मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

नाव मोठे लक्षण खोटे

खूप दिवसांनी वाहिनीवरील चर्चा पाहिली. तेही रिमोट फिरवता फिरवता दिसली म्हणून. आयबीएन-लोकमतवर आत्ताही सुरु आहे. (लेख लिहिला तेव्हा.) पण ब्रेक झाला अन टीव्ही बंद करून प्रतिक्रिया लिहायला बसलो. अगदी खोकल्याची उबळ आल्यासारखा. म्हणजे स्वत:ला थांबवणं शक्यच नव्हतं. एकूणच विचारांचं केविलवाणेपण म्हणजे काय याचा हा नमुना म्हणता येईल. किती बालिश, किती उथळ, किती निर्बुद्ध असावं, वैचारिकतेचे टेंभे मिरवणाऱ्या लोकांनी? नाव मोठं लक्षण खोटं, एवढंच म्हणावं लागेल.

विषय- संघ महात्मा फुलेंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे का?

बोलणारे- प्रकाश आंबेडकर, हरी नरके, मकरंद मुळे.

चर्चा संचालन- मंदार फणसे.

प्रकाश आंबेडकरांनी मुद्दा उपस्थित केला- तुम्ही समरसता म्हणता, मग हिंदू समाजात प्रचलित असणाऱ्या विविध लग्न पद्धतींपैकी कोणती पद्धत तुम्ही मान्य करणार? याच्याएवढा तद्दन भिकार प्रश्न असूच शकत नाही. बुद्धी ही गोष्टच खुंटीला टांगून ठेवली आहे हे दाखवण्याचा एवढा सोस का असावा कळत नाही. अहो, प्रकाश आंबेडकर- विनोबांनी `जय जगत' नारा दिला होता म्हणून त्यांना सगळ्या लग्नपद्धती संपवून एकच लग्नपद्धती जगात आणायची होती का? किंवा जगाच्या भल्याची चर्चा करण्यासाठी जगात एकच लग्नपद्धती असली पाहिजे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? आपण काय बोलतो याचं काहीही भान इतक्या मोठ्या व्यक्तीला असू नये?

प्रकाश आंबेडकरांनीच उपस्थित केलेला मुद्दा होता- सगळ्या जातीच्या व्यक्तींना मंदिरात पूजेचा अधिकार नाही, त्याचे काय? एक तर प्रकाश आंबेडकरांचा हा दावाच चुकीचा आहे. पण तरीही मकरंद मुळे हे संघाचे प्रतिनिधी म्हणून बोलत होते आणि त्यांनी उदाहरण दिले की- तमिळनाडूत विश्व हिंदू परिषद खास यासाठीच उपक्रम आयोजित करते आणि त्या माध्यमातून आजवर शेकडो ब्राम्हणेतर लोकांना पूजा पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले असून ते विविध मंदिरांमध्ये पुजारी म्हणून कामही करीत आहेत.

त्यावर मंदार फणसे यांचा युक्तिवाद तर जडवादाचा बादशाह समजल्या जाणाऱ्या चार्वाक वा मार्क्सलाही थक्क करणारा होता. फणसे म्हणाले- अहो मुळे, तुम्ही विरोधाभास बोलता आहात. तुम्ही म्हणता आम्ही फुलेंना मानतो. फुलेंनी तर मूर्तीपूजेला विरोध केला होता अन तुम्ही मूर्तीच्या पूजेचं प्रशिक्षण देता. यावर काय बोलावे? टीव्हीच्या स्टुडीओत बसून चर्चांचे रतीब घालणाऱ्या या फणसे यांना एवढे कळू नये की, देव- धर्म- पूजा- इत्यादी गोष्टी जगातून कोणीही नष्ट करू शकलेला नाही आणि बहुधा नष्ट करूही शकणार नाही. त्यामुळे जे या गोष्टी मानतात त्यांच्यासाठी ते नेहमीच राहणार आहे. त्यात भेद किमान राहावे, सगळ्यांना संधी मिळावी वगैरे गोष्टी पाहणे एवढेच आपल्या हाती असते. तसे नसते तर भारत सेक्युलर असल्याचे आपली घटना सांगत असूनही, त्याच घटनेने उपासना स्वातंत्र्यही दिलेले आहे. इतके कशाला बाबासाहेबांचे हजारो अनुयायी लक्ष्मीपूजन करतात, उपवास करतात, देवांचे फोटो लावतात, तेरवीला ब्राम्हण देखील बोलावतात. खूप मोठा विषय आहे, खूप लिहिता येईल. पण उदाहरण म्हणून एवढे पुरे.

संघाचीही पंचाईत आहे. वैचारिक स्पष्टता असली तरीही बोलता येत नाही. संघाची चूक मुळीच नाही. संघाला विशिष्ट पद्धतीने समाज जोडत जायचे आहे. त्यामुळे वाद होणारे मुद्दे संघ टाळतो. ती त्याची भूमिका आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर समाजाला जोडून, विविध घटकातील संघर्ष टाळण्यात त्याला लक्षणीय यशही आले आहे.

मात्र समाजाच्या व्यापक हितासाठी वैचारिक स्पष्टता आवश्यक आहे. समाज ही साच्यातून काढलेली गोष्ट नसते. ती multidimensionl, multifaceted जीवमान बाब आहे. लोकप्रिय घोषणा, निरर्थक शब्दावली यांनी ती नीट चालण्याऐवजी देशोधडीला लागते. त्याच्या व्यवस्था, त्याचे व्यवहार इत्यादी, ही व्यामिश्रता लक्षात घेऊन असावे लागतात. विद्यमान जगातील हिंदवेतर विचार अन व्यवस्था वारंवार का कोलमडून पडत आहेत? जगातील सगळे लोक का भांबावून गेले आहेत? याचा शांतपणे विचार विचारवंतांना आणि सामान्य माणसाला देखील करावाच लागणार आहे. त्याची गरजही त्याला वारंवार जाणवते पण तो स्पष्टपणे अन धीटपणे तसे करायला तयार नाही.

नेमके काय करायला हवे त्यासाठी फक्त एक मुद्दा- कोणीही महापुरुष सर्वज्ञ, सार्वकालिक अन सार्वलौकिक नाही. कोणीही याचा अर्थ `अगदी कोणीही'. ज्याला जे वाटेल ते नाव टाकावे. जगातील पहिले पाच, पहिले शंभर वगैरेही नाहीत. प्रथम आपापल्या आवडीच्या महापुरुषांना डोळसपणे पाहणे सुरु केले पाहिजे. आपले महापुरुष कितीही थोर असले तरीही त्यांनाही मर्यादा आहे हे वारंवार, सकाळी उठल्यावर रोज स्वत:ला सांगितले पाहिजे.

हा विषय संघ वा संघेतर असा नाही. एवढेच नव्हे तर संघाचा प्रतिनिधी म्हणूनही मी हे लिहिलेले नाही. किंबहुना अनेक गोष्टी संघाच्या भूमिकेशी मेळ न खाणाऱ्या लिहिल्या आहेत. पण सगळ्या चर्चेत संघ प्रामुख्याने आहे म्हणून शेवटी एक उल्लेख- गोळवलकर गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या `गुरुजी समग्र' या १२ खंडांच्या प्रस्तावनेत तेव्हाचे सरसंघचालक सुदर्शनजी लिहितात, `सगळ्याच महापुरुषांचे काही विचार काळनिरपेक्ष असतात, तर काही तात्कालिक. काही विचार त्यांनी हाती घेतलेल्या कार्याची गरज लक्षात घेऊन घेतलेल्या भूमिका, तर काही त्या त्या संदर्भात व्यक्त केले मत. त्याचा साधक बाधक विचार करणे आवश्यक असते. श्री. गुरुजी देखील त्याला अपवाद नाहीत.' एका सरसंघचालकाने दुसऱ्या सरसंघचालकांबद्दल इतके स्पष्टपणे लिहिणे याला विचार म्हणतात. सगळ्यांनी हे शिकणे अन तितके धाडसी असणे आवश्यक आहे. (हे वाचून कोणी लगेच प्रश्न करू नये की, गुरुजींचे कोणते विचार तात्कालिक होते व कोणते काळनिरपेक्ष? असा प्रश्न विचारणारा गाढव आहे हेच माझे त्यावरील उत्तर राहील. बोध घडवते ती बुद्धी. असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला बुद्धी नाही, कारण त्याला लेखाचा बोध झालेला नाही असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.)

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १२ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा