बुधवार, २६ जानेवारी, २०२२

अशोकचक्र

काल तिरंगा राष्ट्रध्वज पाहताना एक विचार मनात चमकून गेला- अरे, या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी असलेलं अशोकचक्र आपण विसरलो की काय? कोण होता सम्राट अशोक? कलिंगच्या लढाईत लाखो लोकांना यमसदनी पाठवून आपल्या पूर्वजांना न जमलेला कलिंग देश (आजचा ओरिसा) जिंकण्याचा आणि विशाल भारतीय साम्राज्य निर्माण करण्याचा पराक्रम केलेला महान चक्रवर्ती सम्राट. पण या भीषण नरसंहारानंतर व्यथित होऊन त्याने आपला मार्गच बदलून टाकला. अन बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्याने शांतीचा संदेश प्रसारित केला. मनात आले, याची ही दोन रूपे. लाखो लोकांच्या संहारासाठी त्याच्यावर रोष धरता आला असता. पण शेकडो वर्षे भारताने आणि १९५० रोजी स्वीकारलेल्या घटनेच्या निर्मात्यांनी तसे केले नाही. उलट त्याने दिलेला शांतीचा संदेश उचलून धरला. त्यासाठी त्याची आठवण ठेवली. अन चक्क राष्ट्रध्वजात त्याच्या चक्राला स्थानही दिले. मुळातच चक्र ही खूप मार्मिक बाब आहे भारतीय मानसात. हे विश्वच चक्रीय आहे असं इथलं तत्वज्ञान सांगतं. आपल्या प्रत्ययाला येणाऱ्या सगळ्या बाबी या विकासाच्या अवस्था असतात. सम्राट अशोकाच्या बाबतीत तेच तत्व पाळण्यात आलं आहे. `ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ' विचारू नये ही लोकोक्तीसुद्धा काहीशी याच अंगाने जाणारी.

आज मात्र... जाऊ द्या ते उल्लेख. किमान दहा बाबी या क्षणी डोक्यात आहेत, ज्यात जुन्या गोष्टींचा निष्कारण काथ्याकूट काढला जात असतो. त्यातील एखादाही उल्लेख वादंग माजवायला पुरेसा आहे. पुढे जाणे, पुढे पाहणे, पुढे चालणे आम्ही विसरूनच गेलो आहोत की काय? `झाले गेले गंगेला मिळाले' असा विचार करून, `तू नाही तुझ्या बापाने पाणी गढूळ केलं असेल' अशी पंचतंत्रातील कोल्हेकुई न करता; तारतम्य ठेवून, आवश्यक तेवढेच मागे रेंगाळून पुढे चालणे; हा मला अशोकचक्राचा संदेश वाटला. नकोशा, अडचणीच्या गोष्टी असतातच- व्यक्तीजीवनात, सामाजिक जीवनात, राष्ट्रीय जीवनात; सर्वत्र. त्यांचा चोथा किती चिवडायचा असतो? आम्ही अशोकचक्रही आवर्जून लक्षात ठेवायला हवं.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २७ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा