मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

बदल नको, चांगले व्हा...

आज स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. त्यांनी सांगितलेल्या एका छोट्याशा गोष्टीचे त्यानिमित्त स्मरण. त्यांची ओजस्वी, उर्जस्वल व्याख्याने ऐकून एकाने त्यांना विचारले- स्वामीजी आपल्याला असे वाटते का, की आमचे जीवन धन्य होण्यासाठी आम्ही हिंदू व्हायला हवे? स्वामीजी म्हणाले- नाही. त्याची काहीच गरज नाही. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, तुम्ही जे असाल ते चांगले व्हा. तुम्ही ख्रिश्चन आहात, मुस्लीम आहात किंवा अन्य कोणीही आहात. त्याला काहीच हरकत नाही. हे वेगळेपण राहणारच. पण तुम्ही ख्रिश्चन असाल तर चांगले ख्रिश्चन व्हा, तुम्ही मुस्लीम असाल तर चांगले मुस्लीम व्हा, तुम्ही हिंदू असाल तर चांगले हिंदू व्हा.

स्वामीजींच्या या चिंतनाचा आज व्यापक संदर्भात विचार करण्याची गरज आहे. स्त्री, पुरुष, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, अमुक जातीचा, तमुक जातीचा, अमक्या देशाचा, तमक्या देशाचा, अमुक विचारांचा, तमुक संस्थेचा, इंजिनिअर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, गृहिणी, नोकरदार महिला... असंख्य प्रकार. याला ते व्हायचंय किंवा त्याला हे व्हायचंय. किंवा याच्यापेक्षा हे चांगलं, त्याच्यापेक्षा ते चांगलं. नाही तर धर्म मिटवून टाका, जाती गाडून टाका, स्त्री-पुरुष समानता अन अशाच असंख्य, अनाकलनीय गोष्टी. त्यावरून वाद, संघर्ष, वेळ- पैसा- उर्जा- बुद्धी- शक्ती- सगळ्याचा अपव्यय. अशा तऱ्हेने विचार करताना, व्यवहार करताना आपण बहुतांश स्वप्नात वावरत असतो. जगाच्या अंतापर्यंत हे भेद, विविधता राहणारच आहे. फरक राहणारच आहे. आजचे फरक संपवले तर या नवोन्मेशशाली, नित्य सृजनशील विश्वात नवे भेद जन्म घेतील. संघटन अन विघटन, समानता अन वर्गीकरण, एक होणे अन विलग होणे या परस्पर विरोधी क्रिया सतत, क्षणाचीही उसंत न घेता सुरु असतात अन त्यातच विश्वाच्या अस्तित्वाचं रहस्य आहे. म्हणूनच भेद मिटवा, गाडून टाका वगैरे करून पूर्णत्व प्राप्त करता येणे शक्यच नाही. तर आहे त्या गोष्टीचे उन्नयन करूनच पूर्णता गाठणे शक्य आहे. ज्या पूर्णतेच्या शोधात जाणीवपूर्वक वा अजाणता प्रत्येक कण धडपडतो आहे, ती पूर्णता- आहे त्या गोष्टीला व्यापक करीत, तिचे उन्नयन करीत प्राप्त होऊ शकेल. त्याला दुसरा मार्ग नाही. आपण जे आहोत तेच चांगलं होणं, अधिक चांगलं होणं, अधिक अधिक चांगलं होणं... स्वामीजींच्या त्या मार्गदर्शनाचा मला समजलेला हा मतितार्थ आहे.

आपल्या एकूणच जीवनात discourse ची ही दिशा राहिली तर, केवळ आध्यात्मिक नव्हे; सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, बौद्धिक सगळ्याच क्षेत्रात आणि व्यक्तिगत जीवनातही एक नवीन उर्जा, नवीन चैतन्य आणि सुख- शांती- सार्थकता येऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १२ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा