रविवार, २ जानेवारी, २०२२

विनोद, वगैरे...

एखाद्याच्या नाकाला काही लागलं असेल तर- `तुझ्या नाकाला काळं लागलं' असं वेंगाडण्याची सर्वसाधारण सवय असते. अन असं कोणी म्हटलं की, त्याच्याकडे पाहून, बोटं दाखवून हसण्याची खोड आपल्यात मुरली असते. पुढचा टप्पा असतो टवाळकीचा. यातून प्रहसनं, नाटकं, विनोद, विनोदी साहित्य तयार होऊ शकेल. कदाचित थोडा वेळ गंमतजंमत होऊ शकेल.

पण-

ज्याच्या नाकाला काळं लागलं त्याचं ते काळं पुसून देणं, किमान त्याला रुमाल देणं, त्याला हळूच ते सांगून - धुवून ये म्हणून सांगणं, त्यासाठी मदत करणं; हे मात्र कमी लोकांना जमतं. खरं तर कमी असलेली ही संख्या वाढणं हे महत्वाचं. पण त्यासाठी जीवनातलं गांभीर्यही समजायला, पचायला हवं. जीवनातलं गांभीर्य घालवून टाकणारं विनोदीपण निंदनीय अन त्याज्यच आहे. समर्थांनी त्यासाठीच म्हटलंय- `टवाळा आवडे विनोद.'

विनोद महत्वाचा आहे. त्याचं जीवनात एक स्थानही आहे. पण विनोदाने जगात काहीही घडवलेलं नाही. बिघडवलेलंही नाही. अन त्याने कधीही कोणाला आधारही दिलेला नाही. जीवनातलं हास्य नाकारणारं गांभीर्य सुतकी असतंच, पण जीवनातलं गांभीर्य नाकारणारं हास्यही पोरकट असतं. गांभिर्याच्या विशाल सागरात बुडी मारून येणारे विनोदवीर विरळाच. म्हणूनच पु.ल. किंवा चार्ली चाप्लीन किंवा मार्क ट्वेन कधीतरीच जन्माला येतो.

पण-

आपण पु.ल. किंवा चार्ली चाप्लीन किंवा मार्क ट्वेन यांचेच अवतार आहोत असं समजणारे `विनोद पंढरीचे वारकरी' विनोदाचा चोथा तर करतातच, समाजाला अन माणसांनाही दुषित करतात. ते मोठ्या पडद्यावरचे असोत, छोट्या पडद्यावरचे असोत, संगणकाच्या पडद्यावरचे असोत, की मोबाईलच्या पडद्यावरचे असोत. `वृत्तवाहिनी' या प्रकारातील गांभीर्याचा बुरखा पांघरलेले- ना विनोदी, ना गंभीर- असे निरर्थक असोत. यातूनच `राजकीय विनोद' नावाचा प्रकार अमेरिकेत विकसित झाला. अन त्याची लागण आता आपल्यालाही झालेली आहे. मात्र, जीवनाला विनोदी करणे योग्यही नाही अन उपयोगाचेही नाही, हे नक्की.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ३ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा