सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

साधा माणूस

पत्रकारितेने आयुष्यात काही भाग्ययोग जुळवून आणले. त्यातील एक योग जुळून आला होता, १९९९ साली. सुमारे १६ वर्षांपूर्वी. डॉ. विजय भटकर यांची भेट, त्यांच्यासोबतचा प्रवास आणि त्यांच्याशी झालेली बातचीत. यावर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना पद्मभूषण सन्मान जाहीर करण्यात आला. त्यावेळी त्या साऱ्या स्मृती ताज्या झाल्या. त्यांच्याशी झालेली बातचीत २४ जानेवारी १९९९ रोजी `परमची जन्मकथा...' या शीर्षकाने प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे, १३ एप्रिल २००१ रोजी त्यांचं मला जे दर्शन घडलं होतं त्यावर `साधा माणूस' या शीर्षकाने लिहिलं होतं. निमित्त होतं, त्यांना जाहीर झालेला `महाराष्ट्र भूषण' पुरस्कार. संगणक आणि आंतरजाल वापरायला सुरुवात करण्याच्या कितीतरी आधीचे हे दोन लेख. मित्र मैत्रिणी आणि अन्य जिज्ञासू वाचकांसाठी.

साधा माणूस

सुमारे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे चंद्रपूरला अभियांत्रिकी व पॉलीटेक्निक विद्यार्थ्यांच्या मॉडेल्सचे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कसा उपयोग करता येऊ शकेल, त्या ज्ञानाचे छोट्या छोट्या उद्योगांसाठी उपायोजन कसे करता येईल याचा विचार व्हावा, त्यावर चर्चा व्हावी हा या प्रदर्शनामागील उद्देश. प्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला येणार होते. एवढा मोठा शास्त्रज्ञ येणार, त्यांच्याशी गप्पा माराव्या, त्यांनी तयार केलेल्या परम महासंगणकाची कथा जाणून घ्यावी यासाठी त्यांना भेटायचे ठरवले. आधी वेळ घेतलेली नसल्याने ते भेटतील वा बोलतील याबद्दल मनात थोडीशी शंका होती. समारोप कार्यक्रमाला पोहोचायचे. त्यांच्याशी ओळख करून घ्यायची, मधल्या वेळात त्यांच्याशी बोलायचे व नागपूरला परतायचे असा कार्यक्रम ठरला होता. परंतु चंद्रपूरला जाताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने समारोपापूर्वी पोहोचता आले नाही. पोहोचलो तेव्हा समारोप कार्यक्रम आटोपला होता आणि डॉ. भटकर व अन्य मंडळी भोजनासाठी निघत होती. भोजन आटोपून ते लगेच मोटारीने नागपूरला जाणार होते. आता कसे करायचे हा प्रश्न होता. पण मनात म्हटले धीर सोडायचा नाही. परिषदेच्या कार्यकर्त्या मित्रांसह भोजनासाठी गेलो. तिथे सगळ्यांसह माझाही डॉ. भटकर यांना परिचय करून देण्यात आला. स्वप्नील त्यांना म्हणाला, `सर, यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. पेपरसाठी.' क्षणभरच त्यांनी विचार केला व लगेच म्हणाले, `भोजनानंतर मोटारीने नागपूरला जातोय. तुम्हीही चला. वाटेतच बोलू.' माझ्या आनंदाला व आश्चर्याला पारावार उरला नाही. आपल्याला डॉ. भटकर यांचा तीन-साडेतीन तास सहवास मिळणार व त्यांच्याशी बोलायला मिळणार याचा आनंद आणि इतक्या सहजपणे त्यांनी हो म्हटलं याचं आश्चर्य !

डॉ. भटकर मूळ विदर्भातल्याच मुर्तीजापूरचे. आपल्या त्या गावातून सुमारे पाचसहा तासांचा प्रवास करून ते चंद्रपूरला  आले होते. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम. त्यातच पंतप्रधानांपासून तर अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या नित्याच्या संपर्कात असलेला जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ ! पण आपलं मोठेपण, आपला थकवा यापैकी काहीही त्यांनी आड येऊ दिलं नाही. बरं, पत्रकारांशी भेटायला, बोलायला उत्सुक असणाऱ्या राजकारण्यांचीही त्यांची जातकुळी नव्हती. तरीही त्यांनी सहजपणे वेळ दिला हे माझ्यासाठी आश्चर्यच होतं. जेवणाचा बेतही अगदी साधा होता व एका हातात प्लेट घेऊन डॉ. भटकर सगळ्यांमध्ये सहज मिसळून गेले होते. गप्पागोष्टी करीत होते. जेवण झाले. निघायची वेळ झाली. ते पाठीमागे आले व पाठीवर थाप मारून म्हणाले, `चला.' अगदी सहज, वऱ्हाडी व्यवहार.

चंद्रपूरहून नागपूरचा प्रवास सुरु झाला. प्रथम थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. आपलं बालपण, शिक्षण, अभ्यास एके अभ्यास, त्याव्यतिरिक्त फारसं काहीही न करणं; हे सारं बोलणं झालं आणि म्हणाले, विचारा काय विचारायचं ते. म्हटलं, तुमच्या कर्तृत्वाची कहाणी ऐकायचीय. आणि सुरु झाली परम महासंगणकाच्या जन्माची कहाणी. सुमारे दीड दोन तास ते सारे काही तपशीलवार सांगत होते. मधून मधून फक्त पूरक असे काही प्रश्न. माझंही समाधान झालं. पाच मिनिटं शांततेत गेली. दोघांनाही समजलं की जे बोलायचं होतं ते तूर्त आटोपलं आहे. पुन्हा एकवार या मोठ्या माणसाच्या साधेपणाचा प्रत्यय आला. म्हणाले, `मी पडतो जरा. खूप प्रवास झालाय. थकलो आता. नागपूर यायला एखादा तास आहे. थोडा आराम करतो.' असे म्हणून गाडीतल्याच दोन उशा त्यांनी डोक्याशी व पाठीशी घेतल्या व चक्क झोपले, ते हॉटेल सेंटर पॉइन्ट येईपर्यंत. मारुतीतील तिघांची सीट. त्यावर कोपऱ्यात खिडकीशी मी बसलेला. पण त्यांना तेवढी जागाही पुरली. `भुकेला कोंडा नि निजेला धोंडा' म्हणतात ना तेच खरं.

चार तासांचा या शास्त्रज्ञाचा सहवास. त्यात सगळ्यात अधिक मनावर जर काही ठसलं असेल तर ते त्यांचं वैदर्भीय साधेपण. परंतु अजूनही काहीतरी उरलं होतं. याची मलाही जाणीव नव्हती व त्यांनाही.

सेंटर पॉइन्टच्या दारात गाडी थांबली. आम्ही खाली उतरलो. आम्ही म्हणजे मी, डॉ. भटकर व स्वप्नील. स्वप्नील रिसेप्शनवर गेला. मी त्यांच्यासोबत. खोली आधी बुक केलेली असूनही नेहमीप्रमाणेच काहीतरी घोळ झालेला होता. स्वप्नील परतला व म्हणाला, `पाच मिनिटं थांबावं लागेल.' डॉक्टर फक्त हसले. मला म्हणाले, `पाच म्हणजे पंधरा मिनिटं लागणार. कितीही मोठं नाव असो हॉटेलचं. असा घोळ नेहमीचाच. तुम्ही कशाला थांबताय. तुम्ही निघा. तुम्हाला उशीर होईल.' परंतु मला प्रशस्त वाटलं नाही. त्यामुळे तिथेच घुटमळलो. मग म्हणाले, `बरं जाऊ द्या. थोडे पाय मोकळे करू या.' आणि आम्ही तेथेच लाउंजमध्ये १५ मिनिटे शतपावली केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर १५ मिनिटे लागली. त्यांना खोलीपर्यंत पोहोचवलं. धन्यवाद देऊन, सॉरी म्हणून व गुड नाईट करून परतलो. विदर्भाच्या मातीने मानवजातीला, विशेषत: भारताला दिलेल्या या थोर सुपुत्राच्या सहवासात आयुष्यातले चारपाच तास आनंदात गेले होते. ३ एप्रिल रोजी त्यांना `महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त या विदर्भपुत्राचे अभिनंदन ! वैदर्भीय साधेपणा जपणाऱ्या डॉ. भटकर यांच्याकडून हिमालयाएवढ्या कर्तृत्वाची अपेक्षा आहे. `आपलं' माणूस म्हणून एवढा स्वार्थ बाळगायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

(लोकसत्ता, शुक्रवार- १३ एप्रिल २००१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा