रविवार, ९ जानेवारी, २०२२

विचारदारिद्रय

१) अर्णवने परवा दोन विषयांची चर्चा केली. १) समलैंगिक संबंधांच्या आदेशाचा फेरविचार आणि २) चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याचा मुद्दा. तपशील सर्वत्र असल्याने त्यावर लिहिण्याची गरज नाही. मात्र अर्णवने या दोन्ही बाबतीत जी भूमिका घेतली ती मजेशीर होती. समलैंगिक मुद्यावर त्याचे मत होते- हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि राष्ट्रगीत चित्रपटगृहात वाजवण्याच्या संबंधात तर त्याने कहरच केला. कारण सध्याचा मुद्दा राष्ट्रगीत वाजताना उभे राहावे की नाही हा नाहीच. मुद्दा आहे, चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवावे का? त्याने विषयाला कलाटणी देऊन भाजपा आणि केंद्र सरकारवर तोंडसुख तर घेतलेच शिवाय `कोणी मला अतिराष्ट्रवादी म्हटले तरी चालेल, पण राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिलेच पाहिजे' अशी भूमिका घेतली. दोन्ही विषयांची तुलना होऊच शकत नाही हे मान्य करतानाही; एका विषयासाठी `ज्याचा त्याचा प्रश्न' आणि दुसऱ्या विषयासाठी `माझेच मत' ही आग्रही भूमिका; यातून आज समाजात सर्वत्र व्यापून असलेली वैचारिक दुविधा (dichotomy) स्पष्ट दिसून येते.

२) सर्वोच्च न्यायालयाने आज देशभरातील ११०० केंद्रीय विद्यालयातील `तमसो मा ज्योतिर्गमय' या प्रार्थनेसंबंधी जी भूमिका घेतली ती तर वैचारिक दारिद्र्याची निदर्शक आहे. हा गंभीर मुद्दा असून त्याची घटनात्मकता तपासून पाहायला आम्ही रुकार देतो आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही भूमिका हास्यास्पद तर आहेच, पण सर्वोच्च न्यायालयाने ती घेतली असल्याने संतापजनकदेखील आहे.

३) आजच्या वृत्तपत्रात कालची एक बातमी आहे. जेट एअरवेजच्या एका हवाई सुंदरीच्या सामानात कोट्यवधी रुपयांचे विदेशी चलन लपवलेले सापडले. ते जप्त करून तिला अटकही करण्यात आली. तिच्यासोबत एका पुरुषालाही अटक करण्यात आली. या बातमीत त्या पुरुषाचे नाव आहे. त्या हवाई सुंदरीचे नाव मात्र नाही. का? साधारणत: गुन्हेगारी स्वरूपाच्या (criminal) कोणत्याही प्रकरणात महिलेचे नाव जाहीर करता येत नाही. बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यात ते योग्य ठरते. किंबहुना ज्यावेळी असा नियम तयार करण्यात आला तेव्हाही महिलांची आर्थिक, सामाजिक स्थिती लक्षात घेता सगळ्याच गुन्ह्यांसाठी ते योग्य होते. परंतु आता स्थिती बदललेली असतानाही, विदेशी चलनाचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलेचे नाव गोपनीय ठेवण्याचे कारण काय? या नियमात बदल का नको? उलट अशा गुन्हेगार महिलांचे नाव जाहीर करणे सुरु झाले तर; बदनामीच्या भीतीपोटी काही अंशाने का होईना, प्रमाण कमी होऊ शकेल.

वरील तिन्ही विषय वेगवेगळे आहेत आणि त्यांची सरमिसळ करणे चुकीचे वाटू शकते. परंतु थोडा खोलवर आणि बारकाईने विचार केल्यास लक्षात येईल की; या सगळ्याच विषयांच्या आणि गोंधळाच्या मुळाशी विचारदारिद्र्य हेच कारण आहे. जीवनासंबंधीचा अर्थशून्य, भोंगळ दृष्टीकोन हा या विचारशून्यतेच्या मुळात आहे. जीवनदृष्टीचा अभाव आणि सदोष जीवनदृष्टी हे दोन्ही दोष त्यात आहेत. यांची कितीही चर्चा करून काहीही उपयोग नाही. सार्थक जीवनदृष्टीची समाजव्यापी चर्चा हा यावरील उपायाचा पहिला टप्पा ठरू शकतो. सुजाण लोकांनी आपले लक्ष वरवरच्या निरर्थक गोष्टी बाजूस सारून त्या मूळ विषयाकडे वळवायला हवे.

- श्रीपाद कोठे

१० जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा