शनिवार, २९ जानेवारी, २०२२

युगपुरुषाला अभिवादन

अध्यात्म हा जीवनाचा प्राणस्वर झाल्याशिवाय ऐहिक जीवन सुद्धा सुखशांतीचे, समाधानाचे होऊ शकणार नाही; हे समजावण्यासाठी आयुष्यभर धडपडणाऱ्या महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन.

आजच्याच दिवशी एका वेड्या माणसाने भावनातिरेकाने गांधीजींना गोळ्या घातल्या. तो माणूस महाराष्ट्रीय ब्राम्हण होता, हिंदू महासभेशी संबंधित होता, हिंदुत्ववादी होता. त्यामुळे त्याच्या या कृत्याचे परिणाम ब्राम्हण, स्वा. सावरकर, रा. स्व. संघ, गोळवलकर गुरुजी आणि लाखो संघ स्वयंसेवक आणि हिंदुत्वनिष्ठांना भोगावे लागले. खूप सारी पडझड झाली. खूप काही तोडले, मोडले गेले. यासाठी गांधीजींच्या दुर्दैवी हत्येचा वापर करून घेण्याचे कुटील राजकारण जबाबदार होते. गांधीजींनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरच्या घटनांशी त्यांचा संबंध राहीलच कसा? एवढेच नाही तर त्यांचे पुत्र देवीदास गांधी यांनी जाहीरपणे हरिजन वृत्तपत्रात लेख लिहून, वडिलांच्या हत्येसाठी कोणावरही सूड उगवला जाऊ नये, ही अपेक्षा व्यक्त केली होती.

परंतु राजकारणाचे बेभानपण आणि त्याचा आघात सोसणाऱ्या समूहाचे पोळलेपण; या दोन्ही बाबींचा झंझावात इतका तीव्र होता; की त्यात गांधीजी कुठेतरी उडून गेले. कुटील राजकारणाचा बळी ठरलेल्या समूहाने स्वाभाविकपणे परंतु अयोग्य रीतीने गांधीजींना त्यासाठी जबाबदार ठरवून खलनायक केले. परिणामी ज्या हिंदुत्वासाठी हा समूह उभा होता, त्या हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कर्ता; आणि त्या हिंदुत्वाला कडवे आव्हान देणाऱ्या साम्यवादाचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक चोख प्रतिकार करणारा गांधी; त्याच समूहाला सलू लागला.

याच धुमश्चक्रीत पूर्णपणे दुसऱ्या ध्रुवावर उभ्या असणाऱ्या गांधींचे साम्यवादी, समाजवादी आणि स्वार्थवादी समूहांनी अपहरण केले. अन कुटील राजकारणाने पोळलेल्या समूहाने फारसा विचार न करता गांधी त्यांच्या ओटीत टाकला. वास्तविक ज्या साम्राज्यवादी सत्तांनी आणि त्यावेळी जगाचा तारणहार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या साम्यवादी शक्तींनीच भारताला भारत म्हणून उभे करण्याची ताकत असलेल्या दुबळ्या गांधींचा ग्रास केला नसेल कशावरून? मात्र या शक्यतेचा उच्चार सुद्धा केला गेला नाही आणि भारताचे दोन तुकडे झाल्याच्या स्वाभाविक दु:खातिरेकाने भारताचे भवितव्य गढूळ केले.

मातृभूमीचे तुकडे होणे क्लेशदायी होतेच. जगातले आजवरचे सगळ्यात मोठे मानवी स्थलांतर हे तर त्याहून भयानक होते. कोणीही हतबुद्ध व्हावे अशाच त्या सगळ्या घटना होत्या. परंतु मानव्याचा आधार आणि प्राण हतबुद्धता नसून सारासार विचार आणि विवेक हा असतो. दुर्दैवाने हा विचार आणि विवेक कमी झाला होता. मातृभूमीचे विभाजन वेदनादायी होते हे मान्य करूनही, देशभक्ती म्हणजे जमिनीचे भांडण नसते, हे नमूद करणे आवश्यक आहे. देशभक्ती ही त्याहून अधिक काहीतरी असते. शिवाय या विभाजनाचे शांतपणे विश्लेषण करणे त्यावेळी अपेक्षित नव्हते तरी आज ते करणे प्रस्तुत ठरते.

हे विश्लेषण करताना एक प्रश्न कठोरपणे स्वतःलाच विचारायला हवा, की असे पहिल्यांदाच घडले का? ज्यावेळी भारताने अफगाणिस्तान ते पेशावरपर्यंतचा भूभाग गमावला, त्यावेळी गांधी होते तरी का? किंवा अगदी कालपर्यंत भारत म्हणून ओळखला जाणारा श्रीलंका गमावण्यात गांधी कुठे होते? महायुद्धापेक्षा अधिक देशबांधव गमावल्याचे दु:ख अपार असणारच, पण कुरुक्षेत्रावर १८ दिवसात १४-१५ अक्षौहिणी देशबांधव, धर्मबांधव गमावले तेव्हा तर गांधी हे नावही कदाचित अस्तित्वात नसेल.

हे गांधींचा पक्ष मांडणाऱ्या वकिलाचे युक्तिवाद नाहीत. त्यांनाही त्याची गरज नाही. असलाच तर हा; मानवाचा, मानवतेचा, हिंदुत्वाचा, भारताचा, जीवनाच्या प्रवाहाचा आणि जीवनाच्या समग्रतेचा आस्थापूर्वक वेध घेण्याचा प्रयत्न आहे. कधीतरी जुन्याचा सार आणि असार असा लेखाजोखा मांडून, जीवनाचा प्रवाह निरामय करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची गरज उत्पन्न होत असते. आज ती मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेली आहे. इहवाद, भोगवाद, जडवाद, साम्यवाद, सत्तावाद, साम्राज्यवाद इत्यादी वादांनी भारतासह समस्त जगाला वेठीला धरले असताना; दु:ख परिघाच्या बाहेर पडून; जगावर कल्याणमंत्राचे अभिसिंचन करण्याची अपेक्षा ज्यांच्याकडून करता येऊ शकते आणि त्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे; त्यांनी ती भूमिका पार पाडताना त्या प्रयत्नांचे बळ वाढवू शकणाऱ्या गांधीजींना अभिवादन करणे सयुक्तिक ठरेल.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ३० जानेवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा