रविवार, ९ जानेवारी, २०२२

संवेदनशीलता

कालची भंडाऱ्याच्या इस्पितळातील घटना हा व्यवस्थेचा प्रश्न नसून, सार्वत्रिक संवेदनहीनतेची बाब आहे. व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून आपला स्तर प्रचंड घसरला आहे हे मान्य करणे कठीण असले तरीही ते मान्य केलेच पाहिजे. संवेदनशीलता म्हणजे केवळ करुणा नाही हेही लक्षात घ्यायला हवे. एखादी घटना घडल्यावर करुणेचा पूर येतो. अन वाहूनही जातो. संवेदनशीलता हा व्यक्तित्वाचा गुण नाही, ते व्यक्तित्वाचे लक्षण आहे. संवेदनशील असणाऱ्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तित्व निराळं असतं. त्याचं वागणं, बोलणं, विचार करणं, अभिव्यक्त होणं, प्रतिक्रिया देणं, त्याचे लिहिण्या बोलण्याचे विषय, जबाबदारीची भावना, गंमत- विरोध- दुर्लक्ष- कौतुक- अशा पुष्कळ गोष्टींचे प्रमाण आणि मर्यादा, शब्द, भावना; अशा असंख्य गोष्टी त्यात येतात. संवेदनशीलतेचा हा निकष लावून पाहिलं तर जिथे जिथे माणूस आहे, तिथे तिथे काय चित्र आहे? ते सरकारी कार्यालय असो, खाजगी कार्यालय असो, कारखाने असोत, शिक्षण संस्था असोत, इस्पितळे असोत, हॉटेल्स असोत, मंदिरे असोत, कुटुंब असोत, समाज माध्यमे असोत; सर्वत्र निराशाजनक चित्र आहे. चार दोन चांगली उदाहरणे म्हणजे समाज नाही. त्यामुळे समाजाची संवेदनशीलता वाढवण्याला पर्याय नाही. मी संवेदनशील आहे का आणि त्यानुसार जगण्याचा माझा आग्रह आहे का? हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारून त्याचं स्वतःला होकारार्थी उत्तर देणाऱ्या माणसांची संख्या जेव्हा किमान ६०-७० टक्के असेल तेव्हा काही आशा बाळगता येईल. ही संवेदनशीलता कशी आकार घेते याचाही विचार गांभीर्याने केला पाहिजे. पैसा, पे स्केल, प्रमोशन, जात, राज्य, राजकारण, पक्ष, नेते, करियर, तारांकित जगणे अन सेलिब्रिटी होण्याची वा ते स्थान टिकवायची लालसा, तू तू मी मी; यासारख्याच गोष्टी आमच्या जीवनात आणि विचारविश्वात असतील तर काहीही आशा नाही. घटना होत राहतात, होत राहतील; अन प्रत्येक घटनेनंतर रुदाली पाहावे लागतील.

- श्रीपाद कोठे

१० जानेवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा