काही देत नाही अन काही काढून घेत नाही. संघाकडे कुठला अधिकार नाही अन काही नाही. तरीही हजारो स्वयंसेवक येतात, राहतात, कार्यक्रम करतात, भाषणे ऐकतात, गणवेषाचा/ येण्याजाण्याचा स्वत:चा खर्च करतात. का होते असे? असे कसे घडते? संघ विरोधकांना हे प्रश्नच पडत नाहीत. कोणी त्याकडे लक्ष वेधले तरीही त्याकडे लक्ष द्यावे असे त्यांना वाटत नाही. आपण असे वागत नाही आणि वागू शकत नाही याचा अर्थ काहीतरी गडबड आहे असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. किती साधी गोष्ट ना? तरीही समजायला अन पचायला अवघड.

- श्रीपाद कोठे

१२ जानेवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा