शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

प्रश्न मानसिकतेचा

सुट्ट्या, वर्षभराचे कार्यक्रम इत्यादींची यादी सरकार दरवर्षी जाहीर करीत असतं. यावर्षीच्या यादीत स्वामी विवेकानंद यांचं नाव नाही. त्यामुळे अनेक महाविद्यालयात विवेकानंद जयंती साजरी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. याबाबतची बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळाली. त्यावर प्रतिक्रियाही होत्या. या विषयावर मला काहीही मत व्यक्त करायचे नाही. परंतु यानिमित्ताने मनात एक विचार आला- प्रत्येक गोष्टीच्या recognition किंवा certification ची आम्हाला किती सवय लागली आहे? ती योग्य अथवा गरजेची आहे? विवेकानंद यांना सरकार मान्यता देते किंवा नाही याने काय फरक पडतो? मुळात अशी मान्यता वगैरे हवीच कशाला? मान्यता असणे वा प्रमाणपत्र म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का? खरं तर अनेकदा अशी मान्यता अथवा प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीला, संस्थेला, विचाराला कमीपणाच आणतात. मान्यता आणि प्रमाणपत्र हे विचारच; देणाऱ्या अन घेणाऱ्या दोघांच्याही अपरिपक्वपणाचे द्योतक म्हणावे लागतील. त्यातही या गोष्टी सहजपणे घडल्या तर ठीक आहे. मात्र मान्यता वा प्रमाणपत्र देणे वा घेणे म्हणजे फार मोठी गोष्ट आणि तसे नसणे म्हणजे कमअस्सल असं समजणे हा प्रचंड उथळपणा आहे. आज मानसिकता मात्र तशीच आहे. ही मानसिकता इतकी खोलवर रुजली आहे की विचारू नका. अनेक कवी, कवयित्री असतात. खूप उत्तम लिहितात. दर्जेदार लिहितात. पण अनेकदा ते माहिती असले तरीही त्यांच्याबद्दल आपल्याला काही आदर वा प्रेम नसतं. आदर आणि प्रेम कुणाबद्दल असतं? ज्याच्या भरताड कविता अनेकदा छापून वगैरे येतात. दुसऱ्या शब्दात कोणातरी संपादकाने अथवा नियतकालिकाने त्याला मान्यता वा प्रमाणपत्र दिलेलं असतं. स्वत: लिहिणारेही याच न्युनगंडाने अनेकदा पछाडलेले असतात. आपलं लिखाण छापून आलं नाही म्हणजे ते काही फार चांगलं नाही असं त्यांनाही वाटत असतं. लिखाण हे एक उदाहरण. पण अनेक संदर्भात हा प्रकार पाहायला मिळतो.


सरकारी मान्यतेचा एक व्यावहारिक भाग आहे. कधी कधी त्या कार्यक्रमांसाठी पैसा वगैरे मिळतो. पैसा सरकारकडून नाही मिळाला तरीही प्रायोजक मिळू शकतो. कारण सरकारी यादीत कार्यक्रम असल्याने त्याचा अहवाल पाठवावा लागतो. त्या अहवालाच्या निमित्ताने आपलं नाव सरकार दरबारी रुजू होईल ही त्या प्रायोजकाची `जी हुजुरी' मानसिकता असते. त्या त्या महापुरुषाच्या भक्तांना, समर्थकांनाही कार्यक्रमांची संख्या वाढली की बरं वाटतं. त्या महापुरुषाचे अनुयायी वाढले किंवा त्याचे विचार अधिक रुजले अशी खोटी का होईना कल्पना करता येते. सगळाच मामला अघळपघळ, जवळपास अर्थहीन. त्यापेक्षा त्या त्या महापुरुषांच्या जीवन आणि विचारांवरील प्रामाणिक श्रद्धेतून कार्यक्रम करणे आणि त्या प्रामाणिक भावनेच्या आधारेच त्यांचा प्रचार प्रसार करणे, रुजवणूक करणे; हा मार्ग योग्य परंतु कठीण आहे. तुमच्या-माझ्या, एकूणच समाजाच्या मान्यताकेंद्री आणि प्रमाणपत्रकेंद्री मानसिकतेचा हा भाग आहे. ही मानसिकता टाकून देण्याची गरज मात्र आहे. व्यक्तिगत अथवा सामाजिक जीवनातील ९९ टक्के बाबी मान्यता आणि प्रमाणपत्र यातून बाहेर यायला हव्या आहेत.

- श्रीपाद कोठे

८ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा