बुधवार, १९ जानेवारी, २०२२

डॉ. अरुण टिकेकर

डॉ. अरुण टिकेकर गेल्याची बातमी वाचली. मी काही थोडीबहुत पत्रकारिता केली असेल त्याचं श्रेय ज्या मोजक्या लोकांना द्यावं लागेल त्यात डॉक्टर आहेत आणि या मोजक्या लोकांमध्येही त्यांचं पारडं जड आहे. १९९२ साली लोकसत्तेने नागपुरात पाऊल ठेवले. मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांनी नागपूर विदर्भात येण्याची सुरुवात तेव्हापासून झाली. लोकसत्ताचा प्रयत्न पहिलाच. त्यावेळी माझी मुलाखत डॉक्टर टिकेकर यांनीच घेतली होती. त्या मुलाखतीतील एक प्रश्न अन त्याचे उत्तर आजही आठवते. डॉक्टरांनी विचारले- काय वाचता? अन आजवर वाचलेल्यातील काय आवडले? क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर दिले- मला हिटलर आवडला अन दि. वि. गोखले यांनी लिहिलेलं त्याचं चरित्र आणि वि. ग. कानेटकर यांनी लिहिलेली `नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही पुस्तके आवडली. हिटलर आवडतो असे जरा वेगळे उत्तर दिले (अर्थात मनापासून) तरीही त्यांनी मला लोकसत्तेत घेतले.

त्यानंतर लोकसत्तेचे मुख्य संपादक आणि एक जेमतेम तीन-चार वर्षे वृत्तपत्रात घालवलेला मुलगा यांचा जसा संबंध असावा तसाच आमचा संबंध होता. नियमित कामाव्यतिरिक्त लिखाण मी त्यावेळीही करीत असे. ते छापूनही येत असे. कधी फक्त विदर्भ आवृत्तीत तर कधी सगळ्या आवृत्त्यांना. कधी कधी चक्क लोकसत्तेच्या संपादकीय पानावरदेखील. २०-२२ वर्षांपूर्वी तिशी ओलांडायच्याही आधी आपला लेख (अन आपले नावही) लोकसत्ताच्या संपादकीय पानावर छापून येण्याचे कौतुक अन आनंद तर होताच. त्या आनंदाचे श्रेयही त्यांचेच. प्रसंगपरत्वे त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे, आपले काम आणि लिखाण याकडे लक्ष आहे याची जाणीवही होत होती. त्यानंतरचा इतिहास फार मोठा आहे. अन त्याचे हे स्थानही नव्हे.

मधली खूप वर्षे त्यांच्याशी संबंध आलेला नव्हता. गेल्या वर्षी विदर्भ साहित्य संघाच्या एका व्याख्यानासाठी नागपुरात आले असताना डॉक्टरांची भेट झाली. आवर्जून व्याख्यानाला गेलो होतो. डॉक्टर विद्वान होते, विचारवंत होते अन उत्तम वक्ताही होते. व्याख्यान छानच झाले. नंतर भेटलो. भेट झाली. माझ्यातील रूपबदलामुळे ओळखले नाही. मात्र नाव सांगताच एकदम मोकळेपणाने बोलले. आस्थेने चौकशी केली. त्यांच्याबद्दल विचारपूस केली तेव्हा म्हणाले- घरी नव्वदी पार केलेली आई आहे. तिच्यासाठी घरीच असतो. बाहेर जाणे बहुतेक शून्यच. अन्यही गप्पागोष्टी झाल्या. त्यांच्या वयोवृद्ध आई आहेत वा कालपरत्वे त्यांनीही निरोप घेतला माहीत नाही. आज डॉक्टरांचीच बातमी वाचली. त्यांच्यासारखा विचक्षण विचारयोगी म्हणता यावा असे संपादक आज नाहीत. अशांना आज कुठे जागाही नाही अन थाराही नाही. आजच्या विचारशून्यतेच्या वातावरणात त्यांचे जाणे जाणवणारे नक्कीच आहे.

डॉक्टर अरुण टिकेकर यांना माझी श्रद्धांजली.

- श्रीपाद कोठे

२० जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा